आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनसोडेची कविता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहूल बनसोडे जेव्हा भेटतो, तेव्हा आम्ही तासन‌्तास बोलतो. म्हणजे तो बोलतो, मी ऐकतो. त्याच्या बोलण्याचे वैशिष्ट्य असे की, तो न दमता सलगपणे असंबद्ध बोलू शकतो. त्याच्या असंबद्ध बोलण्यामध्ये मात्र एक विचित्र संगती असते. ज्याप्रमाणे फझी लॉजिकचा उपयोग अपुऱ्या िकंवा अस्पष्ट सत्याचा मागोवा घेण्यासाठी होतो, तशी ती संगती. पूर्ण सत्य वा पूर्ण असत्य याच्यामध्ये लोंबकळणारी संगती. अशा (त्याच्या) बोलण्यात मला नेहमीच एक नवी कविता दिसते. तो कवी नाही, हे माहीत असूनही मला कविता भेटते. कवितेच्या विविध रूपांतील ‘जाणीवपूर्वक प्रगटणारी संदिग्धता’ हे रूप भविष्यसूचक तर असतेच; परंतु अनेकदा अंतरंग उलगडण्याची परवलीची खूण तिच्यात सापडते.

परवा नाशिकला माझ्या ‘कार्ल मार्क्स’वरच्या व्याख्यानाच्या निमित्ताने तो भेटला आणि गप्पा झाल्या. या गप्पांतील त्याचे एक वाक्य गेले तीन आठवडे माझ्या मनाशी पुन:पुन्हा येत आहे. ‘(तुमच्या) चेंबूरला आता या उन्हाळ्यात बर्फसुद्धा पडू शकेल.’ तो म्हणाला. तेव्हापासून एखादा हॉलीवूड गाजवलेला, प्रलयाच्या कल्पनेवर आधारित असलेला भयपट पाहावा, तशी मला जाणीव झाली. अमेिरकन भय, साहस, प्रलयपटात शेवटी जसा नायक आपल्या अख्ख्या कुटुंबासकट एकमेकांवर चुंबनांचा वर्षाव करत आपल्याला भेटतो, तसाच तो संध्याकाळी मी निघताना आपल्या बायको-मुलांसह भेटायला आल्यामुळे, अमेरिकन सर्वनाशाचा पूर्ण शो पाहून झाल्यावर जो िथजलेपणा येतो, तशी बधिरता मला आली. माझ्या मागच्या लेखात ‘पॉल व्हिरिलिओ’ या समकालीन तत्त्वचिंतकाचा उल्लेख केला होता.
आपल्या जीवनाचा वाढलेला वेग, नव्या मानवनिर्मित विश्वामध्ये वाटणारे नवे भय, नवी यातनाघरे व त्यामुळे भयावर आधारलेले, भीती दाखवून केलेले राजकारण, हे व्हिरिलिओच्या चिंतनाचे विषय आहेत. जीवनाच्या अमर्याद वेगामुळे पर्यावरणाचे भौतिक, अभौतिक, वैचारिक व म्हणून राजकीय दुष्परिणाम किती मोठे आहेत, हे त्याने सांगितले आहे. या राक्षसी वेगाचा उद््भव भांडवलशाहीतच आहे आणि म्हणून ितला तो ‘टर्बो भांडवली व्यवस्था’ असे संबोधतो.

परंतु व्हिरिलिओच्या कित्येक वर्षे आधी, जवळपास शंभर वर्षांहून अधिक वर्षे आधी कार्ल मार्क्सने भांडवलशाहीच्या अशा लक्षणांविषयी आपली अनुमाने नोंदवली होती. त्या काळात अर्थव्यवस्थेत असलेल्या भांडवलशाहीच्या राक्षसी उत्पादन क्षमतेविषयी मार्क्सला स्पष्ट कल्पना होती. एखाद्या प्रेषितासारखे त्याला येणाऱ्या काळाचे चित्र स्पष्ट दिसत होते. भांडवली अर्थव्यवस्था या पृथ्वीचा नकाशाच बदलेल व जिवंत असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर तिचा प्रभाव असेल, याचे भान त्याला होते. तरीही त्याच्या विश्लेषणात अपुरेपणा होता की काय, अशी शंका यावी, अशी स्थिती मानवनिर्मित जगातील नवनव्या भयगंडाची प्रचिती आल्यानंतर येते. मार्क्सच्या मांडणीमध्ये मानवी जीवनाच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय जडणघडणीचे दोन मूलभूत पैलू म्हणजे, श्रमजीवी/कामगार व निसर्ग-नैसर्गिक साधनसंपत्ती. निसर्ग आणि कामगार यांच्या ‘चयापचय’ संबंधातून कामगार जग कसे घडवतो, आणि मानवनिर्मित जगात नवा मनू कसा घडत जातो, याचे सुंदर वर्णन मार्क्स अभ्यासताना मिळते. स्वाभाविकच कामगार व निसर्ग हे दोन्ही घटक सातत्याने ‘बदलतात.’ परंतु मार्क्सच्या लिखाणात निसर्गाची परिमितता-मर्यादा फारशी जाणवत नाही. निसर्ग अनंत नाही; तो संपू शकतो, याची कल्पना मार्क्स वाचून येईलच, असे नाही
. परंतु भांडवली अर्थव्यवस्थेच्या महाउत्पादक, सतत अवाढव्य होत जाणाऱ्या, नवनव्या नसलेल्या गरजा निर्माण करणाऱ्या आणि नैसर्गिक साधनसंपत्ती खाऊन ितला संपवू शकणारी भूक असलेल्या भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये या अवनीला जिवंत ठेवण्याची, टिकवण्याची क्षमता वा शक्यता नाही, याचीच खात्री पटत जाते.

आज ‘जमीन बळकाव कायद्या’चा बडगा उगारलेला असताना, कंत्राटी वा अन्य कामगार कायद्यांची गळचेपी करून विकासाचे गाजर दाखवले जात असताना, अन्न सुरक्षा कायद्याची कक्षा मर्यादित करून लाखो गरीब कुटुंबांना वंिचत केले जात असताना, पर्यावरण मंत्रालयच विकासाची पुंगी वाजवत असताना आणि प्रधानमंत्री विकासाच्या गुंगीची गीते गात असताना, आपण कोणत्या दरीत कोसळत आहोत, याचे भान येण्याची गरज आहे.

विकसित राष्ट्रांतील सुबत्तेकडे बोट दाखवून तेथे घेऊन जाण्याची भाषा करणारे निसर्गातील मर्यादित साधनांकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करतात. उदाहरणार्थ, विकसित देशात दर माणसी सुमारे पाच-सहाशे लिटर पाणी दररोज वापरले जाते. जगाचे सोडा, फक्त आपल्या देशातील सर्व माणसांना एवढे पाणी पुरवायचे ठरवल्यास साऱ्या पृथ्वीचाच तळ कोरडा पडेल. ही वस्तुस्थिती आहे. असे असूनही प्रगतीचा वारू चौखूर उधळायला, आपण सारेच तयार आहोत. याची चिंता वाटूच नये काय? निसर्गाची ठेव अनंत नाही. ती संपेल, आणि संपत असताना असल्या नसल्या गोष्टी काबीज करण्यासाठी प्रबळांची महायुद्धे जुंपतील, गोरगरिबांच्या वस्त्या, शेतीभाती, जमीनजुमला, पाणी आदी सार्वजनिक मालमत्तांवर टाच तर येईलच; पण संहाराचा डोंब उसळेल, याचे अवधान आपण बाळगणारच नाही आहोत काय?

व्हिरिलिओच्या मते, (प्रगतीच्या) वेगामुळे प्रथम मोकळ्या अवकाशाचा ऱ्हास होतो. त्याने ‘वास्तवाचा प्रवेग’ अशी संकल्पना मांडली आहे. साठ वर्षांपूर्वी डॅनिअल हॅलवीने ‘इतिहासाच्या प्रवेगाचा प्रबंध’ या नावाचे पुस्तक लिहिले होते. घोड्यावरून ट्रेनपर्यंत, ट्रेनपासून साध्या विमानापर्यंत आणि जेट विमानापासून अवकाशयानापर्यंत, असा इितहासाचा प्रवास आलेख त्याने विशद केला होता. इितहासाचा असा वेग एक वेळ नियंत्रित करता येतो, परंतु जेव्हा वास्तवच वेगाने धावू लागते, तेव्हा मानवी शारीरिक मर्यादांना त्यांचे आकलन होणे दुरापास्त होते.
तंत्रज्ञानाच्या टोकाच्या शर्यतीत आज मानवी संवेदना अपुऱ्या पडतात. माणूसविरहित कार्यक्रमप्रणालींमुळेच गेल्या दशकात वित्तीय बाजारपेठा कशा कोसळल्या, यावर इतके लिहून झाले आहे की, वेगळ्या भाष्याची गरज नाही. प्रबळांचा वेग, साधनसंपत्तीचे असमतोल वाटप आणि मरत चाललेल्या निसर्गामुळे निर्माण होणारे उत्पात हा आजच्या भांडवली व्यवस्थेपुढचा मुख्य प्रश्न आहे. मार्क्सने दीडशे वर्षांपूर्वीच लिहिले होते की, या अर्थव्यवस्थेतच ितच्या नाशाची बीजे दडली आहेत. त्याच्यासमोर त्या वेळी वातावरण बदल िकंवा साधनसंपत्तीची महायुद्धे हा प्रश्न जसा आज िदसतो, तसा नसेलही; परंतु असे घडण्याची शक्यता त्याने पुसटपणे व्यक्त केली होतीच.

राहुल बनसोडेची "चेंबूरमध्ये पडणारा बर्फ' ही कविता नसून शक्यता आहे. सर‌्रिअल किंवा अतिवास्तव भीती आहे. या भीतीचा उगम आपल्या वेगवान जीवनशैलीत आहे. जगभर चालू असलेल्या ‘स्लो’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चळवळी हा त्यावरचा एक प्रतिसाद आहे. मार्क्सच्या सुप्रसिद्ध ‘कॅपिटल’ या ग्रंथाच्या पहिल्या खंडाच्या अखेरच्या पानात त्याने माणूस इतर प्राण्यांपेक्षा कसा वेगळा आहे, हे सांगताना माणसाच्या अमर्याद व लवचिक किंवा परिवर्तनशील गरजांकडे बोट दाखवले आहे.
अमर्याद गरजांचा परिणाम चेंबूरमध्ये बर्फ किंवा जगभर युद्धाचा वणवा पेटवू शकतो. परंतु परिवर्तनशीलता हा जर मानवी गरजांचा गाभा असेल, तर त्यावर काम करावे लागेल. व्यवस्थाबदल घडवावा लागेल. गावोगावच्या कवी बनसोडेंना कामाला लावायला लागेल. विकासाच्या गुंगीचा उतारा शोधावा लागेल.
sanjeev.khandekar@gmail.com