आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्षवर्धन वटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाज- अर्थशास्त्रज्ञ, न्यूरो व मानसतज्ज्ञ आणि बलाढ्य औषध कंपन्या यांच्यासाठी ‘आनंदवना’तील शोध हा पर्वणीचा काळ आहे. गेल्या काही वर्षांत पिळदार स्नायूंसाठी बाहेरून घ्यायची संप्रेरके बाजारात आल्यामुळे व पोटाचे सहा पॅक्स हे सौंदर्याचे मानक ठरल्यामुळे आपल्याला रस्तोरस्ती असे ‘प्रोटिन्स’ घेऊन वाढवलेले पिळदार पुरुष व सडपातळ स्त्रिया दिसू लागल्या आहेत. तशीच ‘आनंदाची गोळी’ वा हर्षवर्धन वटी बाजारात उपलब्ध झाली तर?
(हा लेख वाचण्यासाठी एक नवा प्रयोग केला आहे. खाली दिलेली लिंक उघडावी व त्या पार्श्वभूमीवर लेखाचे वाचन किंवा मनन करावे. ‘ऑडिओ व्हिजुअल इन्स्टालेशन’सारखे या लेखाकडे पाहावे, अशी कल्पना आहे.)
‘Breath Samual Beckett’
http://youtube/45F9rzGrt74’
सुमारे बारा वर्षांपूर्वी ‘अभिदानंतर’ प्रकाशनाने माझी एक दीर्घ मुलाखत पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली होती. या मुलाखतीत फ्रॉईडच्या ‘अबोध’ संकल्पनेपेक्षा वेगळी लाकांच्या (Lacan) सुखस्रावावर आधारित अशी बाजारपेठेच्या मुक्त व अतिमुक्त वातावरणात सुखाचे आभासी झरे कसे पाझरतील, याची कल्पना देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दोनच वर्षांनी माझे एक (मर्यादित आवृत्ती) पुस्तक “1, 2, 3... Happy Galaxy’ हे माझ्या जलरंगातील चित्रांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात ‘बाबा रामदेव’सारख्या दिसणाऱ्या एका बाबाचे विविध आसनात केलेले व मुक्तीची पार्श्वभूमी असलेले व्यक्तिचित्रण होते. त्याच सुमारास प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॅनिअल कान्हेमान यांना ‘अनुभवलेला आनंद’ मोजण्याच्या त्यांच्या प्रयोगांसाठी नोबेल पुरस्कार मिळाला, तर रिचर्ड लिआर्ड या अर्थतज्ज्ञाला त्याच्या ‘आनंद नव्या विज्ञानाचे धडे’ या पुस्तकासाठी ‘आनंदाचा बादशहा’ असा किताब देण्यात आला होता. रिचर्ड यांचे हे पुस्तक सर्वाधिक खपाचे विक्रम साधणारे नव्हे, तर अनेक विकसित देशांच्या आर्थिक धोरणांवर प्रचंड प्रभाव असलेले आहे, असे म्हणतात.

‘मानवी उदासीनता (depression) हाच जगासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे; बेरोजगारी नव्हे, असे त्यांचे थोडक्यात म्हणणे असून त्यात निश्चितच तथ्य आहे. साहजिकच विविध पुढारलेल्या देशांत डिप्रेशन हटवण्यासाठी ‘सकारात्मक मानसशास्त्र’ किंवा ‘संज्ञात्मक मनोव्यापार उपचारपद्धती’ अशा नव्या व्यवस्थापकीय योजनांसाठी अवाढव्य खर्चाची तरतूद केली जाऊ लागली आहे.

कान्हेमानच्या प्रयोगात मानवी अनुभवात कशामुळे त्याला प्रसन्न वा चैतन्यमयी वाटते व कशामुळे उदासीन वा कंटाळवाणे वाटते, याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नातून आनंदाची मानके निर्माण करण्यात तो यशस्वी झाला, असे मानले जाते. ‘थिंकिंग, फास्ट अँड स्लो’ या त्याच्या पुस्तकाचा परिचय वेगळा करून देण्याची गरज नाही, इतकेच तेही लोकप्रिय व सतत संदर्भात येणारे काम आहे.

हे सगळे मी आज का सांगतो आहे? ते जाणून घेण्याआधी एका ‘वैश्विक बाबा रामदेव’बद्दलही थोडेसे सांिगतलेले बरे. या महाबाबाचे नाव मॅथ्यू रिकार. हिमालयाच्या सान्निध्यात राहणारा हा बौद्ध भिख्खू असून सूर्योदयाच्या काळात नवजात सूर्यकिरणांनी न्हाऊन निघणारी उजळलेली पर्वतशिखरे न्याहाळत ध्यान करणे, हाच त्याचा गेल्या चाळीसएक वर्षांचा मुख्य कार्यक्रम आहे. लखलखणाऱ्या हिमशिखरांची प्रतिमा त्याच्या हृदयातील (मनातील? मेंदूतील?) शांततेच्या अथांगतेत हळूहळू सामावली जाते आणि चैतन्यमयी परमानंदाच्या शिखरावर त्याला पोहोचवते, असे मानले जाते. सुमारे दहा हजार तासांच्या अशा तपश्चर्येनंतर आज जगभर जो ‘माइंड फूलनेस’ नावाचा नवा परवलीचा शब्द कळतो आहे, त्या संज्ञेचा तो अनभिषिक्त सम्राटच आहे, असे मानतात. आपले बाबा रामदेव वगैरे त्याच्या विराट ब्रह्मानंदासमोर ‘किस झाड की पत्ती’!!
व्हिसकॉनसिन विद्यापीठाच्या मज्जासंस्थेचा अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळेने रिकारच्या मेंदूचे अगणित ‘स्कॅन’ अभ्यासून आणि अन्य न्युरो, अर्थ, मानस, समाज आदी शास्त्रज्ञांनी त्यांचे प्रयोग करून २००६मध्ये असे जाहीर केले की, मॅथ्यू रिकार नावाचा हा बौद्ध साधू आज जगातील सर्वाधिक आनंदी मानव आहे! सर्वाधिक आनंदी मानवाचा किताब मिळाल्यानंतर बाबा िरकार ज्या वेळी हिमालयात नसतात, त्या वेळी बहुधा जगातील अितश्रीमंत उद्योगपती, कलावंत, राजकारणी इ. अनेक मान्यवर व अति सामर्थ्यशाली माणसांच्या महालातील दिवाणखान्यात वा मेजवानीच्या टेबलवर ‘माईंडफूल नेस’ किंवा ‘परमानंद’ या विषयावर प्रवचन देताना दिसतात. डाव्होस येथे भरणाऱ्या जागतिक अर्थपरिषदेत हे महाशय जगातील राष्ट्रप्रमुख बडे उद्योग मालक, उच्च व्यवस्थापक आदी महापुरुष स्त्रियांना ‘आनंदाचे अर्थशास्त्र’ या किंवा अशाच अाध्यात्मिक अर्थकारणावर मार्गदर्शन करतात.

एकूण काय की, सध्याच्या भांडवलशाहीच्या खडतर वाटचालीत समाजाला आनंदी कसे ठेवता येईल व ध्यानधारणा वा तत्सम अाध्यात्मिक प्रयोगातून सध्याच्या उदासीन, तुटलेल्या व कंटाळलेल्या मानवी समाजात अधिक काम करण्याची, अधिक खरेदी करण्याची, अधिक चंगळ उपभोगण्याची वृत्ती कशी वाढवता वा जोपासता येईल, यावर सगळ्याच उच्चवर्गाचे लक्ष लागले आहे. समाजाला सुखी ठेवण्याचे दोन साधे मार्ग असतात. पैकी एक व्यवस्थेतून जन्माला येतो. व्यवस्था समाजाची काळजी घेते, पायाभूत सुखसोयी, आरोग्य, शिक्षा आदी उपलब्ध करते, सामाजिक समता व बंधुभावावर आधारित उत्क्रांत मानवी जीवन निर्माण करते. दुसरा मार्ग, ज्या वेळी व्यवस्था समाजाला सुखी ठेवत नाही, तेव्हा निर्माण होतो किंवा करावा लागतो. या मार्गाला व्यवस्था बदलाचे राजकारण म्हणतात. साहजिकच व्यवस्था बदलाच्या राजकारणाला शह देण्यासाठी समाजाला आभासी सुखाच्या मोहजालात गुंतवण्याचे नवनवे मार्ग शोधले जातात. सद्य काळात ज्या वेळी विकासाच्या नावाखाली एक वेगवान जीवन जे की, तंत्रज्ञानाच्या नवनव्या उन्मेषांमुळे मानवी शक्तीच्या व बुद्धीच्या आकलनापुढे थिटे पडू लागले आहे; मानवी संबंध उद्ध्वस्त व जीवन एकांडे व म्हणून उदासीन व कंटाळवाणे होऊ लागले आहे. श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढल्यामुळे, पायाभूत सोईंचे रेशनिंग झाल्यामुळे व महागडे तंत्रज्ञान समाजाच्या बहुजनांना न परवडल्यामुळे जे जीवन अशांत झाले आहे, त्या जीवनाला अशा ‘सकारात्मक मानसशास्त्रीय’ किंवा ‘अाध्यात्मिक योग साधने’तून ऊर्जा देण्याचे प्रयोग आज जगभर सुरू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिवस किंवा मोठमोठ्या उद्योगसमूहात प्रशिक्षणाच्या नावाने सुरू असलेले ‘संज्ञात्मक मनोव्यापार उपचार’ हे अशाच बेगडी आनंदाचे प्रयत्न आहेत काय, अशी शंका येते.

‘आनंदी राहण्यासाठी आनंद म्हणजे काय, हे समजून घ्यावे लागेल’, अशी धारणा असलेली तात्त्विक विचारप्रणाली बुद्धकाळापासून आपल्याकडे व ग्रीक काळापासून पाश्चिमात्य देशात उगम पावली. बुद्ध सर्वाधिक आनंदी होता काय? जिझस वा पैगंबर, ज्ञानेश्वर वा तुकाराम, कबीर वा आणिक कुणी जो जो आनंदाच्या शोधात गेल्या हजार वर्षांत चालला, त्या आपल्या महात्मा गांधींपर्यंत कोणाकोणाला जगातील सर्वाधिक आनंदाचे निधान सापडले? दु:खी माणसाला कवटाळत, मानवी समाजाचे दु:ख कसे कमी होईल, याचीच चिंता त्यांनी अखंड वाहिली. त्यासाठी देह झिजवला, अश्रू पुसले, जखमा बांधल्या, युद्ध नको शांती हवी असा संदेश दिला, सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले, न्यायाचे लढे दुर्बलांच्या व दुबळ्या दरिद्री लोकांच्या हितासाठी उभारले. अशा प्रयत्नांतून आनंदाचा एखादा थेंब त्यासाठी तहानलेल्या माणसाच्या कोरड्या जिभेवर कसा पडेल, याचे राजकारण केले. बदलाचे राजकारण केले. अशा बदलाऐवजी बाहेरून उसना आनंद माणसाच्या मनात भरता येतो, याचे ज्ञान सद्य प्रस्थापित राज्यकर्ते व उद्योगपती यांना झाल्यामुळे समाजाचे चलनवलन नियंत्रित करण्यासाठी कृत्रिम आनंदाची निर्मिती कशी करता येईल, याचे प्रयत्न न झाल्यास नवल नाही.

समाज-अर्थशास्त्रज्ञ, न्यूरो व मानसतज्ज्ञ आणि बलाढ्य औषध कंपन्या यांच्यासाठी ‘आनंदवना’तील शोध हा पर्वणीचा काळ आहे. गेल्या काही वर्षांत पिळदार स्नायूंसाठी बाहेरून घ्यायची संप्रेरके बाजारात आल्यामुळे व पोटाचे सहा पॅक्स हे सौंदर्याचे मानक ठरल्यामुळे आपल्याला रस्तोरस्ती असे ‘प्रोटिन्स’ घेऊन वाढवलेले पिळदार पुरुष व सडपातळ स्त्रिया दिसू लागल्या आहेत. तशीच ‘आनंदाची गोळी’ वा ‘हर्षवर्धन वटी’ बाजारात उपलब्ध झाली तर?
आनंदाच्या गोळीचे राजकारण व अर्थकारण हा आपल्या सामाजिक भविष्याचा पुढचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या व अशा गोळीमुळे दाबल्या गेलेल्या इच्छा व दु:खांचे ज्वालामुखी पोटात घेऊन भविष्यात ज्या वेळी माणसे जगतील, तेव्हा नव्या स्फोटांची मािलका कदाचित मानवी जगालाच उलथून टाकेल काय, अशी भीती वाटते.
(sanjeev.khandekar@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...