आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुणग्यांचे गर्वगीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका पैलूदार भाषा इतिहासाची व त्यायोगे एका समृद्ध समाजाची कबर खोदताना पाहून काळीज दडपले, व कोणाला हा प्रदेश सोडून जावेसे वाटले, तर त्याच्या स्वत:ला हद्दपार होण्याच्या मानसिक कारुण्याने आपल्या जगण्यावर काजळी चढते. जयपूर कलाकृती वादाला अशा काजळीची छाया अधिकच गहिरी बनवते...
सुमारे एक-दीड वर्षांपूर्वी ‘मॅडिसन स्क्वेअर गार्डन्स’च्या पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतर देशात तयार होत असलेल्या नव्या भुसभुशीत व बुळबुळीत सौंदर्यशास्त्राविषयी, आणि इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून उत्क्रांत झालेल्या सार्वजनिक संपन्न अवकाशाचा मूलभूत घटक असलेल्या (सौंदर्य) भाषेच्या होणाऱ्या ऱ्हासाविषयी विस्तृत विवेचन करणारा दीर्घ लेख ‘अभिदानंतर’ या समकालीन वाङ‌्मयीन जाणिवांचा शोध घेणाऱ्या अनियतकालिकात मी लिहिला होता. आज पुन्हा या लेखाची आठवण होण्याचे कारण म्हणजे, पॉप्युलर सिनेमातील एक महत्त्वाचा नायक अामिर खान याने ‘माझ्या पत्नीला देश सोडून जावे असे वाटते, इतके वातावरण दूषित झाले आहे.’ असे उद्गार काढणे हे जसे आहे, तसेच गेल्या आठवड्यात जयपूर येथे घडलेल्या ‘डिव्हाईन बोवाइन’, ‘पवित्र जनावर’ या कलाकृतीच्या निमित्ताने जे हिंसक असहिष्णूतेचे दर्शन अतिरेकी जमाव व बेगुमान पोलिस यंत्रणेने दाखवले, या प्रसंगातही आहे.
सहिष्णुता, आदर, सभ्यता, सांस्कृतिकता, सहअनुभूती, सहजीवन आदी भाव विचार व त्यांचे अाविष्कार समाजातील त्या-त्या वेळी निर्माण होणाऱ्या सधन कलाकृतींची एक परिणीती असते. संगीत असो वा नृत्य, कविता असो वा नाटक, चित्र -शिल्प असो वा ललित लेखन, या व अशा अनेक अंगाने मानवी समाजाच्या मानसिक अवकाशाची प्रगती होत असते. कला हे या अवकाशात प्रगटणारे जणू चांदणेच असते. अशा चांदण्याच्या कमी-अधिक छटा व छाया प्रकाशातून त्या त्या समाजाचे घनसखोल सौंदर्य टिपणे, म्हणजेच अर्थपूर्ण जगणे. कलेची भाषा व्यामिश्र असते, छाया प्रकाशांच्या डौलदार बांधणीतून जे पाहायचे आहे, जे ऐकायचे आहे, जे वाचायचे आहे, त्याच्या विविध छटा कधी ठळक तर कधी पुसट, कधी स्पष्ट तर कधी अस्पष्ट, कधी शब्दांतून तर कधी त्यांच्या ध्वनी प्रतिमांतून, कधी दृश्य तर कधी अदृश्य, कधी पिसाच्या हळुवार स्पर्शासारखे, तर कधी टोकदार धारदार शस्त्राने खुपसावे तसे, अशा शेकडो नव्हे हजारो पद्धतीने व मार्गाने, इतिहासाच्या प्रस्थर थरांच्या उत्खननातून, नवनव्या विटा रचत, रचलेले मोडत, आकारास आलेली कलेची भाषा हा दर क्षणी केलेला उत्क्रांतीचा अविरत घोष असतो. सर्जनशीलता व प्रतिभा यांच्या मिलनातून अशा भाषेचा जन्म, विस्तार व विकास होत असतो. निर्माण केलेल्या शब्दाला, प्रतिमेला, स्वराला वा मुद्रेला मिळणारा प्रतिसाद व त्यांची तयार होणारी बिंबे व प्रतिबिंबे म्हणजे कलेचा व म्हणून समाजाचा भाषा व्यवहार. हा भाषा व्यवहार म्हणजेच संस्कृती, असे मार्क्स जेव्हा लिहितो, तेव्हा तो या व्यामिश्र सामाजिक आंदोलनाचाच अर्थ आपल्याला एका साध्या समीकरणातून सांगू पाहतो.
बटबटीतपणा हा प्रतिमेचा सर्वात मोठा शत्रू, बुळबुळीत-गुळगुळीतपणा हा समाजाच्या सूक्ष्म व तरल जाणिवांना, सहृदय नितळपणाला व टोकदार ज्ञानपिपासू मज्जारज्जूंना बोथट बनवतो. असा बोथट समाज केवळ कलेचाच शत्रू बनत नाही, तर स्वत:चे माणूसपण, स्वत्व व अस्तित्व गमावून बसतो. त्याचा अनेक शतकांच्या चयापचयातून निर्माण झालेला, भाषाव्यवहार म्हणजेच मेधा किंवा बुद्धी गहाण पडते. मनुष्याचे जनावर बनते.
संदिग्ध स्पष्टता व अॅबसर्डिटी किंवा काहीशी वेडसर अनियमितता यांच्या चपखल वापरातून कलेच्या अाविष्काराची पहाट प्रगटत असते. प्रचलितता मोडणे, कुंपण तोडणे, बांध फोडणे, भिंती कोसळवणे हा व असाच तिचा उद्देश असतो. अशा प्रत्येक वेळी समाज एखादे अर्धेमुर्धे पाऊल पुढे टाकतो. जग नव्याने पाहू लागतो. पाहण्याचा नवा कोन वा भिंग, खिडकी वा दरवाजा उघडतो, अधिक मोठा भवताल व त्याचे आपल्या अस्तित्वाशी लगडलेले ताणेबाणे अशा वेळी अधिक स्पष्ट व नवे दिसतात. कला व विज्ञान या समाजातील दोन समांतर रेषा नव्याचे दार उघडतात. नवा प्रकाश, नवे रंग, नवी रूपे घरात येऊ देतात. ही नवी बाळे घरात चालू-बागडू लागतात, असे नांदते घर व नांदता समाज त्यातून तयार होतो. ही नवी बाळे काही गोष्टींची उलथापालथ करतात, सांडतात, फोडतात, तोडतात, प्रच्छन्नपणे अगदी शी-शूदेखील नागड्याने करतात, प्रश्न विचारतात, उत्तरे शोधतात. त्यातून तरी सत्ये समजतात. नव्या वास्तवाची व म्हणून नव्या भविष्याची बीजे समाजात रुजू लागतात.
मी मागे संदर्भ दिलेल्या ‘अभिदानंतर’च्या लेखामध्ये बटबटीतपणा-सिम्प्लिफिकेशन, लिटरॅलिझम, गुळगुळीतपणा- बनालीटी, यांचे नवे सौंदर्यशास्त्र कसे निर्माण होते आहे, याचे प्रदीर्घ चिंतन मांडले आहे. प्रबळांच्या विकासासाठीच निर्माण झालेल्या राजकीय अर्थकारणाला अशा बुळबुळीत गुळगुळीतपणाची आवश्यकता असते. झगमगाट आणि गोंगाट यांच्या कर्कश्य रचनेतून प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाची जाणीव बोथट होणे, ही अशा व्यवस्थेची गरज असते. व्यामिश्र व गुंतागुंतीच्या कलात्मक रचनांचा व प्रतिमांचा शब्दश: अर्थ काढणे व तोच सत्य आहे, असे मानणे हा या व्यवहारांचा परिपाक असतो. अर्णव गोस्वामीसारखे आचरटाचार्य अशा नव्या सोप्या भाषेचे पीठ चालवतात. त्यांचे मठ जागोजाग बांधून त्यांचे आडदांड समर्थक भाषेच्या आधिभौतिक व प्रस्थर रूपाला शब्दश: व कोषातील मर्यादित अर्थाइतकेच कोते व उथळ बनवतात. प्रत्येक गोष्ट काळी वा पांढरीच असली पाहिजे, असा त्यांचा समज असतो. अन्य हजारो रंगछटा तर सोडाच, पण काळ्याच्या शेकडो– जेट ब्लॅक, अॅश ब्लॅक, काजळ काळा, कभिन्नकाळा, कुळकुळीत काळा, किंवा पांढऱ्याच्या हजारो छटा, हस्तिदंती, शुभ्र, सफेद, चुनखडी, चांदण लख्ख अशा असू शकतात, याची शक्यताच असे निर्बुद्ध सनातनी फेटाळून लावतात.
‘पिपात मेले ओल्या उंदिर’, ‘बेकलाईटी’, ‘चिरला साग’ अशा ७० वर्षांपूर्वी लिहिलेल्या मर्ढेकरी प्रतिमाही त्यांना वेडसर व फालतू वाटतात, तर नव्या प्रतिमांना कवेत घेण्याचे धाडस व उन्मेष ते कोठून आणणार?
शब्दाला शब्द म्हणजे जसे भाषांतर नव्हे, ‘बोलून चालून’चा अर्थ ‘वॉकिंग टॉकिंग’ नव्हे, तसेच कलेच्या भाषेचे शब्दश: अर्थरूपांतर करणे, म्हणजे कला व संवेदनशील प्रतिभेवर केलेला तो अश्लील बलात्कार आहे.
गेल्या काही महिन्यांत समाजात असे बलात्कारी धटिंगण व त्यांची तळी उचलणारे पक्ष, दल, संघ, सेना, सभा वाढत चालल्या आहेत. अर्णवसारखे त्यांचे माध्यमातील मुखंड अशा जमावांच्या जबरदस्तीचे सौंदर्य-नीतिशास्त्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचा कालचा प्रत्यय म्हणजे, संदर्भ कला केंद्राच्या कलाकृतीवर जयपूर येथील हिंदू संघटनांच्या जमावाने पोलिसांच्या मदतीने केलेला बलात्कार.
तेथील भाजप शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी वेळीच हस्तक्षेप केला, एवढीच जमेची गोष्ट. परंतु देशविदेशात झगमगाटी सभा घेत, थिल्लर भाषणे करीत फिरणाऱ्या या देशातील सत्ताधारी मंडळी, अशा बुळबुळीत- लिटरॅलिझमचा किंवा सोप्प्या- बनाल, गुळगुळीत सौंदर्यशास्त्राचा पाया अधिक खोल खणत आहेत, ही बाब चिंतेची आहे. अशा वेळी साहजिकच इतिहास नव्याने लिहिणे, सेन्सॉर मंडळाचे अधिकार आपल्या सेनेतील प्रत्येक सैनिकास देणे, अशा सैनिकांनी लेखक-कलावंतांच्या तोंडात बोळे कोंबल्यानंतर वा त्यांना डांबर फासल्यानंतर त्यांना जाहीर शाबासकी देणे, वेदकालीन मंत्र-तंत्राला विज्ञानाचे मंच बनवणे उथळ बडबडीला पुरस्कारित करणे, या व अशा छचोर गोष्टी समाजात नुस्त्या पसरत नाहीत, तर त्यांची अधिष्ठाने होतात. एका पैलूदार भाषा इतिहासाची व त्यायोगे एका समृद्ध समाजाची कबर खोदताना पाहून काळीज दडपले, व कोणाला हा प्रदेश सोडून जावेसे वाटले, तर त्याच्या स्वत:ला हद्दपार होण्याच्या मानसिक कारुण्याने आपल्या जगण्यावर काजळी चढते. जयपूर कलाकृती वादाला अशा काजळीची छाया अधिकच गहिरी बनवते, याचे भान आपल्या झापडबंद समाजाला लवकर यावे, एवढीच अपेक्षा.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..
sanjeev.khandekar@gmail.com