आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासिक धर्म : धर्मग्रंथ काय सांगतात?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक मंदिरांत स्त्रियांना प्रवेश नाकारला जातो. असा कोणताही धर्मनियम नाही. केवळ पुरोहित/पुजारी आपल्या स्थानाचे माहात्म्य वाढवण्यासाठी, आमचा देव किती कडक आहे नि म्हणूनच पावणारा आहे, हे दाखवण्याच्या नादात काहीतरी विचित्र नियम तयार करतात. शबरीमलय हे दक्षिणेतील मंदिर सध्या चर्चेत आले आहे ते, “जोवर स्त्रियांची मासिक पाळीत सुरू आहे का हे तपासण्याचे स्कॅनर बनत नाही, तोवर मंदिरात त्यांंना प्रवेश नाही,” या मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रमुख प्रयार गोपालकृष्णन यांच्या वादग्रस्त विधानामुळे. मासिक धर्म स्त्रियांना अपवित्र करतो आणि पवित्र मंदिरांत त्यांना प्रवेश देता येणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. यामुळे वादंग उठले असून निकिता आझाद या २० वर्षीय तरुणीने ‘Happy to bleed’ हे आंदोलन सुरू केले असून असंख्य स्त्रियांनी तिला पाठिंबा दिला आहे. याच दरम्यान, महाराष्ट्रातील जागृत (?) मानल्या जाणाऱ्या शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर चढून एक तरुणीने तेल अर्पण केल्यावरून गदारोळ उठला. त्यानंतर शनीचा दगड गोमूत्र व दुधाच्या अभिषेकाने ‘पवित्र’ केल्याने चर्चेला उधाणच आले.

स्त्रियांचा मासिक धर्म हे वरवरचे कारण असून अय्यप्पा ब्रह्मचारी होते आणि शबरीमलय या त्यांच्या तपस्थानी स्त्रीदर्शनाने तपस्याभंग होऊ नये म्हणून तेथे स्त्रियांना प्रवेश नव्हता. शिंगणापूरचा शनीचा इतिहास तर अवघ्या चारपाचशे वर्षांचा. ते प्रसिद्धीला आले ते गुलशन कुमारांनी एक चित्रपट काढल्यावर. यापूर्वी तेथे स्त्रियांना प्रवेश होता, असे सांगण्यात येते. पण गुलशनकुमारांनी त्याला ‘स्त्रीबंदीची’ फोडणी दिल्यामुळे तेथे खरेच स्त्रीबंदी करण्यात आली. गुलशनकुमार काही धर्मगुरू नव्हते, तर धंदेवाईक व्यक्ती होती. त्याच्या धंद्याबरोबरच शनी शिंगणापूरचाही धंदा वाढला, हे मात्र खरे. पण धर्माचा याच्याशी काहीएक संबंध नाही.
भारतात शबरीमलय, हाजी अली, जामा मशीद, पद्मनाभय्या मंदिर, पुष्कर येथील कार्तिकेय मंदिर, निजामुद्दीन दर्गा, शनी शिंगणापूर इत्यादी धर्मस्थळांत स्त्रीप्रवेश बंदी आहे. मुस्लिम म्हणतात की, शरियातच ही तरतूद आहे. तर हिंदू म्हणतात, धर्मशास्त्रांतच हे लिहिलेले आहे.
मारुती हा शनीचा अवतार मानला जातो. मारुती हा ब्रह्मचारी. त्याचे ब्रह्मचर्य भ्रष्ट होऊ नये, म्हणून मारुती मंदिरात स्त्रियांना बंदी हे खरे कारण. पण ते उघड कबूल करणे जड जाते. मासिक धर्मामुळे स्त्री अपवित्र होते आणि म्हणून मंदिराचे/धर्मस्थळाचे पावित्र्य जाईल, ही समजूत म्हणजे नंतर दिली गेलेली जोड आहे. वैदिक धर्मग्रंथांत अथवा शैवप्रधान आगम धर्मग्रंथांत याला आधार नाही. परंतु सामान्य लोकांनी मूळ धर्मग्रंथच वाचलेले नसल्याने पुजारी सांगतील तेच खरे, असे मानण्याचा प्रघात आहे. पुरातन काळापासून स्त्री, तिची मासिक पाळी आणि तिच्या अपत्याला जन्म देऊन मानवी वंशसाखळी अबाधित ठेवण्याच्या सामर्थ्याबाबत कसकसे विचार बदलत गेले, हे पाहणे उद‌्बोधक तसेच मनोरंजकही आहे.

मनुष्य जेव्हा नुकताच कोठे भूतलावर अवतरला होता व निसर्ग व अन्य पशूंच्या प्रकोपात जगायचा प्रयत्न करत होता, त्या काळात स्त्रियांकडे उदात्त भावनेने पाहात होता. तिचा मासिक धर्म, तिने अपत्ये प्रसवणे ही बाब त्या काळातील मानवासाठी अद्भुत चमत्काराहून कमी नव्हती. तिच्या शक्तीला आदिमानवाने देवत्वही दिले. त्यामुळे जगभरात आधी सुरू झाली ती स्त्रीपूजा. योनीपूजा. तिच्यात गूढ शक्ती असाव्यात व ती आपल्याला जशी उपकारक अाहे तशीच अपायकारकही असू शकते, या भावनेतून स्त्री ही पुरुषाच्या गूढ-भयमिश्रित आदराचा विषय बनली.

शैव-शाक्त संप्रदायात रज:स्रावाचा उपयोग अनेक तांत्रिक विधी करण्यासाठी केला जात असे. स्त्री रजोकालात अपवित्र नव्हे तर पवित्र व साधनेचे साधन मानली जात होती. रजोदर्शन अपवित्र आहे, अशी भावना मुळात नव्हती. आज काही मंदिरांत ती मानली जात असेल तर ती पुजाऱ्यांची खोडी आहे. तीन दिवस स्त्रीला कामांपासून विश्रांती मिळावी म्हणून दूर बसणे, हा तत्कालीन स्थितीत सुचलेला पर्याय सोडला तर स्त्री या काळात अस्पर्शीही होती, असा आभासही मिळत नाही. उलट ५२ शक्तिपीठे स्त्रीमहत्तेचा गौरव गातात.

ऋग्वेदात कोठेही ऋतुमती स्त्री अपवित्र असते, अस्पर्श-विटाळशी असते वगैरे उल्लेख नाही. यजुर्वेद, अथर्ववेदातही तसे उल्लेखही नाहीत. उलट अथर्ववेदातील भूमिसूक्तात स्त्रीचे माहात्म्य गायलेले असून ‘धरती आता रज:स्वला झाली आहे. रज:स्वला स्त्री जशी अपत्यजन्मासाठी उत्सुक असते तशीच भूमीही आता भरघोस पीक देईल.’ असा उल्लेख आहे. मंदिरांतील प्रवेशाबाबत एकही स्मृती एक शब्द काढत नाही. ‘स्त्रियांनी मंदिरांत जाऊ नये,’ अशी धर्माज्ञा एकही स्मृती देत नाही. या आज्ञा फक्त यज्ञकर्माशी संबंधित होत्या. कारण यज्ञात अग्नी पेटता असल्याने त्या धगीत रज:स्वला स्त्रियांना त्रास होतो, हे लक्षात आले होते. या पलीकडे त्या बंदीला अर्थ नव्हता. वेदाज्ञा म्हणाल तर याबाबत अशी एकही आज्ञा वेदांत मिळत नाही. म्हणजेच स्त्रियांबाबतचे असे अन्यायी नियम करणे हेच मुळात वेदविरोधी होते. आजकाल घरातील अग्निहोत्रे जवळपास बंद पडलेली आहेत. त्यामुळे जे काही नियम केले त्यांना आज अर्थ नाही.
स्त्रियांना मंदिर प्रवेश बंदी ही धर्माच्याच विरोधात आहे. स्त्रीहक्कांना रोखण्याची ती नंतरच्या पुरोहितांची चाल आहे. बालब्रह्मचारी असलेल्या मारुतीची, शनीची वा अय्यप्पाची स्त्रीदर्शनाने “वासना” चाळवेल, असा समज निर्माण करणारे देवतांचाच अपमान करत आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

इस्लाम
इस्लाममध्ये (भारतात) काही ठिकाणी मशीद-दर्ग्यांत स्त्रियांना प्रवेश नाही, हेही कुराणविरोधी आहे. स्त्रियांना मशिदीत जाण्याचा, नमाज अदा करण्याचा अधिकार आहे, असे कुराणात पैगंबरांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे. पैगंबर म्हणतात, स्त्रियांना कोणी मशिदीत जाण्यापासून रोखू शकत नाही. पण त्याला नंतरच्या धर्मशास्त्र्यांनी दिलेली जोड अशी की, ‘पण घर हीच स्त्रियांच्या नमाजासाठी योग्य जागा आहे.’ पैगंबरांनी स्त्रियांबरोबर लहान मुले असतात व ती रडून नमाजात व्यत्यय आणतात, म्हणून स्त्रियांसाठी स्वतंत्र खोली व दरवाजा असावा, असे म्हटले. असे असले तरी मासिक धर्मातील स्त्रिया व अपवित्र लोक यांच्यासाठी सामुदायिक नमाज पैगंबरांच्याच पत्नीमुळे - आयेशामुळे - नाकारला गेला, असे इस्लामी पंडित सांगतात. अर्थात, याला कुराणात दुजोरा मिळत नाही.

थोडक्यात, पुरुष वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या पुरोहितांनी व मौलवी-मुल्लांनी मूळ धर्मग्रंथांतील बाबी व स्त्रियांबाबतचा उदारमतवाद कसा धिक्कारला आहे, हे आपण वैदिक व इस्लाम धर्माबाबत पाहू शकतो.

मशीद असो की मंदिर, यज्ञ असो की पूजा, स्त्रीला समान अधिकार हवेत. ते पाळायचे की नाही, धर्मस्थळी जायचे की नाही, ही बाब व्यक्तिस्वातंत्र्याची आहे. पण कोणी त्यांना जायचे असून आडकाठी करत असेल, धर्मस्थळ कायदे, लिखित-अलिखित नियम, परंपरादींच्या नावाखाली त्यांना रोखत असेल तर ते घटनात्मक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारे तर आहेच, पण धर्मग्रंथांच्याही विरुद्ध आहे.

स्त्रियांनाच यात व्यापक प्रबोधनासाठी, स्वत:चे स्वातंत्र्य जपण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. मासिक धर्म अपवित्र नाही. ती वेडगळ समजूत आहे. आणि समस्त पुरुषांनीही डोळे उघडून पुरुषी वर्चस्ववादाच्या सरंजामशाही मानसिकतेतून दूर होत आपल्याइतकेच स्त्रियांनाही स्वातंत्र्य आहे, त्या गुलाम नाहीत, याचे भान ठेवले पाहिजे!
sanjaysonawani@gmail.com
(लेखक धर्मशास्त्राचे अभ्यासक आहेत)
बातम्या आणखी आहेत...