आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

100 टक्के उपस्थितीसाठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र ही शैक्षणिक प्रयोगशाळा. शिक्षणात सातत्याने नावीन्यपूर्णतेची कास धरून तांडे, वस्त्या, वाड्या-पाड्या, गावोगावी अनेक धडपडणाऱ्या शिक्षकांनी शाळा उभ्या केल्याचं मी बघतोय. ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा २००९’ व मागील वर्षी २२ जून २०१५ रोजीच्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या अभियानाद्वारे शिकणं-शिकवणं ही आंतरक्रिया खऱ्या अर्थाने वेगाने होतेय, असं मला वाटतं. आजमितीस जिल्हा परिषदांच्या शाळांत शिक्षकांनी सकारात्मकतेचे वातावरण तयार केले आहे. असेच परभणी जिल्ह्यातील पूर्णा या तालुक्यात जागर शिक्षणाचा या उपक्रमाद्वारे गटशिक्षणाधिकारी विठ्ठलराव भुसारे यांनी एका वर्षात दोन कोटी रुपये लोकसहभागातून जमा करून शाळांचा चेहरामोहराच बदललाय. या अभियानातील बिनीच्या शिलेदार म्हणजे राजश्री स्वामी.

पूर्णा या तालुक्याच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या पाच हजार लोकसंख्येच्या पिंपळा लोखंडे या गावात चार वर्षांपूर्वी बदलीने राजश्री स्वामी शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. गाव तसं सधन. परभणी जिल्ह्यात संत्र व भाजीपाल्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. तसेच शहरीकरणाचा गंध या गावालाही लागलेला आहे. ताई रुजू झाल्या त्या वेळी शाळेत शैक्षणिक वातावरण नव्हते. गावातून दोन जीप भरून मुले पूर्णा या ठिकाणी शिकायला जात होती. गावकरी व शिक्षक यांच्यात समन्वय नव्हता. अशा वेळी ताईंनी पुढाकार घेऊन मुख्याध्यापकांना मी नवीन काहीतरी करू इच्छिते, असे सांगितले. मुख्याध्यापकांनी ‘तुम्ही फक्त तुमच्या वर्गापुरते करा’, असे सांगितले आणि येथूनच शाळा बदलायला सुरुवात झाली. मॅडमनी सुरुवातीला पहिलीचा वर्ग घेतला. प्रवेशासाठी घरोघरी जाऊन महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि बघता बघता एका दिवसात ३० मुलांचे प्रवेश झाले. या सर्वांना त्यांनी चॉकलेट दिली. चॉकलेट बघून मुलांना मॅडम आपल्या जवळच्या नातेवाइकासारख्या वाटल्या व यातून मुलांसोबत त्यांची नाळ जुळली. शाळेत आल्यानंतर मुलांवर लगेचच शैक्षणिक ओझे न लादता गप्पा, गोष्टी यातून हळूहळू ताई मुलांचं भावविश्व उलगडत गेल्या. मुलांना शाळेची गोडी लागली. अगदी महिनाभरातच याचा परिणाम दिसून आला. पूर्णा या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणाऱ्या दहा मुलांना पालकांनी या शाळेत प्रविष्ट केले. यातच ताईंच्या कामाचं फलित झालं. हे बघून अजून हिरिरीने सर्व शिक्षक कामाला लागले. आज ही मुलं चौथीत आहेत. ती मनानेच नवनवीन उपक्रम राबवून स्वतःच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत.

ताईंना इंजिनिअर व्हायचे होते, मात्र वडील बसवराज यांची चार मुलींचे शिक्षण व सांभाळ करताना तारेवरची कसरत होऊ लागली. त्यामुळे बारावी पास झाल्यानंतर लगेचच ताईंचं लग्न झालं. त्यांना वाटले, आता माझं शिक्षण संपलं. पण पती अरविंद पंढरपुरे यांच्या प्रोत्साहनामुळे प्रसंगी दागदागिने मोडून ताईंनी डीएड केले व २००५मध्ये नोकरीस लागल्या. आहेरवाडी हे गाव त्यांना मिळाले. गावात येण्या-जाण्यासाठी वाहनाची सोय नव्हती. अशा वेळी दोघांनी या गावात राहून मुलं घडविली. आजमितीस पिंपळा गावातील सर्व नागरिक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, मुख्याध्यापक, तसेच शाळेतील सर्व शिक्षक ताईंना या कामात उत्साहाने मदत करताहेत.

उपक्रम :
आरसा माझा मित्र
: आबालवृद्धांपासून सर्वांनाच आरशात बघायला आवडते. याचाच उपयोग करून मॅडमनी मुलांना स्वच्छतेची सवय लावली. यासाठी वर्गात एक आरसा लावला. आल्या आल्या मुलांनी या आरशात स्वतःचा चेहरा, कपडे, केस, दात बघायचे व ते नीटनेटके आहेत की नाही, ते ठरवून जो सर्वात स्वच्छ असेल त्याला ताई चॉकलेट देतात. या द्वारे मुलांत निकोप स्पर्धा निर्माण झाली व ती स्वच्छतेबाबत जागरूक, सजग झाली.

उपस्थिती टाळ्या : शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात १००% पटनोंदणी, १००% उपस्थिती या बाबी अनिवार्यच असतात. १००% पटनोंदणी ही सोपी बाब आहे, मात्र १००% उपस्थिती ही बाब खूप जिकिरीची व शिक्षणक्षेत्राला भेडसावणारी गोष्ट आहे. कारण शिक्षणातील गळतीचे प्रमाणही खूप मोठे आहे. याला केवळ शिक्षकच जबाबदार असतात असं नाही, तर बऱ्याच अंशी शासकीय धोरणेच कारणीभूत असतात. मात्र या सर्वाच्या पलीकडे जाऊन सातत्याने मुलामुलींची १००% उपस्थिती राहावी, यासाठी मॅडमनी ‘उपस्थिती टाळ्या’ या उपक्रमाची अंमलबजावणी केली. यात मुलांची उपस्थिती टिकावी म्हणून मुली व मुलांमध्ये स्पर्धा लावली जाते. यात ज्यांची उपस्थिती जास्त असेल त्यांच्यासाठी आनंददायी टाळ्या वाजवायच्या. यातून मुलांमध्ये चुरस निर्माण झाली व उपस्थिती वाढण्यास मदत झाली.

श्यामची आई व मी : आजकालच्या मुलांना नीतिमूल्यविषयक शिक्षणाची नितांत गरज आहे, असे सर्व जण हिरिरीने सांगतात. कारण मुले उद्धटपणे वागताना व बोलताना दिसतात. मात्र ताईंनी मुलांत नैतिक मूल्यांची जोपासना व्हावी, यासाठी साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’मधील एक गोष्ट दररोज सांगून त्यावर मुलांमध्ये चर्चा घडवून आणली जाते व यातूनच चांगल्या मूल्यांची रुजवणूक मुलांत केली जाते.

आयएएस होऊ या : दरवर्षी यूपीएससीचा निकाल लागला की, आपल्याकडे खास करून मराठी मुलं या परीक्षेत मागे का, याबाबत सगळीकडे कारणमीमांसा व चर्चा होतात. मात्र स्पर्धा परीक्षेत राज्यातील मुलांनी यश कसे मिळवावे, याबाबत त्यांना कुणीच मार्गदर्शन करत नाही. प्राथमिक स्तरापासून मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड लागावी, या हेतूने मॅडमनी हा उपक्रम सुरू केला. यात इयत्ता पहिलीपासून ते सातवीपावेतो मुलांना वेगवेगळे प्रश्न विचारले जातात, तसेच काही लेखी प्रश्नांचा सराव घेतला जातो. याचा परिणाम असा झाला की, पहिलीची मुले पाचवीची पुस्तके वाचायला लागली व यातूनच मुलांचे बरेचसे मूलभूत संबोध पक्के झालेत.

माझे घड्याळ : कालमापनाबाबतचे मुलांचे संबोध दृढ व्हावेत व सर्व संकल्पना मुलांना व्यवस्थितपणे समजाव्यात, यासाठी प्रत्येक मुलाकडून घड्याळ तयार करून घेतले. घड्याळ तयार करत असताना मुलांनी नवनिर्मितीचा आनंद तर घेतलाच, सोबतच कालमापनाबाबतच्या सर्व संकल्पना मुलांना उत्तमपणे आत्मसात झाल्या.

अभिव्यक्ती फलक : शिक्षणाचा खरा उद्देश मुलांना अभिव्यक्त करणे, हा आहे आणि हा जर साध्य करायचा असेल तर मुलांना चार भिंतीच्या आत व बाहेर बोलू, लिहू दिलं पाहिजे. हेच अपेक्षित धरून ताईंनी हा उपक्रम राबविला. यात वर्गाच्या भिंतीच्या खालच्या बाजूंना काळा रंग देऊन मुले खडूच्या आधारे यावर चित्रे, गणिती सराव, भाषा सराव, निबंधलेखन, अनुभवलेखन करत व्यक्त होतात.
चिखल दिवस : पाऊस सर्वांच्या आवडीचा विषय. पावसात भिजायला व खेळायला लहान मुलांना तर खूप आवडते. हीच बाब लक्षात घेऊन जुलै महिन्यात एक दिवस हा उपक्रम शाळेत राबवला. यात मुलांकडून चिखलापासून विविध वस्तू बनवून घेतल्या व त्यांचे प्रदर्शन भरविले. या ठिकाणी मुलांनी एकाहून एक सरस कलाकृती तयार केल्या.

संतोष मुसळे, जालना
santoshmusle1515@gmail.com
बातम्या आणखी आहेत...