आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्यापकीचा अस्वस्थ पंचनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जशी वृत्तपत्रे संपादकांच्या नावाऐवजी मालकांच्या नावाने ओळखली जाऊ लागली, तशी महाविद्यालये प्राध्यापकांऐवजी संस्थापक पुढार्‍यांच्या नावे प्रसिद्ध झाली, मग कशाशी आला दर्जाचा संबंध?... प्राध्यापक पात्र आहे; पण दर्जेदार आहे का, याचा तपास कोणी करायचा?’

‘प्रस्थापित सत्तारचनांमध्ये हितसंबंध असलेल्या संस्थाचालकांच्या संस्थांमधील वातावरण निरोगी, स्पर्धाशील व निर्भय नसते. याचा परिणाम जसा विद्यार्थ्यांच्या घडणीवर होतो, तसा त्या विद्यार्थ्यांमधूनच प्राध्यापक म्हणून निवड झालेल्या व्यक्तीवर होतो. त्यातच भारतीय अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, असुरक्षितता, कंत्राटी पद्धती आणि अर्धवेळ रोजगार अशा गोष्टीही प्राध्यापकांवर येऊन आदळलेल्या. ’

‘ज्ञानाची साधने व मार्ग अनेक निर्माण झाल्याने प्रोफेसर नामक एकमात्र माध्यमावर विसंबणे अयोग्य ठरते. विद्यार्थ्यांना सध्या इंटरनेट, ग्रंथालय, प्रयोगशाळा, चित्रपट, नियतकालिके, शिकवण्या, हुशार मित्रमैत्रिणी, सुस्थितीतील पालक, टीव्ही, मोबाइल अशी बहुविध साधने ज्ञानग्रहणासाठी उपलब्ध असतात. त्यांच्या मार्‍यापुढे प्राध्यापक अगदीच तकलादू, जुनाट व ताठर वाटतो. स्वत:ला ताजे ज्ञान खाऊ न घालणारा प्रोफेसर आजच्या विद्यार्थ्यांच्या नजरेत एक तर कुपोषित नाही तर आळशी!’

देशातील उच्च शिक्षण आणि त्यात मध्यवर्ती भूमिका बजावणार्‍या प्राध्यापकांच्या स्थितीवर केलेले हे भाष्य आहे, ‘प्राध्यापक लिमिटेड’ या नव्या पुस्तकातील. या पुस्तकाचे शीर्षकही जागतिकीकरणात शिक्षणाचे होणारे बाजारीकरण आणि प्राध्यापकी पेशाचे होत असलेले कंपनीकरण (किंवा कंपूशाही) याकडे लक्ष वेधणारे. लेखक दीर्घकाळ पत्रकारिता केल्यानंतर वयाच्या चाळिशीत प्राध्यापक झालेले जयदेव डोळे. कोणत्याही प्रश्नाकडे पाहण्याची त्यांची अशी खास शैली आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘पत्रकारितेत तयार झालेली नजर प्राध्यापकीच्या व्यवसायातही घुसली.’ ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या नियतकालिकात ‘मास्तर बिस्तर’ या नावाने त्यांचे हे सदर प्रसिद्ध झाले. त्यातील लेखनाबरोबरच काही अप्रकाशित लेखांचाही या पुस्तकात समावेश आहे.

सदरलेखनाच्या मर्यादा लक्षात घेऊनही लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते आता देशविदेशात उच्च शिक्षण व प्राध्यापकी पेशासंबंधी काय म्हटले जात आहे, याचा अभ्यास करून त्यासंबंधीच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातले वास्तव यातील अंतर दाखवण्याचा प्रयत्न डोळे यांनी केला आहे. ‘युनिव्हर्सिटीत परीक्षा घेऊन बी. ए., एम. ए.चे शिक्के ठोकण्यापलीकडे दुसरे काही काम चालत नाही... असल्या युनिव्हर्सिटीस विद्यामंदिर म्हणण्यापेक्षा परीक्षा घेण्याकरिता रजिस्टर्ड झालेली कंपनी म्हटले तरी चालेल,’ असा लोकमान्यांच्या विचारांचा संदर्भ ते देतात. त्याच जोडीने ‘प्रोफेसरांनी अध्ययनाच्या आणि अध्यापनाच्या कामी स्वत:ला इतके वाहून घ्यावे की आपल्या घराकडे बघायला त्यांना मुळी सवडच मिळता कामा नये,’ अशी आंबेडकरांची या पेशाकडून असलेली अपेक्षाही व्यक्त करतात. या महापुरुषांच्या विचारांचा धागा आजच्या शिक्षणाशी जोडताना, या क्षेत्रात सध्या शिरलेल्या कुप्रवृत्तींवरही डोळे हल्ला चढवतात.

तिरकस पण विचार करायला लावणारी शेरेबाजी हे डोळेंच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे. प्राध्यापकांची पुस्तकनिर्मिती आणि पीएच.डी. या विषयांवर त्यांनी कडाडून टीका केली आहे. ती काहीशी एकांगी असली, तरी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. ‘डॉक्टरलेली बुद्धिमत्ता’ या लेखात ‘पदवीपुरती विद्वत्ता मला मंजूर नाही’, असे सांगून पीएच.डी.ला आलेल्या अवकळेची ते झाडाझडती घेतात. ते लिहितात, ‘प्रत्येक विद्यापीठात अशी मानभंग करणारी नोकरशाही असते आणि तिला विद्या, विद्वत्ता, अभ्यास, समाजहित आदींशी काही देणेघेणे नसते. कागद दाखवा, कागद मिळवा, अशी तिची रीत असते. सगळ्या पीएचड्या तिच्यासाठीच केल्या जातात जणू.’ त्यासाठी निवडल्या जाणार्‍या विषयांची खिल्ली उडवत डोळे या डिग्रीचे कागदापुरते असलेले राजकारण उपरोधिक शैलीत मांडतात.सलाम बिन रजाक यांच्या कथेवर आधारित ‘प्रिन्सिपॉल द्रोणाचार्य आणि डॉक्टर एकलव्य’ हा लेख शिक्षणक्षेत्रात अजूनही टिकून असलेल्या जातवादावर कठोर भाष्य करणारा आहे. ‘थ्री इडियट्स’ आणि ‘आरक्षण’ या चित्रपटांमध्ये रेखाटलेल्या प्राचार्यांच्या प्रतिमांवर भाष्य करताना डोळे म्हणतात, ‘पाहता पाहता अवतीभवतीची माणसे चित्रपटांच्या नायकांच्या जागी बसतात. कधीकाळच्या फॅक्टची फिक्शन होऊन जातात. आता अशी माणसे फक्त चित्रपटांतच पाहावी लागणार...? प्रिन्सिपल्स गेली, प्रिन्सिपॉलही गेले!’

उच्च शिक्षणाचा व प्राध्यापकीच्या पेशाचा डोळे यांनी केलेला हा पंचनामा वाचकांनाही अस्वस्थ करणारा आहे. पण तो अपुराही आहे. कदाचित सदरलेखनाच्या मर्यादेमुळे प्रासंगिक लेखनाची मर्यादा या पुस्तकालाही पडली आहे. यात उल्लेख केलेल्या अनेक विषयांवर आणखी अभ्यासपूर्वक मांडणी व्हायला हवी. अन्यथा हा बीभत्स गारठा तसाच झोंबत राहील. या पुस्तकाच्या वाचनातून बोच लागलेल्या कोणी हे काम हाती घेतले, तर तो या पुस्तकाला खरा प्रतिसाद ठरेल.
- प्राध्यापक लिमिटेड
- लेखक : जयदेव डोळे
- प्रकाशक : लोकवाङ्मयगृह, मुंबई
- पृष्ठे : 163
- किंमत : 200 रुपये