आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दु:ख, गरिबी, अडचणी यांचा फार विचार न करता आपल्या अंगी सदैव सकारात्मकता ठेवायची, ही प्रेरणा ज्योतीताईंना आईने दिली. हीच शिकवण त्या आपल्या मुलांत उतरवताना दिसतात.
विद्यार्थी थोडे चंचल होते. त्यांना प्रेमाने शांत केले. चांगल्या सवयी लावून नवनिर्मिती करण्यास उत्तेजन दिले. पालकांच्या मनात विश्वास निर्माण करून हजेरीपट वाढवला आणि टिकवलाही.
२०१० पासून शिक्षणाचा अधिकार हा कायदा देशभर लागू झाला आणि शिक्षणक्षेत्रात नवक्रांतीची सुरुवात झाली. तांडे, वाड्या, वस्त्या, गावोगावी शिक्षणाची गंगोत्री पोहोचली. या कायद्यातील ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीचा वापर अनेक शिक्षक करताना दिसतात. याही पुढे जाऊन पाठ्यघटकांशी निगडित व सहजतेने करता येतील, असे नावीन्यपूर्ण उपक्रम दररोज राबवणारी ठाणे जिल्ह्यातील ज्योती बेलवले म्हणजे उपक्रमीच.
पालघर तालुक्यातील बोईसर येथे तिचा जन्म झाला. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले. चार भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आई मीना शिवराम संखे यांच्यावर. या चारही भावंडांत ज्योती चुणचुणीत व हुशार होती. उपजीविकेचे कुठलेही साहित्य उपलब्ध नसताना आईसमवेत ही चारही भावंडे इतर गावोगाव फिरत. ज्या गावात जातील तेथील शाळेत शिकत. वह्या-पुस्तकांसाठी पैसे नसत. वर्गमित्रांची पुस्तके घेऊन तिने शिक्षण पूर्ण केले. आईने छोटेसे किराणा दुकान टाकले होते, तेथेही ज्योती शाळा सुटल्यानंतर दररोज बसायची.
दु:ख, गरिबी, अडीअडचणी यांचा फार विचार न करता आपल्या अंगी सकारात्मकता व परोपकाराची वृत्ती सदैव अंगी ठेवायची, ही प्रेरणा तिला आईने दिली होती. हीच शिकवण ती दररोज आपल्या मुलांत उतरवताना दिसते. लग्नानंतर पती दीपक यांनी तिला मोलाची साथ दिली. शाळेतील मुले ही आपलीच मुले आहेत आणि त्यांना योग्य शिकवण द्यायला हवी, ही त्यांची भूमिका आहे.
सध्या ताई केवणीदिवे येथे नोकरीस आहे. हे ठाण्यापासून १२ किमी अंतरावर आहे. खाडीकिनारी वसलेली केवणी व दिवे अशी दोन गावे. दोन्ही गावांच्या स्वतंत्र ग्रामपंचायती, परंतु शाळा एक. शाळेचा पट ४४२. शिक्षकसंख्या १२. गेल्या वर्षी लोकसहभागातून रंगरंगोटी केली. गावातील लोकांचे सहकार्य चांगले. शिक्षणाप्रती आवड आहे. शाळेत येणारी मुले ९५% आगरी समाजातील.
ताईने उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक वातावरण निर्माण केले. विविध कलागुणांना वाव दिला. पालकांमध्ये विश्वास निर्माण करून इंग्रजी माध्यमाचे आकर्षण कमी करून पट टिकवला व वाढवला. विद्यार्थी थोडे चंचल होते. त्यांना प्रेमाने शांत केले. चांगल्या सवयी लावून नवनिर्मिती करण्यास उत्तेजन दिले.
उपक्रम
Acrostic : दहावी-बारावीत इंग्रजी विषयात नापास होणारी मुले जास्त दिसतात. याला विविध कारणे आहेत. पण त्यातील एक म्हणजे, प्राथमिक स्तरावर इंग्रजी हा विषय मराठीतून शिकवला जातो. ती एक स्वतंत्र भाषा असून तिची उच्चारपद्धती वेगळी असते, हे भिनवण्याचे काम या उपक्रमाच्या माध्यमातून ताई करतेय. Acrostic म्हणजे अशी कविता किंवा लिखाण, ज्यात एखादा शब्द वा संकल्पनेतील आद्याक्षरे वाक्याच्या सुरुवातीला घेतलेली आहेत. उदा. Moon - Moving and shining across the sky, On the land it shines, On the sea it sparkle, Night after night.
अशाच तऱ्हेने वर्गातील मुलांनी मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही विषयांचे केलेले स्वलेखन कौतुकास्पद आहे. यातूनच मुलांना लेखन कसे करावे, शब्द कसा निवडावा, वर्णाक्षरांवरून लेखन कसे करावे, याची जाण आली. नमुनालेखन करतानादेखील मुलांकडूनच शब्द घेऊन, त्यांची मदत घेऊन हा उपक्रम राबविला.
चौकोन रचना
सहावी ते आठवीच्या मुलांना भौमितिक आकृत्या शिकवताना त्या मुलांना चिरकाल स्मरणात राहाव्या, यासाठी या उपक्रमाची सुरुवात केली. यात ताईने पुठ्ठ्याच्या चार पट्ट्या घेतल्या. त्या एकमेकांना टाचणीच्या साह्याने जोडून चौकोन तयार केला. आता चौकोनाच्या विरुद्ध टोकांवर भार दिला असता चौकोनाचा आकार बदलतो. याप्रमाणे त्याच बाजू असणारे पण वेगळे कोन असणारे आणखी अनेक वेगवेगळे चौकोन मिळतात. यावरून हे लक्षात येते की, चौकोनाच्या फक्त चार बाजू दिल्या असता निश्चित असा एकच चौकोन मिळत नाही. जर कर्ण काढला तर चौकोनाचा आकार बदलण्याचा प्रयत्न केला तरी चौकोनाचा आकार बदलू शकत नाही. यावरून चौकोन रचना करण्यासाठी विशिष्ट असे पाच घटक देणे आवश्यक असते. ही कृती मुलांनी स्वतः केली व त्यांच्या शब्दांत अनुमान काढले. ताईने फक्त सूचना देऊन तशी कृती करायला सांगितले.
Playing With Cards
आपल्याकडे आजही कुणी पत्ते खेळायला लागले की, समाज त्यांना दूषणे देतो व नियमानुसार यावर पोलिस कारवाई करू शकतात. मात्र ताईने याच पत्त्यांना कागद लावून त्यावर दोन्ही बाजूने घरी इंग्रजीतील नवीन (अपरिचित) शब्द मुलांना लिहायला सांगितले. नंतर ते पत्ते गोळा करून त्यांचे सहा सहा कार्डचे भाग केले व मुलांना ती कार्डं इंग्रजी वर्णानुक्रमानुसार लावायला सांगितले. नंतर विद्यार्थ्यांना alphabetical orderनुसार लावलेले शब्द शब्दकोशात शोधायला सांगून त्याचे प्रकट वाचन व मराठी अर्थ जाणून घ्यायला सांगितले. त्याच शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करायला सांगितले. या कार्डपासून नवीन शब्दांसाठी इंग्रजी वर्तमानपत्रे, वरच्या इयत्तेतील पुस्तकांचा वापर विद्यार्थ्यांनी केला. कृतीयुक्त सहभागामुळे मुले आनंदी होती व शिकलीही.
अक्षरांची अदलाबदल
अक्षरांची अदलाबदल करून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करणे, या उपक्रमात एक spelling देऊन त्यातील अक्षरांची अदलाबदल करून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करण्यास सांगितले. त्यांना मदत म्हणून मराठीतून अर्थ सांगण्यात आला. परंतु गंमत म्हणजे नंतर मुलं म्हणाली, मराठी अर्थ देऊ नका व spellingदेखील देऊ नका. आम्ही स्वतः असे वेगवेगळे शब्द घरून तयार करून आणतो.
मैत्री अक्षरलेखन कलेशी आणि स्वच्छता गीत
या उपक्रमात एक चित्रकलेची मोठी वही आणली. ती रोज मधल्या सुट्टीत टेबलावर ठेवत असे. डबा खाऊन झाल्यावर वर्गातील कुणीही, ज्यांना आवडच नव्हे तर इच्छाही असेल, त्यांनी कोणत्याही प्रकारचे फक्त अक्षरलेखनच करावे, अशी सूचना दिली. अक्षरलेखन कसे करावे, त्यातील बारकावे उदाहरण देऊन व चित्रांचे नमुने दाखवून स्पष्ट केले. मुले अक्षरलेखन नमुने शोधण्यासाठी वर्तमानपत्रं, दुकानांच्या पाट्या, मोबाइलची गॅलरी, इतर पुस्तके इ.चे निरीक्षण करून अक्षरलेखन करू लागली. आठवडाभरातच मुले स्वतःची कल्पकता वापरून अक्षरलेखन करू लागली. या बरोबरच ताईने स्वच्छता गीत रचून मुलांमध्ये स्वच्छतेची आवडही निर्माण केली आहे.
आपल्या या उपक्रमी राहण्याचे श्रेय ताई शाळा व्यवस्थापन समिती, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सहशिक्षक व कृतिशील शिक्षक महाराष्ट्र फोरमचे विक्रम अडसूळ यांना देते.
खेळ गावाकडचे
इयत्ता आठवीच्या मराठी विषयात ‘खेळ गावाकडचे’ हा पाठ आहे. या पाठात निसर्गाशी आणि नित्याच्या जगण्याशी नातं सांगणाऱ्या अनेक देशी खेळांची माहिती आहे. हे खेळ हळूहळू कालबाह्य होत चाललेत. या पाठात काचापाणी, सुरपारंब्या, चोरपोलीस, फुगड्या, विटीदांडू, गोट्या, घिसाघिसी, च्यावम्याव, रोपारोपी इ. खेळांचे वर्णन केले आहे. हे सर्व पारंपरिक खेळ शारीरिक शिक्षणाच्या तासिकेला रोज एक असे मुलांना खेळायला सांगितले. पाठात काही खेळ खेळण्याची पद्धत केवणीदिव्यातील पद्धतीपेक्षा थोडी वेगळी आहे. त्यामुळे असे खेळ मुलांची पद्धत व पाठातील पद्धत या दोन्ही प्रकारे प्रत्यक्ष खेळून पाहता आले. नवनवीन खेळ खेळताना मुलांचा आनंद वर्णनातीत आहे.
संतोष मुसळे, जालना
santoshmusle1515@gmail.com