आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहवाची वाफ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
do I love, when I love you my God?’ असा प्रश्न सेंट ऑगस्टिनने विचारला, त्याला आता पंधराशे वर्षे होऊन गेली. सद्य:परिस्थितीत संस्कृतीकरणाचे जुने बुरूज ढासळत असताना ऑगस्टिनच्या चालीवरील एक नवा व गमतीदार प्रश्न मला व तसा आपल्या सर्वांनाच पडला आहे.
‘What do I ‘like’, When I ‘like’ your post?’
‘लाइक’ हा आपल्याला माहीत असलेला साधा शब्द. शब्दकोशात या शब्दाच्या अर्थाच्या किमान दहा तरी छटा आढळतात. ‘लाइक’ म्हणजे (अमुक)प्रमाणे, सारखे, आवडणे, पसंत पडणे, अधिक पसंत पडणे, मानवणे, मान्य असणे आणि इच्छिणे अशा त्यातील निवडक छटा आहेत.

एखाद्या जन्मदिवसाच्या समारंभाची बातमी असो, कोणाच्या मृत्यूची असो, अपघाताची असो, कविता वा चित्राची असो; गाण्याची लकेर असो वा चित्रपटाची फीत असो; राजकारण, समाजकारण वा राजकीय पक्षाच्या नेत्याची छबी असो; सार्‍या समाजाची धडधड वा धडपड याचा प्रत्येक ठोका वा झोका एकाच ‘क्लिक’ची व म्हणून एकाच ‘किक’ची वाट पाहत असतो. लाइक ही ती किक, हीच ती धुंदी, हीच ती मस्ती आणि हाच तो मान्यतेचा पुरावा.

मित्राने मित्राला, मैत्रिणीला ‘लाइक’ करून खुश करणे हा प्रणयाराधनेचा नवा मार्ग आहे. आपल्या मैत्रिणीने दुसर्‍या पुरुषाच्या छायाचित्राला वा मताला लाइक करणे व तेही असे उघड्यावर, म्हणजे प्रतारणा किंवा असूयेची ठिणगी पडणारे कृत्य आहे, असे मानणारे कमी नाहीत.

त्याला/तिला माझ्यापेक्षा अधिक लाइक का, असा विचार करून उदास होणारे, उदासीनतेच्या अत्युच्च पातळीवर पोहोचून मानसिक रोगाची शिकार होणारे, लाइकच्या हव्यासातून वैर धरणारे, अगदी खून-आत्महत्येपर्यंतचा प्रयत्न करणारे जगभर वाढू लागले आहेत. लाइक म्हणजे आवडणे, लाइक म्हणजे पसंत असणे, लाइक म्हणजे नोंद घेणे व लाइक म्हणजे इच्छा असणे अशा विविध छटांतून प्रवास करत शेवटी ‘इच्छे’च्या, मानवी जगण्याच्या अनिरुद्ध मार्गावर येऊन पोहोचते.
‘इच्छा’, तिचा जन्म व तिच्या पूर्तीपर्यंतचा प्रवास, इच्छेचा उगम, विस्तार, तिचे दमन वा विमोचन यावरच तर मानवी सांस्कृतीकरणाचा प्रवास अवलंबून असतो, असे फ्रॉइडने गेल्या शतकात आपल्याला सांगितले. संस्कृती हीच भाषा किंवा अभिव्यक्ती असते आणि या अभिव्यक्तीतून समाजाच्या राजकीय घडणीचा चेहरा आपल्यासमोर येतो, याची मांडणी मार्क्सने त्याही शतकाच्या आधी करून आपल्यासमोर ठेवली. या दोन महान तत्त्ववेत्यांनी मानवी इच्छेच्या पॅथॉलॉजीकडे, तिच्या पूर्तीच्या राजकीय रचनेकडे जवळून निरखण्याचे एक भिंग आपल्याला दिले आहे.

आभासी सत्याच्या नव्या दुनियेत ‘लाइक’ ही जर इच्छा असेल, आकांक्षा असेल, तर तिचे महत्त्वाकांक्षेत रूपांतर करण्यासाठी ‘लाइक’चे प्रॉडक्ट बनले नाही तर नवल. त्यामुळे राजकीय पक्षापासून (मग ते डावे असोत वा उजवे) सटरफटर गोष्टी विकणार्‍या कंपन्यांपर्यंत, बातम्या विकणार्‍या चॅनल्सपासून ग्रंथ विकणार्‍या प्रकाशकांपर्यंत, आयुष्यातील प्रत्येक वस्तूशी ज्याचा ज्याचा विकत घेण्याशी, विकण्याशी (वा निर्माण करण्याशी) जो जो संबंध येतो तो तो, ती ती, या नव्या ‘लाइक’ नावाच्या प्रॉडक्टशी आपला सांधा जुळवून - तिच्या विविध अर्थछटांसह लाइक नावाचे प्रॉडक्ट निर्माण करण्याच्या व ते विकण्याच्या धंद्यात उतरते.

डाव्या, उजव्या, जहाल, नेमस्त अशा सर्वच मंडळींनी एकाच हमामखान्यात उतरून जलक्रीडा करण्याचे हे महान दृश्य मानवी सांस्कृतीकरणाच्या राजकीय इतिहासाचे ‘न भूतो’ व महत्त्वाचे पान आहे.

एकदा लाइक नावाच्या इच्छेचे प्रॉडक्ट झाले की, तिचा इच्छापूर्ती प्रवास पूर्णपणे बदलतो. ती विकत घेता येते, शिकता येते. तिचा साठा करता येतो, ती वाटता येते. इच्छा इच्छाच राहत नाही. मग नसलेल्या इच्छेचा पाठपुरावा करण्याचा नवा प्रवास सुरू होतो. लाका या मानसशास्त्रज्ञाने गेल्या शतकात ‘अतिरिक्त इच्छां’चे गणित मार्क्सच्या ‘अतिरिक्त’ मुद्द्याचा उपयोग करून मांडले होते. माझा प्रयत्न त्यापुढे एक पाऊल टाकण्याचा आहे. नव्या भांडवली मुक्त अति स्वैर बाजारपेठीय अर्थव्यवस्थेत इच्छेचेच प्रॉडक्ट बनवून ‘नसलेल्या इच्छेची इच्छा’ निर्माण करून सार्‍या समाजाला अतृप्त इच्छांच्या भुतांच्या वा वेताळाच्या टोळीमध्ये किंवा एका सतत लागलेल्या व कधीही शांत न होणार्‍या भुकेल्या व म्हणून वसवसलेल्या जनावरांच्या कळपामध्ये परिवर्तित करता येते. ‘लाइक’ ही अशा परिवर्तनाची पहिली पायरी आहे.

खिशात पैसे असतील तर असे लाइक विकत घेतात. अधिकाधिक लाइक जमा करून ते मिरवता येतात. अतृप्त आत्म्यांचे कळप वाढवता येतात. त्यांची झुंड तयार करता येते. अशा झुंडींना भक्ष्य व लक्ष्य दाखवून मोकाट सोडता येते. मोकाट सुटलेल्या झुंडीच्या साहाय्याने त्यांच्यातील भुकेचा राक्षस जागृत करून रान उठवता येते, रान भुईसपाट करता येते. अशा टोळधाडी आकाशभर उडवून उभी पिके, शेते, वनराई या सर्वांचा घास घेता येतो. तेव्हा एवढ्या माहितीवरून गेल्या निवडणुकीत व सद्य: राजकीय परिस्थितीत, सिडनी वा मेडिसन स्क्वेअर गार्डनमधील काश्मीर वा बंगालमधील रणधुमाळीत लाइक नावाच्या प्रॉडक्टने काय व कसे प्रताप दाखवले, याचे विश्लेषण करता येईल; परंतु तो आजचा विषय नाही.

आवड व नावड यांची राजकीय निवड म्हणजेच, सौंदर्यशास्त्राचा अंगभूत नियम, सौंदर्यानुभवाचा आविष्कार अशी सोपी व्याख्या मी केली आहे. मार्क्स, डार्विन व फ्रॉइड यांनी केलेल्या मूलभूत मांडणीचा तिला आधार आहे. लाइकचे थर ही जर आपला सौंदर्यशास्त्राची रचना बनणार असेल व लाइकची कृती हा जर सौंदर्यानुभव ठरणार असेल, तर येणार्‍या काळात आपले सांस्कृतिक जीवन कसे पसरट व उथळ बनणार आहे, याची कल्पना यावी. अशा उथळ जीवनातील लोकशाही प्रक्रियेची सूत्रे साहजिकच खुल्या व स्वैर बाजारव्यवस्थेकडे आपोआप कशी जातील, हे सांगण्यासाठी कोण्या नव्या मार्क्सची गरज नाही. अशा आजच्या व्यवस्थेत फ्रॉइड असता तर त्याने लाइक मिळणे-मिळवण्याच्या क्रियेचा परिणाम नोंदवला असता.

परंतु लाइक नावाच्या वस्तूच्या सौंदर्य नियमाची खरी गंमत वेगळीच आहे. मागे सांगितल्याप्रमाणे ‘आवड व नावड’ यांची राजकीय निवड हा जर सौंदर्यानुभवाचा गाभा असेल तर लाइक या वस्तूमध्ये ‘नावड’ ‘नापसंत’ ‘नाही’ या भावनेचा आविष्कार कोठे आहे? अलीकडेच फेसबुकचे संस्थापक मालक मार्क झुकेरबर्ग यांनी ‘अनलाइक’ ‘नापसंत’ हा पर्याय फेसबुकवर उपलब्ध होणार नाही, हे पुन्हा अधोरेखित केले. म्हणजेच आता पसंत असेल वा नापसंत असेल तरी ‘लाइक’ हा एकमेव भाषाविष्कार समकालीन समाजा(व्यवस्थे)ला उपलब्ध आहे. हा भाषेचा संकोच व लोकशाही समाजाची गळचेपी नव्हे काय?

उलटणार्‍या प्रत्येक निमिषागणिक समोरच्या पडद्यावर सतत कुणी ना कुणी, हजारो लाखो कोटी कोटी जण पुन:पुन्हा ‘लाइक’ हाच मंत्रजागर करीत असतील. तेवढी एकच कृती उपलब्ध असेल तर नकळत आपण सर्वच जण ‘अनलाइक’ ‘नापसंत’ हा पर्याय, ही भाषा, ही संस्कृतीच विसरून जाणार नाही काय?

नकार हा मानवी उत्क्रांतीचा मूलभूत आधार आहे. नकार ही राजकीय संघर्षाची नांदी आहे. नकार हे जिवंत समाजाचे लक्षण आहे. नकार हा व्यवस्थेला विचारलेला प्रश्न आहे. नकार हा लोकशाही प्रक्रियेचा अधिकार आहे. नकारातून आकार, मकार वा ओंकार म्हणजेच व्यवस्थेचा जसा जन्म झाला, तसा नकारातून व्यवस्था बदलण्याची, ती मोडण्याची, तोडण्याची ऊर्मी येथील तळागाळातील दीनदुबळ्या शोषित वर्गामध्ये निर्माण झाली. नव्या सांस्कृतिक जगात टप्प्याटप्प्याने हा नकार, हा कणा, हा प्राण संपवण्याचा, पुसट करण्याचा, धूसर करण्याचा प्रयत्न सर्व पातळ्यांवर सुरू आहे.

भाषा ही सर्वसामान्य माणसाकडे असलेली, त्याने मिळवलेली ‘सार्वजनिक’ मालमत्ता आहे. नव्या व्यवस्थेने सार्वजनिक क्षेत्राचा घास घेताना आपल्याही नकळत आपल्या भाषेवरच कुऱ्हाड चालवली आहे. ‘लाइक’चे सौंदर्यशास्त्र माणसाला मुकी मेंढरे बनवण्याचे तंत्र आहे. लाइकचा सौंदर्य अनुभव माणसाला बटण दाबून सुरू किंवा बंद करण्याचे यंत्र आहे. लाइकमधून जन्माला आलेले तत्त्वज्ञान हा भाषा संहाराचा मंत्र आहे. एका बोबड्या वा मुक्या, मृत वा बेशुद्ध, कोत्या व उथळ समाजाच्या निर्मितीची ही सुरुवात आहे.

जेव्हा जेव्हा यंत्रणेने नकाराच्या वाटा बंद केल्या, तेव्हा तेव्हा कोंडलेल्या नकाराच्या स्फोटाने व्यवस्था हादरून गेल्याचा इतिहास आहे. लाखो ‘लाइक’ मिळवून, विकत घेऊन या समाजात ‘नकारा’चे अस्तित्वच उरलेले नाही, असा प्रचार व प्रसार करण्याचा आज धूमधडाका आहे. पसंतीच्या लाटा आणि त्यावर तरंगणारे होयबांचे पसंतगण यांची आज सद्दी आहे. त्यांच्या लाइकच्या क्लिकक्लिकाटात दाबून टाकलेला नकार जेव्हा केव्हा प्रगट होईल, तेव्हाच व तेवढीच कलाकृती या समाजात शिल्लक राहील.
(हे सदर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी मासिक स्वरूपात प्रकाशित होईल.)
sanjeev.khandekar@gmail.com