आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मशोधाची नवी वाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई, बाबा, मी, माझी बहीण, भाऊ असं आमचं पाच जणांचं कुटुंब होतं. माझी आई मला खूप जीव लावायची. घरात आई स्वयंपाक करत असली तर मी तिच्याजवळ बसायचो. माझे बाबा खूप चिडायचे, म्हणायचे, ‘याला सारखी आई जवळ पाहिजे. आईला चिकटून बसतो.’ का कोण जाणे, पण मी लहान असताना मुलींमध्येच खेळायचो. मुलींचा सहवास मला ओढून न्यायचा. मलाही खूप मनमोकळं वाटायचं. माझ्या घराच्या जवळ एक पडीक, मोकळी जागा होती व तिथे मातीचे ढिगारे होते. आम्ही तिथून माती आणायचो, ती चाळून चिखल करून त्याची चूल बनवायचो. घरातली छोटी भांडी, भाजी, चपातीचे तुकडे आणायचो. एकत्र बसून खायचो...

मी मुलींमध्ये खेळत असताना मुलं खूप चिडवायची, ‘अरे मुलींमध्ये काय खेळतोस, चल आमच्याबरोबर खेळायला. आपण पतंग, बॅट-बॉल, गोट्या खेळू.’ मी मुलांना टाळायचो. मुलं आली की मला भीती, घबराट व्हायची व घाम यायचा. मुलांबरोबर बोलताना माझी जीभ अडखळायची. मी घाबरत बोलायचो. पण त्याला एक अपवाद होता, माझ्या घराजवळ राहणारा सागर. त्याच्याबरोबर खेळायला मला आवडायचं. तो खूप शांत असायचा आणि त्याचं-माझं खूप जमायचं. चौथीत असताना जाकिर नावाच्या मुलाशी माझी मैत्री झाली. तो माझ्यापेक्षा थोडा मोठा होता. खूप मारामारी, धिंगाणा करायचा. माझी छेडछाड करायचा. तो माझ्या शेजारी बसल्यावर माझ्या मनात भीतीचा डोंगर उभा राहायचा. पण माझ्याबरोबर राहून तोही शांत झाला. मन लावून अभ्यासही करू लागला. त्याचा शाळेतला सहवास मला मोहून टाकायचा. पण जाकिरला माहीत नव्हतं, की मी त्याच्याकडे वेगळ्या भावनेनं पाहतोय. मी विचार केला, मनातल्या भावना त्याला सांगाव्या, कारण मला मन हलकं करायचं होतं. मी दबकत दबकत सर्व सांगितलं. त्याला ते ऐकून विश्वास बसेना, पण त्याला मी म्हटलं, ‘हे सर्व खरं आहे.’ तो म्हणाला, ‘मी यातलं कुणालाही कधीच सांगणार नाही हे मी तुला वचन देतो, पण हे सर्व एखाद्या चांगल्या डॉक्टरांना सांग.’ घरी गेल्यावर माझं मन हलकं झालं होतं आणि माझ्या चेहर्‍यावर बर्‍याच दिवसांनंतर थोडंसं हसू आलं होतं.

काही दिवसांनंतर माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. वडील मरण पावले. आर्थिक परिस्थिती खालावली. काही दिवसांनी माझी आई मरण पावली. मग मात्र कौटुंबिक स्थिती खूप बिकट झाली. माझी बहीण आणि भाऊ आजी व मामाकडे राहायला गेले. शाळेतून आल्यावर मी केटररकडे भाजी चिरणे, मसाला वाटणे आदी कामे करू लागलो.

मी पुण्यात आल्यावर शाळेत जाऊ लागलो. त्या वेळी माझ्या नातेवाइकाच्या मुलाशी-पांडूशी ओळख झाली. तो मुलीसारखे हावभाव करायचा, बोलायचा, वेशभूषा करायचा. मी त्याच्याशी पहिल्यांदा बोललो, तेव्हा घाबरत घाबरत बोललो. मी त्याला म्हटलं, ‘असं का करतोस?’ तो म्हणाला, ‘मला असंच आवडतं.’ मला मनात तसंच वाटायचं, पण काय करू? मनावर खूप मोठं दडपण यायचं. त्याचं देवाची पूजा करणं, देवीला साडी घालणं, देवीला नटवणं... दिवसभर तेच चालायचं. नंतर नंतर मी रविवारी सुटी असल्यावर त्याच्याकडे जाऊन बसायचो. तोही माझ्याशी बोलायचा. पांडूबरोबर राहून माझ्या वागणुकीत बदल होत गेला. मी बाहेर जाताना काजळ घालू लागलो. कुंकवाचा टिका लावू लागलो. मुलं माझ्याकडे पाहायची, आवाज द्यायची, शुक शुक करायची व शीळ वाजवायची. कुणीतरी आपल्याकडे बघतंय, म्हणून आनंद व्हायचा. पण अशाने शाळेकडे दुर्लक्ष व्हायचं. माझ्या बायकीपणामुळे मला शाळेत जायचीही लाज वाटायची. मग मी शाळेत जाणं बंद केलं. हे माझ्या आत्याला कुणीतरी सांगितलं. मग माझ्या दोन्ही आत्या व दोन मामा मला भेटायला पुण्याला आले.
त्यांनी सरांना विचारलं तेव्हा सर म्हणाले, ‘संतोष खूप शांत आहे. वर्तणूक चांगली आहे. अभ्यासातही तो हुशार आहे. पण गेले काही दिवस तो शाळेत आला नाही.’ मामा म्हणाला, ‘याला वसतिगृहात पाठवूया, म्हणजे हा सुधारेल. पुढं त्याचं भविष्यही उज्ज्वल होईल.’ मी संतापलो व तिथून घरी आलो. घरात दार लावून मी एकटाच रडत बसलो...

त्यानंतर पुण्यात एका इस्टेट एजन्सीमध्ये कामाला लागलो. कामावरून सुटल्यावर संध्याकाळी पांडूला व त्याच्या मित्रांना भेटायचो. त्यांच्यात जास्त वावरू लागलो. काही दिवसांनी पांडूने गुरू केला. त्यांच्या प्रथेप्रमाणं त्याचं नाव पांडूऐवजी ‘साक्षी’ ठेवलं गेलं. मग साक्षीने तिच्या गुरूंना भेटवलं. मी त्यांच्या घरी गेलो. मीही त्यांना गुरू मानून त्यांच्या पाया पडलो. हे सगळं बघून माझ्यात बदल होत होता. कामाला जाणंही कठीण झालं. मन सगळं हिजड्यांमध्ये रमलं होतं. मी काम सोडून दिलं. काही दिवसांनी मला काही ट्रान्सजेंडर व्यक्ती भेटल्या. त्या समपथिक ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करत होत्या. त्यांच्याकडे बघितल्यानंतर निरुद्देश आयुष्याला काहीतरी उद्देश लाभल्याचं आतून कुठेतरी जाणवलं. त्या म्हणाल्या, ‘तू संस्थेत काम कर.’ मी त्यांच्या आग्रहावरून संस्थेत रुजू व्हायचा निर्णय घेतला. आता मी आऊटरिच वर्कर म्हणून काम करत आहे. तृतीयपंथींना भेडसावणारे प्रश्न, त्यांच्या वाट्याला येणार्‍या समस्या जाणून घेत आहे. तृतीयपंथी म्हणून आयुष्य जगतानाचे धोके मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. तृतीयपंथींना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे, आपले आयुष्य अधिक अर्थपूर्ण व्हावे, यासाठी मी मनापासून झटत आहे.