आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santosh Musale Article About An Innovative Teacher

नवनिर्मितीचा ध्‍यास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदा काही नावीन्याचा ध्यास माणसाच्या अंगी जडला की तो झपाटल्यागत मिळेल त्या वस्तूतून नवनवीन संकल्पना जन्मास घालतो, त्यालाच इनोव्हेशन म्हणतात. लहान-लहान खेळ, साहित्यातून २२ वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात हद्दवाड क्षेत्रात मुलांना शाळेची गोडी लावून त्यांना शाळेत खिळवून ठेवणा-या प्रा. शा. मार्कंडेयनगर, ता. उत्तर सोलापूर येथील हेमा शिंदे-वाघ यांच्या उपक्रमशीलतेची उकल आपण करूया.
१९९३मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या नाविंदगी (ता. अक्कलकोट) या ठिकाणी नोकरीची सुरुवात केली. गाव पूर्ण कन्नड भाषक. थोड्याफार प्रमाणात मराठी बोलणारी कुटुंबे होती. गावात कन्नड, उर्दू व मराठी अशा तीन शाळा. लोकसंख्या जेमतेम दीड हजाराच्या आसपास. मराठी शाळेत येणा-या मुलांनाही प्रमाण मराठी काय, पण मराठी ‘म’देखील माहीत नव्हता. अशा वेळी या ठिकाणी त्यांना सहकारी म्हणून शालन कांबळे भेटल्या व दोघींनी नावीन्यपूर्ण उपक्रमांतून थोड्याच दिवसांत शाळेचा चेहरामोहरा बदलावयास सुरुवात केली.
शैक्षणिक खेळ, शैक्षणिक प्रयोगांच्या माध्यमातून गावातील सर्व मुलामुलींना शिक्षणप्रवाहाशी जोडण्याचे मोलाचे काम त्यांनी बजावले. या कामाची पावती म्हणजे गावात असणारी मराठी माध्यमाची शाळा चौथीपर्यंत होती, ती सातवीपर्यंत झाली. त्यामुळे मुलींना शिक्षणाची गोडी तर लागलीच, त्यासोबत गळती व स्थगितीचे प्रमाणदेखील कमी झाले.
मनोरंजक खेळातून शिक्षण
या उपक्रमाची सुरुवात कन्नड भाषक प्रांतात झाली. या दोघींनाही कन्नड येत नव्हती. अशा वेळी मुले काय सांगतात हे समजणे फार कठीण. त्यामुळे खेळाच्या माध्यमातून मायमराठीची गोडी लावणे, त्यासोबतच गणितातील वेगवेगळ्या घटकांवर आधारित मुलांसाठी छोटे-छोटे खेळ (जवळपास दोनशे प्रकारचे) स्वत: विकसित करून मुलांचे मूलभूत संबोध स्पष्ट करण्यात या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. या उपक्रमांमध्ये ट्रॅफिक सिग्नल, वाहनांची मजा, मामाच्या गावाला जाऊया, सी-सॉ, आरोग्य सापशिडी, व्यक्तिमत्त्व सापशिडी, पर्यावरणविषयक खेळ, चला खरेदीला जाऊया, आपला सोलापूर जिल्हा, खेळ बेरीज- वजाबाकीचा, खेळ गुणाकार-भागाकाराचा, संधीची समानता या मनोरंजक खेळांद्वारे मुलांना नवनवीन संकल्पनांची ओळख करून देण्यात येते.
तळ्यात-मळ्यात हा मुलांचा खेळ सर्व जण आपापल्या शाळेत घेतात. त्यात तळ्यात-मळ्यात हे शब्द न वापरता समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, सम-विषम, लहान-मोठ्या संख्या यांची नावे देऊन मुलांना खेळातून ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, तर ट्रॅफिक सिग्नल या खेळात वाहतुकीच्या नियमांची परिपूर्ण माहिती शाळेतच
देण्यासाठी एका टेबलावर शहरातील वाहतुकीची रचना केली. यात चौपदरी रस्ते, चौक, शाळा, दवाखाने, कार्यालये दाखविली. मुलांना खेळण्यातील छोट्या-छोट्या गाड्या दिल्या व त्या खेळावयास लावल्या. सिग्नलवर मुलांना दिव्यांचे महत्त्व समजावून सांगणे, शाळेजवळ गाडी हळू चालवणे, दवाखाने, न्यायालयाजवळ हॉर्न न वाजवणे अशा वाहतुकीच्या नियमांची माहिती मुलांना सहज या उपक्रमातून मिळाली.
जम्प ऑन थर्टी
नांदणी या गावात बदली झाल्यानंतर या ठिकाणी सातवीचा वर्ग हेमाताईंकडे आला. मुली शाळेत येत नव्हत्या, तर मुले येत असूनही अभ्यासात त्यांना रस नव्हता. गणित आणि इंग्रजी मुलांच्या आवाक्याबाहेरचे होते. मात्र, या उपक्रमाद्वारे या विषयांची गोडी लावता आली. फळ्यावर मुलांनी इंग्रजीचे जे शब्द पाठ आहेत ते हिरव्या खडूने, तर पाठ नसलेले शब्द गुलाबी खडूने सर्वांसमक्ष चिन्हांकित करायचे. गणितातसुद्धा तेच केले. जी मुले तीस दिवसांत म्हणजेच महिनाभरात जास्तीत जास्त शब्द, पाढे, सूत्रे, व्याख्या पाठ करतील त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले. यामुळे मुलांमध्ये सकारात्मक स्पर्धा सुरू झाली.
कार्यानुभव साहित्य निर्मिती
हस्तकलेतून मुलांना शाळेची गोडी लागावी हा या उपक्रमाचा मुख्य हेतू. जून महिन्यातच माहेनिहाय साहित्यनिर्मितीची यादी तयार केली जाते. हेमाताई स्वत: होलसेल भावात ते खरेदी करत. रक्षाबंधनाच्या अगोदर राख्या, दिवाळीच्या अगोदर पणती पेंटिंग, लोकरीची फुले व त्यांचा पडदा, टाकाऊ पुठ्ठ्याचा वॉलपीस, फाटलेल्या कपड्यांपासून पायपुसणी, काचकाम करणे अशी कामे मुले आनंदाने करतात. साहित्य निर्मिती झाल्यानंतर एक दिवस सर्व पालकांना शाळेत बोलावून याचे प्रदर्शन भरवतात.
बहुउद्देशीय गणित फलक
या फलकाच्या माध्यमातून गणिती क्रिया सोप्या करणे, कोटीपर्यंतच्या सहज संख्या, स्थानिक किंमत, लहान-मोठ्या ओळख, संख्येवरील क्रिया, संख्यारेषेचा वापर, अंकज्ञानासाठी पुण्याचे साहित्य तयार करून इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी सोप्या व रंजक पद्धतीने अंकओळख मुलांना करून दिली.
वैज्ञानिक मेंदू
ग्रामीण भागातील अजूनही अंधश्रद्धेचा फार मोठा पगडा आहे. अनेक मुलींना पाळी असताना शाळेत पाठवले जात नसे. काही मुलींना शाळा सोडावी लागे. हेमाताईंनी गावात पथनाट्याच्या माध्यमातून लोकांची अंधश्रद्धा दूर करण्याचे काम केले.
पारंपरिक खेळातून शिक्षण
आजही ग्रामीण भागातील मुले पारंपरिक खेळ मोठ्या आवडीने खेळतात. हेमाताईंनी या खेळांतूनच मुलांना विविध विषयांची गोडी लावली. या उपक्रमात चिरघोडा, गजगे, काचाकवड्या, बियांचा खेळ, वाद आले तुफान आले, वाघोबा-वाघोबा किती वाजले, टाळ्यांचा खेळ, टिकली मारुनी जावे, शिरापुरी, विषअमृत, जिभल्या, करूया कार्यानुभवची निवड, निर्माण होईल शाळेची आवड, लेखन विकास उपक्रम यांचा समावेश होतो.
खेळातून शिक्षण या उपक्रमाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेऊन आयआयएम अहमदाबाद अंतर्गत रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन व स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन, सोलापूर यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर ‘सर रतन टाटा इनोव्हेटिव्ह टीचर अॅवार्ड २००६ मध्ये देण्यात आला, तर IIM अहमदाबादने ‘इयर बुक’मध्ये या उपक्रमाची नोंद घेतली.
हेमाताईंचे पती बालाजीही शिक्षक आहेत. ते, अग्नितेज व अभिषेक ही इंजिनिअरिंग करत असलेली दोन्ही मुले, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा, व्यवस्थापन समिती, सर फाउंडेशनचे सिद्धराम मासाळे यांच्या सर्वांचे मोलाचे सहकार्य व प्रोत्साहनामुळेच मला नवनिर्मितीच्या कल्पना सुचतात, असे हेमाताई आवर्जून सांगतात.
santoshmusle1515@gmail.com