आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रमिक शिक्षणाव्यतिरिक्त खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रशिक्षण, उपक्रमशील प्रयोगांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी ग्रामीण पातळीपर्यंतचे शिक्षक तळमळीनं राबत आहेत. नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनाच्या औचित्यानं, या अंकातील विशेष लेख अशाच शिक्षकांच्या कष्टाला समर्पित.
व याच्या दहाव्या वर्षी शाळेत मल्लखांबाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आलेल्या प्रशिक्षकांना तिनं पाहिलं. त्यांनी दाखवलेली सगळी प्रात्यक्षिकं तिनं हुबेहूब करून दाखवली. आणि त्या क्षणापासूनच मल्लखांब शिकण्याची ओढ तिच्या मनाला लागली. पण तिच्या या जिद्दीला अडसर होता तो ग्रामीण-पारंपरिक विचारसरणीचा. या प्रसंगी पुढाकार घेतला तो तिच्या वडिलांनी. आपल्या मुलीनं मल्लखांबात तरबेज व्हावं, म्हणून ते तिच्या पाठीशी उभे राहिले. आणि त्यानंतर तिचं अवघं विश्वच बदलून गेलं. या साहसी क्रीडा प्रकारात स्वत: तरबेज झाल्यानंतर गावातल्या मुलींना मल्लखांब शिकवण्याचं शिवधनुष्य जिने लीलया पेललं ती आहे, माया पवार-मोहिते. ज्या गावात महिलांना डोक्यावरचा पदर ढळू देण्याचीही परवानगी नाही, अशा गावात अध्यापनासोबत मुलींना विनामोबदला मल्लखांब शिकवण्याची हिंमत दाखवणाऱ्या मायाताईंच्या सात महिला खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे.

सातारा जिल्ह्यातील मस्तरवाडी या छोट्याशा गावात जन्मलेल्या मायाताईंचे वडील विनायकराव शिक्षक, तर आई पवित्रा अंगणवाडी शिक्षिका. चार बहिणी व एक भाऊ अशा परिवारात वाढलेली माया लहानपणापासून चाणाक्ष, चपळ व अवखळ होती. झाडावर, डोंगरावर न घाबरता जायची. पाचवी जिल्हास्तरीय स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावला. तेव्हाच वडिलांनी ठरवले की, मायाला मल्लखांबातच करिअरसाठी प्रोत्साहन द्यायचे. वडील आधुनिक विचारसरणीचे असले तरी गावातील मंडळी त्यांना मुलीवरून उपरोधात्मक टोमणे मारायची. मात्र वडिलांनी पक्के ठरविले की, मुलीने मल्लखांब खेळायचेच. नंतर ही भांवडे सातारा शहरात शिक्षणासाठी आली. इथे भिडे गुरुजी व्यायामशाळेत सुजित शेडगे व दीपक देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले.

चिवटपणा वाढवणारा खेळ
हा खेळ गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने खेळला जातो. त्यामुळे चिवटपणा, ताकद, धाडस, आत्मविश्वास, निर्णयक्षमता, लवचिकता या गुणांसह विद्यार्थ्यात जास्त वेळ काम करण्याची क्षमता विकसित होते. मल्लखांब खेळणारी मुलंं शालेय स्पर्धेव्यतिरिक्त इतर स्पर्धामध्येही प्रथम येतात, कारण या खेळामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो. मायाताईंच्या व्यायामशाळेतील मुलींनी राष्ट्रीय पातळीवर ३६ सुवर्ण पदके, तीन रौप्य, एक कांस्य पदक पटकावले आहे. थायलंड येथे जाऊनही काही मुलींनी योगाभ्यास व मल्लखांबाचे शिक्षण दिलेय. या यशात गावकऱ्यांचाही वाटा असल्याचं ताई आवर्जून नमूद करतात.
उपक्रम :
योगासन स्पर्धा
परिसरातील शाळांमध्ये जाऊन ताई मुलांना योगासनाबाबत मार्गदर्शन करते. शिवाय कारी येथे महाराष्ट्रीय सणांनिमित्त स्पर्धाही आयोजित केल्या जातात. यातून मुलांना शरीरसंपदेचे महत्त्व वाटते व बक्षीसही मिळते.
गौरी सजावट स्पर्धा
गौरी गणपती काळात महिलांनी गौरीसमोर केलेली सजावट; यात फुलोरा, रांगोळी यांची पाहणी मुलींमार्फत केली जाते व विजेत्या महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात येते. गणेशोत्सवाच्या काळात योगासने व मल्लखांबाची प्रात्यक्षिकेदेखील मुले करतात.
मल्लखांबाची दोरी बनविणे
मल्लखांबाची दोरी बनविणे खूप मोठे जिकिरीचे व मेहनतीचे काम आहे. आपण ज्याप्रमाणे विजारीत नाडा घालतो, त्याच पद्धतीने ही दोरी सूत ओढून ओढून बनवावी लागते. याच्या वरच्या भागाला ‘नवार’ असे म्हणतात. यातूनच एक एक सूत ओढून अशा प्रकारची मजबूत दोरी ताईच्या मुली अवघ्या दोन तासांत बनवितात व यापासून मिळणारे उत्पन्न संस्थेसाठी खर्च करतात.
डीएडनंतर १९९९मध्ये सातारा शहरापासून १५ किमी दूर सज्जनगडाच्या पायथ्याशी वसलेल्या कारी या ठिकाणी शिक्षिका म्हणून नियुक्ती मिळाली. गावची लोकसंख्या जेमतेम २०००; मात्र गावात गटातटाचं राजकारण व सारखे वाद असायचे. इथली शाळा तशी बहुशिक्षकी होती, मात्र शैक्षणिक वातावरण नव्हते. ताईने शाळेत मल्लखांबाची प्रात्यक्षिके मुलांसमोर करून दाखविली, मुलांना ती खूप आवडली. गावात चर्चा झाली. मग हळूहळू गावातील लहान मुली मल्लखांब खेळू लागल्या. पण याच मुली सातवीत गेल्यावर त्या मोठ्या दिसतात व कमी कपड्यांवर त्या खेळू शकत नाहीत, असा पवित्रा पालकांनी घेतला. हा विरोध दिवसेंदिवस वाढतच होता. ताईला वाटलं, आता आपलं काम थांबवावं लागेल. पण बालपणापासून कठीण परिश्रम व अडचणींवर मात करण्याचा पिंड असल्यामुळे ती या मुलींच्या मातांकडे गेली. त्यांना एकत्र बसवून सांगितले की, तुम्ही शेतात भात लागवड करताना तुमचे कपडे पण गुडघ्यावर असतात, मग या मुलींनी फक्त सरावापुरतेच मल्लखांबाचे कपडे घातल्यास काय बिघडते? असं समजावून सांगितल्यावर विरोध मावळला. शाळेच्या आवारातील स्टेज व त्या जवळचे भलेमोठे वडाचे झाड, तीन दोरी मल्लखांब, सात गाद्या, एक लाकडी मल्लखांब जमिनीत पुरलेला हे सगळे साहित्य भेटवस्तू म्हणून मिळालेले. अशी उघड्यावरची व्यायामशाळा शाळेत मोठ्या उत्साहाने सुरू झाली. अशा मोजक्या साहित्यात दररोज किमान ५० विद्यार्थी नियमित सराव करतात. मल्लखांबाच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी संस्थेची नोंदणी असणे गरजेचे असते. शेजारील गावच्या, हायस्कूल व कारी शाळेतील मुलीही यात सहभाग घेत असत. यामुळे नोंदणी करून सतरा वर्षांपूर्वी ‘कारी मल्लखांब संघ कारी’ या संस्थेची सुरुवात केली. आजही या संस्थेला शासनाचे कसलेही अनुदान नाही. केवळ काही देणगीदार व मुलांनी बक्षीस म्हणून मिळविलेल्या रकमेतून मुलींचे गणवेश, पूरक पोषण आहार, दुखापतीवर उपचार हे खर्च भागवले जातात. १९९९ ते २००८ पावेतो ताई कारी गावातच शिक्षिका म्हणून होती. शाळा सुटल्यानंतर ताई दररोज सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळात मुलांना व्यायामशाळेत मल्लखांबाचे धडे देत असे. आज ताईची बदली दुर्गम अशा पळसावडे गावात झाली आहे, तरीपण दररोज या वेळेत कारी येथे येऊन ती सराव घेते. या संस्थेचा कारभार सर्व ज्येष्ठ मुलेच बघतात. २००३मध्ये ताईने ठरवून विश्वतेज मोहिते या मल्लखांबपटूशीच लग्न केले. कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, मला या क्षेत्रात मुलांसाठी खूप काम करायचे होते. विशेष बाब म्हणजे, त्यांचे पती सातारा शहरात मोफत मल्लखांब व्यायामशाळा चालवतात. आणखी आनंदाची बाब म्हणजे, दोघांनाही एकाच वर्षी ‘शिवछत्रपती पुरस्कार’ मिळालेला आहे. रणवीर व रुद्रप्रताप ही दोन मुलेही आईवडिलांना सहकार्य करतात.
santoshmusle1515@gmail.com
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज
बातम्या आणखी आहेत...