आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोपाचे शब्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील वर्षी मधुरिमासाठी सदर लेखनाच्या संदर्भात संपादकांकडून विचारणा झाली तेव्हा मला माझीच खात्री नव्हती. नोकरी आणि कार्यक्रमांचं नियोजन सांभाळून वर्षभरासाठी बांधील राहून नियमित लेखन करणं मला जमेल का याची शंका होती. पण विषय निवडीचं स्वातंत्र्य देऊन त्यांनी माझी विकेट घेतली. त्यामुळे पुढं वर्षभर आवडत्या कवयित्रींच्या आवडलेल्या कवितेवर लिहिण्याचं अपूर्व समाधान मला मिळालं.
समग्र स्त्रियांच्या जीवनाचा विचार केला तर जगण्याच्या पसा-यात हरवून गेलेल्या या सगळ्या जणी, त्यातल्या मोजक्या जणींना ‘स्व’ अस्तित्वाचं भान असल्यावर किंवा मिळवताना, ते जपताना कराव्या लागणा-या संघर्षाच्या कहाण्या म्हणजेच या कविता होत. या आघाड्या लढत असताना कुणी मेटाकुटीला आलेल्या तर कुणी संघर्षानंतर का होईना यशस्वी झालेल्या. त्यांच्या कवितेशी संवाद करताना मीही त्याचाच एक भाग झाले. नकळत कधी डोळे भरून आले, कंठ दाटून आला, तर कधी माझा स्वर कधी चढला काही कळले नाही. या सगळ्या जणींसोबत एक मूक संवाद सतत चालू राहिला. त्यामुळे वर्ष कसं संपलं कळलं नाही. सदर लेखनादरम्यान छान अनुभव आले. त्यातले काही तुमच्यासोबत शेअर करायला मला नक्कीच आवडेल.
कवयित्री निवडताना माझी थोडी पंचाईतच झाली. मराठी कवितेला समृद्ध करणारी महत्त्वाची कविता लिहिणा-या अनेक जणी प्रत्येक कालखंडात आहेत. आजच्या कवयित्रींमध्ये तर त्यातल्या अनेक जणी माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत, चांगलं लिहिताहेत, पण तरी मला सर्वजणी घेता येणार नव्हत्याच. म्हणूनच मी प्रत्येक कालखंडामध्ये वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली कविता निवडायचं ठरवलं आणि पहिल्याच लेखात जीवनाला आणि मरणाला वेगळ्या पद्धतीनं सामोरं गेलेली कान्होपात्रा निवडली. मंगळवेढ्याच्या तिच्या तेव्हाच्या (पण आता अतिक्रमण झालेल्या) घराला भेट दिली. तिचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न केला. नुसत्या कवितेचे विश्लेषण करण्यापेक्षा कवयित्रीचं व्यक्तिमत्त्व जीवनासह वाचकांना परिचित व्हावं, हा त्यामागचा हेतू होता आणि तो पूर्ण झाला. कारण ही माहिती लिहिण्याअगोदर आज हयात असणा-या कवयित्रींसोबत स्वत: संवाद करून त्याची सत्यता मी तपासून पाहिली, तर ज्या कवयित्री काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत, त्यांच्या आप्तस्वकीयांशी किंवा पुस्तकांच्या माहितीच्या आधारे लिहिले. वाचकांना हा प्रकार वेगळा वाटल्याने अनेक साहित्यिकांनी त्याचे कौतुक केले. किशोर पाठक, श्रीधर अंभोर, श्री. व सौ. सातपुते, जयराम खेडेकर, हेरंब कुलकर्णी, अभय दाणी, भास्कर निर्मल पाटील, राजू देसले, तेजराव गाडेकर, डॉ. महेंद्र कदम हे सर्व माझे परिचित व चोखंदळ वाचक/साहित्यिक. असे अनेक जण आहेत त्यांनी ई-मेलवर प्रतिक्रिया दिल्या. ब-याच जणांनी फोनवर बोलून व एसएमएस पाठवून आवडल्याचे सांगतानाच त्यातल्या कविता वेगळ्या आहेत हे मान्य केले.
एकदा एका कार्यक्रमासाठी गेले असता तो संपल्यावर एक वयोवृद्ध गृहस्थ माझ्याजवळ आले नि ‘मी तुमचं सदर आवर्जून वाचतो, त्यातल्या अनेक कविता वाचताना काही छान वाचल्याचा प्रामाणिक आनंद होतो. साहित्याचा अभ्यासक असूनही यातल्या ब-याच जणी माहीत नव्हत्या,’ अशी प्रांजळ कबुली दिली. इंदिरा संतांच्या साहित्यावर पीएचडी करणा-या एका प्राध्यापकांचा फोन आला होता. ते म्हणाले, ‘मी अनेक पुस्तक जमवली आहेत. इंदिराबाईंवर खूप लिहून झालं, पण त्यांचा असा सर्वांगसुंदर परिचय कुठेच वाचला नाही.’ त्याचप्रमाणे संजीवनी खोजेला मी पाहिलं नाही, भेटले नाही. कुठली ओळख नाही. पण तिची कविता मला खूप आवडायची. तिच्यावर लिहिण्याअगोदर तिच्या मित्रमैत्रिणींशी बोलले आणि मग लिहिलं. अनेकांना ते खूप आवडलं. तिचे आईवडील फोनवर गहिवरून बोलत होते.
अनुराधा पाटलांची कविता तर माझा जीव की प्राण. प्रज्ञा लोखंडे, आसावरी काकडे, मल्लिका अमर शेख यांच्या वास्तववादी कविता स्वप्नातून जागं करून कान पकडून सभोवतालच्या भयाण वास्तवाचा परिचय करून देतात.
उषाकिरण अत्राम ही आदिवासी भागात काम करणारी कवयित्री, त्यांच्याशी जेव्हा फोनवर बोलले तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी कळल्या. त्यांची वेगळी कविता वाचकांपर्यंत नेता आली. बरं वाटलं. वर्णद्वेषाच्या वेदना किती जीवघेण्या असतात, त्या उराशी कवटाळून दु:खाला टिचकी मारत आनंदी आयुष्य हसत कसं जगावं हे सांगणारी कविता माया अँजेलू यांची. तो लेख वाचल्यानंतर अनेक मैत्रिणींनी आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले.
या सदर लेखनासंदर्भातली एक आठवण मात्र आयुष्याला पुरून उरणारी आहे. जालन्यात आमचं चांगलं साहित्यिक मित्रमंडळ आहे. प्रा. अशोक शेळके त्यापैकीच एक. नवं काय वाचलं हे आवर्जून सांगणारे. सदर सुरू झाल्यावर प्रत्येक वेळी पहिला फोन त्यांचा ठरलेला असे. त्यांची प्रतिक्रिया मला महत्त्वाची वाटत असे. त्यामुळे त्यांच्या फोनची मला जणू सवय लागली. पण संजीवनी खोजेंच्या कवितेवर लेख छापून आला त्या दिवशी शेळकेसरांचा फोन काही आला नाही. मला चुकल्या चुकल्यासारखं वाटलं.
रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास झोपताना अस्वस्थ वाटू लागलं. नकळत हातात फोन घेऊन त्यांचा नंबर काढला, पण उशीर झाल्याचं लक्षात येऊन फोन नाही केला. थोड्या नाराजीनेच मी झोपले. सकाळी उठताच नवरा म्हणाला, ‘रात्री साडेदहाला प्रा. शेळके गेले.’ रात्री अगदी त्याच वेळी मला एवढं अस्वस्थ का वाटत होतं त्याचा अर्थ समजत होता.
विचारांचं, कृतीचं आत्मभान देणा-या या कवयित्रींवर लिहिताना पुन्हा नव्याने त्यांचं साहित्य वाचताना कधी काळी वाचलेल्या त्याच कवितांचे अगदी वेगळे संदर्भ हाताशी लागले. वाचकांच्या थेट संवादातील सौख्य पदरगाठीशी बांधता आले.
याचं सगळं श्रेय संपादक मृण्मयी रानडेंनाच द्यावं लागेल. कधी एसएमएस पाठवून तर कधी फोन करून त्यांनीच हे लिहून घेतलं. नसता, मनात असूनही माझ्याकडून एवढ्या सगळ्या कवयित्रींवर लिहून झालं नसतं. उनाड लेकरानं आज्ञाधारक होऊन निमूटपणानं अभ्यास करावा आणि वर्गात अव्वल गुण मिळवावेत, असंच काहीसं माझं झालं. आज या वळणावर वाचकांपासून दुरावा निर्माण होईल याची थोडी रुखरुख मात्र लागेल. दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानून थांबते.
ना शिकवा करेंगे, ना गिला करेंगे
आप सलामत रहे, यही दुवा करेंगे।
धन्यवाद!