आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेमेचि येतो..! (दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसाला नक्की काय हवं असतं, ‘अंधाराचा अभाव’ की ‘उजेडाचा प्रभाव’? वाईट गोष्टींना सोडचिठ्ठी, का काहीतरी आनंददायक नवे? नाशिकमध्ये ‘दिव्य मराठी’च्या ‘लिटररी फेस्टिव्हल’मध्ये तरी बऱ्याच अंशी ‘अंधाराचा अभाव’ नक्कीच आढळून आला. सांगायचंय ते त्याविषयी.

नेमेचि येतो मग पावसाळा, तसाच येतो साहित्यसोहळा॥
रुसवेफुगवे तीच भांडणे, निवडणुकीचे तेच तराणे
चॅनलवाले खुश होउनी, आनंदाने गाती गाणे
मायबोलीच्या प्रेमाचा चला दाखवू उमाळा
आला आला आला जनहो, साहित्याचा सोहळा॥

अशी गाणी गायचा ऋतू आला बरं का पुन्हा. येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात डोंबिवलीमध्ये नव्वदावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे. एव्हाना टीव्ही चॅनेल्स आणि वर्तमानपत्रे सरसावली असतील. कोणता नवा वाद, नवी भानगड, भांडण... काय चघळायला मिळतंय, या अपेक्षेत मनोरंजनप्रेमी मराठी रसिकही आतुर झाले असतील. (त्या मानाने संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक भलतीच सपक चाललीय अजून तरी!) साहित्य संमेलनात विविध घटकांनी काय करायला हवे आणि काय टाळायला हवे, यावरचे (जुनेच, पण शब्दांना नव्याने धार लावलेले) लेख रविवार पुरवण्यांमधून आता छापले जातील. नव्याने आनंद यादव वाद, श्रीपाल सबनीस वाद वगैरे घटनांच्या आठवणी चघळताना यंदा काय करमणूक होते, त्याकडे साहित्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे.

नाशिकमध्ये ‘दिव्य मराठी’ने मागच्या शुक्रवार-शनिवार-रविवारी अडीच दिवसाचे ‘लिट फेस्ट’ याने की एक मिनी साहित्य संमेलन भरवले, ते या पार्श्वभूमीवर. त्या निमित्ताने मनात विचार आला, की माणसाला नक्की काय हवं असतं, ‘अंधाराचा अभाव’ की ‘उजेडाचा प्रभाव’? वाईट गोष्टींना सोडचिठ्ठी, का काहीतरी आनंददायक नवे? साहित्यसंमेलनातल्या त्याच त्या वैतागदायक बाबी टाळल्यानं मोठाच आनंद होतो, का काहीतरी अभिनव आणि मन प्रसन्न करणारे घडल्याने छान वाटते? नाशिकमध्ये ‘दिव्य मराठी’च्या ‘लिटररी फेस्टिव्हल’मध्ये तरी बऱ्याच अंशी ‘अंधाराचा अभाव’ नक्कीच आढळून आला. सांगायचंय ते त्याविषयी. प्रामाणिकपणे सांगायचं तर नाशिकमध्ये ‘दिव्य मराठी’नं जे ‘लिट फेस्ट’ भरवलं, ते आम्हा साहित्यिक लोकांना तरी एकदम पसंत पडलं. इथे आम्हा लेखकांमध्ये मी जाणीवपूर्वक रंगनाथ पठारे, प्रवीण बांदेकर, अभिराम भडकमकर, हरी नरके, राजीव साने वगैरे साहित्यिक गृहीत धरतोय. येस्स! आम्ही लोक खूश झालो, या संमेलनावर. ‘रसिक’(च्या) वाचकांना त्याची कारणे सांगायला हवीत. म्हणून हा लेख मुद्दाम याच विषयावर.

मुळात साहित्य संमेलनातलं काय आवडत नाही आम्हाला? तर आधी चार-सहा महिने गाजणारे अध्यक्षाच्या निवडीचे भंपक वाद आणि निवडणुकीचा खुळचट फार्स. चार-सहा साहित्य परिषदा आपल्या हजारो सभासदांपैकी जाहीर न केलेल्या अनाकलनीय निकषांवर अगदी मोजके मतदार निवडणार आणि अशा साताठ परिषदांतले असले हजारेक मतदार अध्यक्ष निवडणार, ही पद्धतच मुळात भंपक आहे. एक गंमत म्हणजे, दोन वेळा राज्य सरकारची आणि बाकी अनेक वेळा इतर पारितोषिके मिळवून आणि नावावर साताठ पुस्तके असूनही दर वर्षी मी या अध्यक्ष निवडणुकीच्या मतदारात असेन की नाही, याचे कुतूहल मला अध्यक्ष कोण निवडून येईल, याच्यापेक्षा जास्त असते. त्या यादीत मी कधी असतो; तर कधी नसतो. असो. तर एकूणात हा फार्स या नाशिकच्या संमेलनात नव्हता, ते एक बरे झाले. सई परांजपे या कुणाचाच विरोध नसेल, अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाच्या हस्ते दिमाखदार उद‌्घाटन झाले.

साहित्य संमेलनात साहित्यिक सोडून इतर अनेकांना मानपानाची आणि सरबराईची खात्री असते, पण बहुतेक वेळा साहित्यिक कुठेतरी कोपऱ्यात पडण्याची शक्यता असते. (दर संमेलनात काही अतृप्त साहित्यिक अशी बोंब मारतातच) पण आतली बात सांगायची, तर नाशिकचं संमेलन सर्वच्या सर्व साहित्यिकांसाठी पंचतारांकित हॉटेलात (प्रत्येकाला सेपरेट रूम हं!) उतरवून वर येण्या-जाण्याची सुखकर कार्समधून व्यवस्था वगैरे म्हणजे सुखद धक्का होता.

पण हा वरवरचा आणि गमतीचा भाग सोडा. प्रशांत दीक्षित आणि त्यांच्या टीमने केलेले परिश्रम संमेलनात जागोजागी दिसत होते. चर्चांचे विषय आणि वक्तेही औचित्य साधणारे होते. सई परांजपे, केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग, आशुतोष गोवारीकर वगैरे सेलेब्रिटीजबरोबरच अनेक नवोदित साहित्यिकदेखील व्यासपीठावर हजेरी लावत होते. घरचा माणूस असल्याने, मी तीन सत्रांमध्ये सहभागी झालो होतो, त्यामुळे स्वानुभवावरून सांगतो, की नियोजन, आयोजन, प्रेक्षकांचा प्रतिसाद या सर्वच बाबतीत खरोखर मनापासून समाधान वाटले. ‘दिव्य मराठी’च्या टीमचे कौतुक करावे तेवढे थोडे. म्हणा, नुसते कौतुक करेल तो मराठी माणूस कसला, तेव्हा चार दोन सूचनाही करतोच. अशा सुरेख साहित्य सोहळ्यात पुस्तकांची उणीव मात्र भासली. पुस्तकांचे काही स्टॉल्स असते, तर अशा वाङ‌‌‌्मयीन पर्यावरणात रसिकांनी भरभरून पुस्तकखरेदी नक्की केली असती. दुसरे म्हणजे, काही सत्रात तरी वक्ते निवडताना, त्या क्षेत्रातले कर्तृत्व आणि चर्चासत्र हाताळण्याची परिपक्वता यांचे अधिक चांगले नियोजन हवे होते, असे वाटले. पण एकूणात मी नेहमी म्हणतो, की अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या जोडीलाच गावोगावी अशी छोटी छोटी संमेलने व्हायला हवी, अगदी तसे आदर्श झाले हे छोटेखानी ‘दिव्य मराठी’चे संमेलन.

आता या निमित्ताने एकूण साहित्य संमेलन या विषयावर काहीतरी बोलायलाच हवे ना संभाविता? निवडणुकीतले गोंधळ, संमेलनातला खर्चिकपणा, राजकारण्यांची व्यासपीठावरची घुसखोरी, त्याच त्या विषयावरचे त्याच त्या वक्त्यांचे कंटाळवाणे परिसंवाद, संमेलनाच्या नियोजनातले गोंधळ या विषयांवर अनेकांनी अनेक वेळा बोलून झाले आहे, तेव्हा ते सोडा. समाजातले अनेक असंतुष्ट गट अशा चर्चा करतच राहणार आहेत. त्यातून होणाऱ्या मनोरंजनाचा जरूर आनंद घ्या. अगदी मनसोक्त घ्या. पण आपणही लगेच त्या गटात सामील व्हायला हवे, असे नाही. आपण जर रसिक वाचक असलो, पुस्तकांवर आपलं प्रेम असलं, तर आपल्यापुरता आपण हा सोहळा अद्भुत, सुंदर करू शकतोच. कसा? तेच सांगणार आहे.

संजय भास्कर जोशी
sanjaybhaskarj@gmail.com
बातम्या आणखी आहेत...