आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिळेल का कुणी ‘दिलदार’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवयव प्रत्यारोपण ही तशी वैद्यकीय क्षेत्राला नवीन गोष्ट नाही. मात्र ही मदत वेळेत आणि योग्य ठिकाणी पोहोचणं आवश्यक असतं. शिवाय त्यासाठी अवयवदान संकल्पनेबाबत लोकांनी जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे.
 
रोजचीच धावपळीची सकाळ होती. एक फोन आला. पलीकडचा माणूस म्हणाला, ‘मी योगेश मुळे. माझ्या मुलीला हार्ट ट्रान्सप्लांटची गरज आहे. तुमची काही मदत मिळेल का?’ वैद्यकीय क्षेत्रातली पत्रकारिता करीत असल्याने दररोज मला वैद्यकीय मदत मागण्यासाठी किंवा डॉक्टरांची मदत मिळवून देण्यासाठी अनेक फोन, मेसेज येतच असतात.
 
 तसाच हा फोन. मुलीसाठी हार्ट डोनर मिळावा आणि त्यासाठी मी प्रयत्न करावे, असे नवी मुंबईत स्वत:चा व्यवसाय करणारे योगेश मला सांगत होते. त्यांच्या सांगण्यात होतं की, ‘एक साडेतीन वर्षांचा मुलगा एका हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर (ब्रेन डेड) आहे. त्या मुलाचं हार्ट माझ्या मुलीसाठी मिळालं तर माझी मुलगी वाचू शकेल. 
 
प्लीज काही करू शकाल का?’ योगेशजींशी फोनवर बोलत असताना मलाही एक आशा वाटू लागली. मी ‘आपण काय करता येईल ते बघू या’ असं उत्तर दिलं. दरम्यान राज्य शासनाच्या वैद्यकीय सहसंचालिका आणि सोशल वर्कर यांच्यामार्फत काय करता येईल, ते पाहात होतो. पण कदाचित आमचे प्रयत्न कमी पडले.
 
 कारण व्हेटिलेंटरवर असलेल्या त्या मुलाचे निधन झाले. ही बातमी मला समजली तशी आपण मदत करण्यात कमी पडलो, याची रुखरुख लागून राहिली. कारण मीसुद्धा एक पत्रकार म्हणून नाही तर पित्याच्या भूमिकेतून ही घटना पाहात होतो. 
 
आराध्याच्या निमित्तानं आतापर्यंत दुर्लक्षित असणारा अवयवदानाचा विषय आजघडीला किती महत्त्वाचा झालाय, हे नव्यानं जाणवत राहिलं. पण आजही समाजामध्ये अवयवदानाबाबत असलेली मानसिकता आणि याबाबत अगदीच नगण्य असलेली जनजागृती यामुळे अजूनही आपण अवयवदानात बरेच मागे आहोत. एका वर्षापासून योगेश आणि त्यांची पत्नी प्रतिभा हार्ट ट्रान्सप्लांटसाठी डोनर मिळावा, यासाठीचा संघर्ष करत आहेत.

‘आमचा दैनंदिन संघर्ष सुरूच आहे. हार्ट डोनर मिळावा, म्हणून मी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडेही मदत मागितली. मग ही कथा मी सोशल मीडियावर सर्वांसमोर मांडायची असं ठरवलं,’ असं ते म्हणाले.

योगेश सांगतात, ‘आम्ही कळंबोलीला राहतो. प्रतिभा गृहिणी आहे. तिचं वय २८, माझं ३३. गेल्या वर्षी ८ एप्रिलला आराध्याच्या आजाराचं निदान झालं आणि आम्ही मुळापासून हललो.
 आराध्याचा जन्म झाला तेव्हा ती अगदी नॉर्मल होती. पण एक वर्षापासून तिच्या हृदयाला असलेल्या त्रासामुळे ती सर्वसाधारण मुलांसारखी खेळू-बागडू शकत नाही. तिला डायलेटेड कार्डिओ मायोपॅथी हा त्रास आहे. आमचा दिवस ‘होप फॉर अ हार्ट’ अशा अवस्थेतच सुरू होतो. आराध्याच्या जन्मानंतर मला चांगली कामे मिळू लागली.
 
 आराध्या माझा ‘लकी चार्म’ बनली, पण आता तिच्या आजारपणामुळे आमचे जीवन जणू काही थांबलेच आहे. कारण आता तिला बरे करणे हेच आमचे जीवनातील ध्येय आहे. काहीतरी चमत्कार होईल आणि आमची मुलगी वाचेल, असे वाटते. दर दिवशी देवासमोर हात जोडून आपल्या मुलीला बरे करावे, असेच आम्ही दोघे देवाला सांगत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही शांतपणे झोपलो आहोत, असे आठवत नाही.
 
 आमच्यातले सगळे संभाषण आराध्याबाबतच असते. वर्षभरात आमच्या नातेवाइकांनी, घरच्यांनी, डॉक्टरांनी, परिचितांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले; पण तरीही आपली आराध्या लवकर बरी व्हावी, यासाठी आम्ही काहीही करायला तयार असतो.’  प्रतिभा म्हणतात, ‘आम्ही आशा सोडणार नाहीच. 
 
रोज सकाळी उठल्यावर वाटतं, आमच्या आराध्याला आज कोणीतरी हृदय देईल आणि आमचं जगणं पुन्हा एकदा तिच्या अवखळ बालपणानं उजळून जाईल.’ आराध्या मुळे हिचे हार्ट ट्रान्सप्लांट झाले तरच ती वाचू शकेल. तिचे बाबा आणि आई दोघेही दमलेत; पण त्यांची कहाणी अजूनही संपलेली नाही. आता आराध्याला वाचवणं हे समाजाचं मिशन व्हायला हवं. त्यांना ‘दिलदार’ माणसं मिळायला पाहिजेत. शिवाय ही कहाणी प्रातिनिधिक आहे. अशा अनेक आराध्या समाजात आहेत, त्यांचं काय? हा प्रश्न उरतोच. 
 
पुढील स्लाईडवर क्लीक करून सविस्तर वाचा... 
हृदय प्रत्यारोपणाची सद्य:स्थिती.. 
आराध्या सध्या काय करते...

(santoshreporter@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...