आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानदायिनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खाजगी शाळेचा काही वर्षांचा अनुभव असताना विवाहानंतर जिल्हा परिषदेचे नियुक्तीपत्र मंगलताईंच्या हातात पडले. खाजगी शाळेत इमारत, विद्यार्थी संख्या, वर्गभर बसायला बाके असे वातावरण होते. यातच २००४ च्या सप्टेंबरमध्ये शहापूर तालुक्यात देसलेपाडा या गावातील शाळेत मंगलला नियुक्ती मिळाली.सह्याद्रीच्या पायथ्याशी, निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव. गाव कसले, पाडाच होता तो. पहिल्याच दिवशी पाठसभा असल्याने शाळा बंद होती. परंतु मुळातच शाळेची व मुलांची आवड होती, त्यामुळे त्या दिवशी शाळेच्या ओटीवर संपूर्ण दिवसभर शाळा भरविली.

पाड्यावरचे वातावरण पाहून मंगलताईचे मन खिन्न होत होते. पण कुठून सुरुवात करावी, तेही समजत नव्हते. मग ठरवले स्वच्छता आणि संस्कार यांनी प्रारंभ करावा. तिने स्वच्छतेचे धडे प्रत्यक्ष अमलात आणण्यास सुरुवात केली. दररोज परिपाठ, तसेच दैनिक प्रसंगांतून मुलांवर संस्कार व्हावे या तळमळीने काम सुरू केले. मुलांना, पालकांना शाळेची आवड निर्माण व्हावी, तसेच शैक्षणिकदृष्ट्या शाळेतील, गावातील मुलांचा विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम सुरू केले.

मंगलताईचा जन्म आताच्या पालघर जिल्ह्यातील तलासरीचा. सुरुवातीपासूनच ती मेहनती व जिद्दी होती. महाविद्यालयीन शिक्षणाच्या प्रथम वर्षात असतानाच वडिलांचे अचानक निधन झाले अन या कुटुंबावर मोठे संकट कोसळले. अशा वेळी आई धीरोदात्तपणे उभी ठाकली आणि तिने मंगलला शिकण्याचे बळ दिले. लग्नानंतरही पती गुणेश, मुलगा व मुलगी तिच्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. यामुळेच तिने अशक्य वाटणाऱ्या देसलेपाडा शाळेला तंत्रस्नेही शाळा करून दाखविले आहे. ज्या शाळेत मुलांना बसायलाही नीटशी जागा नव्हती, त्या शाळेत तिने वर्षभरापूर्वी लोकसहभागातून तंत्रस्नेही शाळा उभी करून जंगलात उनाड फिरणाऱ्या आदिवासींच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडून ठेवले आहे.
उपक्रम

माझा वाढदिवस माझी मदत
आदिवासी पाड्यावर या उपक्रमाच्या माध्यमातून खरा विकास करता आला. मंगलताईचा मित्रपरिवार, माजी विद्यार्थी, शाळेतील विद्यार्थी, यांनी घरी वाढदिवस साजरा न करता या शाळेत येऊन साध्या पद्धतीने तो साजरा करायचा व वाचलेला पैसा शाळेतील मुलांच्या विकासासाठी खर्च करायचा, असा पायंडा पाडला. यातून मिळणाऱ्या पैशातून मुलांसाठी आवश्यक वाटणाऱ्या सोयीसुविधा त्यांना सहजपणे उपलब्ध करून देता आल्या.

साधूया “सुसंवाद”
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक सामाजिक कार्यक्रम “सुसंवाद” ग्रामस्थांच्या, महिलांच्या सहकार्याने राबविण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर होत्या. शहापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी झुंजारराव सर, विस्तार अधिकारी वेखंडे सर, जिंदाल कंपनीच्या विद्या गोरक्षीकर, पाटोळे सर, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. या निमित्ताने गावातील महिलांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, चाकोरीबाहेरील जगाची ओळख व्हावी, विविध खेळांच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, विचारांची देवाणघेवाण व्हावी, प्रेरणा मिळावी ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अनुभवातून व कल्पनेतून लेखन
लहान मुलांचं विचारविश्व वेगळंच असतं, आपण त्यांना फक्त संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे, मग ती आपोआप खुलत जातात. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना आलेले विविधांगी अनुभव, मनात आलेल्या भावना, कल्पना, भीतिदायक क्षण कागदावर उतरवून मुलांना व्यक्त होण्याची संधी दिली जाते. मुलं असे अनुभव भराभरा लिहीतात व वर्गात त्यांचे वाचन करून घेतले जाते. यातून वर्गातील अन्य मुलेही अशा प्रकारची माहिती लिहायला लागलेत.

भोंडला
या उपक्रमाची वाट गावकरी व मुले आतुरतेने बघत असतात. दसऱ्याच्या आदल्या दिवशी याचे आयोजन केले जाते. यात मुलांच्या विविध रंगबिरंगी वेषभूषा, गीतगायन, नृत्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. सोबतच पर्यावरण जनजागृतीही केली जाते. दसऱ्याच्या स्वागतासाठी पाने, फुले, धागा यांच्या साह्याने मुले कागदी तोरणे तयार करतात. सोबतच स्त्री साक्षरताविषयक व भुलाबाईची गाणी गायली जातात, व त्यावर सर्वजण ठेका धरतात. एका ठिकाणी खिरापत झाकून ठेवलेली असते, ही ओळखण्यासाठी मुलींना प्राधान्य दिले जाते. यातून मिळणारा आनंद गावकरी व मुलांना शाळेकडे आपसूकच आकर्षित करून घेतो.

लेकरांना आनंदानं शिकू द्या
उपक्रमाच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. मुलांना शाळेत आनंददायी शिक्षण मिळालं तर ती शिकवलेले पटकन आत्मसात करतात. हिवाळ्याच्या दिवसात शनिवारी अर्धवेळ शाळा असल्यामुळे मुले सकाळी कुडकुडतच येतात, त्यांना थंडी वाजू नये म्हणून परिसरातील केरकचरा जमा करून शेकोटी पेटविली जाते व याभोवती ही सर्व मुले जमतात. ‘मालाडचा म्हातारा’ हे लोकप्रिय गाणं गातात. गाणं गात असतानाच याला शेवटी प्रत्येक मूल एक एक शब्द जोडत जातं व यातून एक नवीन गाणं तयार होतं.
पाड्यावरील शाळा उभी करताना गावकरी, शाळेतील जेष्ठ शिक्षिका व अॅक्टिव टीचर फोरमचे संयोजक भाऊसाहेब चासकर यांची मोलाची साथ मिळाली, असं मंगलताई आवर्जून सांगते.
संतोष मुसळे, जालना
santoshmusle1515@gmail.com