आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबाडाचा धनी हतबल होतो तेव्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकरी स्वावलंबी मिशनअंतर्गत तीन वर्षांपूर्वी पॅकेजच्या अनुदानात एक विहीर मंजूर झाली. विहिरीचे काम पूर्ण झाले. सुदैवाने विहिरीला बारमाही पाणीसुद्धा आहे. वीज कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज केला, पण अद्याप शेतात वीजपुरवठाच दिलेला नाही. त्यामुळे विहिरीला पाणी असूनही शेतीला पाणी देता येत नाही. परिणामी शेतीच्या वार्षिक उत्पन्नातून खर्च वजा जाता उरणार्‍या पंचवीस हजारात संसाराचं रहाटगाडगं कसं चालवायचं? पुढच्या पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा? लेकरांना शिकवायचं कसं? हे बोल आहेत, विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील विजय नारायण खेडकर नावाच्या शेतकर्‍याचे. वयाची 48 वर्षे पूर्ण केलेल्या या शेतकर्‍याच्या तोंडून केवळ त्यांच्या व्यथाच ऐकायला मिळतात. शेतीला बारमाही पाणी देता आलं तर वर्षभर भाजीपाला, फळबाग लागवड अशा उत्पन्नातून शेतीला जोड मिळते. दूधदुभती जनावरे पाळून जोडधंदा उभा राहतो. मात्र, सरकारी योजना असतानाही केवळ कागदी घोडे नाचवावे लागतात, हा त्यांचा आजवरचा अनुभव. मागच्या अडीच वर्षांत ‘महावितरण’च्या अमरावती येथे असलेल्या कार्यालयात अनेक चकरा मारल्या, पण वीजपुरवठा काही मिळाला नाही. प्रत्येक खेपेला आता वीजपुरवठा मिळेल, अशी आशा असते; मात्र नेहमीप्रमाणे पदरी निराशाच पडते. आता तर या निराशेची सवय अंगवळणी पडली आहे... शेतावर सध्या ओढवलेली अवस्था दाखवताना खेडकर खिन्न मनाने सांगत असतात.
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात असलेल्या मलकापूर या छोट्याशा गावात खेडकर यांची वडिलोपार्जित मिळकतीमधील साडेतीन एकर शेती आहे. जमिनीच्या एवढ्याच तुकड्यावर पाच जणांचा संसार चालवण्याची जबाबदारी पार पाडताना होणारी दमछाक मांडताना हा शेतकरी विवंचनेत असल्याचे पदोपदी जाणवत राहते...

पस्तीस वर्षे शेतीत राबल्यानंतरही महिन्याकाठी सरासरी दोन हजारांची कमाई. चार फूट बाय आठ फुटांच्या पहिल्या खोलीत नेवारीचा पलंग. 75 वर्षांची म्हातारी आई गोदावरीबाई हिच्यासाठी हा नेवारीचा पलंग राखीव. उरलेल्या आठ बाय दहाच्या एकमेव खोलीत स्वयंपाकघर आणि दोन मुलांसह पती, पत्नी यांचा संपूर्ण परिवार. दिवसा लोडशेडिंगच्या नावाखाली विजेचा पत्ता नाही आणि रात्री आकस्मिक वीजकपात. खेडकर यांच्यासोबत त्यांची पत्नी नंदा हीसुद्धा शेतात राबते. मात्र स्वत:च्या शेतात काम करूनही दुसर्‍यांच्या शेतात मोलमजुरी करण्याची त्यांच्यावर पाळी आली आहे. एकटा माणूस काय काय करणार? मुलाचे शिक्षण, दैनंदिन खर्च, आजारपण, शेतीची कामे सगळेच कसे महत्त्वाचे आहे; म्हणून घराला थोडा हातभार लावण्यासाठी मीसुद्धा शेतमजुरी करते, असे सांगत विजय यांची पत्नी नंदा खेडकर भावनांना वाट मोकळी करून देतात. पैसा नसल्याने मोठा मुलगा विशाल याचे शिक्षण अपूर्णच राहिलेले. मात्र शेतीच्या कामात वडलांबरोबर कष्ट करताना शेतीमधील नवं नवं तंत्रज्ञान शिकण्याचा प्रयत्न करत असल्याचे विशाल याच्या बोलण्यातून जाणवले. तर लहान मुलगा अभय हा आयटीआयमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकतोय. आयटीआयनंतर चांगली नोकरी मिळाली तर तेवढाच घरातील आर्थिक परिस्थितीला हातभार लावून मदत करता येईल आणि वडलांनी कष्ट करून दिलेल्या शिक्षणाचा उपयोग होईल, असे सांगत असताना अभयचा चेहरा थोडा प्रफुल्लित होतो...
पाऊस येईल, या आशेने खेडकर यांनी त्यांच्या साडेतीन एकर शेतीत सोयाबीन पेरलं होतं. जमिनीला ओल येईल एवढा पाऊस बरसला, मात्र त्यानंतर पावसाचं नाव नाही. एक नाही दोन नाही तीन नाही, तर तब्बल पंधरा दिवस पावसानं हुलकावणी दिली. सोयाबीनच्या फुटलेल्या कोंबांना मोड पडली. पेरणी वाया गेली. आता कुठे पावसाला सुरुवात झाली. पण शेतीच्या उत्पन्नाचे वेळापत्रकच चुकले. जून महिन्यात पाऊस नसल्याने उडीद आणि मुगाची पेरणी करता आली नाही. त्यामुळे दोन महिन्यांत घरात हमखास पैसा आणणारं पीक हातातून गेलं. पोळ्याच्या सणाला उडीद-मुगाचे पैसे कामी येतात. मात्र, या उत्पन्नालाही मुकावं लागलं. नुकसान झालेल्या शेतीच्या उत्पन्नाचं अजूनपर्यंत सर्वेक्षणही झालं नाही. पंचनामे नाहीत वा जाबजबाबदेखील नाहीत. मग नुकसान भरपाई केव्हा मिळेल, याचा काहीच नेम नाही. दुष्काळात तेरावा महिना यावा, अशा प्रकारे मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाईसुद्धा कित्येक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही.
मागच्या वर्षी हरभरा पेरला होता. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले. नुकसान भरपाईची सरकारने घोषणा केली. नुकसान भरपाईसाठी अधिकार्‍यांच्या घरी, तलाठ्याच्या घरी वारंवार चकरा माराव्या लागल्या. पटवार्‍याने सर्वेक्षण केले. पण दहा महिन्यांनंतर हरभर्‍याची दहा हजार रुपयांची नुकसान भरपाई बँक खात्यात जुलै महिन्यात जमा झाली. अख्खा हंगाम गेला, केलेली गुंतवणूक वाया गेली, आणि त्यानंतर नुकसान भरपाईची ही तुटपुंजी रक्कम हाती आली. ही रक्कम मिळण्यासाठीही कष्ट घ्यावे लागले. अतिशय खिन्न मनाने विजय खेडकर हा प्रसंग कथन करतात.

अशा बिकट परिस्थितीत असताना महागाई वाढतच आहे. खतांचे भाव, बियाणांचे दर, शेतमजुरी, पेरणीखर्च, कापणीसाठी मोजावी लागणारी रक्कम... या सर्व खर्चात वाढ होतेय. मात्र, शेतमालाचे सरकारी दर आजही वीस वर्षांपूर्वीचेच आहेत. शेतमालाला उत्पन्नाच्या खर्चावर आधारित दर मिळाले तरच शेतकर्‍यांना थोडाफार दिलासा मिळेल, नाही तर अल्पभूधारक शेतकरी हळूहळू नामशेष होईल आणि शेती हा व्यवसाय फक्त भांडवलदारांच्या मालकीपुरता मर्यादित होईल, अशी भीती सध्या खेडकरांप्रमाणेच अनेक शेतकर्‍यांच्या मनात दबा धरून आहे.
sanjay.pakhode@gmail.com