आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'संभा\'विताचे उपाख्‍यान: सुंदरतेचे सुखी वर्तुळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या आग्रहाचे आणि अट्टहासाचे वर्तुळ नको तेव्हा, नको तेवढे अवाढव्य असते. पण सगळे आयुष्य एकदम जगता येत नाही, तसेच सगळा देश एकदम सुखी आणि सुंदर करता येत नाही...
प्रामाणिकपणे सांगा, सज्जनहो, डॉ. श्रीपाल सबनीस सरांनी साहित्य संमेलनाच्या आधी जर ‘अभिनवगुप्त आणि मम्मट यांच्या साहित्यशास्त्रीय भूमिकेतला सूक्ष्म भेद’ या विषयावर काही भाष्य केले असते, तर टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्रांनी त्याकडे ढुंकून तरी पाहिले असते काय? रामदेवबाबांनी पतंजली सूत्रातले सूक्ष्म भेद सांगणारे व्याख्यान दिले तर ते न्यूज चॅनेल्स वारंवार वाजवतील काय? मला माहीत आहे, तुमच्यातले काही जण लगेच मलाच ऐकवतील, ‘हे संभाविता, तू जर कॉस्ट अकाउंटिंंगमधल्या मार्जिनल कॉस्टिंगवर काही लिहिलेस, तर आम्ही तरी वाचू का, हा प्रश्नदेखील आहेच’ आणि त्यावर माझी बोलतीच बंद ... असो. असो.
सांगायचा मुद्दा ज्याने त्याने आपल्याला कळते, त्याच विषयावर गंभीरपणे बोलायचे ठरवले, तर ‘गतप्रभ झणी होतील ना माध्यमे!’ अशीच अवस्था आहे खरी. आता आमचे मित्र मुकुंदराव टाकसाळे किंवा ज्येष्ठ मैत्रीण मंगलाताई गोडबोले यांनीच विनोदी बोलावे-लिहावे यात काय नवल, म्हणूनच की काय, राजकारणी, योगगुरू, नेते, अभिनेते अशा सगळ्यांची विनोदी वागण्या-बोलण्याची स्पर्धा चालू आहे, बघा अवतीभवती. सरकारचे काम असते सरकार चालवून शक्यतोवर लोकांचे जगणे सुसह्य करणे. धर्म आणि देशप्रेम जागे करणे हे का, सरकारचे काम असते? पण ते एक असो, मला सांगा, ज्या आदरणीय विचारवंतांनी समाजातील अंधश्रद्धेवर प्रहार करून विज्ञाननिष्ठ अाणि विवेकवादी विचार पसरवायचे, त्यांनीच ‘पुरुषांना हक्क आहे ना, त्या दगडी शिळेवर तेलाचे डबे ओतून पूजा करायचा, मग आम्हाला पण तो हक्क हवाच गं बाई’ असे म्हणत आंदोलनात उडी घेतली, तर काय म्हणावे? एकूणात ‘जेणे काम तेणे करो’च्या नेमके उलट केले तर बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळते, असा काळ आलाय खरा. अशा वेळी तुम्हा-आम्हा सर्वसामान्य लोकांनी काय करावे, हा कळीचा प्रश्न आहे. नाही म्हणजे, भवतालातल्या या सगळ्या कोलांटउड्या बघत मौजेने जगायचा एक छान पर्याय आहे, म्हणा आपल्यापुढे. पण याचाही कंटाळा येईलच. तेव्हा आपणच आपल्यासाठी काही दीर्घकालीन योजना तयार करायला हवी.
अशी योजना करताना समोर येणारी आणखी एक समस्या म्हणजे, भवतालात नैसर्गिक असलेला आणि जाणीवपूर्वक निर्माण केला जात असलेला सुमारांचा डिसप्रपोर्शनेट सन्मान. मग त्या राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थेतल्या नेमणुका असोत, राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार असोत किंवा राष्ट्रीय पातळीवरचे सर्वोच्च जीवनगौरव असोत... आदर्शच खुजे केले की स्वप्ने भुंडी होतात, आणि भुंड्या स्वप्नांना दुय्यम दर्जाच्या कार्यक्षमतेने सामोरे जाता येते, असा हा डाव आहे. बरे, या कशाचेही आदर्शवादी तत्वज्ञान करून वर त्याचा गोबेल्स पद्धतीने मारा करून बहुसंख्यांना भुलवता येतेच. ‘तुम्हा मोजक्या तथाकथित समीक्षकांचे निकष आम्ही मानत नाही, तर दोन वेळचे जेवण जेमतेम मिळवणाऱ्या सर्वसामान्य माणसाचे दोन घटका मनोरंजन करेल, तीच श्रेष्ठ कला’, अशा प्रकारची वक्तव्ये प्रचंड मोठ्या अतृप्त गटाला कुरवाळणारी असतातच. सरासरी अभिरुची खाली खेचण्याचा, हा खात्रीशीर मार्ग असतो. लक्षात ठेवा सरासरी अभिरुची आणि बुद्ध्यांक खाली खेचला की त्या समूहावर सत्ता गाजवणे नेहमीच सोपे असते. आपण सारेच आज या दिवसागणिक उतरती कळा लागलेल्या सरासरी अभिरुचीचे घटक झालो आहोत.
आणि या मार्गाने सर्वांगात हळूहळू पसरत जाणाऱ्या विषाचा आपल्याला पत्ता देखील लागू नये, म्हणून निर्माण केला जाणारा धार्मिक आणि सांस्कृतिक उन्माद हे तिसरे वास्तव आहे. जे प्रश्न जगण्यामरण्याचे नाहीत, त्यांना बळेच ऐरणीवर आणायचे आणि आपली मने त्यात गुंतवायची, असा हा हातखंडा खेळ आहे. सारांशाने म्हणायचे तर,
1. बेताल आणि असंबद्ध वक्तव्यांचा सुकाळ
2. सुमार अभिरुचीला आलेले मोल; आणि
3. धार्मिक आणि सांस्कृतिक उन्माद
या तीन घटकांनी घेरलेल्या भवतालात आपण (नटसम्राटी भाषेत म्हणायचे तर-) केवळ सहन करावे आपल्या स्वाभिमानावर होणारे बलात्कार; का फेकून द्यावे हे लक्तरलेले निष्क्रियतेचे मांद्य? हा खरा सवाल हा आहे. इथे आपला प्रतिसाद आणि प्रतिक्रिया तीन प्रकारे ठरवता येते.
सर्वात पहिले म्हणजे, कुणा तथाकथित बाबा-बुवा-ताई-अम्मा-बापूचा सल्ला मागत बसू नये, कारण ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता, तेलही गळे’ अशा पद्धतीचे अत्यंत भंपक सल्ले देणारे संभावित आपल्याला जागोजागी टपून बसलेले आढळतील. (अर्थात, आम्ही मात्र अशा खुळ्या सुभाषितांचे घाऊक पुरवठादार नाही हो, कारण आम्हाला कळते वाळूचे कण रगडिता हातातून रक्त गळे, हेच खरे. आमचा सल्ला नेहमीच असा असतो, की अरे लेको, आधी तेलबिया शोधा आणि मग त्या रगडून तेल मिळवा, येड्यासारखे वाळू रगडत बसू नका. आय मीन, जगण्यात फोकस ठेवा यार. असो.) तर सांगायचा मुद्दा, ‘सर्व रोगांवर एकच इलाज देणाऱ्या’ कुणा बाबा- बुवाला सल्ला मागू नका.
दुसरी आणि जरा जास्त गंभीर गोष्ट म्हणजे, सामूहिक विचार जरा बाजूला ठेवूया, मित्रांनो. हे जरा विचित्र वाटेल, पण लक्षात घ्या, सगळ्याच गोष्टी समूहाने करायच्या नसतात. आपण ब्राह्मण-मराठा-दलित वगैरे किंवा महाराष्ट्री-बिहारी-तामिळी किंवा स्त्री-पुरुष किंवा गरीब-मध्यमवर्गीय-श्रीमंत किंवा उजवे-डावे किंवा बीजेपीवाले-काँग्रेसी - कम्युनिस्ट अशा विविध समूहाचे सदस्यच फक्त नसतो, सर्वकाळ. पण अशा समूहांना उद्देशून अनेक अवाहने केली जातात. अशा सामुहिक घोषणाबाजीत आणि अावाहनात न अडकता स्वतंत्रपणे विचार करूया का आपण? आपण ज्या ज्या समूहाचे सदस्य असतो, त्याची समग्र विचारसरणी आपल्याला प्रत्येक वेळी मान्य असायलाच पाहिजे किंवा ती आपण अनुसरलीच पाहिजे, असे नाही, हे एकदा स्वत:ला सांगूया. हे फार फार महत्वाचे आहे. मी समजा मध्यमवर्गीय, डाव्या विचाराचा ब्राह्मण असेन, तर या प्रत्येक गटाचे प्रत्येक अावाहन मी मानायलाच पाहिजे असे नाही. मी ब्राह्मणांच्या मनुस्मृतीचा धिक्कार करू शकतो आणि मध्यमवर्गीयांचे दुबळे विचार नाकारू शकतो, यावर विश्वास हवा. वेळोवेळी मी विविध गटांचा सदस्य असेन, पण मी माझा विचार करू शकतो, यावर माझी ठाम श्रद्धा हवी. प्रत्येक प्रसंगी मी सारासार विचार करून विवेकाच्या आधारे माझा प्रतिसाद, माझी प्रतिक्रिया ठरवायला हवी.
आणि तिसरा मुद्दा म्हणजे ‘देश यह जानना चाहता है’ ‘नेशन वाँट्स टू नो’ असं ज्यांच्याविषयी सदान् कदा म्हटलं जातं, त्या देशाचे आपण रहिवासी नाही, ही खुणगाठ मनाशी बांधा. आपल्या नावाने भलत्याच गाड्या हाकणारे, हे कुणी भलतेच असतात. त्यांना जे विकून आपल्या तुंबड्या भरायच्या असतात, त्यातले आपल्याला काही नको असते. आपला भवताल सुंदर करायला जेवढे, आवश्यक तेवढे जाणून घेऊया. त्यातून वेळ उरला, तर जगाची चिंता करूया. आरुषी का कोण तिच्या आईवडिलांनी तिचा खून केला की नाही, यासाठी सगळ्या देशवासीयांनी डोक्याला डोकी लावून विचार करायची गरज नाही. पोलिस बघून घेतील ते. माझ्या घरासमोरच्या रस्त्यावर कचरा साठला असेल, तर माझ्या गल्लीतल्या सर्वांनी एकत्र येऊन महानगरपालिकेचे पाय न धरता त्यावर काही मार्ग काढता येईल का, तो विचार जास्त महत्वाचा आहे.
समस्याही खूप आहेत आणि पर्यायही खूप आहेत मित्रहो, आता नेहमीप्रमाणे तुम्ही म्हणाल, संभाविता, पेच मोठ्या मनोरंजक पद्धतीने मांडतोस, गड्या, पण मग काय करावे ते तूच का सांगेनास?तर सज्जनहो, यावर आमचे मत सांगतो, ऐका.
संभाविताचा सल्ला : वरच्या पाच-सहा परिच्छेदांत मुद्दामच जरा, विस्कळीतपणे मांडलेल्या मुद््द्यांचा सारांश इतकाच आहे, सज्जनहो, की बुद्धिभेद करणारे आणि आपल्याला गोंधळात टाकणारे अनेक घटक भवतालात कार्यरत आहेत. या साऱ्या स्वार्थांध लोकांनी केलेल्या सामूहिक अवाहनांना बळी न पडता, आपला आपण विचार विवेकाने करूया आणि आपला प्रतिसाद आणि प्रतिक्रिया स्वत:च ठरवूया. सगळे आयुष्य एकदम जगता येत नाही, तसेच सगळा देश एकदम सुखी आणि सुंदर करता येत नाही. सचिन तेंडुलकर म्हणायचा, एका वेळी मी एका बॉलचा किंवा फार तर एका ओव्हरचा विचार करतो, तसे आपण तूर्तास भवतालातील निवडक थोडीच माणसे आणि काही गोष्टी सुखी आणि सुंदर करूया. आणि त्याचा सुरेख चिमुकला सोहळा साजरा करून हळूहळू त्याचा परीघ वाढवत नेऊया. कदाचित लवकरच शेजारच्या कुणाचा तरी परीघ तुमच्या परिघाला टेकलेला आढळेल आणि हे सुंदरतेचे सुखी वर्तुळ आपोआप मोठे होत जाईल.
संजय भास्कर जोशी
sanjaybhaskarj@gmail.com
लेखकाचा मोबाइल क्रमांक - 9822003411