आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीचा श्रीरंगु | तोषवितो तेलंगु ||

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘एकतेत विविधता आणि विविधतेत संपन्नता’, हे भारतीय समाजजीवनाचे एक लोभस वैशिष्ट्य आहे. आपल्या येथे अनेक जातींचे, धर्मांचे, प्रांतांचे, संप्रदायाचे लोक अत्यंत गुण्यागोविंदाने कित्येक वर्षांपासून एकत्र राहत आहेत. प्रत्येकाने या भूमीला ‘मायभूमी’ म्हटलेले आहे. ‘माता’ ही संकल्पना सार्‍यांनीच या मातीशी मोठ्या हार्दिकतेने जोडून घेतलेली आहे.
‘जननी जन्म भूमिश्च, स्वर्गादपि गरियसि
समता विलसित भारती, सर्वजगती श्रेयसि।’
‘जन्मभूमी’ हा शब्द याच अभिलाषेपोटी, आदरापोटी अवतरलेला आहे. ‘भारतीय राज्यघटना’ अशीच सर्वसमावेशक वृत्तीची आहे. याचा सार्‍यांनाच रास्त अभिमान आहे.
‘छप्पन्न भाषेचा केलासे गौरव। भवर्णावीनाव उभारिली
श्रवणाचे मिषे बैसावे येऊनी। साम्राज्य भुवंती सुखी नांदो।’
संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांच्या ठायी असा विविध भाषांबद्दलचा जिव्हाळा होता, हे वरील ओवीतून संत नामदेवांनी सांगितले आहे. श्री ज्ञानेश्वरीत तेलुगु, कन्नडबरोबर अनेक भाषांचा जणू अमृतकल्लोळच आहे. अनेक तेलुगु शब्दांचा त्यात भरणा आहे. पिलु, गाभण, दिवटी, ठिंगणा, मामी, बापुरे, मोट, बोट असे अनेक शब्द वानगीदाखल देता येतील. तर श्री ज्ञानदेवांनी कन्नड भाषेतून ‘अक्का नि केळू चिक्कनि मातु’ अशा शब्दांत अभंग लिहिला. जसे मानवी शरीरात रक्ताभिसरण होते, तसे आपल्या भारतीय भूमीत ‘भाषाभिसरण’ होते आहे. रक्ताभिसरणाने देह शुद्ध, तर भाषाभिसरणाने देश शुद्ध होतो आहे.

या सार्‍या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या महन्मंगल भूमीत तैलबुद्धीची तेलंगु मंडळी कशी, कधी आली? त्यांचे या महाराष्ट्राच्या जडणघडणीत काय योगदान आहे? या मराठी मातीशी एकरूप होताना त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राष्ट्रीय, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय या सर्व स्तरांवर कोणते कार्य केले? त्यांचे कोणते कार्य येथल्या समाजोन्नतीच्या दृष्टीने लक्षवेधी ठरले? याचा ढोबळ आढावा घेण्याच्या निमित्ताने हा शब्दप्रपंच.

स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती 1960मध्ये झाली. याला आज 53 वर्षे होत आहेत. त्रेपन्न गुणिले दोन, याप्रमाणे 106 जणांनी या महाराष्ट्र निर्मितीत हौतात्म्य पत्करले. या 106 जणांत अनेक अमराठी लोकही आहेत. सार्‍यांच्याच रक्ताभिषेकाने हे महाराष्ट्राचे तख्त उभारले गेले आहे. तेव्हा सर्वभाषकांना समान न्याय देणे, ही या तख्ताची नैतिक जबाबदारी आहे, हे वेगळे सांगणे नको. हा तेलुगु समाज सामान्यपणे आंध्रातून- अधिक नेमक्या शब्दांत सांगायचे झाल्यास, हैदराबादच्या सरंजामी निझामशाहीच्या कच्छपी असलेल्या तेलंगणातून, तर काही रायपूर जिल्ह्यातून येथे आला.

‘माझा प्रांत तेलंगाणा। कोटि रत्नांची वीणा’ असे भक्तिभावाने म्हणणारे लोक निझामाच्या पाशवी राजवटीच्या रझाकारांच्या राक्षसी कृत्याला भिऊन येथे आले. त्याहीपूर्वी प्रचंड दुष्काळाने दुबळ्या गरिबांना देशोधडीला लावले होते. या ना त्या अनेक कारणांनी तेलंगणच्या आई देवकीला सोडून, मराठी मावशी यशोदेकडे या लोकांनी धाव घेतलेली आहे.

‘तेलुगु’ भाषक म्हटल्यास, तेलुगु बोलणारी समस्त जातीतली माणसे होत. यात अनेक जाती-जमातीचे, वर्गाचे बहुविध कष्ट करणारे बलुतेदार आहेत. पद्मशाली, पट्टसाली, नीलकंठ, तोगटवीर, कुरहीन शेट्टी, निलगार, मुन्नुरुकापु, माला, मादिगा, मंगली, चाकली, बेस्तोळ्ळु, कोंडादोरलु, साधना सुरूलु, कोमटलु, सकुळसाळी, कुनपेल्ली, वडार, रेड्डीलु, कुंचेकोरवी, वड्रंगी, कम्मरी, तापिमेस्त्री, कुम्मरी, गोल्ला, कंसाली, मेदरी असे अनेक जाती/जमातींचे लोक यात येतात. हा तेलुगु समाज सामान्यपणे महाराष्ट्रात दाखल झाल्याची नोंद इ. स. 1665 सालची आहे. या वेळी मुंबईला भेट दिलेल्या डॉ. जॉन फ्रेअर यांनी लिहिलेल्या ‘ट्रॅव्हल्स इन इंडिया अँड पर्सिया’ या ग्रंथात तेलुगु समाजाची माहिती लिहिलेली आढळते. कोणतेही भांडवल, साधनसामग्री न आणता ही मंडळी येथे वसली आहेत. अतिशय प्रामाणिक, कष्टाळू आणि चिकाटीमुळे तेलुगु लोकांना सहजपणे येथे काम मिळत गेले.

मराठीत जसा आपण ‘कामधंदा’ हा शब्द वापरतो, त्याच अर्थाने तेलुगुत ‘पनीपाटा’ हा शब्द योजिला जातो. पनी म्हणजे काम, पाटा म्हणजे गाणे. ‘बोटात काम आणि ओठात गाणे’ हा यांचा स्थायीभाव आहे. तात्पर्य, हा समाज अत्यंत कष्टाळू, गाणे गात राहणार्‍या हसतमुख माणसांचा आहे.

‘डिस्क्रिप्शन फ बॉम्बे’ या ग्रंथानुसारही ही मंडळी इ.स. 1665मध्ये मुंबईत आल्याची नोंद आहे. ‘मुंबईचा वृत्तान्त’ या 1889मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथातही हेच वर्ष दिले आहे. एकंदरीत ‘प्रामाणिक कष्टकरी’ असा आपला ठसा या लोकांनी जनमानसावर उठवला. त्यामुळे 1757मध्ये त्यांना लष्करात भरती आणि बढती मिळाली. 1757पासून तर बुरुजाचे बांधकाम सुरू झाले, त्या वेळी या समाजाची सरकारला खूप मदत झाली. ही नोंद ‘राइझ फ बॉम्बे’ या ग्रंथात आहे.

हा समाज मूळ तेलंगणातला. या इथे इ.स. 1759 ते 1900 पर्यंत म्हणजे 141 वर्षांत 35 मोठे दुष्काळ पडून सुमारे सव्वातीन कोटी माणसे मृत्युमुखी पडली. या भीषण काळात उदरनिर्वाहासाठी ही मंडळी महाराष्ट्रात दाखल झाली. हा समाज आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला होता.

पद्मशाली समाज सुमारे 1850च्या दरम्यान, आपल्या पारंपरिक हातमाग व्यवसायाच्या निमित्ताने, पेशवाईच्या काळात महाराष्ट्रात आला. आपल्या पारंपरिक कौशल्याचा फायदा मुंबईतील कापड गिरण्यांना मिळू लागला. येथे जवळजवळ प्रत्येकाला हमखासपणे काम मिळते आणि सन्मानही मिळतो, याची हमी मिळाल्यानंतर शेकडो लोक मुंबईच्या दिशेने धावू लागले. कापड गिरण्यांना एक प्रकारची तेजी आली...