आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजुबाबा, बापू आणि सविनय कायदेभंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मु.पो. येरवडा जेल. संजूबाबा आपल्या कोठडीत गुडघ्यावर हनुवटी टेकवून शून्यात नजर लावून बसला आहे. लाइट, कॅमेरा, साऊंड, अ‍ॅक्शन... असे शब्द ऐकण्याची सवय झालेल्या त्याच्या कानांना बराकीत पहा-यावरच्या पोलिस शिपायांनी दिलेले आवाज, कैद्यांत होणा-या मारामा-यांचे आवाज याची सवय व्हायला थोडा वेळ लागला होता. ‘जेल’ने त्याला ‘झप्पी’ देऊन आता पंधराहून अधिक दिवस झाले आहेत. येणारे जाणारे कैदी, पोलिस, अधिकारी व अन्य कर्मचारी त्याच्याकडे येता जाता ‘झू’मधल्या प्राण्यासारखे बघायचे, एवढेच त्याला खटकायचे. ‘बाहेरच्या लोकांना मी दिसू नये’ अशी काही तरी व्यवस्था करा, असा अर्ज कोर्टापुढे करण्याचा त्याचा विचार होता, पण आपण आधीच अनेक सवलती मिळवल्या आहेत; आता आणखी मागितल्या तर बभ्रा होईल, त्यापेक्षा जेलरच्या ‘लेव्हल’लाच काही तरी सेटिंग करून घे, असे वकिलांनी सांगितल्याने तो गप्प राहिला होता.

आज त्याला जेलमध्ये सुतारकाम दिले होते. या कामामुळे त्याचे हात, खांदे चांगलेच भरून आले होते. अशा कामांची सवय नसल्याने दमलेल्या संजूबाबाला घरचा डबा खाल्ल्यावर बसल्या-बसल्याच गाढ झोप लागली. त्याला जाग आली ती डोक्यावर होणा-या एका प्रेमळ स्पर्शाने. आपल्या डोक्यावर कोणी तरी प्रेमाने हात फिरवते आहे, अशी जाणीव त्याला होत होती. वात्सल्य, करुणा, प्रेम, जिव्हाळा अशा अनेक भावना त्या स्पर्शात एकवटलेल्या होत्या. संजूबाबाने आपले जडावलेले डोळे कसेबसे उघडले. पाहतो तर त्याच्या शेजारी चक्क बापू उभे. संजूबाबाची झोप उडालीच.


‘बाप्पू, तुम्ही चक्क इथे?’ संजूबाबा किंचाळायचाच बाकी होता.
‘का! तो हिराणी आणि तू मला सिनेमात नेऊ शकता; मग मी इथे येऊ शकत नाही का?’ बापू संजूबाबाची फिरकी घेतात.
‘नाही, नाही. मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही इथे का आलात एवढंच विचारायचं होतं.’
‘सहज आलो. तुला माफी द्यावी की न द्यावी याचा गोंधळ ‘वरती’देखील ऐकू येत होता. माझ्या विचारांचा प्रसार केला म्हणून तुला माफी द्या, असेही कोणी तरी म्हणताना ऐकू आले. म्हणून म्हटले, चला बघून येऊ कोण आहे आपला शिष्य?’
हे सांगत असताना बापू संजूबाबाला आपादमस्तक न्याहाळतात. त्याची गादी, उशी, पंखा, जेवणाचा घरचा डबा... अशा अनेक गोष्टी त्यांच्या नजरेस पडतात. या वस्तूंकडे पाहत पाहत बापू संजूबाबाच्या शेजारी बसतात.
‘का बरं शिक्षा झाली आहे तुला?’ बापू मोठ्या आपुलकीने विचारतात. मग संजूबाबा आपल्याला का शिक्षा दिली गेली, हे बापूंना सविस्तर ऐकवतो.
‘मग काहीच चूक नाहीये कोर्टाची. तुला शिक्षा झाली हे योग्यच झाले.’ बापू काहीशा कठोर स्वरात बोलतात.
‘काय बरोबर आहे म्हणता? क्या बापू! मी काय केलं तर फक्त एक एके 47 घेतली. त्यामागचं कारण माहीत आहे का तुम्हाला? दंगलीमध्ये लोक माझ्या घरावर चाल करून येणार होते. त्यांनी माझ्या घरच्यांना मारून टाकले असते. त्यांना धाक दाखवायला मी बंदूक घेतली; पण ती कुणावर चालवली नाही.’
‘पण चोरून शस्त्र विकत घेणे तेही एके 56 सारखे, हा कायद्यानुसार गुन्हा आहे.’
‘बापू, तुम्हीसुद्धा मीठ उचलून गुन्हाच केला होता ना. त्या वेळी तुम्ही कायदाच मोडला होता ना.’
‘अरे पण ते परक्यांचे, ब्रिटिशांचे सरकार होते.’
‘सरकार कोणाचे का असेना, कायदा हा कायदा असतो. ब्रिटिशांचा कायदा चुकीचा होता, असे तुमचे म्हणणे होते ना; आमच्या सरकारचा कायदा चुकीचा आहे, असे माझे म्हणणे आहे’ संजूबाबा आपले म्हणणे सडेतोड शब्दांत मांडतो. ‘लगे रहो’च्या वेळी विधु विनोद चोप्रा आणि राजकुमार हिराणीने संजूबाबाला बापूंविषयी बरेच काही वाचायला दिलेले असते. त्याचा वापर संजूबाबा आता व्यवस्थित करून घेतो.
संजूबाबाचे सडेतोड बोलणे ऐकून बापू त्याच्याकडे टकामका पाहतच राहतात.
‘तुमच्या कायदा मोडण्याला सविनय कायदेभंग म्हटले गेले. त्याचा बराच गवगवा झाला. मी मात्र आत बसलोय. तुम्ही काय सांगितले आहे- एखादा कसाई गायीच्या पाठीमागे लागला; गायीचा पाठलाग करताना तो कसाई तुम्हाला गाय कुठे गेली असे विचारू लागला; अशा वेळी तुम्ही गाय ज्या दिशेने गेली त्या दिशेने त्या दिशेकडे बोट न दाखवता चुकीच्या दिशेकडे बोट दाखवले तर ते खोटे बोलणे ठरत नाही. कारण तुम्ही निष्पाप गायीचे प्राण वाचवण्यासाठी तसे बोलला असता. मी तसेच केले. माझ्या निष्पाप कुटुंबीयांना वाचवण्यासाठी मी बंदूक आणून ठेवली. त्याचा वापर मी केला नाही. निष्पापांचा जीव वाचवण्यासाठी मी हे केले.’
‘हूं. तू माझ्या विचारांचा प्रसार करतो आहेस असे का बोलले गेले ते मला आत्ता कळतेय. एकूण काय तर तू कोणताही कायदा मोडला नाहीस, हे ऐकून मला फार बरे वाटले.’ असे बोलून बापू अंतर्धान पावतात.


cm.dedhakka@gmail.com