आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjeevani Tadegaonkar Article About Asawari Kakde

नव्या जाणिवांचे भान देणारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संध्याकाळची वेळ होती. एक स्त्री घाईने घराकडे परतत होती. सोबत तिचा 3-4 वर्षांचा मुलगा होता. एका खांद्यावर पर्स, हातात भाजीची पिशवी व दुस-या हातात मुलाचं दप्तर. तिच्या आगे-मागे चालताना तिचा पदर त्याच्या हाती येतो आणि तो पकडून तो चालू लागतो. गर्दीच्या धक्क्यामुळे कावरंबावरं झालेलं लेकरू आईकडे, पिशव्यांकडे संभ्रमित होऊन पाहत राहिलं.
बसल्या जागेवरून मी विमनस्क मन:स्थितीने त्या बाईची तारांबळ नि आटापिटा पाहत राहिले. कशासाठी चाललंय तिचं हे? काय साध्य करायचं आहे तिला?
तसं पाहिलं तर हे दृश्य सर्वसामान्यपणे कुठल्याही शहरात, गावात दिसणारं आहे. आसावरी काकडे यांनी (मात्र) त्यांच्या कवितेतून अधिक व्यापकपणे ते व्यक्त केले आहे त्या म्हणतात,
एक स्त्री दूर्वा वेचते आहे
तिच्या मनात
आजच्या स्वयंपाकाचा
मेनू ठरतो आहे
तिला बहुधा एकविशी गाठायचीय
आणि सव्वानऊची बससुद्धा...
तिला ऑफिसातले राहिलेले काम
आज संपवायचे आहे
आणि यथासांग स्वयंपाकही!
तिने हातचा वेग वाढवलाय
ती आता... एकवीस दूर्वांच्या जुड्या
न मोजताच बांधते आहे
इतक्या असह्य मेटाकुटीने
ती काय साधते आहे?
जगभरातल्या स्त्रिया करिअर, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्या आहेत. स्वअस्तित्वाचं भान त्यांना घरात स्वस्थ बसू देत नाही आणि या स्वाभिमानाचा आत्मसन्मान जपताना वरीलप्रमाणे (तिची) कुतरओढ चालली आहे. जिथं तिला समजून घेणारा परिसर असेल तिथे थोडं फार चित्र बदललेलं आहे.
आधीची मुलगी
तिची झाली बाई
मग झाली आई
रिवाजाने
याप्रमाणे पारंपरिक सामाजिक, कौटुंबिक मूल्यं जपत जगता जगता अनेक जणी मेटाकुटीला आल्या आहेत. वरवर पाहता त्या सुखी वाटतात. संसार समृद्ध दिसतो; पण खरंच तो तसा असतो का? तो तसा असावा म्हणून सुरुवातीला स्त्रिया त्यात अडकत, नंतर गुंतत नि शेवटी बंदिस्त झाल्या आहेत. हाच धागा पकडून आसावरी काकडेंनी आपल्या कवितांमधून महानगरीय मध्यमवर्गीय स्त्रियांच्या जीवनजाणिवा व्यक्त करणा-या कविता आरसा, आकाश, उत्तरार्ध, लाहो, मी एक दर्शनबिंदू, रहाटाला पुन्हा गती दिलीय मी, स्त्री असण्याचा अर्थ आणि इस लिए शायद (हिंदी) या संग्रहातून लिहिली आहे. आसावरी काकडे पुण्यात राहत असल्यामुळे स्त्रियांची ऑफिसमध्ये, रेल्वेमध्ये, घरामध्ये होणारी धावपळ त्या नेहमी पाहत आल्या आहेत आणि त्यामुळेच स्त्रियांचं जगणं आणि त्यांचं अस्तित्व हा त्यांच्या चिंतनाचा विषय झाला आहे.
खरं म्हणजे स्त्रीत्वाचा विकास होऊन माणसातल्या दोन्ही प्रवृत्तींमध्ये ऐक्य निर्माण व्हायला हवं. असे झाल्यानेच कुटुंबाचा व समाजाचा विकास होईल; पण असे होत नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण जीवन-मृत्यू, सुखदु:ख यासारखी जीवनातील द्वंद्वं आपण समजू शकतो; पण आपल्यातल्या स्त्री-पुरुष द्वंद्वाला समजून घेताना मात्र गोंधळतो. यासाठी मुळात स्त्री असणं म्हणजे काय आणि तिचं नेमकं महत्त्व कशात आहे हे समजून घ्यायला हवं.
स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून
फक्त तिनंच का पेलावं स्त्रीत्व?
कळायला हवा
पुरुषी होत चाललेल्या समाजाला
स्त्री असण्याचा अर्थ
स्त्रीचा देह असणं
म्हणजे स्त्री असणं नाही
स्त्री असणं म्हणजे
सर्जक आनंदाचा शोध घेत जगणे... जगवणे...
जतन करणं अस्तित्वाचे अक्षांरा-रेखांश
रोखून धरणं महुयद्धाच्या शक्यता
स्त्री असणं म्हणजे
सहवेदना... प्रेम... तितिक्षा
पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण
जशी स्त्री निभावतेय सहज पुरुषपण।।
सर्वसामान्यपणे स्त्रिया शहरी असो की ग्रामीण, शिक्षित असो की अशिक्षित ती कुठल्याही स्थितीत सहजासहजी हार मानणारी नसते. आपण नेहमीच पाहतो छोट्यामोठ्या संकटांनी पुरुष खचून जाऊन व्यसनाधीन होतो व नवनव्या समस्यांना जन्म देतो. बायको अगोदर गेली तर भरल्या घरामध्येही एकाकी पडतो. याउलट स्त्रीचे आहे. स्त्रिया सर्व सामर्थ्याने आणि धैर्याने विपरीत स्थितीतही उभ्या राहतात आणि उद्ध्वस्त होऊ पाहणारा आपला भोवताल सांभाळतात. चिवटपणे तग धरून धैर्याने कृतिशील राहतात. म्हणूनच आसावरी काकडे लिहितात,
कुणी मांडले मोडले
तरी उभ्या ताठ
घट्ट धरून ठेवती
जगण्याचा काठ
आज ख-या अर्थाने कोंडीत सापडली आहे ती बहुजन मध्यमवर्गीय व नोकरी व्यवसाय करणारी स्त्री. पूर्वीच्या तुलनेत तिचा संघर्ष किती तरी पटींनी वाढला आहे. पूर्वी तो फक्त कुटुंबासोबत होता, आता तो कुटुंबासोबतच समाजासोबत व स्वत:सोबतही सुरू आहे. नातेसंबंधामध्ये व सहका-यांमध्ये हा संघर्ष कुठल्या ना कुठल्या कारणाने चालूच असतो आणि तो कोणत्याही कायद्याने, आंदोलनाने, चळवळीने संपणार नाही. म्हणूनच इथे एकाने दुस-याचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वीकार करणारी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे आणि ही प्रक्रिया जितकी व्यक्तिगत तितकीच सामाजिक पातळीवर होणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे स्व-रूपाची समज आलेली व्यक्ती मग जसे पुरुषत्व जाणेल तेवढेच स्त्रीत्वही समजून घेईल. असा आशावाद निर्माण करणारी कविता आसावरी यांनी लिहिली आहे.
स्त्रियांनी आपल्या मर्यादांसहित सामर्थ्याचे भान ठेवून स्त्रीत्वाचा आत्मसन्मान जपण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी कवितांमधून दिला आहे. त्या आपल्या हिंदी कवितेत एकेठिकाणी म्हणतात,
इतनी बार झाँका है मैंने
खुद को आईने में
की अब मुझे
हर तरफ अपनाही चेहरा
नजर आने लगा है।
क्या मैं अपने में ही
सीमित होती जा रही हूँ
या फिर व्यष्टी से सृष्टी तक
फैल रही हूँ।