आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santosh Kale Article About Entrepreneur Anuja Deshpande.

रुमालाचा धागा जपतोय भारतीय संस्‍कृती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तोंड आणि हात पुसण्याच्या कामी येणाऱ्या साध्या वीतभर रुमालाची किंमत ती काय? काम झाले की खिशात नाही तर बॅगेत; पण तसे नाही हं. औरंगाबादमधील रुमालाचा धागा मात्र भारतीय कलासंस्कृतीची नाळ जोडत सातासमुद्रापार गेलाय. वारली, मधुबनी, पटोला, अजिंठा, वेरूळ या भारतीय संस्कृतीच्या बलस्थानांना रुमालावर साकारून थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्याचा ध्यास सिव्हिल इंजिनिअर अनुजा देशपांडे यांनी घेतला आहे. त्यातही मराठवाड्यातील त्या एकमेव टेक्सटाइल प्रोसेसर महिला उद्योजक आहेत हे विशेष.

पैठणीचा वारसा लाभलेल्या मराठवाड्यात रुमाल उत्पादनाचा व्यवसाय सुरू करायचे म्हणजे तसे हास्यास्पदच. अनुजा देशपांडे यांनी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली तेव्हाही असेच काहीसे झाले. अशा प्रकारे व्यवसाय कराल तर रस्त्यावर याल, अशा टीकाटिपण्णीदेखील सहन कराव्या लागल्या. आता तेही बरोबर आहे म्हणा, बाजारात जर वीस-पंचवीस रुपयांत जर डझनभर रुमाल मिळत असतील तर हे रुमाल घेणार कोण? लग्न समारंभ, रिसेप्शनसाठी पार्क अॅव्हेन्यू, सिग्‍नेचर ब्रँडचे पांढरे झक्क महागडे रुमाल वापरले की झाले. त्यामुळेच रुमाल खरेदी करताना कापडाचा पोत, धागे, रंग, दर्जा या गोष्टी ग्राहक कधीच विचारात घेत नाहीत; पण जबरदस्त क्रिएटिव्हिटी असलेल्या देशपांडे यांच्या ‘ईश्वरी टेक्सटाइल्स’चे रुमाल येथेच हटके ठरतात.

अनुजा देशपांडे आणि त्यांचे पती नितीन देशपांडे दोघेही मूळचे लातूरचे. अनुजा सिव्हिल इंजिनिअर, तर नितीन यांनी टेक्सटाइल डिझाइन आणि प्रिटिंग शाखेचे पदवीधारक. एका नामांकित टेक्सटाइल कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने दोघांना १९८८ मध्ये गुजरातला स्थलांतरित व्हावे लागले. नुसती नोकरी करून जीवनातील स्वप्न साकार होणार नाहीत हे दोघांनाही वाटत होते. नोकरीची दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने ते पुन्हा लातूरला येऊन टेक्सटाइल युिनट सुरू करण्याचा प्रयत्न केला. जवळच्या पुंजीतून एमआयडीसीमध्ये प्‍लॉट घेतला; पण बँकेकडून कर्ज उपलब्ध होऊ न शकल्याने व्यवसाय सुरू करणे त्या वेळी तरी स्वप्न ठरले. माझ्या पतीची नोकरीही गेली होती, त्यामुळे निर्णय चुकला की काय? असे वाटू लागले अनुजा देशपांडे आपल्या व्यावसायिक वाटचालीची कहाणी सांगत होत्या.

मराठी माणसाला व्यवसाय जमणार नाही, त्याने नोकरीच करावी, अशी टीकाही झाली; पण ती मी स्वीकारली. कारण माझ्यासाठी ती योग्य वेळ नव्हती. पोटापाण्यासाठी काही तरी करणे भाग होते. त्यामुळे मी सार्वजनिक बांधकाम खात्यात २००५ ते २०१२ पर्यंत सब काँट्रॅक्टर म्हणून व नंतर सल्लागार म्हणून काम केले. थोडेसे स्थिरावल्याची जाणीव झाल्यावर पुन्हा व्यवसायाचे मूळ स्वप्न खुणवायला लागले; पण कोणता व्यवसाय करायचा हे सुचत नव्हते. सुरुवातीला दहा बाय बाराच्या खोलीत राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर्स बनवण्याची कामे केली. पीडब्ल्यूडीच्या कामातून मिळालेले आणि या व्यवसायातील पैसे असे मिळून लाखभर रुपयांचा निधी गोळा झाला. तरीही नेमके व्यवसायासाठी कोणते उत्पादन निवडावे हे सुचत नव्हते. आजकाल प्रत्येकाला ब्रँडेड लागते; पण बऱ्याचदा ब्रँडेडच्या नावाखाली सामान्यांच्या खिशाला चाट बसेल अशीच उत्पादने विकली जातात.

त्यामुळे ब्रँड हौसेला मुरड घालावी लागते. खूप अभ्यास केल्यावर लक्षात आले की, पुरुषांसाठी पार्क अॅव्हेन्यू, सिग्‍नेचरसारखे नामांकित कंपन्यांचे रुमाल उपलब्ध आहेत; परंतु लहान मुले, महिलांसाठी असे काही रुमाल उपलब्ध नाहीत. सर्वसामान्य, उच्चमध्यमवर्गीय महिलांना रुमालाच्या कुठे तरी करावी लागणारी तडजोड मनात खटकत होती, देशपांडे सांगत होत्या. नेमके हेच आव्हान अनुजाताईंनी स्वीकारले. बाजारातील रुमालांचा अभ्यास करताना त्यांना जाणवले की डिझाइन, दर्जा याबाबत कोणताही विचार न करता केवळ गरज म्हणून रुमालांकडे बघितले जाते; पण क्रिएटिव्हिटी असेल तर रुमालासारख्या व्यवसायातही आपण स्वत:ला सिद्ध करून दाखवू शकतो, याची हिंमत त्यांच्यामध्ये होती. त्यामुळे हे उत्पादन चालणार नाही, रस्त्यावर याल, अशी टीका होऊनही त्यांनी धाडसाने पुढचे पाऊल टाकले.

पुरुष, महिला आणि लहान मुले यांच्यासाठी त्यांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन २०१० पासून रुमालांचे उत्पादन सुरू केले. आता यात वेगळे काय, असे कोणीही म्हणेल; पण एक लक्षात घेतले पाहिजे की बाजारातील रुमाल हे स्टार्च केल्याशिवाय विकू शकत नाहीत. विशेष म्हणजे हे रुमाल दोन वेळा धुतल्याशिवाय हवे तसे वापरता येत नाहीत. त्यातूनही धुतल्यानंतर कपडा २५ टक्के आटत असल्यामुळे बाजारातल्या रुमालाचा आकार थोडासा मोठाच असतो. नेमक्या याच सगळ्या निकषांवर ‘ईश्वरी’चे रुमाल वेगळे ठरतात. या रुमालाचा सुती कपडा तामिळनाडू येथून आणण्यात येतो. या कपड्यातील स्टार्च काढून प्रक्रिया केली जाते. त्यामुळे हे रुमाल मुलायम आणि कपडा दाट होतो. विशेष म्हणजे रुमालातील उभे धागे आणि आडवे धागे एक इंच जास्त घेतल्यामुळे स्टार्च करायची गरज भासत नाही. त्यामुळे देशपांडे यांचे रुमाल न धुताही वापरता येतात. हा झाला तांत्रिक दर्जा; पण या पांढऱ्याशुभ्र रुमालावर पाने-फुले, नक्षीकामांच्या पलीकडे जात महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारली कला, मध्य प्रदेशातील मधुबनी राजस्थानमधील निनिएचर, गुजरातची पटोला, आंध्र प्रदेशातील कलमकारी या सगळ्या कला - संस्कृती आपल्या क्रिएटिव्हिटीतून साकारत रुमालाला एक वेगळे रुपडे दिले. त्यामुळे हा रुमाल गरजेपुरता न राहता एक सांस्कृतिक ब्रँड झाला. बच्चेकंपनीच्या पसंतीची कार्टूनही त्यावर अवतरली. शंभर रुपये (६ रुमाल) किमतीचे हे आगळेवेगळे ब्रँडेड रुमाल ग्राहकांपर्यंत पोहोचवताना अडचणीचे शुक्लकाष्ठ संपले नाही. मार्केटिंगसाठी नामांकित वितरकांकडे गेल्यानंतर त्यांना हे दर्जेदार उत्पादन आवडले; पण किमतीवर घोडे अडले. रुमालाचा रंग जाईल का, प्रिंट खराब होईल का, असे नाना प्रश्न त्यांना विचारले; पण अनुजा यांनी ठामपणे सांगितले की, मी शंभर टक्के सुती रुमालाची गॅरंटी देते. विदेशात निर्यात करण्यासाठी जे निकष लागतात त्यानुसारच या रुमालांचे उत्पादन केले आहे. सध्याची ऑनलाइन विक्रीची क्रेझ लक्षात घेऊन त्यांनी महिला (१००) आणि मुलांचे (५०) रुमाल वेबसाइटवर टाकले आणि काय आश्चर्य, थेट परदेशातूनच त्यांच्या रुमालांना मागणी आली. रुमालाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जपण्याच्या अनुजा देशपांडे यांच्या भन्नाट कल्पकतेचे परदेशातून कोडकौतुक झाले. इतकेच नाही, तर दोन महिन्यांपूर्वी त्यांना भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौसेनेच्या देशभरातील कँटीनसाठी रुमाल पुरवण्याचे कंत्राट मिळाले. या कंत्राटामुळे ईश्वरी टेक्सटाइल्सच्या विपणन आणि खरेदीची जबाबदारी सांभाळणारे नितीन देशपांडे आणि अनुजा देशपांडे यांना एक नवा हुरूप मिळाला आहे. भारतीय उत्पादनांना लंडनची बाजारपेठ खुली करून देणारे हेरंब सहस्रबुद्धे यांच्या लंडनमध्ये होऊ घेतलेल्या सुपरस्टोअरमध्येदेखील हे रुमाल उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अनुजा देशपांडे म्हणतात की, उत्पादनाची विक्री कशी होईल, याची काळजी मला नाही. उत्पादन विस्तारासाठी एका चांगल्या जागेची गरज आहे.

औरंगाबाद एमआयडीसीमध्ये सध्या तीन हजार चौरस फूट जागेत एकूण १५ कर्मचाऱ्यांच्या मदतीने दिवसाला बाराशे रुमालांचे उत्पादन होते. ही क्षमता वाढवण्यासाठी एमआयडीसीमध्ये जागा मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे; पण अद्याप त्याला यश आलेले नाही. एक लाखाच्या भांडवलाने सुरू झालेला हा व्यवसाय आता ६० लाख रुपयांच्या वार्षिक उलाढालीपर्यंत आला आहे. रुमालांची वाढती मागणी आणि त्याच्याच जोडीला हाच पॅटर्न महिलांच्या कुडत्यामध्येही आणण्याचा त्यांचा ध्यास आहे. हा ध्यास पूर्ण होण्यासाठी त्यांना प्रकल्पासाठी जागा मिळाल्यास केवळ औरंगाबाद, मराठवाडा आणि महाराष्ट्रच नाही, तर पूर्ण देशासाठीच ही अभिमानाची गोष्ट ठरेल यात शंका नाही.