आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘नमो’च्या वारीत ‘उठा’चा गजर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी सात-आठ महिने अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देश ढवळून काढला आणि काँग्रेसमुक्त भारताचे वातावरण तयार केले... आणि मग ते निवडणुकांच्या मैदानात उतरले! नमो...नमो...चा गजर हा या वातावरणातूनच तयार झाला. मोदींच्या रूपात पंतप्रधानपदाचे उमेदवार लोकांच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे दिसले. मोदींची लाट होती...असे म्हटले गेले तरी ती लाट तयार होण्यासाठी समुद्राच्या खोल तळात तसे अंडरकरंट तयार व्हावे लागतात! एकाएकी लाटा तयार होत नाहीत... हे सांगण्याचे कारण म्हणजे, आता लोकसभेनंतर महाराष्ट्रातील लोकांचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकीवर. ऑक्टोबरच्या सुमारास होणार्‍या या निवडणुकीत गेली 15 वर्षे सत्ता अक्षरश: उपभोगणार्‍या काँग्रेस आघाडीचा सुपडा साफ होणार की 1999नंतर पुन्हा एकदा युतीची सत्ता येणार... यावर आता चांद्यापासून बांद्यापर्यंत चर्चा व्हायला लागली. सध्या तरी जनमानसाचा कानोसा घेतला असता महायुतीला आघाडीपेक्षा सत्ता मिळवण्याची जास्त संधी आहे. युतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोणाचा होणार? शिवसेनेचा की भाजपचा... याची चर्चाही यानिमित्ताने जोर धरू लागली आहे.
हे सारे अपेक्षित धरून शिवसेनेने लोकसभा निवडणुकांनंतर लगेचच विधानसभेची तयारी करायला घेतली आहे. त्यांच्या रिसर्च टीमकडे 288 विधानसभा मतदारसंघांचा रिपोर्ट तयार असून नुकत्याच झालेल्या सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त त्यावर नजर टाकून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचा एक महिन्याचा दौरा आखला आहे.
या दौर्‍यात ते गटप्रमुखांपासून ते जिल्हाप्रमुखांपर्यंत आणि नेत्यांपासून ते पदाधिकार्‍यांपर्यंत सर्वांशी चर्चा करून आपल्या हाती असलेल्या अहवालाशी पडताळणी करून त्यानुसार निवडणुकांना सामोरे जातील. यात प्रतिस्पर्धी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल जनमानसातील तिरस्कार किती टोकाचा आहे, याचा तर ते अंदाज घेतीलच; पण मित्रपक्ष भाजपच्याही ताकदीचा अंदाज घेऊन महायुतीच्या बैठकीत कसे पत्ते फेकायचे, याचीही तयारी करतील. आधी ठरल्याप्रमाणे सध्या युतीत सेनेच्या वाट्याला 171 जागा आहेत, तर भाजपकडे 117. मात्र लोकसभेतील मोठ्या यशानंतर भाजपला आता हे जागावाटप मान्य नाही. त्यांना 150च्या वर जागा हव्या आहेत. सेनेला मित्रपक्षाच्या वाढलेल्या महत्त्वाकांक्षेचा अंदाज आधीच आला आहे. यदाकदाचित युती तुटली तर सर्व 288 जागांवर आपले उमेदवार उभे करायचे झाल्यास काय करावे लागेल, याचीही तयारी त्यांनी केली आहे. शिवसेनेतील एका गटाच्या मते, हात धरून डोक्यावर बसलेल्या भाजपचे लाड करण्यापेक्षा एकट्याने निवडणुकीला सामोरे जायला हवे. रिसर्च टीमनुसार शिवसेनेचे विधानसभेत एकट्याच्या ताकदीवर किमान 90 ते 100 जागांवर उमेदवार निवडून येऊ शकतात. तसे झाले तर निवडणुकीनंतर भाजपबरोबर युती करून सत्तेच्या किल्ल्या हाती घ्यायच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर उद्धव ठाकरे यांनी बसायचे, असाही एक विचार आहे.
वर्धापनदिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवताना दुसर्‍या बाजूस राज्यातील जनतेकडे दुर्लक्ष होणार नाही, याची उद्धव यांनी काळजी घेतली. ‘माझ्या हाती सत्ता द्या, मी महाराष्ट्र एक नंबर करून दाखवतो’, असे सांगताना त्यांनी महाराष्ट्रासाठी शिवसेनेचे व्हिजनही मांडले. मुंबईकरांसाठी कोस्टल रोडबरोबरच बीपीटी, नेव्हीच्या अखत्यारीतील 900 एकर जागेवर शांघायसारखे शहर उभारणे आणि त्यात प्रकल्पबाधित तसेच गिरणी कामगारांसाठी घरांची निर्मिती, रेसकोर्सवर थीम पार्क, ग्रामीण शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम, शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शेतमालाला चांगला भाव, ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न प्राधान्याने सोडवणे, यावर आपण भर देणार असल्याचे सांगितले. आपण पंतप्रधान झाल्यावर देशासाठी काय काय करणार आहोत, हे ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी सांगितले; त्याच पद्धतीने उद्धव यांनीही आपण जनतेसाठी काय करणार आहोत, हे भावी मुख्यमंत्र्याच्या आवेशात सांगून टाकले आहे. मात्र, त्यात आपण कुठेही मुख्यमंत्री होणार आहोत, असा आविर्भाव आणू दिला नाही... उद्धव परिपक्व राजकारणी होत असल्याचे हे चित्र होते. या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा मंत्र फक्त मनसे प्रमुख राज ठाकरेंकडेच आहे, हे चित्र जाणीवपूर्वक खोडून काढले. आपण बोलून नाही तर करून दाखवतो आणि जे करता येणे शक्य आहे तेच सांगतो, असे सांगून उद्धव यांनी आपल्या चुलत भावाला चिमटा काढला!
उद्धव यांच्याकडे राज ठाकरेंइतके प्रभावी वक्तृत्व व गर्दीखेचक व्यक्तिमत्त्व नसले तरी त्यांचा पहिल्यापासूनच, ‘झगामगा आणि माझ्याकडे बघा’, असा अट्टहास कधीच नव्हता. मला आहे तसा तुम्ही स्वीकारा, असे ते शिवसैनिकांना तसेच जनतेला पहिल्यापासून सांगत आलेले आहेत.
बाळासाहेबांच्या छायेतून बाहेर येत आणि राजपेक्षा आपण वेगळे असल्याचे सिद्ध करताना उद्धव ठाकरेंना बरीच मेहनत करावी लागली. राजकारणात येऊन प्रत्यक्ष एकहाती कार्यरत होण्यासाठी चांगले एक दशक त्यांना द्यावे लागले आहे. आता त्यांच्याकडे शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे. ना स्मिता ठाकरेंचा कौटुंबिक कलह, ना नारायण राणेंचा त्रास, ना राज यांचे दडपण असल्याने ते आता शांतपणे काम करताना दिसतात. मात्र, संजय राऊत, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब या चौकडीच्या बाहेर जाऊन ते विचार करताना दिसत नाहीत, असे चित्र आजही उभे केले जाते. पण... ज्या माणसाचा राजकारण हा कधी पिंडच नव्हता आणि शिवसेनेत इतकी पडझड होत असताना पक्ष समजून घ्यायला काही वर्षे आणि काही माणसांचा आधार हा त्यांना घ्यावाच लागणार होता आणि तसेच झाले. त्यामुळे संजय राऊत यांचे महत्त्व नको तितके वाढले. मिलिंद नार्वेकररूपी मोठा अडसर त्यांच्यात आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उभा झाला. पत्नी रश्मी ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे उद्धव चालतात, असेही सांगितले गेले. पण... याचे स्पष्टीकरण देण्याच्या किंवा ते खोडून काढण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. ते आता आपल्या मताप्रमाणे शिवसेना चालवत आहेत.
मध्यंतरी ‘सामना’मधून गुजराती समाजाविरोधातील अग्रलेखामुळे वादळ उठले होते. संजय राऊत यांची भूमिका म्हणजे शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्नही उपस्थित केला गेला. पण उद्धव यांना विचारल्याशिवाय राऊत असे करणे शक्य नव्हते. या निमित्ताने गुजराती समाजात, भाजपमध्ये काय प्रतिक्रिया उमटते, हे उद्धव यांना पाहायचे होते आणि त्यांचा उद्देश सफल झाला. मनसेच्या प्रचंड आव्हानाचा सामना करून महापालिकेत मिळालेले यश आणि लोकसभेत मिळालेल्या 18 जागांमुळे उद्धव यांचा आत्मविश्वास प्रचंड उंचावला आहे. याच्या जोरावर ते प्रतिस्पर्धी व मित्रपक्षांच्या डाव आणि पेचांचा बर्‍यापैकी मुकाबला करताना दिसत आहेत. पूर्वीचे उद्धव व आताचे उद्धव यात बराच फरक आहे, हे आता त्यांचे राजकीय विरोधकही मान्य करतात. मात्र, या घडीला शिवसेनेसमोर काँग्रेस आघाडीपेक्षा भाजपचे मोठे आव्हान आहे. कारण 18 खासदार असूनही मोदींच्या सरकारमध्ये शिवसेनेला एकाच बिनमहत्त्वाच्या कॅबिनेटमंत्रिपदावर समाधान मानावे लागले, तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना मोदींनी निमंत्रण दिल्यावर सेनेच्या वाघाला पूर्वीचा जोश कायम राखून डरकाळी फोडता आली नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाल्ल्यासारखाच हा प्रकार होता आणि त्यातच महायुतीतील सेनेचे सर्वात जवळचे मित्र गोपीनाथ मुंडे यांचे आकस्मिक निधन झाल्याने तर उद्धव यांचे वैयक्तिक खूप मोठे नुकसान झाले आहे.
मुळात पंतप्रधान मोदींनाही प्रादेशिक पक्षांचे घोंगडे गळ्यात घालून फिरायचे नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तोंडी लावण्यापुरता जसा बहुजन समाज लागतो, तसेच भाजपचे प्रादेशिक पक्षांबाबत आहे. प्रादेशिक पक्षाची ताकद घेऊन आधी मोठे व्हायचे आणि नंतर त्यांच्याच डोक्यावर बसायचे, असा हा प्रकार! याची झलक मोदींनी लोकसभा निवडणुकीआधी मुंबईत महागर्जना कार्यक्रमात दाखवली होती. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेखही केला नव्हता. मात्र, नंतर प्रचारसभेत बाळासाहेब यांचे नाव घेऊन मतांची बेरीज करायला विसरले नव्हते. उद्धव ठाकरे ही बाब विसरले नाहीत. लोकसभेत काँग्रेस आघाडीला संपवण्यासाठी मोदींचा मोठा फायदा झाल्याची त्यांना कल्पना असली तरी आता ते आणि शिवसेनेचे मुखपत्र सामना नमो...नमो... करताना दिसत नाहीत. उद्धव यांना मोदींच्या नावाने मतांचा जोगवा मागण्याची इच्छा नाही. म्हणूनच विधानसभेला सामोरे जाताना व्हिजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाचे मॉडेल मांडले आहे. हे लोकांना अपील झाले तर शिवसेनेच्या सर्वाधिक जागांचा- मुख्य म्हणजे उद्धव यांच्या मुख्यमंत्रिपदाचा- मार्ग मोकळा होईल, असे शिवसेनेला वाटते. महायुतीत आज फक्त भाजपच नव्हे तर रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष असे मित्रपक्ष आहेत. जागावाटप करताना या सर्वांचाही विचार त्यांना करावा लागेल. लोकसभेसाठी मोदींना मतदारांनी पसंती दिली असली तरी विधानसभेत ते काय करतील, हे आताच छातीठोकपणे कोणीही सांगू शकत नाही.
एक मात्र खरे की, आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर वातावरण आहे. केंद्रात सत्ता गेल्याने काही फरक पडत नाही, असाच सध्याचा काँग्रेसचा कारभार असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेविना राहू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस भवनात शरद पवारांचा गेले काही दिवस वावर पुन्हा वाढला असून ते जोरात कामाला लागल्याचेच हे निदर्शक आहे. आज मुंडे असते तर पवारांविरोधात राज्यभर पुन्हा एकदा रान पेटवून त्यांनी युतीचे काम सोपे केले असते; पण मुंडे हयात नाहीत आणि मोदी शिवसेनेला फार महत्त्व देण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत भाजपच्या मागे फरपटत जायचे की डरकाळी फोडून शिवसेनेच्या वाघाचे अस्तिव दाखवून द्यायचे, अशा दुहेरी कात्रीत शिवसेना अडकल्याची सध्याची स्थिती आहे. या आव्हानाचा मुकाबला उद्धव ठाकरे कसा करतात, यावर त्यांच्यातील परिपक्व होत चाललेला राजकारणी खर्‍या अर्थाने किती मुरब्बी झाला, हे ठरवता येईल!
sanjay.parab5@gmail.com