आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santosh Musale Article About Teacher Alka Thakre, Chandrapur

ज्ञानमयी द‍िशादर्शक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या तालुक्याच्या ठिकाणापासून तीस किमीवर असणारे तिरवंजा हे आठशे लोकवस्तीचे, कोळशाच्या खाणीजवळ वसलेले पूर्णत: मजूरवर्गाचे गाव. तीन वर्षांपूर्वी गावात शैक्षणिक वातावरण अजिबात नव्हते. गावातील मुले शिकायला दुसऱ्या गावात जायची. या ठिकाणी तीन वर्षांपूर्वी अलका ठाकरे मुख्याध्यापिका म्हणून आल्या आणि शाळेचा चेहरामोहराच बदलला. आजमितीस संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक पावली आहे.

सामाजिक कार्यासाठी जीव ओतून काम करणारे याच जिल्ह्यातील बल्लारशा या गावात पेशाने पोस्टमास्तर असणारे भाऊराव जेऊरकर यांची ही कन्या. तीन भाऊ व दोन बहिणी. बालपणातच वडिलांकडून सामाजिक कार्याची प्रेरणा सदोदित मिळायची. प्राथमिक शिक्षण बल्लारशातच झाले. वडिलांची बदली चंद्रपुरात झाल्यामुळे सर्व कुटुंब चंद्रपूरला राहायला आले. येथील एस.ई.एस. मुलींच्या शाळेतल्या पाटील मॅडम खूप प्रेमळ ‌व शिस्तप्रिय होत्या. का कुणास ठाऊक पाटील मॅडमकडे पाहून मलाही भविष्यात शिक्षिकाच व्हावे असे वाटे, असे ठाकरे मॅडम आ‌‌वर्जून सांगतात. पाचवीतच ज्या मुली अप्रगत म्हणजे कमी हुशार होत्या, त्यांना मधल्या सुटीत अलका शिकवायची.

तिरवंजा गावात प्रवेशताच सर्व सुविधायुक्त शाळेचा परिसर नजरेस पडतो. खेळासाठीचे प्रशस्त मैदान, कुठेही घाण नाही, कचरा नाही. प्रत्येक शिक्षक आपापल्या वर्गात मुलांना कृतियुक्त अध्यापनाद्वारे ‘ज्ञानरचनावाद’ त्यांच्यात रुजविताना दिसतो. मात्र, ठाकरे मॅडम येण्याअगोदर अर्धवट बांधकाम करून सोडून दिलेल्या वर्गखोल्या होत्या, त्यातच जागेच्या वादाबद्दल सरपंचावर गुन्हा दाखल होता. गावातील पुरुष भल्या पहाटेच मजुरीच्या निमित्ताने गावाबाहेर पडायचे. या ठिकाणी काय करता येईल, यासाठी प्रथम शिक्षकांसमवेत चर्चा केली व त्यातून गावची पार्श्वभूमी, विद्यार्थ्यांची मानसकिता जाणून घेतली. एक मार्चला रुजू झालेल्या ठाकरे मॅडमसाठी ८ मार्च हा महिला दिन अविस्मरणीय ठरून गेला. त्यांनी मुलांद्वारे प्रत्येकाच्या आईस शाळेत बोलावून घेतले. शाळेच्या अडीअडचणी सांगितल्या, अर्ध‌वट अवस्थेत असणाऱ्या वर्गखोल्यांसाठी निधीची कमतरता सांगितली.

जमलेल्या महिलांकडे लोकसहभागाची मागणी केली. काबाडकष्ट करणाऱ्या या मायमाउल्यांनी तत्काळ तीन लाखांची आर्थिक मदत देऊ केली. किचनशेड व मंदिरात शिकायला बसणारी मुले वर्गात जाऊन शिकवीत, हीच यामागची भूमिका होती. मात्र, समस्या इथेच संपली नाही. जाड कातडी घेऊन झोपेच्या सोंगात असणारे प्रशासन त्यांना त्रास द्यायले लागले. मात्र, सासरकडील सर्व मंडळी ठाम त्यांच्यामागे उभी राहिली. थोड्याच दिवसांत खोलीचे बांधकाम पूर्ण झाले व मुले वर्गात बसायला लागली.

आज पहिली ते आठ‌वी वर्ग, पाच वर्गखोल्या व सहा शिक्षिका आहेत, १०७ मुले आहेत. गावाजवळच्या कोळसा खाणींमुळे या मुलांत शिक्षणाविषयी आपुलकीची कमतरता होती, यासाठी उपक्रमांची निवड झाली. मात्र परत पैशाची अडचण आली. शाळेत कुठल्याच भौतिक सोयीसुविधा नव्हत्या. या वेळी सर्व शिक्षिकांनी स्वत:चे पैसे जमा केले त्यासोबतच गावातून लोकवर्गणी जमा केली. गावकऱ्यांनी अजून दोन लाख रुपये मदत केली. यातून शाळेला संगणक, रंगरंगोटी, ध्वनिव्यवस्था यांसह अनेक उपयोगी साहित्य खरेदी करता आले. नकळत आता आमच्यावर दबाव यायला लागला तो गुणवत्तेचा, असे ठाकरे मॅडम सांगतात. आता या स‌र्वजणी कामाला लागल्या.

आदर्श परिपाठ - दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो यासाठी आदर्श परिपाठ कसा असावा याचा विचार केला. परिपाठात दहा गाभाभूत घटकांव्यतिरिक्त व परिपाठांतर्गत येणारे मुद्दे होतेच. पहिली ते चौथी व पाचवी ते आठ‌वी असे दोन गट करून एका बॉक्समध्ये विविध मुद्द्यांच्या चिठ्ठ्या टाकणे, त्यानुसार मुलांना बोलावणे व त्यास चिठ्ठी काढावयास सांगून त्यात १० वस्तूंची नावे, १० गावांची नावे, अभ्यासक्रमावर आधारित १० प्रश्न असायचे. यातून मुले अभ्यास करायला लागली. लहान मुलांना चार फुलांची, फळांची, भाज्यांची, वस्तंूची नावे विचारून त्यांनादेखील कृतिप्रवण ठेवले.

श्रुतलेखन व वाचन लेखन प्रकल्प - जून २०१२मध्ये मुलांना प्रगत करण्यासाठी वाचन लेखन प्रकल्पाची अंमलबजावणी या शाळेने केली. शाळा भरण्याच्या अगोदर अर्धा तास मुलांना मूलभूत संकल्पना शिक्षिका समजावून सांगत. हा उपक्रम संपूर्ण ‌‌वर्षभर त्यांनी राबविला. त्यासोबतच श्रुतलेखनाच्या माध्यमातून मुलांना मराठी व्याकरण‌‌विषयक नियम, हस्ताक्षर सुधारण्यास मदत झाली. यासोबत मॅडमनी रोज १० मिनिटे वक्तृत्व विकसनाविषयी मार्गदर्शन केले. यातून मागच्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत चौथीत शिकणाऱ्या श्रुती रमेश ताजणेने प्रथम क्रमांक पटकावला. नंतर याच मुलीने चंद्रपुरात दोन हजार महाविद्यालयीन मुलांपुढे वक्तृत्व कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले.

उन्हाळी मार्गदर्शन शिबिर - एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा संपल्यानंतर शिक्षक निकालात मग्न असतात व मुले शाळेत धिंगाणा घालतात. या मुलांसाठी उन्हाळी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. याद्वारे कथाकथन स्पर्धा, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनविणे, आदी त्यांना शिकवण्यात आले. योगासने, नृत्य, शाळेत तयार केलेल्या साहित्याचे प्रदर्शन भरवून गावातील लोकांना याची इत्थंभूत माहिती विद्यार्थ्यांमार्फत करून दिली जाते. यामुळे शाळा-शिक्षक-विद्यार्थी-पालक हे नाते घट्ट झाले आहे. आणि मुख्य म्हणजे मुले क्रियाशील व सर्जनशील झाली.

शाळा म्हणजे मज्जाच मज्जा - वर्षभरात येणारे सर्व धार्मिक उत्सव, त्यासोबतच्या राष्ट्रीय सणास दिवसभर मुलांकडून नाट्यीकरण, उत्सवामागील भूमिका, त्याचे फायदे यावर चर्चा करून सांस्कृतिक ठेवा अबाधित ठेवला जातो. ठाकरे मॅडमनी शाळेतच परसबाग तयार करून विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केलेली आहे, ज्यांचा उपयोग शालेय पोषण आहारात होतो.
आकाशवाणीवर विद्यार्थी - चंद्रपूर आकाशवाणी केंद्रावर नोव्हेंबरमध्ये दोनदा या शाळेतील मुलांनी अलका ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडले. तेरा मुलांनी एक तास प्रार्थना, दनिविशेष, मूल्यसंस्कार, पर्यावरणाचे, आहाराचे महत्त्व आकाशवाणीवरून सांगितले. तर पाच मुलींनी बोधकथा सांगितल्या. यामुळे मुलांचा आत्मविश्वास दुणावला. त्यासोबतच खेड्यातील मुले प्रथमच प्रसिद्धिमाध्यमांपुढे आल्यामुळे आनंदित दिसली.लोकसहभागातून शाळेतच ‘वाचनकुटी’ तयार केली असून दुपारच्या मधल्या सुटीत मुले या ठिकाणी विविध वर्तमानपत्रे, शैक्षणिक मासिके आ‌वडीने वाचतात.

मुलींचे बँडपथक - तिसरी ते आठ‌वीतील मुलींचे बँडपथक असून यात बारा मुली आहेत. शाळेत विविध समारंभांत, पथसंचलनात, लेझीम स्पर्धेत, रॅलीमध्ये या मुलींचे पथक असते. हे गाव पावसाळ्यात संपर्कक्षेत्राच्या बाहेर असते. मोठमोठे नाले असल्यामुळे शाळेत जाण्यासाठी अडचणी येतात. अशा वेळी वातावरणाचा अंदाज घेऊन या शाळेतील सर्व शिक्षिका आठ-आठ दिवस गावातच मुक्काम करतात व शाळा बंद पडू देत नाहीत.