आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sanjeev Khandekar Articles About Clean India Campaign

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाल गुलाबाचा काळा वेताळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जगभर साऱ्यांनाच मग ते तरुण वा वृद्ध असोत; चाहुल लागते ती १४ फेब्रुवारीची. व्हॅलेन्टाईन डेची. शुभेच्छा पत्रे, भेटी, त्या गुंडाळण्याचे आकर्षक कागद, रेस्टॉरन्ट्स आणि गुलाबाची फुले... एका पाठोपाठ एक प्रेम संदेशाचे आदानप्रदान करणारी प्रतीके बाजारात दिसू लागतात आणि जसजसा १४चा दिवस जवळ येऊ लागतो, तसतशा या सर्व गोष्टी महाग होत जातात. चौदा तारखेला तर गुलाबपुष्पांचा दर सर्वात वर चढलेला असतो. गुच्छ तीनशेपासून पुढे, तर एक फूल काही वेळा पन्नास रुपयांपर्यंत महागलेले मी अनुभवले आहे. दरवर्षी त्यामुळे मला एक प्रश्न सतावतो, ‘प्रेमीजन एवढी महाग गुलाब फुले का बरे एकमेकाला देत असावीत?’ गुलाबाचे फुल - हायब्रिड, लाल बुंद, टपोरे पण सुवास नसलेले, दुसऱ्या दिवशी कोमेजणारे, संध्याकाळी केराच्या टोपलीत जाणारे तरीही महागडे फूल-मग ते देण्यापेक्षा प्रियकर आपल्या प्रेयसीला बटाट्यांचे, कांद्याचे पोते का देत नाही? दुष्काळी भागात पाण्याचा हंडा किंवा तत्सम गोष्ट का भेट करत नाही? बटाटे टिकतात, रोज खाताना आठवण येऊ शकते, कांदे उपयोगी असतात, पाण्याचा हंडा तर अति उपयोगी, मग असे असताना निरुपयोगी, महाग व क्षणिक कोमेजून जाणारे, ‘वाया जाणारे गुलाब फूल व त्यांचा गुच्छ’ ही निवड का होते? निरुपयोगी वस्तू देऊन सखा/सखीचे मन कसे जिंकता येते?
सौंदर्य आणि सुख या दोन्ही बाबी मानवी उत्क्रांतीच्या प्रवासातील महत्त्वाचे ‘मार्कर’ - खूण किंवा निशाणी आहेत. या खुणांचा अभ्यास डार्विन आणि फ्रॉईड दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने गेल्या शतकात केला. या खुणांच्या पाऊलवाटातून उलगडलेल्या प्रवासाचे आर्थिक तत्त्वज्ञान मार्क्सने त्याही आधी मांडण्याचा प्रयत्न केला. डार्विन, फ्रॉईड व मार्क्स यांनी दिलेल्या चश्म्यावर दिसणाऱ्या जगाचे अवलोकन गेल्या अनेक दशकांत अनेकांनी केले. निरुपयोगी गुलाब, हिऱ्याची अंगठी, महागडे जेवण, मानवी लैंगिक निवडीच्या प्रवासात व म्हणून राजकीय वाटचालीत कसे व किती महत्त्वाचे आहे, याचे उत्तम विवेचन स्टिव्हन पिंकरपासून डेनिस डटनपर्यंत विविध ज्ञान शाखांच्या अभ्यासकांनी केले आहे.
खिशात पैसे नसताना उसनवारीने गुलाब घेणे, कर्ज काढून वा प्रसंगी चोरीमारी करून हिऱ्याची अंगठी विकत घेणे, उधारी करून महागडे जेवण आयोजित करणे, ऋण काढून सण साजरा करणे या प्रवृत्तीतून व देखाव्यातून प्रियकर प्रेयसीला कसा आकृष्ठ करतो, याचे उत्तर आपल्याला डार्विनच देऊ शकतो. डार्विनच्या मते, अशा उधळखोर वृत्तीमुळे ‘तो’ ‘तिला’ सांगतो, ‘बघ प्रिये, माझ्याकडे निरुपयोगी सुंदर गोष्टींवर वायफळ खर्च करण्याची(ही) ताकद आहे. "डे बीर'ची ‘Diamond is for Ever’ ही जाहिरातबाजी आजही जाहिरात क्षेत्रातली अग्रेसर जाहिरात मानली जाते. याचे कारण त्याने वायफळ निरुपयोगी वस्तूला प्रथम सुंदरतेचे मुख दिले आणि मग तिला एक ‘आवश्यक लैंगिक गरज’ बनवले.
निरुपयोगी व क्षणिक, वाया जाणाऱ्या मानवी कृतीचे एक सौंदर्यशास्त्र गेल्या हजारो वर्षांच्या मानवी इतिहासातून निर्माण झाले आहे. वेबलेन नावाच्या शंभर वर्षांपूर्वीच्या एका नामवंत अर्थतज्ज्ञाचे "द थिअरी ऑफ लेझर क्लास' नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध आहे. ‘डोळे दिपवणारा खर्च’ किंवा ‘लक्षणीय उपभोग’ अशी संज्ञा तो वापरतो. त्याबरोबरच येणाऱ्या (भांडवलशाहीच्या) काळात अशा झगमगटाचे व निरुपयोगत्वाचे सौंदर्यीकरण कसे झपाट्याने होणार आहे, याची भीती व्यक्त करतो.
ही भीतीची लहर विशेषत: गेल्या काही महिन्यांत आपल्याकडे झालेल्या राजकीय बदलामुळे दैनंदिन जीवनात दिवसेंदिवस अधिकाधिक ठळक बनू लागली आहे.
‘कला ही एक निरुपयोगी वस्तू आहे. सर्व कला वस्तू निरुपयोगी असतात.’ अशा आशयाचे ऑस्कर वाइल्डचे विधान प्रसिद्ध आहे. ते अनेक जण आपापल्या सोईनुसार वापरत असतातच. परंतु ऑस्कर वाइल्डने सर्व निरुपयोगी वस्तू या कला असतात, असे म्हटले नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवे. निरुपयोगाचे व विशेषत: उधळपट्टीचे रूपांतर सौंदर्याच्या, आकर्षणांच्या, लैंगिक आणि म्हणून मूलभूत गरजांत कस कसे होत गेले आहे, याचा वेगळा अभ्यास करण्याची जरुरी नाही. आपल्या अवतीभवती वाढणाऱ्या ‘मॉल’ संस्कृतीमधून, आपल्या महिन्याच्या खर्च रोजनिशीतून किंवा आपल्या घरातील, कार्यालयातील, घराबाहेरील, रस्त्यावरील आणि शेवटी शहराचा सारा कचरा जेथे गोळा होतो तेथील महाकाय कचराकुंडीचा नजारा आपल्या वाढत गेलेल्या नव्या सौंदर्यदृष्टीचा आरसा यातून आपल्या समोर येतो.
काही वर्षांपूर्वी ‘कोरो’ नावाच्या चेंबूरमधील झोपडपट्टीत काम करणाऱ्या संघटनेच्या एक कार्यकर्त्या अन्वरी खान मला भेटल्या होत्या. शहराच्या ‘डंपिंग’ क्षेत्राला खेटून असलेल्या झोपड्यांत राहात असल्याने त्याची तेथे कचरा आणणाऱ्या व तेथील कचरा ‘वेचणाऱ्या’ महिलांविषयीचे काही अनुभव मला सांगितले होते. कचऱ्यामुळे साऱ्या झोपडपट्टीत रोगराई कशी पसरली आहे, असे सांगतानाच त्याच कचऱ्यातून तऱ्हेतऱ्हेचा फेकून दिलेला शहराच्या पचनसंस्थेतून गाळून निघालेला, साऱ्या शहराची विष्ठाच असलेला, या शहराने काय खाल्ले त्याचे पुरावे दाखवणारा, आपल्या उपभोगाचे मलमूत्र असणारा कचरा ‘वेचून’ हजारो कुटुंबे त्यांची भूक कशी भागवतात, याचे वर्णन केले होते. ते वर्णन जसे हृदयद्रावक होते तसेच प्रलयंकारी होते.
त्या वर्णनामुळे म्हेदी बेल्हान कासेम या तरुण फ्रेंच मार्क्सवादी तत्त्वचिंतकाने ‘चैनबाज विलासा’वर लिहिलेले चिंतन समजण्यास उपयोग झाला. पैसा आणि त्यातून निर्माण होणारा सामाजिक व म्हणून राजकीय ऱ्हास यांच्या परस्पर संबंधावर, पैसा आणि ढासळणाऱ्या सांस्कृतिक व मानवी संबंधावर, पैसा आणि कलेच्या सडत जाणाऱ्या कॅनव्हासवर कार्ल मार्क्सइतके खोल व व्यासंगी विवेचन अन्य कोणी केल्याचे मला आठवत नाही. कासेमने उधळखोर पैसा, जो केवळ चलन म्हणून आपल्याला माहीत आहे, तोच पैसा कचऱ्याच्या कुंडीतील शहराच्या विष्ठेमध्ये कसा मूर्तिमंत प्रगटतो, याची सखोल मांडणी केली आहे. जेन मिलनेपासून आपला महात्मा गांधींपर्यंत अनेकांनी कचरा, अस्वच्छता आणि घाण यांची विल्हेवाट तो तो समाज कशी लावतो, निर्माण होणारा कचरा व तो समाज यांचे चयापचय संबंध कसे असतात व काय असतात, यावर त्या त्या समाजाची संस्कृती, कला, सभ्यता व संपन्नता अवलंबून असते, हे सांगितले आहे.
कचऱ्याचा अभ्यास म्हणजे काय वाया गेले यापेक्षा काय वाया घालवले याची समज वाढवणे, काय फेकून िदले, काय रिचवल्याने काय ओकले, काय प्यायल्यामुळे काय मूत्रविसर्जन केले व काय पचवल्याने कशाचे मलात रूपांतर झाले, हे पाहताना अतिरेक व चंगळ आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे, अति उपलब्धता यांचा सारासार विवेक विचार व्हायला हवा. अति उपलब्धतेमुळे म्हणजे गरजेपेक्षा उत्पादन वाढवल्यामुळे मानवी उत्पादनशीलतेच्या प्रतिष्ठेलाच धक्का पोहोचतो, माणूस म्हणून जगण्यातली इभ्रत नष्ट होते आणि नकळत एका अमानवी समाजाच्या निर्मितीची बीजे रोवली जातात, याचे भान कचऱ्याचा अभ्यास करताना येते.
एकदा असे भान आले की, कचरा व्यवस्थापन हे निव्वळ यांत्रिक न राहता आपल्या काळातील राजकारणाचा पायाच आहे, याचे ज्ञान होते. आणि राजकारण विरहित, घोषणाबाज स्वच्छ भारत अभियान हा कार्यक्रम किती पोकळ, भुसभुशीत आणि दुर्दैवी आहे, याचीही जाणीव होते.
एकीकडे समाजातील प्रबळांचे चोचले पुरवत, त्यांच्या चवी मिरवत, त्यांना सुग्रास घास भरवत, त्यांच्या विलासी महत्त्वाकांक्षांची दालने सजवत शेवटी गल्लीबोळातील तुंबलेली गटारे आणि कचऱ्यांचे ढीग, डोंगर उभे करीत त्यांच्या आसऱ्याने, त्यांची घाण साफ करत व काही वेळा त्या घाणीवरच उपजीविका करण्याची सक्ती लादणाऱ्या समाजाच्या संस्कृतीविषयी या स्वच्छता अभियानात कोण व कधी बोलणार आहे, हा खरा प्रश्न आहे.
सिव्हिलायइज्ड किंवा ‘उत्सवी’ भांडवलशाही हे सद्य:काळातील भांडवली व्यवस्थेचे नवे रूप आहे. दिवसभरात सतरा वेळा पोशाख बदलणारे (व तेही लाखो रुपये मोजून घेतलेले) पंतप्रधान असोत, ओबामाच्या जेवणावळी व उंची भेटवस्तू असो, कोट्यवधी रुपये खर्च करून केलेली भाषणे वा उभारलेले पुतळे असोत, किंवा स्वच्छ भारत अभियानाचे उथळ आणि प्रसिद्धीच्या झोतात पार पाडलेले कर्मकांड असो, ही सगळी रूपे ‘उत्सवी’ भांडवलशाहीच्या दहामुखी राक्षसाच्या न संपणाऱ्या भुकेची अवतार भूते आहेत. या सर्व भुतांना, वेताळांना न संपणारी भूक आहे, नवश्रीमंत मध्यमवर्ग, श्रीमंत व अतिश्रीमंत प्रबळ वर्ग यांच्या लालसेची भूक शमवणे ही या ‘उत्सवी’ भांडवली व्यवस्थेची गरज आहे. चरा, भंगार, घाण, अस्वच्छता, हा या व्यवस्थेतून उत्सर्जित होणारा पाण्याचा अखंड वाहणारा नळ आहे.
त्यामुळे स्वच्छता अभियांनाचे बेगडी कार्यक्रम फक्त साहजिकच नव्हे तर सांस्कृतिक घाणीचेच निर्मितीकेंद्र बनण्याची शक्यता कोण नाकारेल?

प्रथम उधळखोर चंगळखोर वृत्तीचे उदात्तीकरण, मग त्याचे शास्त्र, मग त्याचे गरजेत रूपांतर, त्या रूपांतरासाठी विकास कार्यक्रम, विकास कार्यक्रमांची फसवी जाहिरातबाजी, अतिरेक, अतिरेकी वापरातून निर्माण झालेला अतिरिक्त कचरा व त्या कचऱ्यासाठी पुन्हा उत्सवी ढोल-ताशे असे हे न सुटणारे गणित आहे.
प्रदूषण, बेबंध कारखानदारी, निसर्गाची कत्तल, पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवणे, उद्योगांना सोयी सवलती, सार्वजनिक मालमत्तेचे खासगीकरण, बेकायदेशीर बांधकमे ही व अशी लांबच लांब साखळी आपल्या भवतीचा भौतिक व तात्त्विक कचरा वढवते. तो दिसू नये, लपवता यावा व सारे कसे सोपे व स्वच्छ दिसावे, यातून मग चढवायचा नवा पोशाख, तो बदलायचा तासागणिक, जरतारी फेटा आणि मांडायची स्वच्छ भारताभियानाची उत्सवी रास.