आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझे लता मंगेशकर विद्यापीठ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लता मंगेशकर म्हणजे पवित्र... पाक... आणि बेदाग शुद्धता. त्यांची सूरसाधना ही सर्वोत्कृष्टतेचे दुर्मिळ उदाहरण आहे. त्या आदर्श आहेत. त्या विद्यापीठ आहेत. त्या महाग्रंथ आहेत. गायनकलेच्या त्या गीता, कुराण, बायबल, वेद, उपनिषद असे सारे काही आहेत. 
मुख्तसर सी बात कहुँ तो... त्या सरस्वतीचे रूप आहेत. त्या विशाल वृक्ष आहेत. त्या वृक्षाच्या छायेतली आम्ही छोटी छोटी रोपटी आहोत... 


अजूनही मला आठवते, लता मंगेशकरांचा आवाज पहिल्यांदा रेडिओवरून मी कधी ऐकला ते. शनिवारी-रविवारी शाळेला सुटी असायची. रेडिओवर सकाळी साडेसात वाजल्यापासून संगीत सरिता, ठुमरी, विविध भारतीवर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, भूलेबिसरे गीत, गाणी लावून मी बसायचे. वाघ जसा टपून बसलेला असतो, तसे टपून बसायचे. माझ्या मावशीने मला अमेरिकेहून एक टेपरेकाॅर्डर आणला होता. लतादीदींचे रेडिअोवर गाणे लागले की मी पटकन टेपरेकॉर्डचे बटन दाबायचे आणि ते गाणे रेकॉर्ड करायचे. मग गाणे रेकॉर्ड केलेली टेप रिवाइंड करायची. मग रिवाईंड-फॉरवर्ड असे करत करत त्या गाण्यामध्ये लतादीदींनी विशिष्ट ठिकाणी जागा कशी घेतली आहे, ती ऐकून तसा सराव मी करत असे. हे झाले की, मग दुसरी एक ब्लँक टेप घ्यायची. ती टेपरेकॉर्डरमध्ये घालायची आणि मग अापण गायचे. पुन्हा ऐकायचे की ते गाणे लतादीदींसारखे झाले की, नाही ते. असे करत करत मी ‘लता मंगेशकर विद्यापीठा’मध्ये शिकले.  


त्यांचा तो खूप असा स्वच्छ नि सुबक स्वर नेहमी मन मोहवून टाकत असे. ‘ज्योती कलश झलके’ या गाण्यातील लतादीदींचा सुरुवातीचा आलाप किंवा ‘किस मोडसे जाते है’चा सुरुवातीचा आलाप सुरू झाला की तो सर्वांना भारूनच टाकतो. संपूर्ण खोली भरून जाते, स्वरांनी. तो स्वर अत्यंत बिनचूक असतो. त्याचा असर होतोच, होतो आपल्यावर! ‘आ जाने जा...’ या गाण्यामध्ये त्या जो ‘आ’ लावतात, त्यात एवढी ताकद आहे की, ऐकणाऱ्याचे सारे लक्ष ते स्वर वेधून घेतात. खरे तर ते आहे एक कॅब्रे गाणे. पण ते गाणे गाताना लतादीदी आपल्या आवाजातून ज्या भावना व्यक्त करतात, त्या गाणे ऐकणाऱ्यांपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. दुसरा पर्यायच नाही.  


काही दुसऱ्या गाण्यांची उदाहरणे द्यायची, तर ‘जा मै तोसे नाही बोलू’ या गाण्यामध्ये सुरांचा अभिनय सादर केला आहे. ‘जा मै तोसे नाही बोलू’ हे एक वाक्य त्या गाण्यामध्ये १५ वेळा येते. दर वेळेला त्या वाक्याच्या चालीत व अभिव्यक्तीत  खूप वैविध्य आहे. कधी ते वाक्य रुसून, तर कधी विनंती करून म्हणायचे आहे. अशी किती तरी गाणी आहेत, की ज्यांचे व्हिज्युअल्स तुम्ही बघितलेले नसले तरी, त्याची ऑडिओ ऐकताना दीदींच्या आवाजातून त्या गाण्याची दृश्यात्मकता रसिकाला सहज कळून येते. इतक्या सहजशैलीने, त्यात कोणतेही गाणे खुलवितात. मी शाळेत असल्यापासून दीदींचीच गाणी गात अाले आहे. तेव्हा तर लताबाई म्हणजे कोण, हे कळायचेही वय नव्हते. पण त्या माझ्यासाठी मापदंड आहेत. जसा रोज सूर्य उगवतो, तसे रोज लता मंगेशकरांचे गाणे ऐकणे, हे माझे नित्यकर्तव्य होते व आहे. 


खरं सांगायचं तर,दीदींचा सूर हा अत्यंत नेमकेपणाने लागतो. ‘आप यू फासलों से गुजरते रहे, दिलसे कदमों की आवाज आती रही’, या गाण्यामध्ये ‘आप यूँ’ हे शब्द म्हणताना दीदींनी जे स्मित केलंय, ते लाजवाबच आहे. गाण्याचा जो माहोल आहे, त्यानुसार दीदी गाताना भाव प्रकट करतात. त्यांच्या गाण्यात सुरांचा अभिनय आहे. प्रत्येक कलाकाराची संगीत जाणून घेण्याची एक क्षमता असते. ही क्षमता दीदींकडे अफाट आहे. त्यांची शब्दांची समज विलक्षण आहे. शब्दांचा अर्थ समजून त्यात कसे भाव ओतायचे, आणि तेही खोटे- खोटे नाही, हे आम्ही दीदींकडून शिकलो. तशी गाण्याची, शायरीची सखोलता समजण्याची क्षमता आपल्यात आली पाहिजे. मीराबाईंच्या पदांचेच उदाहरण घेऊ. मीराची ओळख ही आत्म्याची आहे. ‘मैं आत्मन हूँ शरीर नही हूँ’ असे ती म्हणते. त्यामुळे पाचशे वर्षानंतरही मीराबाईच्या आत्म्याचा जो गंध आहे, तो तिच्या पदांमधून सर्वांना जाणवतो. त्यामुळे मीराबाईची पदे लताबाईंसारख्या व्यक्तीने गाणे हे अत्यंत साहजिकच आहे. दीदींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी आयुष्यभर स्वत:ची ओळख आपली कला अशीच ठेवलेली आहे. लता मंगेशकर आज ७५ वर्षे गात आहेत. कोणत्या प्रोफेशनमध्ये ७५ वर्षे काम करतात हो? सांगा बरं. शक्यच नाही. एखाद्या अभिनेत्रीची प्रत्यक्ष कामाची वर्षे १० ते १२ वर्षे धरली, तर सात पिढ्यांमधील अभिनेत्रींसाठी लता मंगेशकर यांनी गाणे गायलेले आहे. केवळ कर्तृत्वाच्या जोरावर दीदींनी एवढे नाव, यश मिळवले, ही अपूर्व गोष्टच आहे. 


लता मंगेशकरांनी गायलेली मीराची गाणीसुद्धा मी लहानपणापासून  ऐकत आले आहे. अलीकडेच मी मीराच्या पदांचा इंग्रजीत अनुवाद केला. त्याचे पुस्तक ‘मीरा अँड मी’ या नावाने प्रसिद्ध झाले. मीराबाईंच्या अनुवादित केलेल्या रचना इंग्रजीतून गायले. एखाद्या गायिकेला जी गाण्याची भूक असते, ती दीदींची गाणी गायल्याने पुरी होते. त्या गाण्यांमध्ये भावना प्रकटीकरणाला पूरेपूर वाव असतो. खरंच काही उत्तम गायल्यासारखे वाटते. ‘लता 75’ हा कार्यक्रम मी सादर करते. त्यात दीदींची निवडक गाणी मी म्हणते. ती लोकांना आवडतात, कारण मूळ गाणीच फार सुंदर आहेत. लताबाईंच्या अनेक गाण्यांचे मी िचत्रीकरण बघितलेलेच नाही. ‘ये दिल और उनकी निगाहों के सायें’ हे त्यांचे गाणे घ्या. या गाण्याचा व्हििडओ यूट्यूबवर उपलब्धच नाही. कोण नायिका पडद्यावर गात आहे, याची मला काहीही माहिती नाही. पण हे गाणे ऐकल्यावर तुम्ही आपसूक काश्मीरमध्ये पोहोचता. अशी सहजरीत्या तुम्हाला आपल्या कवेत घेणारी खूप गाणी आहेत. ‘हाये जिया रोए’ या गाण्यातील ‘रोए’ या शब्दांत आक्रंदनाचे भाव आहेत. ते दीदींनी ज्या रीतीने प्रकट केले आहेत, त्याला तोड नाही. ‘दिलवर दिलसे दिलसे प्यारे’ हे गाणे पडद्यावर अरुणा इराणी नाचत नाचत म्हणताना दिसते. त्या नायिकेच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होऊन पार्श्वगायन करणे, हे वाटते तितके सोपे नाही. हे काम अत्यंत सहजपणे लता मंगेशकरांनी अनेक गाण्यांत केले आहे. या शिवाय भक्तीचा स्वर म्हटला तरीही, दीदींचे ‘अल्ला तेरो नाम’ हे गाणे आठवते. लोरी म्हणजे धीरे से आजा रे अखियन मे, भूपाळी म्हणजे घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, रोमान्स म्हणजे, ‘तेरे लिए पलकों की चादर ओढे’ अशी समीकरणे अनेकांच्या मनात तयार झाली आहेत. याचे कारण लतादीदींचा मधुर स्वर.   


दीदी सर्वार्थाने संगीताचे विद्यापीठ आहेत. या विद्यापीठात प्रत्येक होतकरू गायक-गायिकेने प्रवेश घेतला पाहिजे. शास्त्रीय संगीताची घराणी आहेत. तशी सुगम संगीताची घराणी नाहीत. पण माझ्या मते, लताबाईंचे गाणे हेच पार्श्वगायनाच्या क्षेत्रातले एक तालेवार घराणे आहे. मात्र, त्यांचा आदर्श ठेवून गाताना त्यांच्या आवाजाची नक्कल कोणीही करू नये. लताबाईंचा स्वर, त्यांची शैली, सुराचा लगाव, या गोष्टी बारकाईने अभ्यासाव्यात असे मला नेहमी वाटत आले आहे. लता मंगेशकर यांच्यासारखे गाणे, म्हणजे वरच्या पट्टीत गाणे, असे काही जणांना म्हणजे, जे त्यांच्यासारखे गाऊ पाहतात, त्यांना वाटते. काळी एकच्या वरच्या पट्टीच्या, गावून वरचा सूर लावणे म्हणजे, लता मंगेशकरांसारखे गाणे, असा काहींचा समज झालेला असतो, पण तोही अयोग्य आहे. त्यापेक्षा दीदींच्या स्वराची शुद्धता आपल्यात आणण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. अर्थात, जिच्या गळ्यात सूर आहे, अशी भारतातील प्रत्येक मुलगी एकलव्यासारखे लताबाईंचे गाणे शिकते.  गायनाबरोबरच मी आता संगीत गुंफायलाही सुरुवात केली आहे. हृदयनाथ मंगेशकर हे महान संगीतकार आहेत. त्यांच्या शैलीचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे. गाणे हृदयनाथ मंगेशकरांसारखे  बनवावे, आणि गायन लतादीदींइतक्या निष्ठेने गावे, हाच माझा सदोदित प्रयत्न राहिला आहे. 


- संजीवनी भेलांडे 

बातम्या आणखी आहेत...