आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjivani Tadegaonkar Article About Poet Pradnya Daya Pawar

आरपार प्राणांत‍िक वेदनेची कविता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तू विचारू नेस
अर्थ कवितेचा
कवितेमागील संदर्भांचा
वळचणीला बांधावी दु:खं
आणि व्हावं मार्गस्थ
इतका सोपा नसतोच हा प्रवास
किंवा
वितळून जाण्याइतके सहज नसतात
दु:खाचे पापुद्रे...

ही टोकदार अभिव्यक्ती आहे प्रज्ञा दया पवारची. स्वतंत्र विचारसरणीनं आपली भूमिका मांडण्याचं कौशल्य हा प्रज्ञाच्या कवितेचा आत्मा आहे. हा वारसा तिला वडिलांकडून म्हणजेच दया पवार यांच्याकडून मिळाला. महाराष्ट्रात अशी काही उदाहरणं आहेत, ज्यात वडिलांचा साहित्यिक वारसा मुलींनी अतिशय सक्षमपणे चालवला आहे. त्यात मल्लिका - अमर शेख, प्रिया - विजय तेंडुलकर, नीरजा - म.सु. पाटील आणि प्रज्ञा - दया पवार या काही जणी आहेत.
प्रतिभासंपन्न बापमाणूस घरात असल्यामुळे कळत-नकळत जाणिवा प्रगल्भ करणारे संस्कार सांज-सकाळ होत राहिले. विचारांना नवी दिशा मिळाली. आणि म्हणूनच जात, वर्ग, यांना भेदून प्रज्ञाची कविता वैश्विक जाणिवेपर्यंतचा टप्पा गाठू शकली. आजघडीला अंतस्थ, उत्कट जीवघेण्या धगीवर, मी भिडवू पाहतेय समग्राशी डोळा, आदी कवितासंग्रह प्रज्ञाच्या नावावर आहेत.
प्रज्ञाचं उभं आयुष्य मुंबईसारख्या महानगरात, वडिलांच्या सुरक्षित कवचात आणि प्र.के. अत्रे, कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, बाबुराव बागूल अशा गर्भश्रीमंत विचारी माणसांच्या सान्निध्यात गेलं. तिच्या वाट्याला बाईपणाची अवहेलना, जातीच्या उतरंडीची उपेक्षा कधी आली नाही. पण ज्या महानगरात ती वावरते तिथल्या जगण्याची यातायात, दीनदुबळ्यांचं शोषण आणि जीवघेण्या स्पर्धेत तिथल्या स्त्रीची फरपट ती नेहमीच अनुभवते. आजही महाराष्ट्राच्या कानाकोप-यात जातीपातीचं राजकारण होतं.
दलितांची घरं जळतात, हक्क डावलले जातात. तेव्हा तिचं संवेदनशील मन विव्हळ होतं. माणुसकीच्या शोधात निघालेली तिची कविता व्यथित होते. आणि मग अभिव्यक्ती टोकदार होते.
अगदी अलीकडे ‘आरपार लयीत प्राणांतिक’ हे प्रज्ञाचं नवं पुस्तक आलं आहे. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या तमाशासम्राज्ञीची ती शोकांतिका आहे. खरं तर तमाशा हा अवघ्या मराठी मुलखाचा आणि मनाचा आवडीचा भाग. पण वरवर दिसणा-या देखण्या रूपाच्या आणि अदाकारीच्या मागे जीवघेण्या यातना असतात, तमाशाचा रसिकवर्ग जरी सर्व समाजातील असला तरी तमाशात नाचणारी बाई नेहमीच खालच्या जातीची असते. उच्चवर्णीय स्त्रीकडे कधीच
तमाशात नाचणारी चीज म्हणून पाहिलं जात नाही. ही कविता म्हणजे बाईपणाच्या जगण्याचे पेच उलगडून दाखवणारे दीर्घकाव्य आहे. विद्रोहाशी नाते जोडून मूल्यात्मक शोषणाच्या जातीय, वर्गीय, परंपरांना झिडकारणारी आहे.
जातिव्यवस्थेच्या उतरंडीतली मांग ही एक खालची जात. त्यात जन्मलेली विठाबाई एक प्रख्यात तमाशा कलावंत. स्वत:च्या वासनांध करमणुकीसाठी समाजाने वेदनेचे घुंगरू पायात बांधायला लावलेली. दूधपित्या तान्ह्याला कनातीमागे टाकून, पुरुष वासनांची खाज उद्दीपित करून शमवण्यासाठी बोर्डावर नाचायला भाग पडलेली. बिनउजेडाची सावली असलेल्या लैंगिक शोषणाच्या परंपरेला नतमस्तक होऊन तमासगिरांचं जिणं स्वीकारणारी विठाबाई, जातीच्या उतरंडीची भ्रामक कल्पना एकाच वेळी स्वीकारते अन् झिडकारतेही.
स्त्रीचरित्राच्या, वर्गचरित्राच्या, जातचरित्राच्या पाळामुळाचं कूळ जिथवर पोहोचतं तिथं विठाबाई नावाची पोटसंस्कृती सुरू होते. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्रिया आणि जातीच्या संदर्भात म्हणतात, स्त्री ही जातीचे प्रवेशद्वार आहे. बाई जातीच्या सरहद्दींशी इमान राखत त्या झेंड्याखाली लहरत राहते. म्हणूनच समाजात स्त्रियांवरचे निर्बंध जितके कडक तितके जातीचे पावित्र्य अबाधित समजले जाते.
म्हणूनच प्रज्ञाची कविता महार, मांग, ढोर, चांभार, डोंबारी, कोल्हाटी, अशा विविध जातींच्या स्त्रियांच्या वस्तुकरणाच्या, जातीपातीच्या, लिंगाझिंगाच्या लळिताला हात घालत विचारते
खरंच
काय फरक पडतो
बाईचा चेहरा असतो
पवळा नावाचा
काय फरक पडतो
जेव्हा चेहरा असतो विठाबाईचा
काय फरक पडतो
जेव्हा बाई असते
महार, मांग, ढोर, चांभार
कोल्हाटी
किंवा
डोंबारी...
इथं विठाबाई हे एक निमित्त. पण अशा अनेक लैंगिकतेशी निगडित व्यवसायात असणा-या शोषित स्त्रियांच्या जीवनाशी समाजाने जो खेळ मांडला आहे, त्याचे समाजात उमटणारे पडसाद किती जीवघेणे असतात. कायम खालच्या पायरीवर बसलेल्या किंवा बसवलेल्या या स्त्रिया वेगवेगळ्या समस्यांनी आणि रोगांनी ग्रासलेलं आयुष्य कोणत्या पातळीवर जगत आहेत, याचा सुसंस्कृत समजला जाणारा आमचा समाज विचार तरी करतो का?
एकविसाव्या शतकाच्या वेशीवर उभ्या असलेल्या या स्त्रियांना बदलत्या सामाजिक वास्तवात नव्या जटिल संस्कृतीला सामोरे जावे लागते आहे. नवसाम्राज्यवादी संस्कृती तळागाळातल्या कष्टकरी स्त्रियांचे व्यक्ती म्हणून समष्टीतले जगणे अधिकाधिक अवघड करते आहे. अशा वातावरणात आपण कोण याचा शोध घेणे, ही व्यक्तीच्या आत्मभानाची पहिली पायरी आहे.
आरपार लयीत प्राणांतिक या कवितेत प्रज्ञाचे हे आत्मभान नवे आहे. कारण ते निव्वळ जातिनिष्ठ, पोथीनिष्ठ, पृथकपणे विचार करत नाही. स्त्री नावाची एकसंध कोटी स्वीकारत नाही. किंवा सत्तासंबंधांकडे डोळेझाक करीत नाही.
स्त्री नावाच्या सरधोप नावाखाली दडपलेल्या बायकांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या अस्तित्वाचा शोध घेते. भूतकाळाचे स्तर तपासून पाहत वर्तमानाच्या बदलत्या प्रक्रिया समजावून घेते. संघर्षाच्या इतिहासाची पुनर्मांडणी करते. आणि एका मानुष भविष्याच्या दिशांचा निर्देश करते...
एकाच वेळी अनेक पातळ्यांवर वावरणारी प्रज्ञाची कविता अनेक सांस्कृतिक परंपरा नाकारते आणि त्याच वेळी निवडक परंपरांशी नाते जोडते. त्यामुळेच तिची शब्दकळा, प्रतिभासृष्टी प्रस्थापित मराठी कवितेच्या आणि परंपरांशी नाते जोडते. तमाशापासून कलावादी प्रेरणेच्या कवितेपर्यंत. मर्ढेकरी सौंदर्यलक्ष्यी सामर्थ्यापासून ते दलित श्रमिक कवितेच्या स्फोटक प्रभंजक गतिमानतेपर्यंत. म्हणूनच दलित बहुजन स्त्रीच्या नजरेतून इतिहास लिहू पाहणारी प्रज्ञाची कविता निश्चितच सीमोल्लंघन करून नवी दिशा देणारी आहे.