आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व काही विद्यार्थ्यांसाठीच !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक सारख्या महानगरात वाढलली रंजना व शशिकांत पाटलाची लाडकी मुलगी म्हणजे गौरी. लहानपणापासून इतरांपेक्षा वेगळे करण्याची आवड. गौरी हुशार होती. दहावी, बारावीला मेरिटमध्ये आलेली, बारावीनंतर इंजिनिअर व्हायचे होते, मात्र आजीची इच्छा होती व त्यामुळेच शिक्षकी पेशा स्वीकारला. हीच गौरी, गौरी मॅडम, आता जिथे जाईल तिथे उत्कृष्ट काम करत आहे. निफाड तालुक्यातील चांदोरी मुलांची शाळा या ठिकाणी सात वर्षांपासून नानाविध नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सर्वांगीण विकास साधत आहेत.
निफाड या तालुक्याच्या ठिकाणापासून १९ किमी अंतरावर वसलेले चांदोरी गाव. गाव राजकीय वारसा लाभलेले. गावात खासगी शिक्षण संस्था आहेतच तसेच उच्च माध्यमिक शिक्षण संस्था आहेत. आणि अशातच दोन मजली जि.प. शाळा. शाळेत ऊसतोडणी कामगारांची मुले, वीटभट्टीवर काम करणाऱ्यांची मुले, कोळी समाजाची मुले आहेत. पहिली ते चौथीतील १३० मुले ज्ञानार्जन करतात.

२००७ मध्ये गौरी मॅडम शाळेत रुजू झाल्या तेव्हा शाळेचे वातावरण एवढे चांगले नव्हते. ही मुले गरीब घरातून येत असल्यामुळे शारीरिक स्वच्छतेचा गंधच नव्हता. नोकरीच्या सुरुवातीच्या काळापासूनच त्यांना ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षण प्रक्रियेत नीरसता अथवा तोच तोपणा जाणवत होता. काही तरी बदल घडवून आणला पाहिजे यासाठी वरिष्ठ शिक्षकांसोबतच चर्चा केली. त्या सर्वांनी मला जे जे उपक्रम राबवायचे ते राबवा, असे सांगितले. माझा आत्मविश्वास वाढला व मी जोमाने कामाला लागले, असे त्या म्हणतात.

उपक्रम—
१) उपस्थितिदर्शक झाड— शासन नियमानुसार १००%पटनोंदणी, उपस्थिती टिकवणे अपेक्षित आहे. मात्र उपस्थिती टिकवणे सोपे काम नाही. कारण मुले खूप चंचल असतात. त्यांना मनासारखे वातावरण नाही मिळाले की ती शाळेत येतच नाहीत. यावर उपाय म्हणून मॅडमने या उपक्रमाची सुरुवात केली. यात वर्गात एका आंब्याच्या झाडाचे कटआउट लावले. वर्गात आठवडाभर उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा फोटो त्या झाडावरील आंब्यांना चिटकवला जातो व तो फलक सर्वांसमोर लावला जातो. या मुलांची चर्चा पूर्ण शाळेत होते. याचा परिणाम असा झाला की मुलांत स्पर्धा वाढली व यातून ते झाड फोटोंनी लगडले आहे.
२) टाकाऊतून नवनिर्मिती— विद्यार्थ्यांचा संग्रहप्रवृत्तीला वाव मिळावा यासाठी मुलांकडून टाकाऊ साहित्य गोळा केले. यात शंख, जुनी लेस, मणी, पेन्सिलचा सिललेला भाग, टिकल्या यातून आकर्षक भेट कार्ड, शिंपल्याच्या सौंदर्यकृती, पेन्सिलच्या छिललेल्या भागापासून कोलाजकाम याचे गावस्तरावर प्रदर्शन भरवून या साहित्याची विक्री केली. यामुळे मुलांत नकळत श्रमातून अर्थार्जन ही संकल्पना रुजवली.
३) विद्यार्थी साहित्य कोपरा— कृतीतून आनंद व आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी या उपक्रमात रक्षाबंधन या सणाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून ओवाळणी म्हणून शब्दकार्ड तयार करून घेतले. यातून मुलांच्या नवनिर्मिती कौशल्याला उभारी मिळाली. मुलांनी नवनवीन साहित्य तयार करून स्वतःचा कोपरा तयार केला.
४) टाइमपास कोपरा— शाळेत मध्यांतरादरम्यान मुले खूप गोंधळ, धिंगाणा घालतात व भांडणे आणतात. यावर उपाय म्हणून टाइमपास कोपरा सुरू केला. यात एक छोटी वाचनपेटी ठेवण्यात आली. तिच्यात अनेकविध गोष्टींची, चित्रकथांची पुस्तके, वाचन कार्ड, फ्लॅश कार्ड, शैक्षणिक कॅलेंडर, चित्रकोडे, काॅन्संट्रेशन गेम, व बालमित्र वाचन फाइल ठेवली. याचा फायदा असा झाला की, मुले या मध्यांतरादरम्यान ही वाचनपेटी हाताळू लागली. यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड तर लागलीच, सोबतच स्वयंप्रेरणेने कविता, गोष्टी लिहाव्याशा वाटू लागल्या.
५) सर्व काही कार्यानुभव— मुलांचा सर्वात आवडता विषय कार्यानुभव, कारण यात त्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळतो. हाच धागा पकडून छोटा भीम, बालगणेश, डोरेमॉन या मुलांच्या आवडत्या कार्टूनचे पपेट्स तयार करून याद्वारे भाषा, गणित, इंग्रजी या विषयाच्या सूचना मुलांना शिकवणे सुरू केले. मुले आनंदाने आपल्या आवडत्या कार्टूनच्या सूचनांची अंमलबजावणी करू लागली. यासोबतच चिकटकाम, नक्षीकाम करून विविध विषयातील प्रकल्प पूर्ण करू लागली.
६) प्रदर्शनीय फलक— शाळेतील प्रत्येक मुलात वेगवेगळे गुण असतात, मात्र बरीचशी मुले भीतीपोटी पुढे येत नाहीत किंवा लाजाळू असतात. यासाठी वर्गात प्रदर्शनीय फलक लावले. यात ‘माझी कला,’ ‘सामान्यज्ञान,’ ‘माहिती सांगा,’ ‘संख्यावाचन,’ ‘चित्रवर्णन,’ अशा प्रकारचे फलक लावले. याची जबाबदारी गटप्रमुखाकडे सोपवण्यात आली. मुले स्वतःहून ही माहिती बदलू लागली, अबोल मुले हिरीरीने सहभागी झाल्यामुळे वर्गाध्यापनात मदत झालीच, सोबतच मुलांच्या मनातील न्यूनगंड दूर झाले.
७) मी परीक्षक— शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आनंददायी व दडपणमुक्त वातावरणात परीक्षा घेणे बंधनकारक आहे. यासाठी स्वयंमूल्यमापन भाषा व गणित या उपक्रमाची सुरुवात केली. यात १० प्रश्नाचे बंच करून एका पेटीत टाकायचे. मुलांनी कुठलाही बंच काढून तो सोडवायचा. यामुळे जे जे प्रश्न मुलांना सोडवता येत ते ती सोडवू लागली व यातून परीक्षेची भीती दूर झाली.
आनंददायी शिक्षणासाठी शाळा व्यवस्थापन समिती, गावकरी, मुख्याध्यापिका व सर्व सहकारी शिक्षिका मदत करतात.
बातम्या आणखी आहेत...