आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Joshi About Litrature, Social And Culture, Rasik, Divya Marathi

परेटो ने लिखा है यारो!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साहित्य -समाज-संस्कृती... ऑलिम्पिकच्या वर्तुळांसारखी एकमेकांत गुंफलेली-गुंतलेली ही तीन क्षेत्रं... या क्षेत्रातल्या घटना-प्रसंगांचा माग काढत, जमेल तशा टपल्या मारत, संभावित राहण्याचा कसोशीने प्रयत्न करणारे हे पाक्षिक सदर...

गंभीर विषयावर गमतीदार बोलणे आणि गमतीदार वाटणाऱ्या विषयावर गंभीर चिंतन सादर करणे, ही प्रभावी वक्तृत्वातली एक हातखंडा क्लृप्ती मानली जाते. त्याचा मुख्य फायदा म्हणजे, साबणाच्या ओल्या वडीसारखे सुळ‌‌्कन दुसऱ्याच्या हातातून निसटता येते. (याचे राजकारणातले उपयोग सांगायलाच नकोत. एकाआड एक दिवसाच्या बातम्या बघितल्या की, ‘माझ्या बोलण्याचा विपर्यास केला, आय नेव्हर मेन्ट इट’ अशी वाक्ये ऐकायला मिळतातच की!) अंगाला माती लागू न देता कुस्ती खेळणे, आणि अंगाला पाणी लागू न देता पोहणे या कला काही वेळा कामी येतात. असो. नमनालाच इतके तेल पुरे.

सांगायचा मुद्दा, इकडे-तिकडे जमेल तशा टपल्या मारत पुन्हा संभावित राहण्याचा कसोशीने प्रयत्न करणारे हे सदर लिहिताना मी अशीच नीती वापरली, तर सुज्ञांनी मथितार्थ ध्यानात घेऊन, या लेखनातले ‘वैचारिक गाभ्याचे प्रतिपादन’ तेवढे घ्यावे आणि उरलेल्यांनी घटकाभरची मौज म्हणून सरळ एन्जॉय करावे, म्हणजे झाले. आजूबाजूला घडणाऱ्या, विशेषत: साहित्यिक क्षेत्रातल्या काही घटनांवर अशी (अंगाला लावून न घेता) मल्लिनाथी करायचा हा संभावित उद्योग कसा रंगतोय, ते पाहू या. ‘एटी-ट्वेन्टी’ न्यायाने मी वाचकांतील ऐंशी टक्के लोक हे सुज्ञ आणि विचारी वाचक आहेत, असे गृहीत धरेन आणि वाचकांपैकी ऐंशी टक्के लोकांनी आपला त्यांच्याशी काय संबंध म्हणून मौज करावी म्हणजे, उभयपक्षी सौहार्दपूर्ण आनंदाचे वातावरण अबाधित राहील. शेवटी सगळीकडे हा ८०:२० न्याय लागू पडतोच हो.

अनेक क्षेत्रांत वापरल्या जाणाऱ्या या ‘परेटोज लॉ’ उर्फ एटी-ट्वेन्टी (८० : २०) न्यायाचे मूळ तत्त्व असे आहे, की ८०% निकाल हे २०% लोकांच्या प्रयत्नांचे फळ असते. म्हणजे बघा, एखाद्या कार्यालयात जर १०० लोक काम करत असतील तर २०% लोकच ८०% काम करतात आणि बाकी ८०% लोक कामचुकारपणे काम करत जेमतेम २०% काम उरकतात. किंवा एखाद्या क्रिकेट संघाचा स्कोअर २०० झाला, तर संघातले २०% खेळाडूच ८०% धावसंख्या उभारतात. अर्थातच, हे दर वेळी अगदी ८० आणि २० नसते; पण मथितार्थ असा की, बहुसंख्य जनता गणंग असते आणि काही थोड्या लोकांवर हे जग सुरळीत चाललेले असते. संसदेतदेखील २०% लोक सहजीच संसदेचा ८०% वेळ बरबाद करू शकतात, हे तर आपण बघतोच; किंवा या उलट २०% मंत्री उत्तम काम करून सरकारची लाज राखतात, हेही पाहतोच आपण. या नियमाचे असे ‘परेटोज लॉ’ हे नामकरण व्यवस्थापन तज्ज्ञ जोसेफ जुरन याने केले. कारण इटालियन अर्थशास्त्रज्ञ विल्फ्रेडो परेटो याच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या या नियमाचे असे हे नामकरण व्यवस्थापन तज्ज्ञ जोसेफ जुरन याने केले. मुळात परेटो या अर्थशास्त्रज्ञाने १९व्या शतकाच्या शेवटी लिहिलेल्या एका निबंधात असे दाखवून दिले होते की, इटलीमधली ८०% जमीन २०% लोकांच्या मालकीची आहे. त्यानंतर सुमारे १०० वर्षांनी म्हणजे १९८९मध्ये एका पाहणीत असे आढळले की, जगातल्या २०% देशांचे जीडीपी ८२% आहे. म्हणजे, पुन्हा तोच निष्कर्ष. व्यवस्थापन शास्त्रातल्या अनेक बाबतीत, या तत्त्वाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, गोडाऊनमध्ये ठेवलेल्या मालापैकी २०% माल ८०% किमतीचा असतो, तेव्हा मालावरच्या नियंत्रणात त्या २०% मालाची अधिक काळजी घेतली की झाले, ज्याला ‘एबीसी मेथड’ म्हणतात. सिनेमात नाही का, दोन-तीनशे कोटीवाले थोडेच असतात.

सगळ्याच काही नाही, पण अनेक बाबतीत हा परेटोचा नियम लागू पडतो, असे आपल्याला दिसून येईल. आता यातला खरा गमतीचा भाग म्हणजे, याच्याकडे बघायची आपली मानसिकता. सर्वांना औपचारिक किंवा अनौपचारिक पद्धतीने या परेटोजच्या नियमाची जाण असते; पण श्रम, कष्ट, प्रयत्न या बाबतीत आपण त्या (कष्टाळू) २०%मध्ये आहोत आणि लाभ मिळण्याच्या बाबतीत मात्र दुर्दैवी ८०%मध्ये आहोत, अशी बहुतेक सर्वांची खात्री असते बघा. एक गंमत सांगतो, तुम्हाला विख्यात ज्योतिषी व्हायचे आहे का? मग एखाद्या चाळिशी-पंचेचाळिशीच्या स्त्रीचा तळहात निरखून एकच वाक्य बोला, किती किती कष्ट करतेस गं सगळ्यांसाठी; पण कुण्णाकुण्णाला कदर नाही तुझी. क्षणार्धात तुम्हाला उत्तम भविष्य कळते आणि नुसता हात बघून आयुष्य जाणता येते, यावर तिचा पूर्ण विश्वास बसेल. किंवा एखाद्या पुरुषाला म्हणा, अरे तूच एकटा खरे अपार कष्ट करतोस, पण बाकीचे पॉलिटिक्स करून प्रमोशन आणि इन्क्रीमेन्ट उकळतात बघ. तुम्ही विख्यात ज्योतिषी झालाच म्हणून समजा. खाजगी काय आणि सरकारी काय, सर्व कार्यालयांत प्रत्येकाला ते कष्ट करणारे २०% म्हणजे आपणच आहोत, याची नितांत खात्री असते. ‘साले आमच्यासारखे लोक कामचुकारपणा करतात म्हणून आपला देश असा मागास राहिला.’ असे म्हणणारा माणूस तुमच्या पाहण्यात आला आहे काय? शक्यच नाही. एखाद्या लग्नसमारंभात बघा, खांद्यावर टॉवेल टाकून इकडे तिकडे करणारा एखादा वैतागून म्हणत असतो, साला आम्ही मर मर मरायचं, तेव्हा कार्य पार पडतात, नाही तर ते आप्पासाहेब (किंवा बाळासाहेब किंवा तत्सम कुणीही) बघा कसे तंगड्या वर करून लोडाला टेकून पसरले आहेत. तर वर ते आप्पासाहेब किंवा बाळासाहेब म्हणत असतात, ‘मर मर मरून जरा दोन मिन्टं इथं पडलो, तर तो बघा कसा इकडून तिकडे उड्या मारत कामात असल्याचं नाटक करतोय.’ सांगायचा मुद्दा, कुणी काही म्हणो, खरे काम करणारे २०%च असतात आणि ते ८०% कामे करतात, ८०% संपत्ती निर्माण करतात, ८०% गोष्टी घडवतात. तुम्ही म्हणाल, समजले तुझे उपाख्यान, मग करायचे काय?

संभाविताचा सल्ला : तर मित्रहो, जग आणि जगणं अधिक सुंदर करायचं, तर पहिलं म्हणजे निदान आरशासमोर विवस्त्र होऊन स्वत:ला तपासायला हवं. आपण त्या २०%मध्ये आहोत का, याची झाडाझडती घ्यायला हवी. अगदी प्रामाणिकपणे. (आपण आरशाचा उपयोग उत्तमोत्तम दागिने आणि उत्तम फॅशनचे कपडे आपला बेंगरुळपणा नक्की किती झाकतात, याची चाचपणी करायला करतो, हा भाग सोडा. कधीतरी आरशाचा खरा उपयोग करून स्वत:ला बघा राव!) तर असे आरशासमोर विवस्त्र होऊन (पक्षी : प्रामाणिकपणे) स्वत:ला तपासल्यावर जे आढळेल, त्याच्या शक्यता दोन आहेत. पहिली शक्यता, खरेच आपण जग बदलणाऱ्या त्या २०%मध्ये असू. तसे असेल तर मग त्याचा गर्व नाही, पण सार्थ अभिमान बाळगत आपण तसे असल्याचा आनंदोत्सव करायला हवा. सुरेल सोहळा करायला हवा. तो सोहळाच आपल्याला पुढेही त्या २०%मध्ये राहायची ऊर्जा, उमेद आणि उत्साह देत राहील. पण... पण आपण त्या २०%मध्ये नसलो तर? तर काय करायचं, ते का सांगायला हवं राव? संभावित लोक एकच सल्ला देतात. तोच आमचा सल्ला, लागा कामाला!
(sanjaybhaskarj@gmail.com)