आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santosh Musale Article About Anita Warhade Madam

संघर्षमयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळेतल्या वर्गात बसून मिळणाऱ्या शिक्षणाव्यतिरिक्त ज्ञान मुलांना मिळायला हवं. मुलं केवळ अभ्यासातच नव्हे, तर इतरही क्षेत्रांत पुढे असायला हवीत.
या एकमेव उद्देशानं आदिवासीबहुल भागातल्या मुलांवर मेहनत घेणाऱ्या शिक्षिकेविषयी आजच्या भागात...


आईवडील दोघेही अशिक्षित. वडील लोकांच्या म्हशी सांभाळायचे व आई जवळच्याच वसतिगृहात स्वयंपाकिणीचे काम करायची. दोन मुली व एक मुलगा घरात. गरिबी असूनही मुलं शाळेत मात्र जात होती. दोघी बहिणी नववीत असताना अचानक मोठी बहीण सुनीताचं १९८७मध्ये लग्न जमलं. पत्रिका छापून वाटणं चालू होतं, लग्नाला आठ दिवस बाकी असतानाच अनिताचंही आतेभावाशी लग्न जमवण्यात आलं. घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे एकाच मांडवात दोन्ही लग्नं पार पडली. अनिता व तिचा नवरा दोघेही नववीत. इथेच तिचे शिक्षण थांबले. लग्नानंतर दोनच महिन्यांनी आईवडिलांकडे परत पाठवण्यात आलं, कारण नवऱ्याचं दहावीचं वर्ष सुरू होणार होतं. एका वर्षानंतर परत सासरी पाठवलं. “मलाही मनातून खूप वाटत होतं की, दहावीची परीक्षा द्यावी; पण नाही देऊ दिली. सासरी लोकांच्या शेतात दररोज मजुरीने कामास जावे लागे. स्वयंपाकपण येत नव्हता. सासरच्यांनी मग दोनच महिन्यांनी माहेरी पाठवलं. मग मीही ठरवलं की, आता परत नांदायला जाणार नाही,’ अनिता ऊर्फ सध्याच्या अनिता वऱ्हाडे मॅडम सांगतात.

आईवडील नेहमी मुलीमुळे चिंतेत असायचे. नंतर मॅडम मावशीकडे यवतमाळला आल्या. मावशीने माधुरीताई आंबेडकर यांच्याकडे १०० रु. महिन्याने ब्यूटी पार्लरमध्ये कामास ठेवले. त्यांनीच १९९०मध्ये १७ नंबरचा फॉर्म भरून दहावीची परीक्षा द्यायला प्रोत्साहन दिलं. दहावीची परीक्षा त्या चांगल्या गुणांनी पास झाल्या. नंतर डीएडला प्रवेश घेतला. जवळ पैसे नव्हते. अशा वेळी कुणी फी भरली, कुणी पुस्तकं घेऊन दिली, काेणाकडे जेवायची सोय झाली. अशा मदतीमुळे डीएड पूर्ण केले. १९९५ मध्ये वडील वारले, घरची संपूर्ण जबाबदारी मॅडमवर आली. परत एक वर्ष मजुरी केली व १९९६मध्ये शिक्षिकेची नोकरी लागली. २७ जून २०११ रोजी मॅडम घाटंजी या तालुक्याच्या ठिकाणापासून २० किमी अंतरावर वसलेल्या आदिवासीबहुल शिवनी गावात मुख्य अध्यापकपदी रुजू झाल्या.

उपक्रम : शाळा माझी, मी शाळेेचा
शाळा परिसर स्वछ असला की, मुलं आपोआप शाळेत रमतात. दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात आदिवासी व भटक्या जातींचे प्रमाण जास्त आहे. मुलांना स्वच्छतेची सवय लागावी म्हणून सर्वप्रथम परिसर स्वछता हा उपक्रम राबवावा लागला. ज्या वर्गाचा परिपाठ असेल त्या वर्गातील मुलं त्या दिवशी पूर्ण वेळ शालेय परिसर स्वछ ठेवतात. ज्या वर्गाची मुलं महिनाखेर सर्वाधिक सुंदर परिसर ठेवतील त्या वर्गाला महिनाअखेरीस गौरवले जाते. यातून मुलांत स्पर्धा निर्माण झाली व ती परिसर स्वछ ठेवू लागली.

झुक झुक गाडी आपल्या दारी
गावातील मुलं दररोज शाळेत येत नसत. दिवसभर गावात उनाडक्या करत फिरणे, मारामारी करणे यातच त्यांचा दिवस जायचा. आईवडील सकाळीच शेतात निघून जात. संध्याकाळी घरी आल्यावर मुलांची सततची भांडणे ऐकून एका दिवशी बरेच पालक समूहाने शाळेत आले व ही अडचण सांगून यावर उपाय काढा अशी विनंती केली. मग शालेय वेळात एकही मुलगा गैरहजर असेल तर दोन मुले दोरीची झुकझुक गाडी घेऊन त्या मुलांना त्या गाडीत बसवून शाळेत घेऊन येतात. यामुळे थोड्याच दिवसात गैरहजेरीचे प्रमाण कमी झाले.

शब्द हजेरी
शासनाने पहिलीपासून इंग्रजीची सुरुवात २००१पासून केली मात्र आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी पाचवीत गेल्यानंतरच इंग्रजी विषय शिकवायला सुरुवात करतात. मॅडमनी पहिलीपासूनच या विषयाचा पाया पक्का केला. पाचवीच्या वर्गासाठी इंग्रजी स्पेलिंग दृढ करण्यासाठी हजेरी घेतेवेळेस आजचे अक्षर A असेल तर मुलांनी Aपासून सुरू होणारे शब्द उच्चारायचे. दिननिहाय Zपर्यंत अनेक शब्द मुलांकडून सहज चालताबोलता पाठ झाले.

मलाही काही बोलायचंय
शाळा म्हटलं की, प्रत्येक मूल वेगळं असतं. काही जण बोलकी तर काही लाजाळू असतात. मुलांना व्यक्त होण्यासाठी मदत व्हावी म्हणून या उपक्रमाची सुरुवात केली. दर शनिवारी हा उपक्रम घेण्यात येतो. यात वर्गात न बोलणाऱ्या मुलांना कुठल्याही एका विषयावर पाच वाक्यं बोलायला लावले जाते. मुले सुरुवातीला लाजत होती, मात्र हळुहळू ती मनमोकळं बोलायला लागली. सुरुवातीला ती पतंग, बाग, फुलपाखरू अशा सोप्या विषयांवर बोलत. सरावाने कुठल्याही विषयावर बोलायला लागली. मुलांचा आत्मविश्वास दुणावला व ही मुले अभ्यासातही हुशार झाली.

झाडे लावा, झाडे जगवा
शिवनी गावात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात आहे. अशा वेळी मुलांना पाणीबचतीचे व वृक्षांचे महत्त्व समजावे यासाठी मोठ्या प्रमाणात परिसरात झाडे लावली. मात्र, ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी ती सुकून जाऊ लागली. अशा वेळी रिकाम्या सलाइनचा वापर पानी देण्यासाठी करण्यात आला. पहिली ते सातवीच्या मुलांनी रोज घरून पाणी आणून झाडे जगवलीत. त्यामुळे शाळेत प्रसन्न वातावरण वाटते.

मॅडमचे सामाजिक क्षेत्रातही खूप मोठे योगदान आहे. अंजना राठोड या गरीब मुलीला दत्तक घेऊन तिचे डीएड पूर्ण केले, तिचे लग्नही त्यांनी लावून दिले. ती आज चंद्रपूर जिल्ह्यतील चिमूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सध्याही त्यांनी दोन मुलींना दत्तक घेतले आहे. मॅडम आपल्या यशाचे श्रेय शाळेतील सर्व शिक्षकांना, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना व गावकऱ्यांना देतात.