आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरण बदलावरील एकांगी लेखन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे पुस्तक वाचताना असे जाणवत राहते की, घोष इथे दोन प्रकारे कमी पडतात. एक तर त्यांचे संदर्भ हे एका विशिष्ट पठडीतले आहेत. वातावरण बदल या प्रश्नाविषयी नकारात्मक दृष्टिकोन असलेले आणि मुख्य प्रवाहावर सातत्याने टीका करत राहणारे असे हे संदर्भ आहेत. तर दुसऱ्या बाजूला घोष यांचे या प्रश्नावरील लेखनसुद्धा एकांगी झालेले आहे.

अमिताव घोष हे इंग्रजीत लिहिणाऱ्या महत्त्वाच्या भारतीय लेखकांपैकी एक आहेत. कादंबरीकार, अशी त्यांची मुख्यतः ओळख आहे. त्यांच्या दी सर्कल ऑफ रिझन, दी हंग्री टाइड वगैरे कादंबऱ्या चांगल्याच गाजल्या आहेत. घोष यांनी ललित लेखन विश्वाच्या बाहेर येऊन ज्याचा वास्तवाशी प्रत्यक्ष संबंध आहे, असे थोडेफार नॉनफिक्शन लेखनदेखील केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी मुख्यतः निबंध लिहिले आहेत. तसेच १९९८मध्ये भारत आणि पाकिस्तानने अणुस्फोट केल्यानंतर त्यांनी राजकीय नेते, प्रशासक, अभ्यासक, सामान्य लोक अशा विविध स्तरातील लोकांच्या मुलाखती घेऊन, प्रत्यक्ष फिरून अण्वस्त्रे कशी विनाशकारी आहेत, याविषयी लिहिले होते. आता त्याच घोष यांनी ‘वातावरण बदल’ या सध्याच्या ‘हॉट’ विषयाला हात घातला आहे. त्यांचे ‘दी ग्रेट डीरेन्जमेन्ट’ या नावाचे नवे पुस्तक या महिन्यात आले आहे. घोष यांचे हे नवे पुस्तक म्हणजे तीन दीर्घ निबंध आहेत. त्यापैकी पहिला निबंध हा मुख्यतः इंग्रजी साहित्य आणि वातावरण बदल या विषयावर लिहिलेला आहे. हा तीनपैकी सर्वात मोठा निबंध असून जवळपास अर्ध्याहून अधिक पाने भरतील इतका दीर्घ आहे. त्याशिवाय पुढील दोन निबंध हे अनुक्रमे इतिहास आणि राजकारण या दोन क्षेत्रांचा वातावरण बदलाशी काय आणि कसा संबंध आहे, हे दाखवणारे आहेत. खरे तर हे पुस्तक म्हणजे घोष यांनी शिकागो विद्यापीठात दिलेली लेक्चर्स असून पुस्तकाला कोणतीही प्रस्तावना किंवा आपली भूमिका मांडणारे प्रास्ताविक घोष यांनी लिहिलेले नाही. संपूर्ण पुस्तक वाचूनच घोष यांची भूमिका समजून घ्यावी, असा याचा अर्थ आहे!

घोष यांची भूमिका थोडक्यात सांगायची तर ती अशा प्रकारे मांडता येईल : वातावरण बदल ही एक मोठी आपत्ती आपल्या जगासमोर आहे. पुढील काही काळात वातावरण बदल रोखला जावा, यासाठी काही कृती तीसुद्धा व्यक्तीच्या नव्हे तर समाजाच्या आणि व्यवस्थेच्या पातळीवर केली नाही तर त्याचे परिणाम भोगायला लागतील. सध्याच्या जगात या समस्येची तीव्रता विविध कारणांमुळे आपल्यासमोर येत नाही. घोष विविध उदाहरणे देऊन हे दाखवून देतात की, आधुनिकीकरणाने घडवलेल्या विचारप्रक्रियेमुळे, विशिष्ट दृष्टिकोनामुळे आपले निसर्गाविषयीचे, त्याच्या खऱ्या स्वरूपाविषयीचे आकलन अपुरे राहिले आहे. त्यामुळे मानव-निसर्ग संबंधांचे चित्रसुद्धा आपण एकाच दृष्टिकोनातून काढत राहतो. याचा तोटा असा होतो की, जेव्हा आपल्यावर निसर्गनिर्मित संकटे येतात, तेव्हा आपण त्याचा प्रतिकार समर्थपणे करू शकत नाही.

साहित्यावरील आपले विवेचन करताना अमिताव घोष हे कादंबरीलेखनाचे तंत्र, त्याचा झालेला विकास आणि या लेखनप्रकाराचा एकूण संस्कृतीशी असलेला संबंध अशा विषयाची एक सफर वाचकाला घडवून आणतात. हा निबंध वाचताना इंग्रजी साहित्य आणि साहित्यिक यांचे जितके अधिक संदर्भ माहीत असतील, तितकी जास्त मजा वाचकांना येऊ शकते. त्यापुढील निबंध हा ‘इतिहास’ या विषयावरील असून त्यामध्ये घोष यांनी आपले लक्ष मुख्यतः आशिया खंडाकडे वळवले आहे. ते असे म्हणतात की, आशिया खंड हे वातावरण बदल या प्रश्नाच्या केंद्रस्थानी आहे. सध्याची वातावरण बदल या प्रश्नावरील चर्चा ही युरोप आणि अमेरिका यांच्या चौकटीत होते. ती आता आशियाच्या दृष्टिकोनातून होण्याची गरज आहे. ते लिहितात की, गेल्या तीस वर्षांत आशिया खंडात झालेल्या औद्योगिक विकासामुळे वातावरण बदल हा प्रश्न कोणत्या दिशेने जाईल, याविषयी आता आशिया खंडाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. वातावरण बदलाच्या विपरीत बदलांचे सर्वाधिक बळी आशिया खंडातील पाकिस्तान, भारत, बांगलादेश आणि चीन अशा देशांत असणार आहेत. त्यामुळे वातावरण बदल या प्रश्नाचा सामना कसा करायचा, याविषयी चर्चा करताना आशिया खंडातील देशांना टाळून पुढे जाताच येणार नाही.

पुस्तकातील तिसरा आणि शेवटचा निबंध हा ‘राजकारण’ आणि वातावरण बदल याला वाहिलेला असून त्यामध्ये घोष यांनी मुख्यतः पाश्चात्त्य जगावर लक्ष वळवले आहे. ते सांगतात की, जरी इंग्रजीभाषिक अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये अनेक गट वातावरण बदल ही वस्तुस्थिती नाकारत असले तरी त्यांच्या लष्करी आणि गुप्तचर यंत्रणांना मात्र वातावरण बदलाची चांगलीच कल्पना आहे. नुसतीच कल्पना आहे असे नव्हे, तर त्याचे लष्करावर आणि राजकीय वर्चस्वावर कमीत कमी परिणाम व्हावेत, या दृष्टीने तंत्रज्ञानसुद्धा ते विकसित करीत आहेत. परिणामी अशी एक विचित्र परिस्थिती आहे की, या देशांमध्ये एका बाजूला या समस्येविषयी अतिशय जागरूक असे गट आहेत आणि दुसऱ्या बाजूला याच देशांची सरकारे मात्र आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये वातावरण बदलाचा विचार संकुचित राष्ट्रीय स्वार्थाच्या दृष्टीने करतात. वातावरण बदल या समस्येचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे दुहेरी स्वरूप लक्षात घेता, या प्रश्नाला मिळणाऱ्या दुहेरी प्रतिसादाबद्दल घोष यांना अजिबात आश्चर्य वाटत नाही.

अमिताव घोष यांचा जगभर पसरलेला आणि सर्व स्तरांतील वाचक वर्ग आहे. घोष काय लिहितात, याला तो वर्ग अतिशय गांभीर्याने घेतो. त्यामुळे घोष यांच्यासारख्या लोकप्रिय ललित लेखकांवर लिहिताना अधिक जास्त जबाबदारी येते. विशेषतः असे लेखक जेव्हा नेहमीच्या क्षेत्राबाहेर जाऊन राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक विषयांवर लिहितात, तेव्हा त्यांनी पुरेसा आणि सम्यक दृष्टिकोनातून अभ्यास करणे अपेक्षित असते. पुस्तक वाचताना असे जाणवत राहते की, घोष इथे दोन प्रकारे कमी पडतात. एक तर त्यांचे संदर्भ हे एका विशिष्ट पठडीतले आहेत. वातावरण बदल या प्रश्नाविषयी नकारात्मक दृष्टिकोन असलेले आणि मुख्य प्रवाहावर सातत्याने टीका करत राहणारे असे हे संदर्भ आहेत. तर दुसऱ्या बाजूला घोष यांचे या प्रश्नावरील लेखनसुद्धा एकांगी झालेले आहे. पुस्तक वाचताना वाचकांच्या मनात कळत-नकळतपणे निराशावाद पेरला जातो. वातावरण बदल या विषयातील गुंतागुंत पाहू जाता घोष यांनी अधिक जबाबदारीने लिहायला हवे होते, असे वाटत राहते. आणि असेही वाटते की, त्यांनी पुस्तकात साहित्यावर कमी आणि राजकारणावर थोडे जास्त लिहायला हवे होते.

(sankalp.gurjar@gmail.com)
दि ग्रेट डिरेन्जमेन्ट
लेखक : अमिताव घोष
किंमत : ~ ३९९/-
प्रकाशन : पेंगवीन
पृष्ठे : २८४

बातम्या आणखी आहेत...