आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुले व्यक्त होऊ लागली...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मिता विनोद गालफाडे
नॊकरी- जि. प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय. आसगाव,
ता. पवनी. जि. भंडारा


नोकरीसाठी मिळालेलं गाव हे बहुतांश शिक्षिकांसाठी एक मोठं आव्हान असतं. शिक्षणाविरोधात असलेले गावकरी, तिसऱ्याच गावातून आलेल्या शिक्षकांसमोर मोकळी न होणारी मुले आणि महिला म्हणून त्रास देणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीची माणसं या अडचणी स्मिताताईंसमोरही होत्या. पण ताईंनी मुलं हीच संपत्ती मानत त्यांना विविध उपक्रमांतून बहरण्यास, फुलण्यास मदत केली.
१९९७ ला नागपूरहून स्मिताताईंची भंडारा जिल्हा परिषदेत बदली झाली. सानगडी नावाच्या गावात रुजू झाल्या. चार भींतींच्या बाहेरचं जग फार भयावह होतं. नागपूरपासून १३० किमी दूर हे गाव. रोज जाणे येणे शक्यच नव्हते. पहिलीतल्या आदित्यला पतीकडे सोडून दर आठवड्याला नोकरीच्या गावात यायचं. फक्त एक दिवस मुलासोबत घालवायचा. माय आणि बाप अशा दोन्ही भूमिका सरांनी पेलल्या. शाळेतले वातावरण फारसे ठीक नव्हते. बाई बाहेर नॊकरी करते म्हणजे घरं दुभंगली असतील, या शंकेने लोक पाहायचे. सलगी करायचा प्रयत्न करायचे. यंत्रणा मुद्दाम छळायची. खूप विभागांचे काम करून ताई सक्षम झाल्या होत्या. त्याच एकांतात लिखाणाकडे मन वळवले. लिहायला लागल्या. अनेक लेख प्रकाशित झाले. मुलांची नाटकं, गाणी गावात गाजली. त्यानंतर त्या भंडारा येथील लालबहाद्दूर शास्त्री या प्रसिद्ध शाळेत रुजू झाल्या. ५५-६० लोकांचा स्टाफ, अडीच हजार विद्यार्थी. ताईंचे डोळे दिपून गेले. बारा वर्षं या शाळेत राहिल्या. या शाळेने अनेक सन्मान तर मिळवून दिलेच, सोबतच विद्यार्थ्यांशी अतूट अशी नाती बांधली गेली. ताईंचं आयुष्यच संघर्षमयी. जिथे जातील तिथे संघर्ष. या शाळेतही संघर्ष होताच. बाहेरच्या जिल्ह्यातली कोणीतरी येते आणि प्रस्थापितांना हादरा देते म्हणजे काय? नुकसान सहन करावं लागलं. धमक्या मिळायला लागल्या. मात्र मुलांसाठी राबणे ताईंना बळ देत गेले. शाळेत ताईंचा होणारा अपमान मुलं घरी जाऊन सांगायची. पालक पाठीशी उभे राहिले. ती मुलंच आज ताईंची संपत्ती. मोठमोठ्या पदावर गेली, पण ताईंना विसरली नाहीत.

२०१२मध्ये आसगावातील शाळेने ताईंना निमंत्रण दिले. भंडाऱ्यापासून ६० किमी लांब. रीतसर बदली झाल्यावर एक झपाटलेपण घेऊन त्या गावात गेल्या. पवनी तालुक्यातले ४५०० लोकवस्तीचे ते गाव. पण शाळेत १२०० मुलं. कनिष्ठ महाविद्यालय पण सोबत. तेवढ्याच निष्ठेने काम सुरू झाले. सुरुवातीला राष्ट्रगीत ऐकायला अख्खे गाव गर्दी करायचे. गरीब, तळागाळातली मुलं मंचावर यायला लागली. सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्यायला सुरुवात केली. मुलांना आकाशवाणीवर नेले. स्थानिक बोलीतून कथाकथन सुरू केले. उन्हाळी शिबिरे, कॅन्सर शिबिर, रक्तगट तपासणी शिबिर, हस्तलिखिते, भित्तिपत्रके प्रकाशित झाली. मुलांमध्ये चैतन्य आले.

बस आली आमच्या गावा
किशोरी मंचाची जबाबदारी स्मिता ताईंकडे आली. मुलींची मुख्य समस्या बसची. काही गावात तर बसच नाही. महामंडळाकडे पत्रव्यवहार झाले, रस्ते खराब म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खेटा झाल्या. बांधकाम विभाग, आमदार, विभागीय नियंत्रक, कलेक्टर सगळ्यांकडे चकरा मारल्या. त्याच प्रयत्नांतून सार्वजनिक बांधकाम विभागाने १० किमीचा रस्ता दुरुस्त करून दिला.एस. टी. महामंडळाने तीन बस सुरू केल्या. आसगावच नव्हे; उमरी, बोरगाव मांगली, इसापूर, पवना, इटाण अशा आठ गावांना पहिल्यांदाच बस दिसली. प्रत्येक गावात बसचे स्वागत झाले. मुलींची आणि नागरिकांचीही सोय झाली.

पण मुलींचे शिक्षण कठीण वाटावे, असे आक्रितही घडले. ११ वीच्या एका मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या झाली. ताईंना धक्का बसला. एवढे समुपदेशन करूनही असे कसे घडले, या विचाराने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. बाहेरच्या जगाचे प्रलोभन, पालकांचे दुर्लक्ष, कोणाचेच पाठबळ नाही, दारूत बुडालेले घर अशी अनेक कारणे अभ्यासली. सरपंच, पोलिसपाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, काही पालक आणि आजूबाजूच्या शाळांमधील शिक्षिकांना घेऊन ‘गर्ल्स एजुकेशन सपोर्ट सिस्टीम’ स्थापन केली. या ठिकाणी मुली मोकळ्या होऊ लागल्या.
पुढील स्लाइड्सवर वाचा, उर्वरित लेख