आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुला काय हवे?'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझ्या अति अस्ताव्यस्त खोलीतील लिहिण्याच्या जुन्या टेबलावर एका बाजूला असलेल्या वह्यांच्या गठ्ठ्यात एका वहीत करायच्या कामांची यादी आहे. दर आठवड्याला ही यादी वाढतच जाते. त्यामध्ये िलहायचे लेख, कथा, परीक्षणे आदींचे विषय, चित्रमालिकांची, शिल्प मांडणी रेखाचित्रे, वाचनासाठी घ्यायचे मोठे प्रकल्प, अशा अनेक गोष्टींची यादी आहे. त्यातल्या चार-दोन जरी वर्षाकाठी करता आल्या तर... अशा स्वप्नरंजनावर मी दिवस घालवतो.

पैकी एक विषय म्हणजे सिग्मंड फ्रॉइड. नवा कोरा विशीतील पोरासारखा दिसणारा फ्रॉइड एकविसाव्या शतकात त्याच्या डोरा किंवा अॅनासारख्या पेशंटबरोबर अवतरला, तर स्वप्न सिद्धांतापासून मानवी जीवनातल्या अनेकविध पैलूंविषयी तो आत्ता काय सांगेल? डोरा त्याची उपचार थेरपी मध्येच सोडेल, की या वेळी पूर्ण करेल? ‘स्त्रीला काय हवे(असते)?’ या त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्याला नव्या शतकात तरी मिळेल किंवा नाही? अर्धवट लिहून ठेवलेल्या हिस्टेरिआ-उन्मादावर तो काय म्हणेल, अशा अनेक प्रश्नांची मालिका या माझ्या वहीत आहे.
फ्रॉइडवरती नाटके, सिनेमे, कथा, चित्रे काही कमी झाली नाहीत. अगदी मी वर लिहिलेल्या विषयावरसुद्धा मेक्सिकन नाटककार, पत्रकार, मानसतज्ज्ञ सबीना बर्मनचे ‘हॅपी न्यू सेंच्युरी, डॉ. फ्रॉइड’ हे गेल्या काही वर्षांत जगभर गाजलेले नाटक आणि त्यातील नग्न डोराची स्टेजवरील शस्त्रक्रिया आदी प्रसंगावर विस्तृत व सविस्तर चर्चा जगभरच्या कला, फिल्म, नाट्य आदी क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठांवर झाली आहे. त्यामुळे खरं म्हणजे, मी हा विषय थोडा बाजूला ठेवला होता. परंतु अलीकडच्या दिल्लीतील ‘आप’ विजयानंतर, पाठोपाठ ‘आप’मध्ये घडलेल्या काही क्रूर चकमकीनंतर अधूनमधून फ्रॉइडची दाढी माझ्या वहीच्या कोपऱ्यातून बाहेर आलेली मी पाहिली आहे. वहीतून अशी दाढी बाहेर पडलेली पाहून कदाचित फ्रॉइडने वहीला योनी किंवा मला कल्पित लैंगिक भावनांशी लगट करणारा म्हणून माझ्याच टेबलावर असलेल्या (त्याच्या टेबलावर असत त्याप्रमाणे) एखाद्या जुन्यापुराण्या ‘अँटिक’ वस्तूशी खेळत माझ्याकडे रोखून पाहिले असते.
हिस्टेरिया किंवा उन्मादाचा उगम लैंगिक भावनांचे दमन झाल्यामुळे नव्हे तर इच्छांचे मुक्त प्रगटीकरण केल्यामुळे नव्या जगातील ‘उत्सवी आणि टर्बो’ भांडवलशाहीच्या विकासांच्या रेट्यामुळे होते, या माझ्या मताशी तो कितपत सहमत झाला असता, याचा विचार माझे मन अजूनही पुन:पुन्हा करते. की विकासाच्या वेगात व प्रगतीच्या वेडात फ्रॉइडियन लैंगिकतेचे, इच्छा व आकांक्षांचे दमन होते, शोषण होते, असा नवा विचार तो मांडेल? विकासामुळे ‘न्यूरॉसिस’ होऊ शकतो, असे सांगणारा डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड व त्याच्या बाजूला डोराऐवजी पंतप्रधान मोदींसारखा चेहरा असलेला पुरुष आणि सभोवताली ब्रह्मचर्याची दीक्षा घेतलेले भगव्या कफनीतील साधू, साध्वी व स्वयंसेवक असे चित्र किंवा व्यंगचित्र कसे दिसेल, असा विनोद त्याच्या ‘जोक्स अँड देअर रिलेशन टू द अनकॉन्शस’ या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल काय, असा प्रश्नही मला पडला. भांडवली व्यवस्थेच्या प्रबळांच्या प्रगती स्पर्धेत सामान्य माणसाचे माणूसपण कसे संपते, याचे विवेचन फ्रॉइडच्या जन्माआधी कित्येक वर्षं मार्क्सने केले होते व अशा परात्मभावातून आलेल्या एकटेपणाची इतिश्री आत्महत्येत होऊ शकते, याचेही निवेदन केले असल्यामुळे प्रगती, विकास यांच्या राजकारणात भरडलेला सामान्य माणूस ‘न्यूरॉटिक’ किंवा ‘वेडा’, ‘उन्मादी’ होऊ शकणार नाही, असे फ्रॉइडनेदेखील मान्य केले नसते. सात वर्षांपूर्वी जगात २००८च्या सुमारास बाजारपेठेत भूकंप होऊन वैश्विक अर्थ उत्पात घडल्यानंतर जगभर वेगवेगळ्या प्रकारचे उन्माद आणि त्यांचे विस्फोट घडून येत आहेत. विकिलीक्सपासून रशियन लोकसत्ताक हुकूमशहा पुतीनविरोधात झालेले ‘पूसी रायट’ या स्त्रीवादी संघटनेचे जाहीर (कला) कार्यक्रम, किंवा अमेरिकेतील ‘ऑक्युपाय वॉलस्ट्रीट’ने सुरू झालेली व पाठोपाठ अनेक देशांत पसरलेली अहिंसक सत्याग्रहांची उत्स्फूर्त मालिका आणि पाठोपाठ आपल्याकडे उठलेले ‘आप’चे वादळ ही अशा सामाजिक, सांस्कृतिक उन्माद प्रगटीकरणाची काही उदाहरणे सांगता येतील.
मुख्यत: भ्रष्टाचारविरोधी व/वा प्रशासकीय अकार्यक्षमतेमुळे निर्माण झालेल्या असंतोषामुळे रागावलेल्या अनेक सर्वसामान्य माणसांचे हे उद्रेक आहेत. समाजशास्त्रीय भाषेत अशा उद्रेकांना MGI (मास ग्रुप इन्सिडेंट्स किंवा गटातटाचे उद्रेक) असे म्हटले जाते. मार्क्स म्हणतो तसे हे वर्गसंघर्षाचे लढे नव्हेत. संघटित विरोध नव्हेत. पण फ्रॉइड म्हणतो तशा ‘इच्छांच्या दमनातून’ [व मी म्हणतो तशा ‘दमन झालेला फ्रॉइडियन अबोध’(Unconscious) निर्वेधरीत्या बाजारपेठेच्या दबावाखाली मुक्त झाल्यामुळे ] उन्मादाची निर्मिती होते.
‘ऑक्युपाय ते आप’ किंवा ‘असीजे ते पूसी रायट’ अशा सर्वच घटनांना उर्वरित सभ्य (स्वत:ला समजणाऱ्या) समाजाकडून ‘हिस्टेरिक’ किंवा उन्मादी हे विशेषण सर्रास चिकटवण्यात आले आहे.
सभ्य समाजात उन्मादाकडे विकृती म्हणून पाहण्याची प्रथा आहे. परंतु फ्रॉइडच्या परंपरेत वाढलेले लाकां आणि नंतर झिझेक या दोघांनीही उन्माद व विकृती या कशा दोन स्वतंत्र व परस्परविरोधी कृती आहेत, याचे स्पष्टीकरण केले आहे. अंगात आलेल्या स्त्रीला पुरुषप्रधान संस्कृतीचा मांत्रिक ‘तुला काय हवे?’ असा थेट प्रश्न विचारतो. अंगात येणे किंवा उन्मादित होऊन थयथयाट करणे, यामध्ये त्या स्त्रीच्या दाबलेल्या इच्छा-आकांक्षांचा स्फोट दडलेला असतो. (पुरुष)सत्तेला, सत्तेच्या राजकारणाला, त्यांच्या पिळवणुकीला, भ्रष्ट आचरणाला केलेला तो प्रश्न असतो. प्रतिकाराचा उद‌्गार म्हणजेच तिचा उन्माद असतो. प्रस्थापित मांडणीला हादरा देऊन तिच्या भक्कम भिंतीला भगदाड पाडण्याचा तो प्रयत्न असतो. त्यामुळेच तिच्या या रूपाला पाहून भयचकित झालेल्या व्यवस्थेकडून ‘तुला काय हवे?’, ‘काय हवंय तुझ्यातील वेताळाला, आत दडलेल्या भुताला?’ असे प्रश्न ज्या वेळी विचारले जातात, तेव्हा त्यात ‘तुला काय कळतंय काय हवंय तुला, मला समजेल अशा माझ्या भाषेत सांग’ असा तो ‘मांडवली’चा प्रयत्न असतो. व्यवस्थेला ज्या भौतिक साधनांतून आनंद मिळतो, त्या म्हणजे ‘दारू, कोंबडी, नवी साडी, चुडा’ आदी गोष्टींचा मारा करून व्यवस्थाच अशा वेळी ‘काय हवंय तुला?’ या प्रश्नाचा निकाल लावण्याचा प्रयत्न करत असते. एकदा का भूत उतरवले की दुसऱ्या दिवशीपासून परत त्या बाईला नांगराला जुंपून पाठीवर चाबूक मारता येतो.
उन्मादी घटना एकाकी असतात, त्यांच्यात साऱ्या समाजाला मारण्याची ताकद नसते, उत्तर आधुनिक पथनाट्यासारख्या त्या कुठून तरी अवचित अवतरतात व संपून जातात. त्यांच्यात असलेली धग राजकीय बदलाच्या कृतीत संप्रेरित करण्यासाठी आवश्यक असलेली तात्त्विक प्रेरणा मर्यादित असते. परंतु त्यांची निर्मिती व्यवस्थेला प्रतिकार करण्यासाठीच झालेली असते. याउलट विकृती ही व्यवस्थेचे अस्तित्व व अनिवार्यता मानूनच व्यवस्थेतूनच निर्माण झालेली वेगळी रचना असते.
‘आप’च्या उन्मादाला व्यवस्थेकडून ‘तुला काय हवे?’ हा प्रश्न विचारणे गेली दोन-अडीच वर्षे सुरू आहे. भूषण-यादव आदी मंडळींनीदेखील उन्मादाचे व्यवस्थेत-विचारप्रणालीत रूपांतर व्हावे, म्हणूनच भुताला बाटलीत बंद करता यावे म्हणूनच प्रयत्न केले. असे बाटलीत बंद करणे म्हणजे उन्मादाचे व्यवस्थेत विलीनीकरण होय. ते तसे झाले नाही, हे जरी खरे असले तरी उन्मादाची प्रखरता निश्चितच कमी झाली आहे. विकलांग उन्माद अर्थहीन होऊ शकतो. डॉक्टर फ्रॉइडला ‘उन्मादित स्त्रीला काय हवे?’ या प्रश्नाचे उत्तर मिळू न देण्यातच ती व्यवस्थेला किती ढासळवते, याचे उत्तर अवलंबून आहे.

sanjeev.khandekar@gmail.com