आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलात मूल होणारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पौर्णिमाताईचा जन्म मालेगावचा. वडील शिक्षक तर आई घरकाम करणारी. वडिलांनी लहानपणापासून हाती धरलेले कुठलेही काम नेटाने व प्रामाणिकपणे तडीस नेण्याची शिकवण दिलेली. आई अशिक्षित असली तरी एखाद्या बाबीकडे तिची चतुरस्रपणे पाहण्याची वृत्ती होती. हे सारे पौर्णिमा राणे यांच्या अंगी आपसूक आलेले. आपल्या वीस वर्षांच्या सेवेत ती जिथे गेली तिथे मुलांना सर्व काही समजून मुलांच्या शैक्षणिकच नव्हे तर सर्वांगीण विकासासाठी ती सदैव कार्यतत्पर राहते. भुसावळ या तालुक्याच्या ठिकाणापासून दहा किमी अंतरावर असलेल्या साडेआठ हजार लोकसंख्येच्या साकरी या ठिकाणी पहिली ते चौथीच्या वर्गांना सात शिक्षक. त्यापैकीच एक पौर्णिमाताई. गाव तसं मोठं व शहरालगत असल्यामुळे साहजिकच पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या झगमगाटी शाळांकडे अोढा. मात्र ताईने नानाविध नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे मुलांना या शाळेतच खिळवून ठेवले आहे. शाळेत येणारी मुले ही बहुतांशी गोरगरीब घरातीलच.
ताईची पहिली नोकरी जि. प. शाळा चिखली, ता. मुक्ताईनगर. ती शाळा सातवीपर्यंत होती. पटसंख्या भरपूर होती. तेथे रुजू झाल्यानंतर बेशिस्त वागणारी मुले, कुठलेच वळण नाही, हे बघून ताईला रडू कोसळायचे. पण या मुलांना सुधारायचे, असे ठरवून चांगले शैक्षणिक वातावरण तयार केले. शाळेत आल्यावर प्रार्थनेपासून शाळा सुटेपर्यंत विविध उपक्रमांतून मुलांना शिकवत राहिली. प्रभावी भाषा व उत्तम वक्तृत्व, यामुळे मुलांवर सर्व काही बिंबवता आलं.

नंतर कोळवद, ता. यावल येथे बदली झाली. तेथील शाळा चौथीपर्यंतच होती. तिथे तिने खूप मोठा बगीचा तयार केला. वर्गसजावट व स्वत:च्याच हाताने तयार केलेले साहित्य हा तालुक्यात खूप कौतुकाचा विषय ठरला. तालुक्यातून जो तो वर्ग व बगीचा पाहण्यासाठी शाळेत येऊ लागले. तिथे असतानाच खाजगी दादोजी कोंडदेव आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर महात्मा जोतिबा फुले शिक्षाबिंदू पुरस्कार मिळाला. तेथील शाळेत “सुंदर हस्ताक्षर हाच आपला दागिना” हा उपक्रम राबवला.

२००५ मध्ये अकलुद, ता. यावल येथे बदली झाली, तिथे ४०० लोकवस्ती होती. तेथील शाळा पहिली ते चौथी. शाळेची स्थिती खूपच दयनीय होती. तेथील शाळेतील सर्व मुले हातमजुरी करणाऱ्यांची. त्यांना स्वछता म्हणजे काय, हे माहीतच नव्हते. मग ताईने मुलांना आपलंसं करायला सुरुवात केली. काही दिवसांनंतर ही मुले जवळ येऊ लागली. त्यानंतर ओळखपत्रं बनवून घेतली. त्यांना टाय व पट्टे मोफत दिले. त्यानंतर परिपाठ नेमून दिला.

परिपाठासाठी मेगाफोन वापरला. लाउडस्पीकरवर बोलायला मिळेल, म्हणून मुले तयारी करून येऊ लागली. कविता, पाढे, प्रश्नोत्तरे सर्व त्यावरच घेऊ लागली. मग मुलांचा सहभाग वाढू लागला. त्यानंतर विविध क्षेत्रभेटी, उदा. आरोग्य केंद्र, आठवडे बाजार, कुंभारकाम, चांभारकाम, किराणा दुकान, शिलाईकाम, शेती, ग्रामपंचायत, पोस्ट आॅफिस अशा विविध ठिकाणी नेऊन आणले.

ताई वस्तीत जाऊन मुलांना शाळेत घेऊन यायची. सुरुवातीला मुले पळून जायची. मग मी शाळेत जाऊन जे असायचे त्यांना गाणी, गोष्टी सांगायची व त्यांना सांगायची की, तुम्ही हे घरी जाऊन सांगा. मग ती मुले ते घरी जाऊन सांगू लागली. मग मुले शाळेत येऊ लागली. ताई त्यांच्यात रममाण होऊन खेळू लागली. मग ती मुलं रोज नियमित शाळेत येऊ लागली. त्यानंतर विविध कार्यशाळा शाळेतच त्यांच्यासाठी आयोजित केल्या. कला विषयासाठी रंगखडू, पेन्सिली, कोरे कागद, वाॅटरकलर, ब्रश, घोटीव कागद, डिंक स्वत: आणले. एके दिवशी मुद्राचित्र शिकवून तयार करून घेतले. कोलाजचित्र तसेच वेगवेगळी चित्रे काढून रंगवून घेणे सुरू केले.

रचनावादी परिपाठ
साकरी येथे ताई जाण्यापूर्वी थोडं अशैक्षणिक वातावरण होतं. सुरुवातीला मुलांना गुणवत्तेचे उपक्रम न राबविता रचनावादी परिपाठाची सुरुवात केली. ज्या शाळेत परिपाठ चांगला होतो, तेथे निश्चितच मुलांचे मन शाळेत रमते. कारण परिपाठ म्हणजे शाळा व मुलांचं सामाजिक जीवन यांना जोडणारा ‘सेतू’ आहे. परिपाठात सहा दिवस दररोज नवनवीन गीते, प्रार्थना, देशभक्तिपर गीते, आनंददायी गीते, तिन्ही भाषांतून प्रतिज्ञा यामुळे मुलांना शाळेत यायची गोडी लागली.

विद्यार्थी आमचे वाढदिवस त्यांचे
सदोदित कामाच्या व्यापात असणारी खेड्यातील माणसे. अशांना ना मुलांच्या वाढदिवसाचे कौतुक ना बक्षिसांचे. मात्र ताईने या मुलांचे वाढदिवस साजरे करायचे ठरवले. मग मुलांच्या वाढदिवसाच्या तारखा एका कागदावर लिहून वर्गात लावल्या. यामुळे मुलांना आपापली वाढदिवसाची तारीख माहीत झाली. मग आमदार संजय सावकारे यांना याची माहिती दिली; त्यांनी या मुलांच्या वाढदिवशी भेटवस्तू व शुभेच्छा पत्र पाठवायला सुरुवात केली. यामुळे शिक्षकांत उत्साह संचारला व मुलेही आनंदी झाली.

वृक्षबंधन
शालेय विद्यार्थी तसेच जनमानसात झाडांविषयी आवड निर्माण व्हावी, तसेच वृक्ष लागवड आणि संवर्धनात त्यांनी हिरिरीने सहभागी व्हावे, यासाठी वृक्षबंधन हा उपक्रम राबविला गेला. टाकाऊपासून टिकाऊ म्हणून जुन्या लग्नपत्रिका विविध आकारांत कापून व्यवस्थित शिवून घेतल्या व दोन्ही बाजूला काथ्या, सुतळ बांधली.

म्हणजे आपली पर्यावरणस्नेही राखी तयार झाली. आता ही राखी शाळेच्या परिसरातील झाडाला बांधली नि त्याच्या रक्षणाची शपथ घेतली. आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा नि मुख्य म्हणजे प्राणवायू देणाऱ्या या झाडांच्या प्रती आभार व्यक्त करण्याची ही एक अनोखी पद्धती.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईच्या सूचनेनुसार गट साधन केंद्र, भुसावळ द्वारे आयोजित बेटी बचाओ बेटी पढाओ व स्वच्छ भारत विद्यालय या विषयांवर पोस्टर स्पर्धेत नुकताच शाळेतील मुलांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.

अब की बारी शाळा सरकारी
जि. प. शाळा आणि खासगी शाळांतील फरक म्हणजे, खासगीवाले मसाला लावून जाहिरातबाजी करतात व पालकांना व मुलांना आपल्याकडे आकर्षित करतात आणि जि. प.वाले इथेच अजूनही मागे आहेत. ताईने यंदा मे महिन्यातच शाळेत दिले जाणारे शिक्षण, सोयीसुविधा याविषयी; तसेच देणगीविना मुलांना प्रवेश दिला जातो, अशी जाहिरात करून पटसंख्या वाढवली. परिणामी इंग्रजी माध्यमातील बरीच मुले परत आली.

गणिती रचनावाद
ज्ञानरचनावादाच्या सिद्धांतानुसार शिक्षकाने सुलभकाची भूमिका बजावायची तर मुलांनी आपल्या सभोवतालच्या परिसरातून ज्ञानाची निर्मिती करायची, हे अभिप्रेत आहे. हाच धागा पकडून ताईने फरशीवर एक ते शंभर चौकटी आखून घेतल्या. प्रत्येक चौकटीत एकेका मुलाला उभे करायचे. ज्या चौकटीत मुलगा उभा आहे, ती संख्या सदर मुलाने जोराने म्हणायची. यामुळे मुलांचा संख्याबोध स्पष्ट होत गेला; तसेच याचा उपयोग विविध गणिती क्रियांसाठी केला गेला.

अंक गुडगुड्या
पुरातन काळी गावोगावी सोंगट्या खेळल्या जायच्या. ताईने अशाच दोन गुडगुड्या तयार केल्या. एकावर सम व दुसऱ्यावर विषम संख्या व मागील बाजूस चित्र काढलेले असायचे. वर्गातील मुलांचे दोन गट करून एकेका मुलास समोर बोलावून दोघांच्या हातात गुडगुड्या द्यायच्या, त्या मुलांना टेबलावर टाकायला लावायच्या. ज्या गटाचा अंक मोठा त्यास एक गुण, असे पाच सहा वेळा करायचे. यातून जो गट विजेता ठरतो त्याला बक्षीस दिले जाते.
santoshmusle1515@gmail.com
बातम्या आणखी आहेत...