अहमदनगर- बीड मार्गावरील पारगाव जोगेश्वरी हे साधारण साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव. गावात सर्व जातिधर्मांचे लोक राहतात. पावसाचे प्रमाण अत्यल्प, दुष्काळी भाग. शाळेत २३० विद्यार्थी शिक्षण घेतात, यात मागास व गरीब, ऊसतोड कामगारांची, आदिवासी व पारधी समाजाची मुले आहेत.
बाणेगाव (ता. केज, जि. बीड) येथील काशीबाई व सखाराम मोराळे यांच्या नऊ अपत्यांपैकी एक उषाताई. उषावर बालपणापासूनच मेहनत, चिकाटी, समायोजन या गुणांचे संस्कार होते. वडील पंधरा वर्षं गावचे सरपंच होते. सातही मुलींना त्यांनी शिकवले. उषाताई सातवीत असताना अचानक वडिलांचे निधन झाले आणि ही लेकरं पोरकी झाली. अशा वेळी अशिक्षित आईने कंबरेत पदर खोवला व मुलांच्या मागे ठामपणे उभी राहिली. तिने खूप मेहनतीने सर्व भावंडांना शिकवले. आज सर्व जण स्वतःच्या पायावर उभी आहेत. यामुळे आई ही आमची आईच नव्हती, तर पहिली गुरू बनली, असं उषाताई आवर्जून सांगतात.
मागील वर्षी या ठिकाणी बदली होऊन आल्यानंतर शाळेतील मुलांसाठी उपक्रमांची उषाताईंनी सुरुवात केली. या ठिकाणी मागील वर्षी पाच शिक्षक नवीन आले होते, त्यामुळे शाळेतील मुलांना कुठलीच गुणवत्ता व शैक्षणिक वातावरण नव्हते. उषाताईंनी हे वातावरण बदलले. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “यश नेहमी कष्टाच्या प्रमाणात बदलतं.” त्यांचे काही उपक्रम पुढीलप्रमाणे-
ब्रेन लॉकर : या उपक्रमात फळ्यावर एक परिच्छेद लिहून उषाताई याचे प्रकट वाचन करतात. यानंतर त्यांच्या मागोमाग मुले वाचतात. हे दोनदा वाचून होते. नंतर सांगा पाहू म्हणून आठवेल त्या शब्दाचा उच्चार विद्यार्थ्याने करून तो फलकावरील शब्द स्वतः दाखवायचा. अशा प्रकारे जो विद्यार्थी जास्त शब्दोच्चार लक्षात ठेवून तो शब्द अचूक दाखवेल तो विजयी घोषित केला जातो. संबंधित मुलांकडून तो शब्द पाच वेळा स्पेलिंग मागे- पुढे अशा प्रकारे वाचन घेतले जाते. रोज किमान १० वाक्यांचा परिच्छेद मुलांसमोर वाचनासाठी ठेवल्यामुळे हळूहळू मुलांचा सराव वाढला व यातून वाचनाची आवड, शब्दसंपत्तीत वाढ झाली.
माझी प्रश्नमालिका : याअंतर्गत कोणत्याही ५ अंकी तीन संख्या फळ्यावर दिल्या जातात, त्यापासून प्रश्न तयार करावयाचा सराव घेतला जातो. चढता-उतरता क्रम, लहान मोठी संख्या ओळखणे, बेरीज, वजाबाकी यावर आधारित प्रश्न मुले आपापल्या आकलनक्षमतेनुसार तयार करून आणतात. नंतर ते प्रश्न वर्गामध्ये सर्व मुलांकडून सोडवून घेतले जातात. यामुळे प्रश्ननिर्मिती कौशल्य विकसित झाले. बरोबरच गणितातील उदाहरणांचा सराव वाढल्यामुळे गणिताशी मुलांची मैत्री झाली.
कौन बनेगा पाढेपती : अमिताभच्या ‘कौन बनेगा करोडपती’ने सर्व अाबालवृद्धांना वेड लावले आहे. हाच धागा पकडून मुलांना पाढे पाठांतरासाठी हा उपक्रम सुरू केला. यात वर्गात किंवा मैदानावर गोलाकार उभे करून दोनपासून पाढे सुरू करून पाढा फिरता ठेवायचा. जसे की एक मुलगा बे एके बे म्हटला तर क्रमाने त्याच्या शेजारील मुलाने तो पाढा खंड न पडू देता सुरूच ठेवायचा. दोनचा संपला की न थांबता तीन, चार, पाच अशा रीतीने राउंड सुरू ठेवायचे. उच्चाराची एकच संधी. तीन सेकंदांत ज्या विद्यार्थ्याला सुचणार किंवा आठवणार नाही तो बाद होतो व बाहेर काढला जातो. अशा रीतीने २ ते ३०पर्यंत पाढे घेतले जातात. शेवटी तीनपेक्षा कमी मुले उरली तर पाढ्यांची गती वाढवली जाते व जो जिंकेल त्यास पाढेपतीचा टोप घातला जातो. या उपक्रमामुळे अचूकता, निर्णयक्षमता विकसन या गुणांची वाढ झाली.
स्वयंशासन : वर्षभरातील सहशालेय उपक्रमांची माहेनिहाय यादी तयार करून यात नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या यांचा समावेश असतो. या उपक्रमांतर्गत मुलांनीच सूत्रसंचालन, मनोगत व इतर बाबी करावयाच्या आहेत. भाषणासाठी मुले संदर्भ साहित्य चाळू लागली व परिपूर्ण माहिती काढून सर्वांसमक्ष भाषणे करू लागली. यामुळे सभाधीटपणासोबतच ज्ञानवृद्धी झाली. मुले नेत्यांच्या माहितीसाठी सखोल अभ्यास तर करूच लागली सोबतच टिपणंही काढू लागली. यामुळे नकळतच मुलांत स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हायला लागली.
उषाताईंनी मुलींचे लेझीमपथक तयार करून मुलींच्या उपजत कलागुणांना वाव मिळवून दिला आहे. या कामी गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकांसमवेतच पती हनुमंत केदार, मुलगा प्रणव व मुलगी दिशा यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभते.
जोडी तुझी-माझी
हा मनोरंजनात्मक उपक्रम असून यात वर्गातील मुलांचे बुद्धिमत्तेनुसार दोन गट केले जातात. नंतर गणितातील कुठल्या प्रकारच्या उदाहरणांचा सराव घ्यायचा हे ठरवतात. दोन्ही गटांतील प्रत्येक मुलाला संधी मिळावी म्हणून एक-एक विद्यार्थी समोर बोलावून एकाने उदाहरण द्यावे, तर दुस-याने ते सोडवायचे. उत्तर अचूक असल्यास त्यास गुण दिले जातात. नंतर दुसरी जोडी येते. याप्रमाणे सर्वांना समान संधी मिळते. समान संधीसोबतच वर्गातील अप्रगत मुलांना संधी मिळते व ती प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतात.