आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावरान जेवणाचा सप्ततारांकित प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतल्या बांद्रा-कुर्ला संकुलातील सोफीटेल या सप्ततारांकित हॉटेलमधील संध्याकाळची वेळ. स्वागतिका स्मितहास्याने पाहुण्यांचे स्वागत करतेय. प्रवेशद्वारावर नक्षीदार कमान, दोन तोफा, त्याच्या बाजूला बांधलेला एक चित्ताकर्षक किल्ला व त्यावर लढत असलेले मावळे पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत होते. एका पाठोपाठ एक पेटलेल्या चार विटांच्या चुली, चुलीवरील पितळेच्या भांड्यातून कधी खमंग वांग्याच्या भरताचा, तर कधी गरम चिकनचा घमघमाट नकळत हातात जेवणाचे ताट हातात घेण्यासाठी पाहुण्यांना भाग पाडत होता. त्यांच्याच बाजूला पिठलं, भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचाही जणू काही आमचीच चव आधी घ्या, असे सांगत होते. सप्ततारांकित हॉटेलात हा मराठमोळा बाज कसा काय बुवा?

तर निमित्त होते ते अस्सल गावरान जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्‍या ‘मराठा वॉरियर फूड फेस्टिव्हल’चे. या फेस्टिव्हलमधल्या सगळ्या जेवणाचा स्वाद मूळच्या सोलापूरच्या सुगंधा पोळके या सुगरणीच्या हाताचा आहे, हे कळल्यावर पांढऱ्या रश्श्यावर ताव मारत सुगंधाताईंशी गप्पा केल्या. सोलापूरच्या गावरान जेवणाचा सप्ततारांकित हॉटेलपर्यंतचा प्रवास जाणून घेण्यास सुरुवात केली. अत्यंत साधी राहणी आणि तितकीच साधी विचारसरणी असलेल्या सुगंधाताई मी शेफबिफ काही नाही, असे अगोदरच सांगून टाकत म्हणाल्या, ‘सोलापूरमधील कर्नाळा तालुक्यातील साडे हे माझे मूळ गाव. आमच्या सासूबाई द्रौपदीबाई पोळके यांच्या हाताला खूप चव होती. त्यांच्या बटव्यातील गावरान स्वयंपाकाची कला माझ्याकडेही आली. अगदी वयाच्या बाराव्या वर्षीच मी त्यांच्यासारखा स्वयंपाक शिकले. लहान वयात लग्न झाल्यानंतर पती सरकारी नोकरीत असल्याने मुंबईत यावे लागले. सगळे काही सुरळीत सुरू असताना पतीचे अचानक निधन झाले. वयाच्या २५व्या वर्षी तीन लहान मुले आणि सासू यांची जबाबदारी माझ्यावर आली. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये अनुकंपा तत्त्वावर मला नोकरी मिळत होती, पण तेव्हा कंपनीत महिलांसाठी विशेष पद नव्हते. तेव्हा स्वयंपाकाची कला कामी आली आणि आरसीएफच्या हॉस्टेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम मिळाले. मध्यंतरीच्या काळात अनेक गोष्टी शिकून घेत प्रशासन खात्यात बढती मिळाली. या सगळ्या प्रवासात खूप खस्ताही खाव्या लागल्या. पण सासूबाईंच्या भक्कम आधारामुळे माझे जीवन सावरले.’
काहीशा भावुक झालेल्या सुगंधाताईंना त्यांच्या स्वयंपाकाच्या कलेवरून बोलते केल्यावर मात्र त्या भरभरून सांगू लागल्या. ‘सासूबाईंकडून अनेक मराठी पदार्थ मला शिकता आले. आमच्‍या घरात सर्व प्रकारची वाळवणे आजही होतात. मिरची आणि लसूण घालून केलेली ओल्‍या भुईमुगाची चटणी, खिमा मटण आणि भाताचा बाऊ भात, चटपटीत मसाल्यांच्या ऐवजी केवळ काळी मिरी घालून केलेली मटणाची उकड, खारे वांगे, पिठले, भाकरी, झणझणीत मिरचीचा ठेचा हे आमचे खास गावरान पदार्थ बरं का!’
सुगंधाताई त्यांची घाटी मसाल्याची कृती कोणाला देत नाहीत, पण त्याची भाजी मात्र आवर्जून सगळ्यांना खाऊ घालतात. आज वयाच्या ६२व्या वर्षीही त्यांचा तोच उत्साह कायम आहे. सुगंधाताईंची मुलगी वर्षा मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत कार्यरत असून आईचा वारसा त्यांच्याकडेही आला आहे, पण तो गोड पदार्थांच्या रूपाने. ओल्‍या नारळाच्या करंज्या, उकडीचे मोदक, गावरान उकडीच्या शेवया आणि लापशी खीर यांसारखे काही पारंपरिक गोड पदार्थ ही त्यांची खासियत आहे. गावरान जेवणाची बाजू सुगंधाताई आणि गोडाचे पदार्थ वर्षाताई अशी जणू विभागणीच झाली आहे. अस्सल मराठमोळे खवय्ये, झणझणीत जेवणाची चव चाखण्यासाठी आसुसलेले असतात व विविध प्रकारच्या हॉटेलचा शोध घेत असतात. हॉटेलमध्ये झणझणीत मिळेल, याची शाश्वती नसते. पण सुनंदाताईंच्या हातचे जेवण झणझणीतच आहे. मराठा वॉरियरच्‍या निमित्ताने झालेला हा पहिला प्रयोग नक्कीच हटके आहे. शिवाजीच्या काळातील मावळे युद्ध नसलेल्या काळात शेती करायचे आणि शेतावरच झुणका, भाकर, कांदा, पिठले, चटणी असे साधे जेवण करायचे. अगदी मांसाहारही साधा पण वैविध्यपूर्ण आणि वेगळ्या चवीचा असायचा. नेमके हेच या खाद्य महोत्सवाने साध्य करण्याचा प्रयत्न केला. हे खाद्यपदार्थ पहिल्यांदाच सोलापूरची वेस ओलांडून थेट सप्ततारांकित हॉटेलमध्ये आले, याचा आनंद वाटतो. न जाणो येणाऱ्या काळात अस्सल चवीने झणझणीत खाणार त्याला सुगंधाताई देणार, ही युक्ती अन्य एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बघायला मिळेल.
झाडावरचं भरीत ताटात
भरीत म्हटले की, वांगे भाजून त्याची साले काढल्यानंतर ते मसाल्यामध्ये हाताने कालवून ताटात वाढायचे, हीच कृती आपल्‍याला ठाऊक. पण सुगंधाताईंच्या सासूबाईंकडे एक वेगळीच कल्पना होती. झाडाला लटकत असलेल्या वांग्याच्या खालच्या बाजूला अाग लावायची. या आगीवर वांगे खरपूस शिजल्यानंतर ते हाताचा स्पर्श न करता मसाला तयार केलेल्या मडक्यात घ्यायचे. हे वांगे मडक्यातच मसाल्यात टॉस करून थेट ताटात वाढायचे. या भरिताला येणारी खमंग चव काही वेगळीच असते. आपल्याही घरातील छोट्याशा बागेत हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही.
सुगंधाताईंच्या रेसिपी युट्यूबवर
नवनवीन पदार्थ शिकण्याची इच्छा असलेल्या महिलांना ‘बीइंग मराठी’ या यूट्युबवरील डिजिटल वाहिनीवर थेट जाता येईल. सुगंधाताईंची दुसरी मुलगी वैशाली यांनी हे खाद्यपदार्थ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या वाहिनीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचा पत्ता आहे https://www.youtube.com/user/beeingintrend
santosh.kale@dbcorp.in
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सुगंधा पोळके आणि वर्षा पोळके यांचे फोटो..