आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उडता उंट आणि ओंडका ! (रसिक, संजय भास्कर जोशी)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुळचट या एकाच शब्दाने वर्णन करता यावे, अशा गोष्टी एका मागोमाग एक घडताना दिसतात, अशा काळात आणि अशा समाजात वावरताना मेंदूला झंडू बाम लावावा का मनाला अमृतांजन चोपडावे, आणि झक्कास ताणून द्यावी? थोडाफार जरी शहाणपणा शिल्लक असेल तरी अशा भवतालात जगणे अवघड आहे. यह मेरा सिर्फ हवा में ‘उडता’ हुवा विधान नही, उदाहरण म्हणून या गोष्टी पाहा ना -

१. देव, धर्म आणि श्रद्धेच्या अंधारात शेकडो वर्षे स्त्रियांना कोंडून ठेवले, असे म्हणणाऱ्यांनीच मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन करणे;
२. अवघ्या देशाने (खरे तर जगाने) ज्यांना महान म्हणून गौरवले, त्या मंगेशकर-तेंडुलकरांवर कुठच्या तरी कोपऱ्यात कुणीतरी टिंगल केली म्हणून आमच्या आदरस्थानाला धक्का पोहोचला, अशी सार्वत्रिक बोंब उठणे;
३. ज्या गोष्टी देवाला आवडणे शक्यच नाही, त्या गोष्टी, म्हणजे अश्लील गाण्यांचा दणदणाट, मद्यधुंद नाच वगैरे सर्रास देवाच्या उत्सवात करणे;
४. आजूबाजूला पोलिस, कंडक्टर, रिक्षावाले, सातवी-आठवीतली मुले इतकेच काय, अनेक आईबाप ज्या शिव्या सर्रास देतात, त्या सिनेमात आल्या तर त्यामुळे समाज बिघडेल, असे म्हणत त्या सेन्सॉरच्या कात्रीने कापून टाकणे...

यादी बरीच मोठी होईल. तुम्हीच सांगा, असल्या घटनांना खुळचट म्हणावे नाहीतर काय म्हणावे? तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य लोकांना जे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट दिसते, ते जेव्हा अनेक महनीयांना दिसत नाही, तेव्हा गडबड नेमकी कशात आहे? नागडा राजा नुसताच घरा-दरबारात हिंडत नाही, तर फॅशन शोच्या ‘रँप’वरून दिमाखात चालतो आणि अनेक जण त्याच्या फॅशनेबल पोशाखाची तारीफ करतात, तेव्हा आपलीच गोची होते. बरं, अशा वेळी प्रसारमाध्यमांनी जागल्याचे किंवा सामूहिक शहाणपणाचे काम करावे म्हटले, तर असल्या ‘खुळचटपणाचे’ बक्षीस काही कोटी रुपयांत मिळत असल्याने, तेही या यात्रेत सामील झालेले दिसतात. खरे तर मिरवताना दिसतात.
नाही, प्रश्न चेष्टेवारी न्यावा असा नाही. सज्जनहो, हा खरेच गंभीर प्रश्न आहे. ‘सुमारांची सद्दी’ हा शब्दप्रयोगदेखील अतिवापराने ‘क्लिशे’ होत जावा, आणि ‘यड्याचा बाजार अन् खुळ्याचा शेजार’ ही स्थिती वास्तव बनावी, अशा या काळात काय करावे, हा खरेच गंभीर प्रश्न आहे. पण होतं काय की, सुरुवातीला हा प्रश्न गंभीर वाटतो आणि आपणही विचार करतो, पण अशाच गोष्टी सातत्याने आणि सर्वत्र घडतात, तेव्हा एक तर आपण ‘सिंहासन’ सिनेमात शेवटी दिगू पत्रकार (निळू फुले) जसा वेडा होतो, तसे खुळे होतो किंवा बधिर होत नकळत त्या खुळ्या यात्रेचे भोई होतो. दोन्ही पर्यायांत आपल्या आत्म्याची हत्या अटळ असते. जे थोडे आकांताने या सामूहिक आणि सार्वत्रिक खुळेपणाविरुद्ध आवाज उठवत राहतात, त्यांचा आवाज क्षीण होत जाताना पाहणे तर अधिकच दयनीय असते.

बरे, अशा काळात आणि समाजात या सार्वत्रिक खुळाचाराचे दर्शन घडवण्याचे आणि समाजाला जागे करायचे काम साहित्याचे आणि कलेचे असते, असे म्हणावे तर त्या कलेलाही चिरडून, कोंडून, दाबून आणि दडपून टाकण्याचे प्रयत्न होतात. खरे तर ही म्हणजे उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी! त्या कथेत उंटाच्या पाठीवरचे ओझे वाढत वाढत त्या शेवटच्या काडीने अखेर उंट बसकण मारतो, पण आपल्या समाजाचा उंट तर खुळचटपणाच्या काड्यावर काड्या पाठीवर घेतच चाललेला दिसतोय. पहलाज निहलानीने सेन्सॉरच्या नावाखाली अाविष्काराची जी बेधुंद गळचेपी चालवलीय, तिला काडी कसे म्हणावे; तो तर उंटाला हमखास वाकवेल असा ओंडका आहे, तरीही समाजाचा उंट डगमगत चालतच राहिलाय, आपली खुळी चाल. आता याला काय म्हणावे? बरे अशा काळात संवेदना थोडीफार शिल्लक असणाऱ्या कलावंतांनी थोडाफार आवाज उठवायचा प्रयत्न केला, तर लगेच त्यांच्यावर ‘तथाकथित’, ‘पुरोगामी’, ‘चमचे’ वगैरे शब्दांचे भाले फेकून त्यांना रक्तबंबाळ करणारी झुंड तयारच असते.

ज्यांना प्रियदर्शिनी म्हणून प्रचंड गौरवाने डोक्यावर घेतले, त्या इंदिरा गांधींनादेखील पराभवाची धूळ चारणारी आणि ज्या जनता पक्षाला तितक्याच प्रचंड अपेक्षेने सत्ता दिली, त्यांनाही वेळ येताच खाली खेचणारी ही जनता मूर्ख नाहीये, हे साधे सत्य या सेन्सॉर बोर्ड नामक खुळचट समूहाला कळत कसे नाही? कलेने ऊठसूट समाज घडत वा बिघडत नसतो तर कलेच्या आरशात स्वत:ला बघून शेवटी समाज वस्तरा आपल्याच गालावर चालवून काय ते भलेबुरे करत असतो. पण या जनतेवर सतत संस्कार करायची आपली जबाबदारीच आहे, असे मानणाऱ्यांच्या या खुळचटपणाला काय म्हणावे? मुळात कशा आणि कोणत्या शिव्या कधी आणि कुणाला द्याव्या, हे शिकण्यासाठी अनुराग कश्यपचा सिनेमा पाहायची गरज नसते आणि कुष्ठरोग्यांसाठी आपले अवघे जगणे देण्यासाठी बाबा आमट्यांना वि. स. खांडेकरांची एखादी कादंबरी वाचायची गरज नसते. ‘श्यामची आई’ वाचून आदर्श श्यामचा कारखाना निघत नसतो आणि शक्ती कपूरचे सिनेमे बघून गल्लोगल्ली बलात्कारी तयार होत नसतात, हे समजून घ्या यार. कलेचे प्रयोजन दुपदरी असते : पहिले म्हणजे निखळ आनंद आणि मनोरंजन; आणि दुसरे म्हणजे जग आणि जगण्याचे भान वाढवणे. नेहमीची उपमा द्यायची, तर दाढी करताना आरसा हवाच, पण दाढी टोचते आपल्यालाच आणि वस्तरा आपल्याच गालावर आपणच चालवायचा असतो.

लक्षात घ्या सज्जनहो, दाढी फार वाढली आहे, हे आपल्याला जाणवत असते, तरी आरशात बघूनच आपल्याला ते समजते, मग आपण दाढी करायचा विचार करतो. साहित्य, चित्रपट, नाटक या कला या आरशासारख्या असतात. एखादा अनुराग कश्यप, विजय तेंडुलकर किंवा श्याम मनोहर त्याच्या त्याच्या पद्धतीने हा आरसा आपल्यासमोर धरत असतो. तो बघून आपण अस्वच्छ दिसत असलो, तर स्वत:ला स्वच्छ करायचे असते. पण लक्षात घ्या, आपण नेहमी स्वच्छ आणि सुंदरच असल्याचे दाखवणारा जादूचा आरसा म्हणजे कला नव्हे. ती शुद्ध फसवणूक होय. या सेन्सॉर बोर्डाला तसली खुळचट फसवणूक हवी आहे. खुरटी दाढी वाढून आजारी आणि भकास दिसणारा चेहरा दाखवणारा आरसा नकोय. आणि तो आरसा दाखवणाऱ्या अनुराग कश्यपसारख्या कलाकारांचा आवाज दडपून टाकायला पाठीशी मोठी झुंड हवी, म्हणून ते ‘होय, आहोत आम्ही पंतप्रधानांचे चमचे’ असे अभिमानाने सांगत आहेत. सुदैवाने लोकशाहीच्या चार खांबांपैकी न्यायसंस्थेने विश्वासाची बूज राखली आणि ‘उडता पंजाब’मधले ८०-९० कट रद्द करून एकच कट केला, आणि अाविष्कारस्वातंत्र्याला धुगधुगी दिली. (कुणी म्हणतात तो ‘कट’ सेन्सॉरच्या नाकाचाच होता!) असो. तर सज्जनहो, ‘उडता पंजाब’ प्रकरणाचे हे खरे तात्पर्य आहे! तुम्ही म्हणाल, संभाविता, तात्पर्य नको, नेमका सल्ला दे...

संजय भास्कर जोशी
sanjaybhaskarj@gmail.com
बातम्या आणखी आहेत...