आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Nahar Rasik Article About International Border Issue

दर्दपुराची खोल वेदना...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाच्या सीमा या-ना त्या कारणांनी धगधगत्या असतात. सततची घुसखोरी, तस्करी, लष्करी संघर्ष, या संघर्षातून उद‌्भवणारे शारीरिक-मानसिक-भावनिक गुंते सीमेवरच्या गावांची
जीवनशैली निश्चित करत असतात. म्हणूनच या गावांमधला दिवस वेगळा असतो, रात्र वेगळी असते. या गावातल्या लोकांच्या गरजा वेगळ्या असतात, मागण्या वेगळ्या असतात, अर्थातच जीवनशैलीवरचे प्रभाव आणि परिणाम इतर प्रांतातल्या समूहांपेक्षा निराळे असतात. त्यांच्या घटना-प्रसंगांनुरूप असलेल्या क्रिया-प्रतिक्रियांचा पोत निराळा असतो, साद-प्रतिसादाची
पातळी भिन्न असते. अगदी पेहरावापासून सीमेपलीकडच्या गावांशी असलेल्या संबंधांपर्यंतचे वेगळेपण ही सीमावर्ती गावं जपत असतात. त्याचाच हा वेध...

काश्मीरमधल्या कित्येक घरांमधील कर्ते सवरते पुरुष अतिरेकी किंवा लष्कर किंवा शत्रूसैनिकांनी केलेल्या गोळीबारात बळी गेले आहेत.

ही कथा काश्मीरच्या सरहद्दीवरील जवळपास प्रत्येक गावाची आहे. शांत, सुरक्षित जीवन ही कुणाही माणसाची असलेली साधी अपेक्षा या लोकांचीदेखील आहे; पण केवळ सीमावर्ती त्यातही काश्मीरच्या सदैव तणावग्रस्त असलेल्या भागात राहात असल्यामुळे ते जीवन त्यांच्या नशिबी नाही...

लोलाब पर्वतरांगांमधील सोगाम तालुक्यातील दर्दपुरा हे भारत-पाकिस्तानच्या ‘लाइन ऑफ कंट्रोल’ म्हणजेच एलओसीवरचं गाव. काश्मीरात दहशतवाद सुरू झाला नव्हता, तेव्हा कुपवाडा जिल्ह्यातील या गावाच्या पलीकडे असणाऱ्या या पर्वतांच्या रांगा ओलांडल्या, की सहज पाकिस्तानात जाता यायचं. आजही अनेकांचे नातेवाईक पलीकडे वादी-ए-नीलममध्ये राहतात. १९९० पूर्वी दोन्ही गावांमध्ये एकमेकांकडील लग्नसमारंभ पार पडायचे. त्यानंतर दहशतवादी कारवायांमुळे दरी रक्ताने माखत गेली. एकमेकांमधले रोटी-बेटी व्यवहार ठप्प झाले. आता एलओसी तारेच्या कुंपणाने बंद आहे. तोफगोळे आणि बंदुकांचे आवाज ही इथली नित्याचीच घटना आहे. कधीही, कुठल्याही क्षणी दहशतवादी गावाला वेठीस ठरतात. कुणी दहशतवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडतो, कुणी लष्कराला असलेल्या संशयाने बळी जातो. जाणारा कुणाचा तरी भाऊ असतो, नवरा असतो किंवा बाप तरी. दर वेळेस घटना घडते, एका घराला निराधार करून जाते. म्हणूनही दर्दपुराची विधवांचा गाव म्हणून जगभरात ओळख पक्की होत जाते...

तीनशेपेक्षा अधिक विधवांच्या या गावाची लोकसंख्या आहे, जवळपास १० ते ११ हजार. ‘सरहद’ संस्थेने जेव्हा काश्मीरातील मुलांना दत्तक घ्यायचं ठरवलं, तेव्हा सर्वाधिक अर्ज या भागातून आले. त्यापैकी ८ मुले आणि ४ मुली २००४मध्ये पुण्यात दाखल झाले. त्यातला दिलबर खोजा तर दहावीच्या परीक्षेत मराठीत शाळेत पहिला आला...तेव्हाही कदाचित दर्दपुराच्या वातावरणात आनंद साजरा करण्याइतपत मोकळीक आलेली नव्हती...

एरवी, दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा या एका अर्थी वाळूत मारलेल्या रेघांप्रमाणे असतात. त्यांच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये धर्म, भाषा, संस्कृती अशी अनेक साम्ये असतात. साहजिकच परस्परांशी संबंध ठेवण्याची, मुक्तपणे एकमेकांकडे जाण्या-येण्याची इच्छा असते. मात्र भारत-पाकिस्तानच्या सीमेवर विशेषत: जम्मू-काश्मीर भागात कुठे ना कुठे सतत गोळीबार, घुसखोरीचे प्रसंग घडत असतात. अशा परिस्थितीत सीमेवरील लोक सतत भीतीच्या आणि अनेकदा मृत्यूच्याही छायेत राहात असतात. केव्हा, कुठून गोळी येईल आणि कामानिमित्त किंवा सहज म्हणून घराबाहेर पडलेल्या माणसाचा वेध घेईल, याचा काहीही नेम नसतो.

जम्मूमधील डोडा जिल्हा, काश्मीरातील कुपवाडा, बांदिपोर, लडाखमधले कारगिल हे सर्व सरहद्दीवरील जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमधील दर्दपुरासारखी अनेक गावे अशी आहेत, जिथून पायी चालत सरहद्द ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाता येऊ शकते. या गावांमधून आलेली ही मुले त्यांच्या गावातील परिस्थिती सांगतात, तेव्हा पुणे, महाराष्ट्रासारख्या सर्वार्थाने सुरक्षित वातावरणात राहणाऱ्या आपल्यासारख्याला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहात नाही.
खरोखर, सरहद्दीवर राहणाऱ्या लोकांच्या जीवनाबद्दल किंवा त्यांच्या दहशतग्रस्त जीवनशैलीबद्दल तुम्हा-आम्हाला यत्किंचितही कल्पना नसते. डोडासारख्या जिल्ह्यात आजही संपूर्ण जिल्ह्यात दोन किंवा तीन महाविद्यालये आहेत. काही गावांमधून, विशेषतः सीमेजवळील गावांमधून मुलांनी तिथे जायचे, तर किमान सहा तास प्रवास करावा लागतो. तोही साधा, सोपा नाही. कारण एक तर रस्तेच नाहीत, किंवा असले तर त्यांची अवस्था वर्णन करता येण्यापलीकडे वाईट आहे. अशा परिस्थितीत मुलींनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची बात सोडा, मुले तरी किती संख्येने जाऊ शकतील?

जी परिस्थिती शिक्षणाची, तीच संपर्कयंत्रणांची आणि तीच आरोग्यसेवांचीसुद्धा. अनेक ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक किंवा दोन हॉस्पिटल्स असतात. तीही बहुतांशी सरकारी. त्यामुळे तिथली सरकारी अनास्था, औषधे इ. चा तुटवडा, डॉक्टरांची अनुपलब्धता या सगळ्यांचा विचार केला तर काय आरोग्यसेवा मिळत असेल?

सीमेवरील गावे अत्यंत संवेदनशील असतात. दहशतवाद्यांचे पहिले लक्ष्य असतात. त्यामुळे तिथे उद्योगधंदे, व्यवसाय यांना अजिबात चालना मिळत नाही. उद्योग नाही म्हटल्यावर कुठल्याही सोयी नाहीत. जे काही आहे, ते लष्कराच्या अस्तित्वामुळे आणि त्यापुरतेच. तातडीने वैद्यकीय मदत लागली, तर लष्कराचे व निमलष्करी दलांचे डॉक्टर किंवा लष्करी वाहन उपलब्ध नसल्यास त्या रुग्णाचे काय होत असेल, याची कल्पनाही करवत नाही. काही सरकारी संस्थाही ही परिस्थिती ओळखून कामे करतात, पण हे प्रयत्न फारच त्रोटक ठरतात. नीट, ठोस व्यवसाय वा उत्पन्न नसल्यामुळे गरिबी पाचवीलाच पुजलेली. मग या लोकांनी करायचे काय? जीवनशैलीला आकार द्यायचा तरी कसा?

विरोधाभास असा की, जेव्हा युद्धसदृश परिस्थिती उद‌्भवते, तेव्हा लष्कराला सर्वतोपरी मदत करणारे लोक हे सीमावर्ती भागातील लोकच असतात. सामान, दारूगोळा, रसद इ. वाहून नेणे, रात्री-अपरात्री रस्ता दाखवणे, अन्य आनुषंगिक कामे, शत्रूच्या हालचालींची खबर देणे, अशा अनेक गोष्टींकरता स्थानिकांचीच गरज लष्कराला भासते. किंबहुना, त्याशिवाय त्यांना लढणे शक्यच होत नाही.

कदाचित त्यामुळेच असेल; पण या गावांना जे काही थोडेबहुत साहाय्य मिळते, ते लष्कराकडून अथवा राज्यशासनाकडूनच. त्या अर्थी ही गावे जास्त करून लष्करावरच अवलंबून राहतात. लष्करासाठी मजुरी करणाऱ्या लोकांना आता लष्कराने विमा संरक्षण देऊ केलेले आहे. यापूर्वी जेव्हा हेही नव्हते, तेव्हा तर संबंधित लष्करीदलाच्या तिथल्या प्रमुखाच्या दया, मर्जी वा माणुसकीशिवाय या लोकांना कशाचाच आधार नव्हता.

सुविधा, सोयी, आर्थिक अडचणी ही फक्त एक बाजू झाली. पण सीमावर्ती भागातल्या लोकांना भेडसावणारा आणखी एक तितकाच भयंकर प्रश्न म्हणजे, सुरक्षा दलांचा विश्वास संपादन करणे. लष्कराच्या बाजूने पाहता गावातील कोण शत्रूचा हस्तक म्हणून काम करतो आहे, हे कळणे अशक्य असल्यामुळे सर्वांवरच संशयाची सुई फिरत राहते.

पण, त्याच वेळी लोकांच्या बाजूने पाहिले, तर आपली कुठली कृती कुठल्या अधिकारी वा जवानाला संशयास्पद वाटेल, हे सांगता येत नसल्यामुळे, तसेच स्वतःचा जीव वाचवण्याकरता वा खाजगी हिशेब चुकता करण्याकरता कुणी आपल्याबद्दल लष्कराला खोटी माहिती देऊ शकेल आणि त्यामुळे त्यांच्याकडून छळ होईल की काय, अशी सतत एक टांगती तलवार मानेवर असते. त्यातही दर्दपुरासारख्या गावात बहुसंख्य लोक मुस्लिम धर्मीय असल्यामुळे, त्यांच्यावर लटकणारी तलवार अनेक अर्थाने जास्त धारदार असते.


(sanjaynahar15@gmail.com)
(लेखक ‘सरहद’ संस्थेचे संस्थापक आहेत. संस्थेने १५० काश्मिरी मुले दत्तक घेतली आहेत.)