आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंधाराच्या निषेधाने उजेड नाहीत होत !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवसामागून दिवस जात आहेत आणि रोजच्या रोज आपली ऑलिम्पिक पदकांबाबत निराशा होते आहे. १२५ कोटींच्या देशाची ओंजळ रिकामीच राहात आहे. खूप आशा निर्माण करणारी दीपा कर्माकर, धनुर्विद्येत अपेक्षा असणाऱ्या दीपिका कुमारी, बोंबायला देवी, इतर वेळी अनेक स्पर्धा गाजवणाऱ्या सानिया आणि सायना, शिवाय महिला आणि पुरुष हॉकी संघ, नेमबाजीत अभिनव बिंद्रा, गगन नारंग... एकेक करून आपले खेळाडू रिकाम्या ओंजळीनिशी स्पर्धेतून बाहेर फेकले जाताहेत. हा लेख छापला जाईल तेव्हा, कदाचित आपल्या ओंजळीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकी काही पदके लखलखत असतील किंवा कदाचित ओंजळ रिकामीच असेल. या निमित्ताने दर चार वर्षांनी होणाऱ्या चर्चांना एव्हाना रंग भरायला लागला आहे. त्यात शोभा डे या चटकदार लेखन करणाऱ्या उच्चभ्रू सेलिब्रिटीने नेहमीप्रमाणे ‘रिओला जा, सेल्फी काढा आणि रिकाम्या हाताने परत या’ असे बोचरे उपरोधिक उद‌्गार काढून चर्चकांना नवे तेल-पाणी पुरवले आहे. खेळाडू बाजूला राहून या ‘डे’ बाईंची धुलाई करण्यात माध्यमे आणि क्रीडाप्रेमी धन्यता मानत आहेत. या निमित्ताने मला एक गमतीदार (आणि संभावित) प्रश्न सुचला आहे. बघा : तथाकथित देशद्रोह्याचा निषेध करून देशप्रेम सिद्ध होत असेल, तर कार्यालयात काम न करणाऱ्यांचा शाब्दिक निषेध करून उरलेल्या कामचुकार कर्मचाऱ्यांना आपली कार्यनिष्ठा सिद्ध करून प्रमोशनवर अधिकार सांगता येईल काय? प्रश्न गमतीचा वाटला तरी पण दिवस तर असेच आले आहेत, खरे. गमतीचा भाग सोडा सज्जनहो, खरा तत्त्वज्ञानात्मक प्रश्न असा निर्माण होतो, की अंधाराचा निषेध करून उजेड निर्माण करता येतो काय?

वरवर गमतीचा वाटेल, पण खोलात जाल तर या प्रश्नाचे एकेक पदर अस्वस्थ करायला लागतील बघा. अंधाराचा (पक्षी : नकारात्मकतेचा) निषेध तर करायलाच हवा. पण अंधाराचा निषेध कितीही आवश्यक आणि अगत्याचा असला तरी केवळ त्याने नाही हो उजेड निर्माण होत. त्यासाठी आपल्यालाच पुढे होऊन पणती पेटवावी लागते. तेल घालावे लागते, वात वळावी लागते आणि काडी जाळून वात पेटवावी लागते. शिवाय प्रसंगी हाताचा किंवा प्राणाचा आडोसा करून वात तेवती ठेवावी लागते. केवळ अंधाराच्या निषेधाने नाही काम भागत. भवतालात अनेक बाबतीत अंधार आहे. आणि त्याचा विविध प्रकारे निषेध करणारे अनेक लोक आहेत. पण उजेड होत नाहीये. खरे आहे ना?
किती उदाहरणे देऊ? कोणत्या क्षेत्रातली उदाहरणे देऊ? गायींविषयीची अनास्था आणि त्याच वेळी गायीच्या निमित्ताने केलेली निर्घृण हिंसा. बलात्काराच्या वाढत्या घटना आणि त्याच वेळी अनेक माध्यमातून वाढलेला निरर्गल थिल्लरपणा. राजकारण्यांच्या भ्रष्ट आचाराच्या नवनव्या घटना आणि त्याचबरोबर एकेका खटल्याला लागणारी वर्षामागून वर्षे. एकीकडे जो या देशाचा धर्म होऊन बसलाय, त्या क्रिकेटमध्ये आलेला प्रचंड बाजारूपणा आणि त्याच वेळी अतिरेकी क्रिकेटप्रेमामुळे इतर खेळांची झालेली वाताहत... यादी वाढतच जाईल. आणि या सर्व बाबतीत रोज रात्री नऊ वाजता सर्व चॅनेलवर निषेधाच्या आरोळ्या आणि गर्जना ऐकायला मिळतात. संवेदनशील माणसाने नऊ वाजता कोणताही न्यूज चॅनेल बघू नये, अन्यथा भवतालाच्या विदारक अवस्थेमुळे नंतर झोप लागणेच अशक्य व्हावे. तरीही मला खात्री आहे की, निषेधाच्या आरोळ्या ठोकणारे हे बहुतांश वाचावीर नंतर रीतसर झोपी जातच असतील. ‘तू स्वत: चार पणत्या पेटवल्या असशील तरच अंधाराचा निषेध करायला ये, असा नियम केला तर या न्यूज चॅनेलवर किती जण निषेधाच्या चर्चा करायला येतील? तुम्हीच विचार करा. अँकर काय, हातखंडा चर्चक काय, आणि जगातल्या कोणत्याही विषयावर हमखास मते मांडणारे राजकीय पक्षांचे प्रवक्ते काय; रोज नव्या विषयावर चर्चा करून कालच्या विषयाला विसरून जाणारे, हे ‘निषेधमहर्षी’ नक्की काय योगदान देतात उजेडाच्या निर्मितीसाठी? साधी गोष्ट आहे. युद्धावर लढणाऱ्या सैनिकांच्या जेवणाची सोय करायला आचारी हवेच. पण जेव्हा सैनिकांपेक्षा आचारीच जास्त होतात, तेव्हा युद्धे जिंकावी कशी आणि कोणी?

तर बोलत होतो ऑलिम्पिकविषयी. पदके मिळाली नाहीत, तर त्याची सतरा प्रकारे कारणमीमांसा आणि छप्पन्न प्रकारे विश्लेषण करणारे गल्लीगल्लीत भेटतील. आणि खात्री बाळगा, त्यांनी सांगितलेली बहुतेक सर्व कारणे समान असतील आणि आपल्याला ती नक्की पटतील. मी सांगू, काय असतील त्यांच्या गहन विश्लेषणातून बाहेर आलेली कारणे? १)आपल्या देशात क्रीडा संस्कृतीच नाही. २)राजकीय हस्तक्षेपाचा अतिरेक आहे आपल्याकडे.
३)क्रिकेटला अतिरेकी महत्त्व दिल्याने हे सारे होत आहे. ४) मूलभूत सुविधादेखील नसतात आपल्या खेळाडूंना.
५) आपल्याकडे साधा शारीरिक शिक्षणाचा विषयदेखील अनिवार्य नाही अभ्यासक्रमात... खरे आहे ना? हीच आणि अशीच कारणे सापडतील की नाही? जरा जुनी, म्हणजे चार किंवा आठ वर्षांपूर्वीची वर्तमानपत्रे काढा, जेव्हा आधीचे ऑलिम्पिक चालू होते, त्याही वेळी याच कारणांची चर्चा झाली होती. याच गोष्टींचा निषेध केला होता. काय झाले? झाला उजेड? नुसता शोभा डे यांचा निषेध करून आणि शिवीगाळ करून काय साधणार आहे? बाईंचे चुकलेच. एकट्या खेळाडूंवर असे उपरोधाने आणि अपमानास्पद शब्दात खापर फोडणे गैरच आहे. पण बाईंच्या घरावर मोर्चे काढून आणि नऊ वाजता चॅनेल्सवर ‘डे’ली शोभा वगैरे फुटकळ कोट्या करून उजेड पडणार नाही, हे मात्र नक्की. (असेच त्या तन्मय भटचे केलेले निषेध कुठच्या कुठे विरले, ते स्मरणात तरी आहे का कुणाच्या?) महिनाभरात हे सगळे विसरून जाऊन पुन्हा आयपीएल नामक सर्कसची वाट बघणाऱ्यांना खरं तर असं काहीदेखील करायचा अधिकार नाही. आज (एरवी कधीही आपण चुकूनदेखील पाहात नाही त्या जिमनॅस्टिकच्या स्पर्धा रात्री जागून पाहताना) दीऽऽपा, दीऽऽऽपा असा गजर करणारे देशप्रेमी दोन महिन्यांनंतर दीपा कर्माकर नावाची कुणी भारतीय तरुणी अस्तित्वात आहे, हेदेखील विसरून जातील. मग उरतील फक्त कोहली आणि रहाणे, रोहित आणि अश्विन. हो की नाही?

मुळात खेळ आणि कला या गोष्टींकडे बघायचा आपला दृष्टिकोन काय आहे, तो तपासून बघू या का? साधारण इयत्ता सातवी-आठवीनंतर खेळणारा किंवा चित्रं वगैरे काढणारा मुलगा किंवा मुलगी आपल्याच घरात उपजला/ली असेल, तर आपली प्रतिक्रिया किती हिंस्र असते, याचा विचार करा. ‘लहान आहेस का आता खेळत बसायला?’ ही आपली पहिली प्रतिक्रिया असते. आपला पहिला निकष असतो : याने नोकरी मिळेल काय? डॉक्टर, इंजिनिअर, सीए, आर्किटेक्ट, गेला बाजार एम. कॉम., अगदीच ते नाही तर निदान बी. एड., डी. एड. काहीतरी कर आणि महिन्याच्या महिन्याला काय दहा, वीस, पन्नास, ऐशी हजार ते दोन-पाच-दहा लाख मिळव, या एकमेव अपेक्षेने आपली पाल्य-संवर्धन-संस्कृती बरबटलेली आहे. सांगायचा मुद्दा, निषेधाच्या घोषणा आपणच आपल्याच कानात ओरडायला हव्या आणि बोटे आपल्याकडे वळवायला हवी. असो. तुम्ही म्हणाल, तुझादेखील नुसता कोरडा निषेध पुरे संभाविता, करावे काय मग?

संभाविताचा सल्ला : सुरुवात म्हणून किमान त्याच त्या दळभद्री सासू-सुना किंवा ‘इसकी बीबी उसके घर उसका शोहर इसके घर’ टाइपच्या रटाळ मालिका टाळून जरा क्रिकेटेतर खेळ दाखवणाऱ्या वाहिन्या तरी बघायला लागू या? किमान आपल्या घरात तरी ‘स्ट्रिक्टली’ संध्याकाळचा पाच ते आठ हा वेळ टीव्ही बंद ठेवून आपल्या मुलांना मैदानात पिटाळू या? शाळेत शारीरिक शिक्षणाचा तासच नव्हे तर गुणपत्रिकेत त्या विषयाचे स्थान अनिवार्य करू या? अगदी क्रिकेटबद्दलदेखील बोलायचे तर बाजारू आयपीएलला नकार देऊन देशांतर्गत रणजी करंडकाचे सामने पाहू या? आपल्या मुलाने अभ्यासातल्या (मार्कांच्याऐवजी नाही तरी निदान) मार्कांबरोबरच, एका तरी खेळात प्रावीण्य मिळवायलाच हवे, असा आग्रह धरू या? थोडा विचार कराल तर बरेच काही आहे करण्यासारखे. गमतीत म्हणायचे, तर ‘क्रीडासंस्कृती’ म्हणजे काही ब्रिटिशांची राजवट किंवा परदेशी ब्रँड्सची आवड नाही बाहेरून कुणी लादायला, ती आपली आपणच निर्माण करायची आहे.

संजय भास्कर जोशी
sanjaybhaskarj@gmail.com
लेखकाचा मोबाइल क्रमांक - ९८२२००३४११
बातम्या आणखी आहेत...