आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Parab Article About Shiv Sena And BJP Dispute

नाद करायचा नाय!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘शिवसेना’ या चार अक्षरी शब्दाने शिवसैनिकांचे तन-मन भारले आहे. म्हणूनच कितीही राजकीय वादळे आली आिण गेली; तरी शिवसेनेची मुळे जमिनीत घट्ट रुतलेली दिसत आहेत. सत्तेतील मिरपक्ष असलेल्या भाजपशी दोन हात करताना उद्धव यांनी याच शिवसैनिकांच्या जोरावर पंगा घेतला आहे आणि शिवसैनिक ‘नाद करायचा नाय’ म्हणत विरोधकांना शिंगावर घेत आहेत...

अरे... आवाज कुणाचा? शिवसेनेचा! बाळासाहेब ठाकरेंचा!!
जय भवानी, जय शिवाजी...

अशा दणकेबाज घोषणा देत हजारो शिवसैनिक हातात भगवा झेंडा हाती घेऊन दसऱ्याला बाळासाहेबांचे भाषण ऐकण्यासाठी शिवाजी पार्कवर मोठ्या संख्येने जमत आिण शिवसैनिकांचा तो जोश पाहून बाळासाहेबही सेनेची तळागाळाशी जुळलेली नाळ अजून तुटलेली नाही, याची खात्री करून घेत. त्यानंतर ते ठाकरी शैलीत विरोधकांचा असा काही समाचार घेत की, वर्षभर म्हणजे पुढचा दसरा येईंपर्यंत हे ‘विचारांचे सोने’ त्यांना पुरत असे. बाळासाहेब हे शिवसैनिकांसाठी देव होते, आजही आहेत. म्हणूनच, ‘मातोश्री’साठी आजही त्यांची काहीही करायची तयारी आहे.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी हीच पूर्वीची शिवसेना दिसली. कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासून ‘सेना अस्त्रा’चा संदेश शिवसैनिकांनी सर्वत्र व्यवस्थित पोहोचवला. एवढे होऊनही कार्यक्रम होऊ दिला, सेनेने कच खाल्ली, या मत-मतांतरांना शिवसैनिकांच्या दृष्टीने किंमत नाही. आदेश होता, फासली शाई... काम फत्ते! विशेष म्हणजे, असे काही राडे केले की बाळासाहेब जसे खूश होत, तसे या वेळी उद्धव यांनीही शाई फासणाऱ्या शिवसैनिकांना ‘मातोश्री’वर बोलावून शाबासकी दिली. त्यांच्या कोर्टकचेरीचा खर्च करण्याची तयारी दाखवली. तळागाळात काम करणाऱ्या शिवसैनिकांना हे पुरसे आहे. माझा नेता माझ्या पाठीशी आहे, हाच मोठेपणा त्यांना हवाय; बाकी काही नको!
‘शिवसेना’ या चार अक्षरी शब्दाने शिवसैनिकांचे तन-मन भारले आहे. म्हणूनच कितीही राजकीय वादळे आली आिण गेली; तरी शिवसेनेची मुळे जमिनीत घट्ट रुतलेली दिसत आहेत. हेच सैनिक आज बाळासाहेबांच्या पश्चात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासाठी एका पायावर लढायला तयार आहेत. सत्तेतील मित्रपक्ष भाजपशी दोन हात करताना उद्धव यांनी याच शिवसैनिकांच्या जोरावर पंगा घेतला आहे! फडणवीस, खडसे यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या सुभाष देसाई, दिवाकर रावते किंवा रामदास कदम यांच्या जोरावर नव्हे, ही बाब या निमित्ताने लक्षात घेण्यासारखी आहे. सध्या ‘मातोश्री’वरून चांद्यापासून ते बांद्यापर्यंतच्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांचा अंदाज घेऊनच सरकारविरोधी वातावरण सध्या तयार केले जात आहे. हेच शिवसैनिकांना हवे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षभरापूर्वी निवडणुकांच्या आधी आपल्या पक्षाच्या बैठकीत उपस्थितांना हेच सांगितले होते, की एखादा पक्ष किंवा संघटना ही उभी राहते, ती कार्यकर्त्यांच्या जोरावर. कार्यकर्तेही असे हवे की, ज्यांना सत्तेची किंवा पदाची लालसा नाही. यासाठी त्यांनी उदाहरण दिले होते, ते शिवसैनिकांचे! राजकारणाची पाच दशके गाजवणाऱ्या शरद पवारांसारखा मुरब्बी नेता जेव्हा असे सांगतो, तेव्हा शिवसैनिकांचे महत्त्व लक्षात येते.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेला कंटाळलेल्या जनतेने लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सोबतीने शिवसेनेलाही मतदान केले होते. पण, लोकसभेतील पाशवी बहुमतामुळे मती गुंग झालेल्या भाजपला विधानसभेतही आपल्याला एकट्याच्या ताकदीवर बहुमत मिळेल, असे वाटत होते. प्रत्यक्षात मोदी लाटेची सुनामी येऊनही (मुंबईतील अनपेक्षित फटक्यानंतरही) शिवसेनेनेला ६३ जागा मिळाल्या. हे यश एकट्या सेनेचे होते. पण, त्यानंतर सत्तेसाठी केंद्रात तसेच राज्यात भाजपच्या सोबत गेलेल्या सेनेची चांगलीच फरफट झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळणाऱ्या कस्पटासमान वागणुकीने सर्वसामान्य शिवसैनिक अस्वस्थ दिसत आहेत. म्हणूनच या सत्तेत जीव रमत नाही, असे आता सैनिक व पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्याकडे उघडपणे बोलत आहेत.

केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपद आिण राज्यात १० (पाच कॅबिनेट व पाच राज्यमंत्री) अशी मंत्रीपदे भाजपने शिवसेनेला दिली; पण या मंत्रीपदांना सत्तेतील महत्त्वाच्या निर्णयाच्या दृष्टीने फारशी किंमत दिसत नाही. त्यात काही मोठे निर्णय घ्यायचेच असल्यास फडणवीस सेनेला हिंग लावूनही विचारत नाहीत, मोदींचा आदेश मानतात, अशी परिस्थिती आहे. पूर्वी राज्याचा मुख्यमंत्री दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या तालावर नाचतो, म्हणून आगपाखड करणाऱ्या भाजपच्या तोंडाळवीरांना फडणवीसांचे हे वागणे रुचते का, हा आता खरा प्रश्न आहे.
पण, मोदी भाजपच्याच मंत्र्यांना, नेत्यांना किंमत द्यायला तयार नाही, तेथे सेनेच्या वाचाळवीरांना विचारतोय कोण? महसूल, अर्थ, गृह, नगरविकास, कृषी अशी महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवून भाजप राज्यात आपला पाया विस्तारतो आहे, याची कल्पना शिवसेनेला वर्षभरात आली आहे. आणखी दोन ते तीन वर्षे मोदींच्या कृपेने आणखी वेगाने कामे करून, भाजप ‘शत-प्रतिशत’ या वेगाने महाराष्ट्रात हातपाय पसरणार, याची उद्धव यांना चांगली कल्पना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने मोदी-फडणवीसांनी ते करून दाखवले. आंबेडकरी पक्षांच्या नेत्यांना एकत्र करून भविष्यात भाजप-रिपाइं युतीच्या दृष्टीने पावलेही टाकली. अशा वेळी उद्धव यांनाही सेनेचा वेगळेपण दाखवण्याची गरज होती, आणि त्यामधून बीडचा दुष्काळ दौरा तर निघालाच; पण सेनेच्या मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना, महापौरांना कार्यक्रमाकडे फिरकू नका, असा व्हीप काढण्यात आला. सामान्य शिवसैनिकांच्या मनातील खदखद उद्धव यांनी मोदींना दाखवून दिली! त्याचमुळे उद्धव यांचा तो निर्णय अतिशय योग्य होता, सुधींद्र यांच्या चेहऱ्यावर फासली गेलेली शाई ही भाजपच्या तोंडाला लावलेले काळे होते, दिला तो योग्य धडा होता, हीच खरी शिवसेना, अशा प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांमध्ये उमटल्याचे दिसले.

या पार्श्वभूमीवर यापुढे भाजपबरोबर जायचे नाही, असा सेनेचा निर्णय होऊन आगामी कोल्हापूर तसेच कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकट्याने ताकद अजमावण्याचे सेना नेत्यांचे मनसुबे आहेत. दोन्ही निवडणुकांसाठी भाजपने सत्ता आणि पैशांची ताकद लावत सेनेला नामोहरम करण्याची व्यूहरचना आधीच केली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांनी ते दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे, कल्याण डोंबिवलीत अधिकृत घोषणा न करता, दोघांनीही युती तोडली. आता पुढील वर्षभर सत्तेत बसायचे, पण त्यांच्याबरोबर फरफटत जायचे नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे, २०१७च्या फेब्रुवारी-मार्च दरम्यान भाजपला दणका द्यायचा, असा शिवसेनेचा विचार असल्याचे सैनिक, पदाधिकारी बोलताना दिसत आहेत.
शिवसेनेकडे आता गमावण्यासारखे काही उरलेले नाही. बाळासाहेबांच्या हयातीत आणि नंतरही पक्षाला अपेक्षेपेक्षा मोठे हादरे बसले आहेत. पण बाळासाहेब असताना मिळाले नाही एवढे मोठे यश गेल्या काही वर्षांत महापालिका, लोकसभा, निधानसभा निवडणुकांमध्ये सेनेला मिळाले आहे. सेनेच्या गडकिल्ल्यांचे नेतेरूपी काही दगड निसटले असले, तरी मूळ भिंतीचा पाया सैनिकांच्या भक्कम खांद्यावर अजूनही शाबूत आहे. उद्धव यांचे राजकारण बाळासाहेबांप्रमाणे आक्रमक नसले, तरी धोरणी आणि भविष्याचा वेध घेणार आहे, असे सैनिनक आता खुलेपणाने मान्य करू लागले आहेत. बाळासाहेब हयात असताना शिवसेनेचा वारस कोण? यावरून शिवसेनापक्षप्रमुखांना बऱ्याच यातना सहन कराव्या लागल्या होत्या. पण, उद्धव यांनी आदित्यला योग्य वेळी पुढे आणत पुढची संकटे टाळली आहेत. गेल्या काही दिवसांतील घटना पाहता शिवसैनिकांना आपला नेता योग्य दिशेने चालला आहे, असेच वाटत आहे. आता दसरा मेळाव्यात उद्धव यांनी भाजपाला जोरदार दणका द्यावा, या अपेक्षेने शिवसैनिकांची पावले शिवाजी पार्ककडे वळणार आहेत!

सत्तेतील विरोधक
जमीन अधिग्रहण कायद्याला विरोध करताना पर्युषण काळात मांसाहार बंदीच्या विरोधात रस्त्यावर उतरून सत्तेत एकत्र असलो तरी भाजपपेक्षा आपण वेगळे असल्याचे, शिवसेने वारंवार दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे, दुष्काळग्रस्तांच्या मदतीच्या नावाखाली केलेल्या करवाढीचे ‘पाकिटमार’ असे वर्णन करताना शिवसेनेने पिठापासून मिठापर्यंत वाढलेल्या महागाईस भाजपला जबाबदार धरले आहे.

तयारीत राहा
‘मातोश्री’वरूनही मध्यावधी निवडणुकांना कधीही तयार राहा, असे सर्व संबंधितांना आदेश दिले गेले आहेत. मात्र सत्तेसाठी आसुसलेल्या आणि लोकांमधून निवडून न आलेल्या सेनेच्या मंत्र्यांना तसेच राज्यसभा खासदारांना तसे वाटत नाही. सत्तेत राहून स्वत:चे वेगळेपण जपू या, असे त्यांचे म्हणणे आहे. पण, पक्षफुटीच्या भीतीमुळे उद्धव यांनी वर्षभरापूर्वी भाजपशी जुळवून घेतले असले तरी आता सत्तेसाठी पक्षाला आणखी वेठीला बांधून देणे उद्धव यांना मान्य दिसत आहे. सैनिकांची भावना आणि सेनेच्या स्वतंत्र अिस्तत्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने हे पाऊल उचलणे त्यांना गरजेचे ठरणार आहे.

शिवसेना हेच भाजपचे मोठे आव्हान
भाजपला या क्षणी चिंता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची नाही, तर शिवसेनेच्या आक्रमक विरोधाची आहे. हा विरोध मोडून काढण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान, स्मार्ट सिटी, औद्योगिक गुंतवणूक, मेट्रोचा विस्तार अशा योजनांबरोबर सामाजिक समतोल म्हणून छत्रपती शिवाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकांच्या कामांना मार्गी लावण्याचा फडणवीसांचा प्रयत्न आहे. परंतु, दुष्काळच्या सावटाखाली असलेल्या राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या मनात भाजपबद्दल आपुलकी निर्माण झालेली दिसत नाही. पावसाने हात आखडता घेतल्याने जलयुक्त शिवार योजना अद्याप बहरलेली नसल्याने भाजपचे कमळ फुलण्याआधीच कोमजण्यास सुरुवात झाल्याचे जाणकारांचे निरीक्षण आहे. अन्न सुरक्षा योजना, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफ करण्याचा निर्णय, पीक विमा योजना याचा फायदा अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नसल्याचे चित्र आहे.

सहानुभूतीचा फायदा शिवसेनेला
उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी शेतकऱ्यांशी संवाद साधून आम्ही तुमच्याबरोबर आहोत, हे सांगत असल्याने विरोधी पक्षांकडे जाणारा सहानभूतीचा फायदा शिवसेनेला मिळत आहेच, पण त्या आधी जमीन अधिग्रहण कायद्याला विरोध, तसेच पर्युषण काळात मांसाहार बंदीच्या विरोधात रस्त्यावर उतरून सत्तेत एकत्र असलो तरी भाजपपेक्षा आपण वेगळे असल्याचे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे, दुष्काळग्रस्तांच्या मदतीच्या नावाखाली केलेल्या करवाढीचे ‘पाकीटमार’ असे वर्णन करताना शिवसेनेने पिठापासून मिठापर्यंत महागाई, याला भाजपला जबाबदार धरले आहे.

तर धोक्याची घंटा
आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मध्यमवर्गाला भावत असली, तरी पृथ्वीराज चव्हाण यांचीही प्रतिमा या वर्गाला भावली होती. मात्र प्रतिमेच्या जोरावर निवडणूक जिंकता येतेच असे नाही, हे विधानसभा निवडणुकीने दाखवून दिले होते. तसे असते तर मोदींच्या प्रतिमेचा फायदा होऊन राज्यात भाजपला एकहाती सत्ता मिळाली असती. येत्या काळात कोल्हापूर तसेच कल्याण- डोंबिवली महापालिकेत भाजपला अपेक्षेप्रमाणे मोठे यश मिळाले नाही, तर त्याचा हिशेब फडणवीसांना पक्षश्रेष्ठींना द्यावा तर लागेलच; पण भाजपपेक्षा येथे शिवसेना सरस ठरली, तर उद्धव ठाकरेंची पावले भविष्यात खूप दमदारपणे पडतील आणि फडणवीसांसाठी ती धोक्याची घंटा ठरू शकेल.

एकच लक्ष्य, महापालिका
भाजपच्या दृष्टीने २०१७ मधील मुंबई महापालिका निवडणूक ही खूप महत्त्वाची आहे. त्याची रंगीत तालीम म्हणून कल्याण-डोंबिवली निवडणुकीकडे बघितले जात आहे. एकीकडे महापालिकांची सत्ता हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. ही ताकदच खच्ची करण्यासाठी भाजपकडून आपल्या लोकप्रतिनिधींना सर्व प्रकारची रसद पुरवली जात आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर सध्या शिवसेनेविरोधात वातावरण निर्मिती करण्याची जबाबदारी सोपवली आहे. परंतु केवळ गुजराती, मारवाडी, जैन समाज, तसेच मराठी उच्च मध्यमवर्गावर भरवसा ठेवून निवडणूक जिंकता येणार नाही. महापालिकांमध्ये भाजपला वाढू न देण्यासाठी, कदाचित शरद पवार पडद्याआडून बाळासाहेबांच्या मैत्रीला जागून शिवसेनेला मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भविष्यात परीक्षा असेल ती भाजप आणि त्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांची!