आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यिक गर्भजलपरीक्षेचा धिक्‍कार असो ! (संजय भास्‍कर जोशी)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडच्या महत्त्वाच्या अशा दोन कादंबऱ्यांच्या मलपृष्ठावरील मजकुराने, म्हणजे ज्याला आपण ब्लर्ब म्हणतो, त्या मजकुराने मला कोड्यात टाकले आहे. दोन्ही कादंबऱ्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे, श्याम मनोहर यांची ‘शंभर मी’, तर दुसरी मकरंद साठे यांची ‘काळे रहस्य’. श्याम मनोहर हे एक महत्त्वाचे लेखक आहेत. ‘कळ’, ‘शीतयुद्ध सदानंद’, ‘उत्सुकतेने मी झोपलो’ अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या मराठी साहित्यात महत्त्वाच्या मानल्या जातात.

त्यांच्या कादंबऱ्यांचा वाचकवर्ग संख्येने लहान असला तरी अत्यंत उच्च अभिरुचीचा आणि दर्जेदार आहे. श्यामरावांच्या अलीकडच्या ‘शंभर मी’ या कादंबरीचा ब्लर्ब वाचकाला पुरेसा घाबरवून टाकणारा आहे. सलील वाघ यांनी लिहिलेल्या ब्लर्बवरची ही वाक्ये पाहा :
“विनानेपथ्याच्या निवेदनभूमीवर ‘शंभर मी’ या कथननाट्याची सुरवात होते... इथे बऱ्याच ठिकाणचा मुख्य मजकूरच जाणीवपूर्वक डिलीट केला आहे आणि केवळ कथनपूर्व मजकूर आणि कथनोत्तर मजकूर (प्री-टेक्स्ट आणि पोस्ट-टेक्स्ट) वाचकांच्या हाती सोपवला आहे. कित्येक वेळा टेक्स्टलेसनेसचा (मजकूरविहीनतेचा) चक्रावून टाकणारा अनुभव वाचकाला देणारा, मराठीतला हा एक अनोखा प्रयोग आहे... यातल्या परस्परसुसंगतीचे दोर लेखकाने मुद्दाम कापून टाकले आहेत. वाचकाने स्वत:च्या वाचनसाक्षरतेला आवाहन करत, तिची परीक्षा बघत स्वत:च्या मनाने ते जुळवून काढायचे आहेत. मराठी वाचक अशा प्रयोगाला धीराने सामोरे गेले तर या परीक्षेत नक्की पास होतील.”
मुख्य परीक्षेआधी (त्याहूनही अवघड) प्रिलीमची परीक्षा असते, तसा हा ब्लर्ब आहे. तात्पर्य : ब्लर्बमधून आपल्याला फारसा बोध होत नाही; मात्र कशाला तरी ‘सामोरे’ जावे लागणार आहे (तेही धीराने), याची पूर्वकल्पना देण्यात हा ब्लर्ब यशस्वी होतो. या कादंबरीत काय आहे, त्याचे वर्णन करताना सलील वाघ लिहितात, ‘या पुस्तकात शेकडो पात्रे आहेत, प्रसंग आहेत, विधाने, प्रश्न आणि प्रमेये आहेत. काही ठिकाणी त्याला सामाजिक स्पर्शस्थाने आणि मोक्षस्थाने आहेत, तर काही ठिकाणी कालसंवेद्य स्पर्श-मोक्षस्थाने आहेत.’ सर्वसाधारण वाचकाला ‘कालसंवेद्य स्पर्श-मोक्षस्थाने’ वगैरे भानगडी कळायचा काहीच मार्ग किंवा शक्यता नसल्याने एकूणात तसा हा ब्लर्ब निरुपयोगी आहे; पण तो निरुपद्रवी आहे, असे म्हणणे अवघड आहे. कारण नाही म्हटले तरी त्याने आपल्या मनात जबरदस्त धडकी भरतेच. म्हणूनच सर्वसामान्य सुज्ञ वाचक हा ब्लर्ब वाचून मुकाट्याने (आणि काही इजा व्हायच्या आत, त्वरेने) हे पुस्तक हातातून खाली ठेवेल, विकत घेऊन वाचायचा विचार करणे दूरच.
दुसरा ब्लर्ब ‘काळे रहस्य’ या मकरंद साठे यांच्या ‘पॉप्युलर प्रकाशना’ने प्रसिद्ध केलेल्या कादंबरीचा आहे. तो विख्यात समीक्षक हरिश्चंद्र थोरात यांचा आहे. या ब्लर्बमध्ये हरिश्चंद्र थोरात म्हणतात, ‘या रहस्यमय कथानकाला समकालीन समाजाच्या जडणघडणीचा आणि सांस्कृतिक व्यवहारांचा ठोस संदर्भ आहे. सामाजिक-सांस्कृतिक घटितांचे सातत्याने मानसिक कोटींमध्ये रूपांतर होत राहिल्यामुळे ही कादंबरी वाचकाच्या अर्थांनिर्णयनक्षमतेला आवाहन करत राहते. सर्जनाची शक्यता धूसर झालेल्या कालखंडात जगण्यातील अर्थपूर्णतेचा वेध घेण्याचे अपयशी ठरणारे प्रयत्न ‘काळे रहस्य’ने अधोरेखित केले आहेत... रहस्यकथेच्या रूपबंधाचा अर्थपूर्ण उपयोग करणारी आणि मानवी व्यवहार आणि सैद्धांतिकता यांचा अनुबंध शोधणारी ‘काळे रहस्य’ समकालीन परिस्थितीवरील एक गंभीर भाष्य आहे.’
मकरंद साठे यांच्या या कादंबरीवरचे हे मौलिक भाष्य आहे. कादंबरीच्या गाभ्यावर ते प्रकाश टाकते आणि कादंबरीवरचे आपले नेणिवेत तयार झालेले मत, नेमक्या शब्दात व्यक्त करते. पण प्रश्न इतकाच आहे की, ब्लर्बचे प्रयोजन काय, आणि ब्लर्ब कोण आणि कधी वाचतो? हा मोठा कळीचा प्रश्न आहे. समीक्षालेख आणि ब्लर्ब यात फरक असावा, असे मला वाटते.
थोरात सरांचा हा ब्लर्ब वाचून मकरंद साठे, श्याम मनोहर, हरिश्चंद्र थोरात यांच्यासारख्या लेखकांच्या काहीशा अवघड लेखनाशी अपरिचित असणारा सर्वसामान्य वाचक, जो कदाचित अरुण साधू, जयवंत दळवी, मिलिंद बोकील, मेघना पेठे, सानिया यांचे लेखन वाचत असेल, तर त्याला ‘सामाजिक-सांस्कृतिक घटितांचे सातत्याने मानसिक कोटींमध्ये रूपांतर’ किंवा ‘मानवी व्यवहार आणि सैद्धांतिकता यांचा अनुबंध’ किंवा ‘अर्थांनिर्णयनक्षमतेला आवाहन’ या शब्दसमूहांचा काहीच अर्थबोध न होण्याची शक्यता आहे. सलील वाघ यांचा ब्लर्ब तर याहूनही अवघड भाषेतला आहे. त्यामुळे वाचनालयात, प्रदर्शनात किंवा पुस्तकाच्या दुकानात पुस्तके घेण्यापूर्वी ब्लर्ब वाचणाऱ्या बहुसंख्य वाचकांना ही पुस्तके वाचायला घेण्यापासून हे ब्लर्ब परावृत्त करतील. बहुसंख्य वाचक असले ब्लर्ब वाचूनच पुस्तक बाजूला ठेवतील, अशी शक्यता आहे. त्यांना एक प्रकारे ‘अभिरुची उन्नत करण्याची संधी’ आपण नाकारतो, असे नाही का वाटत? कदाचित प्रोत्साहक ब्लर्ब वाचून त्यांनी या कादंबऱ्या वाचल्या तर त्यांना त्या आवडतीलही.
म्हणजे, एका प्रकारे गर्भजलपरीक्षेची चाचणी घेऊन नको ते अर्भक जसे नष्ट केले जाते, तसे हा अत्यंत कठीण ब्लर्ब वाचकाची चाचणी घेऊन एक भावी चांगला वाचक नष्ट करण्याच्या प्रक्रियेला हातभार लावतो, असे मला वाटते. ज्या वाचकांना मकरंद साठे यांच्या आधीच्या कादंबऱ्या किंवा श्याम मनोहर वगैरे लेखकांचे लेखन माहीत आहे, वाचले आहे, त्यांना या ब्लर्बमुळे फायदा होईल. परंतु अशा प्रकारचे वाचक अत्यंत मर्यादित आहेत, हे सर्वमान्य आहे. प्रश्न आहे तो उरलेल्या बहुसंख्य वाचकांचा.
मुळात ब्लर्बचे प्रयोजन काय असते, हाच इथे प्रश्न आहे. श्याम मनोहर आणि मकरंद साठे हे अत्यंत विचारपूर्वक आणि अतिशय महत्त्वाचे लेखन करत आहेत. त्यांचे लेखन अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सुरुवातीला वपु काळे, बाबा कदम किंवा सुहास शिरवळकर यांचे रंजक साहित्य वाचता वाचता स्वत:ची अभिरुची उन्नत करत जयवंत दळवी, सानिया, मिलिंद बोकील किंवा खानोलकर वाचणारे ‘मध्यम अभिरुचीचे’ वाचक अशा प्रकारच्या उच्च अभिरुचीच्या पुस्तकांकडे वळवता आले तर नक्कीच, त्यातले काही वाचक आपली अभिरुची उन्नत करतील आणि सरासरी अभिरुची उंचावायला मदत होईल. अशा वाचकांना मग कादंबरी वाचल्यावर थोरात सरांचे भाष्य वाचायला मिळाले, तर त्यांना अशी पुस्तके समजून घ्यायला मदत होईल, हे तर आहेच; पण आधीच (ब्लर्बच्या माध्यमातून) नव्या वाचकांना चाळणी लावणे, मला योग्य वाटत नाही. वाचकांना चाळणी लावणे हे ब्लर्बचे काम नव्हे.
आता यावर, ‘वाचकांनी स्वत: काही कष्ट घेऊच नयेत का?’ असा प्रश्न विचारणे सोपे आहे आणि सहज शक्य आहे; पण अशा प्रश्नामुळे आपल्या व्यासंगाचा अहंकार कुरवाळणारे खोटे समाधान तेवढे मिळेल. शेवटी आपण पुस्तकाच्या रूपातले हे प्रॉडक्ट बाजारात आणले आहे, तेव्हा ते अधिकाधिक ग्राहकांनी घ्यावे, हाच उद्देश महत्त्वाचा. आपला तथाकथित अहंकार नव्हे.
थोरात सरांचे भाष्य मौलिक आणि नेमके आहे, यात संशयच नाही. फक्त त्याचे स्थान ब्लर्बवर आहे का समीक्षा लेख म्हणून आहे, हा तेवढा प्रश्न आहे. मला वाटते, अशा प्रकारचा लेख कादंबरीच्या शेवटी पुस्तकात समाविष्ट करणे स्वागतार्ह ठरेल. प्रत्येक लेखकाचे अंतिम उद्दिष्ट आपण लिहिले ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावे, असाच असतो. निदान प्रत्येक प्रकाशकाचे तरी ते उद्दिष्ट असतेच. काहीशा अवघड (पक्षी: वाचकांना परिचित असलेल्या वाचकानुयायी पद्धतीने न लिहिलेल्या) पुस्तकांच्या बाबतीत तर प्रकाशकांवर ही जबाबदारी अधिकच असते. सरासरी अभिरुची वाढवत नेली, तरच फक्त वपु काळे आणि बाबा कदम वाचणारे वाचक हळूहळू अरुण साधू, जयवंत दळवी आणि खानोलकर वाचतील, आणि मग नेमाडे, जीए, ग्रेस वगैरे वाचतील. पण हा वेगळ्या वाटेवरचा प्रवास काही आपोआप होणारा नाही. समीक्षक, प्रकाशक, संपादक आणि सजग वाचक यांनी आवर्जून हा प्रवास सुकर केला पाहिजे. वाचकाभिमुख समीक्षा आणि ब्लर्बसारखी माध्यमे यांचे हे काम आहे. अन्यथा चित्रपटक्षेत्रात जशी सुमारांची सद्दी निर्माण होऊन शंभर, दोनशे, तीनशे कोटींचे क्लब झाले, तसेच साहित्यात होत राहील.
संजय भास्कर जोशी
sanjaybhaskarj@gmail.com
बातम्या आणखी आहेत...