स्पॉइलर अॅलर्ट : या लेखात ‘पिंक’ सिनेमातल्या कथानकाची चर्चा आहे. त्यामुळे ज्यांनी हा सिनेमा पाहिला नाही आणि ज्यांना आधीच कथानक जाणून घ्यायचे नाही, त्यांनी हा लेख न वाचल्यास बरे.
स्त्रीचा नकाराधिकार ओलांडायचा अधिकार पुरुषाला नाहीच, अगदी कधीही नाहीच, हा आणि इतकाच ‘पिंक’चा संदेश आहे. १९व्या वर्षी लग्नाअगोदर संबंध ठेवणे, अनेक मित्रांशी संबंध ठेवणे, अनोळखी तरुणांबरोबर दारू प्यायला एकांताच्या जागी जाणे वगैरे वगैरे गोष्टींचे समर्थन ‘पिंक’मध्ये नाही, हे समजून घ्यायला हवे.
एक जबाबदार नागरिक आणि पुरुष म्हणून एक विधान मी लेखाच्या सुरुवातीलाच करतो : ‘प्रत्येक पुरुषाने स्त्रीच्या नकाराधिकाराचे स्वातंत्र्य मान्य करायलाच हवे आणि जेव्हा स्त्री नकार देते तेव्हा तिच्यावर जबरदस्ती करायचा अधिकार कोणाही पुरुषाला नाही, आणि अशी जबरदस्ती करणाऱ्या पुरुषाला प्रचलित कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हायलाच हवी.’
मुख्य म्हणजे, स्त्रीबरोबरच्या बहीण, मैत्रीण, बायको, सहकारी अशा प्रत्येकच नात्यात या नकाराधिकाराचा सन्मान राखायलाच हवा. एक चांगला निरोगी समाज निर्माण व्हायचा तर हे तत्त्व मला स्वत:ला अतिशय मोलाचे वाटते. प्रत्येकाने त्यानुसार वागावे, असे माझे मत आहे. आता या पार्श्वभूमीवर शुजीत सरकार निर्मित ‘पिंक’ या चित्रपटाचा विचार करू या. या चित्रपटाने वरील तत्त्वाचाच पुरस्कार केला आहे. अतिशय प्रभावीपणे स्त्रीचा नकाराधिकार ‘नो मिन्स नो’ या उत्कट शब्दात व्यक्त केला आहे. फक्त
आपल्या समाजात एक प्रॉब्लेम असा होतो, की वरील तत्त्व अगदी मनापासून मान्य असूनही, त्या तत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या चित्रपटावर काही बाबतीत टीका केली की, जणू त्या तत्त्वावरच टीका केली, असे गृहीत धरले जाते. या मानसिकतेतून आपण बाहेर यायला हवे. कलाकृतीचा दर्जा केवळ तिने दिलेल्या संदेशावर अवलंबून नसतो. पण म्हणूनच सुरुवातीलाच हे तत्त्व मला नुसतेच मान्य नाही तर चांगल्या समाजासाठी अतिशय आवश्यक वाटते, हे सांगितले. आता ‘पिंक’ सिनेमाकडे वळू या.
‘पिंक’ ही मीनल अरोरा या तरुणीची कथा. आईवडिलांचे घर (तिथे पुरेसे स्वातंत्र्य मिळत नाही म्हणून) सोडून दोघी मैत्रिणींबरोबर एका फ्लॅटमध्ये राहणारी ही एक वर्किंग वुमन. फलक आणि अँड्रिया या तिच्यासारख्याच बाहेर काम करणाऱ्या दोघींबरोबर ती राहते. तिघी स्वभावाने मोकळ्या आणि आनंदी, नव्या युगानुसार प्रसंगी सिगारेट, दारू, रात्रीच्या पार्ट्या अशी स्वच्छंदी जीवनशैली असणाऱ्या. एकदा एका पार्टीत फलकच्या जुन्या मित्रामार्फत राजवीर नावाच्या तरुणाशी त्यांची ओळख होते. राजवीर आणि त्याचे दोन मित्र त्यांना जेवायला रिसॉर्टवर बोलावतात. तिघी जातात. तिथे त्या तिघांबरोबर या तिघी दारू पितात. राजवीर बाकीचे चौघे रूमबाहेर जाताच मीनलला जास्त जवळिकीचे स्पर्श करू लागतो. ते मीनलला नकोसे होते. ती राजवीरला स्पष्ट शब्दांत तसेच हाताने ढकलून नाकारते, पण राजवीर ऐकत नाही. तेव्हा ती टेबलावरची दारूची बाटली त्याच्या तोंडावर मारते. राजवीरचा डोळा वाचतो, पण जखम खूप मोठी होते. उरलेला सिनेमा आधी राजवीर आणि त्याचे मित्र त्या तिघींना धमकावत, सूड घेण्याची भीती दाखवत दहशतीखाली ठेवतात, त्याविषयी आहे; आणि नंतरचा भाग दीपक सेहगल हा म्हातारा वकील (अमिताभ बच्चन) मीनलची केस लढवून तिला कसा ‘बाइज्जत रिहा’ करतो याबद्दल आहे. हा भाग प्रत्यक्षातच बघायला हवा. स्त्रीला गृहीत धरणे, केव्हाही क्षम्य नाही. स्त्री जेव्हा ‘नाही’ म्हणते तेव्हा त्याचा अर्थ ‘नाही’ असाच होतो, हा चित्रपटाचा प्रभावी संदेश आहे.
चित्रपट संपतो, तेव्हा आपल्या मनावर हा संदेश चांगल्या प्रकारे ठसवलेला असतो. पण, चित्रपट म्हणून यात गडबड आहे. संपूर्ण चित्रपटभर राजवीर हा मुद्दाम खलनायकी पद्धतीचा दाखवला आहे. त्याचे राजकीय लागेबांधे, त्याच्या काका आणि मित्रांनी पोलिसांवर आणलेला दबाव, त्याचा कुटिल वाटणारा वकील या साऱ्या माध्यमातून राजवीर हा आपल्या मनात किंचितही सहानुभूती मिळवणार नाही, याची काळजी लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांनी घेतली आहे. त्याच्या उलट मीनल, तिच्या मैत्रिणी आणि दीपक सेहगल हे सुरुवातीपासूनच नुसतीच सहानुभूती मिळवत नाहीत तर अभिनय, लेखन आणि दिग्दर्शनातून असे काही सादर केले जातात, की नकळत आपण त्यांच्या टीममध्ये सामील होतोच. ही मॅच विशिष्ट संदेश देण्यासाठी अशी फिक्स केलेली आहे. संदेश तर आपल्यालादेखील मान्यच आहे, पण तरी तो आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लेखक- दिग्दर्शकाने इतकी काही पार्शियालिटी केली आहे, की अचंबा वाटतो. ज्या कलाकृतीत पात्रे अशी मुद्दाम काळ्या आणि पांढऱ्या रंगात रंगवतात, तिथे कलाकृतीचे कलात्म कार्य संपते आणि ती केवळ प्रचारकी होते.
आता दुसरा मुद्दा : दीपक सेहगल मीनलची तपासणी घेतो, तेव्हा ती हेही स्पष्ट करते, की १९व्या वर्षीच तिचा कौमार्यभंग तिच्या खुशीनेच झालेला आहे. त्यानंतरही तिने इतर काही मित्रांबरोबर लैंगिक संबंध ठेवलेले आहेत. एरवीदेखील काही प्रसंगात ती दिवसादेखील अतिशय तोकड्या अर्ध्या चड्डीत रस्त्यावर येते. राजवीरच्या वागण्याला यापैकी कोणतीही गोष्ट समर्थन म्हणून वापरता येत नाही, हे खरेच आहे. आपल्यालादेखील ते मान्यच आहे. तरी पण माझा मुद्दा इतकाच आहे, की ‘नो मीन्स नो’ हा अतिशय मौलिक संदेश देताना समाजातल्या १५-१६ वर्षांच्या मुलींना मीनल आणि तिच्या मैत्रिणींचे सगळेच वागणे योग्य होते, असा गुलाबी संदेश मात्र जायला नको. याचे कारण सांगतो. एक पालक म्हणून तुम्ही जसे मीनलचे आई-बाप असू शकता तसेच राजवीरचे आई-बाप असू शकता. सगळेच राजवीर चित्रपटातल्यासारखे खलनायकी असतील, असे नाही. सहज कल्पना करा, राजवीर जर दुष्ट किंवा वाईट नसता (त्याचे काम समजा शाहीद कपूरने केले असते) तरी असा प्रसंग घडू शकला असता. ज्या वेळी तो प्रसंग घडला त्या वेळी राजवीर जरी तितकासा वाईट मुलगा नसता तरीही कदाचित त्याचा तोल गेला असता. एकूण परिस्थिती आणि मीनलचे वागणे बघता ते अशक्य नाही.
चूक तर राजवीरची आहेच. संशयच नाही. आधी हसतखेळत दारू प्यायली म्हणून ‘तशा’ संबंधांना होकार असेलच, हे गृहीत धरणे गैरच. मीनलने त्या क्षणी नकार देताच त्याने थांबायला हवे होते. समस्या अशी आहे की, प्रत्यक्षातल्या मीनल मर्यादेची कोणती रेषा ओलांडायची नाही, हे ती रेषा ओलांडल्यावरच सांगतात. प्रत्यक्षातले अनेक राजवीर तितकेसे दुष्ट नसूनही घसरतात आणि फसतात. आमच्या ऑफिसमधली एक केस आठवते. अशाच एका ‘सेक्शुअल हॅरेसमेंट’च्या केसमध्ये तपासणी अधिकारी म्हणून मी काम करत होतो. तेव्हा तो पुरुष मला शेवटपर्यंत परोपरीने समजावून सांगत होता, सर उसने पहले मेरा हात हाथ में लिया, लेकिन जब मैने उसके कंधेपर हात रख्खा, तो वो चिल्लायी. शेवटी त्याला आम्ही कंपनीतून काढून टाकलेच. सांगायचा मुद्दा, ‘पिंक’चा संदेश योग्य प्रकारे समजून घेणे फार गरजेचे आहे. स्त्रीचा नकाराधिकार ओलांडायचा अधिकार पुरुषाला नाहीच, अगदी कधीही नाहीच, हा आणि इतकाच ‘पिंक’चा संदेश आहे. मीनल आणि तिच्या मैत्रिणींचे सगळे वागणे, म्हणजे १९व्या वर्षी लग्नाअगोदर संबंध ठेवणे, अनेक मित्रांशी संबंध ठेवणे, अनोळखी तरुणांबरोबर दारू प्यायला एकांताच्या जागी जाणे वगैरे वगैरे गोष्टींचे समर्थन ‘पिंक’मध्ये नाही, हे समजून घ्यायला हवे. ते वागणेदेखील चुकीचेच आहे. पावलोपावली मोह पडावा, अशा वाटांवरून आजचे तरुण-तरुणी चालताहेत. अशा वेळी हे समजून घेणे आवश्यक आहे. राजवीरबरोबर घडलेला प्रसंग वगळून पाहिले, तर मीनलचे बरेचसे वागणे चुकीचे आहे, हेही समजून घ्यायला हवे. आयुष्यातली बरीचशी गणिते आणि समीकरणे अशीच उफराटी असतात.
तात्पर्य : राजवीरचे सगळे चूक म्हणून मीनलचे सगळे बरोबर, असे नाही. मग काय घ्यावे अशा सिनेमातून संभाविता?
संभाविताचा सल्ला : पहिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मीनलचे वागणे एरवी कसेही असले तरी केवळ त्या कारणाने राजवीरला मीनलच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जवळीक करायचा अधिकार नाहीच. नो मीन्स नो. कोणत्याही पुरुषाला तो अधिकार नाहीच. हे सर्वात महत्त्वाचे आणि अंतिम सत्य आहे. पण याचा व्यत्यासदेखील बघायला हवा. राजवीरसारखा प्रसंग घडत नाही म्हणून, आणि तो घडेस्तोवर मीनलला असे उच्छृंखल आणि अनिर्बंध वागायचा अधिकार आहे, असेही नाही. मुक्त वागणे, स्वच्छंद असणे आणि अमर्याद भौतिक सुखांच्या जाळ्यात अडकणे, यातला फरक मुलींना कळायलाच हवा. दीपक सेहगल हा वकील आणि शुजित सरकार वगैरे मंडळींनी मीनलची बाजू घेतली म्हणून तिचे सगळेच वागणे आदर्श आहे, असे नाही. तुम्ही जर तरुण मुलाचे आईवडील असाल तर हेही ध्यानात घ्या की, तुमच्या मुलाला ‘पॉइंट ऑफ नो रिटर्न’पर्यंत खेचत नेणारी आणि अचानक मागे परतायला सांगणारी मीनल या जगात असू शकेल, तेव्हा आपल्या मुलालाही सावध करा.
संजय भास्कर जोशी : ९८२२००३४११
sanjaybhaskarj@gmail.com