आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझी गानदेवता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘पायोजी मैने रामरतन धन पायो...’ हे गाणे ऐकूनच त्यावेळी मी फलंदाजीसाठी जायचो.  हे गाणे मला आत्मविश्वास द्यायचे. एरवीसुद्धा, मूडमध्ये असलो की मी दीदींची गाणी आवर्जून ऐकायचो, अजूनही ऐकतो...

  
माझे वडील विजय मांजरेकर पट्टीचे भजन गायक होते. त्यांची फलंदाजी जितकी नजाकतदार होती. तितकेच त्यांचे भजनही सुश्राव्य होते. कदाचित तोच वारसा माझ्याकडेही आला असावा. शिस्तबद्ध फलंदाजीच्या जोडीने मी गायनाकडेही तितक्यात आत्मियतेने लक्ष पुरवले. फलंदाजीतील नैपुण्य, नजाकत, सहजसुंदरता  गाण्यातून प्रकट करण्याचा प्रयत्न केला.  म्हणूनही "संजय मांजरेकरला गाण्याची जाण आहे', अशी दाद आजवर मला मिळत गेली. याच बळावर मी गायनाच्या क्षेत्रात मुशाफिरी करत आलोय,माझी बंगाली गाण्याची एक सीडी नुकतीच रिलीज  झाली आहे.  क्रिकेट माझ्या रक्तात आहे हे खरंच, पण गाणं हा माझा प्राणवायू आहे. अगदी प्रांजळपणे सांगायचे तर, गायनाच्या प्रांतात किशोरकुमार हे माझे लाडके दैवत आहे, तर लता मंगेशकर माझी देवता.


दीदींच्या कारकीर्दीचा अमृतमहोत्सव होणे, हा माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्यांसाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा क्षण आहे. "अलौकिक' हा एकच शब्द दीदींच्या कर्तृत्वाचे वर्णन करण्यास पुरेसा आहे. मी या क्षणी भारत-श्रीलंका यांच्यातल्या नागपूर कसोटी सामन्याच्या नाणेफेकीचे थेट समालोचन करण्याच्या तयारीत आहे, परंतु दीदींच्या केवळ विचारानेच माझे मन प्रसन्न होऊन गेले आहे. हीच प्रसन्नता आणि हाच रोमांच मी  १९८९च्या पाकिस्तान दौऱ्यावर अनुभवला आहे.  त्या दौऱ्यात फलंदाज मी म्हणून यशस्वी ठरलो. त्यामागची प्रेरणा लतादीदींच्या गाण्यांची होती. १९८९च्या त्या दौऱ्यात मी वकार युनुस, वसीम अक्रम आदी पाकिस्तानी गोलंदाजांचा तोफखाना खेळून काढला होता. अब्दुल कादीरच्या फसव्या फिरकीचा सामना केला होता. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूही ठरलो होते, पण ही सगळी दीदींच्या गाण्यांची कमाल होती. त्या वेळी सकाळी मैदानात उतरण्याआधी दीदींची गाणी सतत ऐकायचो. मला चांगलंच आठवतंय, ‘पायोजी मैने रामरतन धन पायो...’ हे गाणे ऐकूनच मी फलंदाजीसाठी जायचो.  हे गाणे मला आत्मविश्वास द्यायचे. 


एरवीसुद्धा, मूडमध्ये असलो की मी दीदींची गाणी आवर्जून ऐकायचो, अजूनही ऐकतो. विशेषत: मनावर तणाव असला की तो दूर करण्यासाठी दीदींची गाणी मला साथ देत आली आहेत. मी खरे तर दीदींच्या गाण्यावर बोलावे इतका मोठा नाही. पण इतके जरुर सांगेन की, त्या एक परिपूर्ण गायिका आहेत. आपण जर किशोर कुमार यांना ‘गॉड ऑफ म्युझिक’ असे संबोधत असू तर लता मंगेशकर यांना ‘गॉडेस ऑफ म्युझिक’ असेच म्हणावे लागेल.  त्यांच्या स्वरांमधील आर्तता, सुमधूरता, भक्तिभाव तुम्हाला स्वर्गीय आनंदाची अनुभूती करून देतात. दीदींचे गाणे हा माझ्यादृष्टीने खूप  मोलाचा ठेवा आहे... 


- संजय मांजरेकर (शब्दांकन : विनायक दळवी)

बातम्या आणखी आहेत...