आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील आनंदवन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘छूने से बिमारी नहीं फैलती, प्यार फैलता है।’ ही ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची जाहिरात पाच-सहा वर्षांपूर्वी दूरदर्शनने घराघरात नेऊन ‘एड्स’ या आजाराविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. मात्र एड्सग्रस्त वा एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांशी अजूनही समाज नीट वागत नाही. त्यामुळे दत्ता व संध्या यांचे अनाथ मुलांना हक्काचे छत देण्यासोबतच शिक्षण देण्याचे काम महत्त्वाचे आहे.

१९९८मध्ये दत्ता बारगजे भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात लेप्रसी टेक्निशियन म्हणून नोकरीस लागले. येथून काही अंतरावर असणाऱ्या आनंदवनाचे दरवाजे त्यांना नेहमी खुणावायचे. अशातूनच आनंदवनात येणे-जाणे सुरू झाले, बाबा व साधनाताईंशी संवाद होऊ लागला. त्यातूनच या पती-पत्नीच्या डोक्यात सामाजिक कार्याची ऊर्मी जोर धरायला लागली. संध्या एम.ए. (समाजशास्त्र) आहेत. दत्ता नोकरीवर गेल्यानंतर त्या कुष्ठरोग्यांशी संवाद साधत. त्यांच्या वेदना, दु:ख, अवहेलना समजून घेतानाच त्यांची नाळ सामाजिक कार्याशी जोडली गेली. नंतर दत्ता यांची बदली बीड ग्रामीण रुग्णालयात झाली. ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय निवासस्थानात दोघे राहात. याच परिसरात पार्वती नावाची एक महिला राहायची. ती अधूनमधून रुग्णालयात यायची व या दोघांशी गप्पा मारायची. ती स्वत: एचआयव्हीग्रस्त होती आणि तिचा मुलगासुद्धा. ती सांगायची, ती अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगतेय. समाजात नको त्या दाहक शब्दांनी छळले जाते. मात्र अशी वागणूक मुलाला मिळू नये, हीच तिची भावना होती. त्यातूनच दत्ता यांना याविषयी काही करावेसे वाटले.

या मुलाला त्यांनी स्वत:च्या राहत्या घरात ठेवले आणि २६ जानेवारी २००७ रोजी ‘इन्फंट इंडिया’ संस्था सुरू केली. निवासस्थानाच्या परिसरातील नागरिकांना या गोष्टीची बातमी लागल्यानंतर त्यांनी याला विरोध केला. त्यामुळे हे निवासस्थान सोडून शहरातीलच अलीशहा पटेल यांच्याकडे भाड्याने राहायला गेले. हळूहळू ‘इन्फंट इंिडया’ म्हणजे एचआयव्हीग्रस्त अनाथ मुलांची संस्था आहे, ही माहिती पसरली आणि लोकांचा ओढा संस्थेकडे वाढायला लागला. मुलांची संख्या १७ झाली. दोघेही याच कामात व्यग्र राहू लागले. मात्र काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी या कुटुंबाला त्रास देणे सुरू केले. वेळोवेळी मारण्याच्या धमक्या मिळाल्या, अॅट्रॉसिटी कायद्याखाली कोठडीत डांबले. तशात भाड्याच्या घरात जागा अपुरी पडायला लागली. मग दत्ता यांनी नोकरीचा राजीनामा देऊन ‘इन्फंट’च्या कामात झोकून दिले.

मुलांची वाढती संख्या व बीड शहरातील लोकांचा त्रास ओळखून संस्थेसाठी नवीन जागा शोधायचे ठरविले आणि तीही हक्काची. दत्ता यांनी गावाकडची जमीन विकली, बाकीही होते- नव्हते विकून बिंदुसरा धरणाजवळ माळरानावर दोन एकर जमीन विकत घेतली. दगड आणि लाल मातीशिवाय काहीच नाही, अशा ठिकाणी पत्र्याच्या तात्पुरत्या शेडमध्ये ‘इन्फंट’चा संसार सुरू झाला. मात्र आता मुलांना खाऊ काय घालायचे, असा प्रश्न आ वासून उभा राहिला. आपण घेतलेला निर्णय चुकला तर नाही, हा प्रश्न मनात खळबळ माजवायला लागला. मात्र या वेळी बाबांची आणि साधनाताईंची प्रेरणा पाठीमागे उभी राहिली आणि त्यांनी काम सुरू ठेवले. बीड शहरात माणसांनी त्रास दिला आणि आता माळरानावर निसर्गाच्या आव्हानांना सामोरे जायचे होते. सप्टेंबरच्या एका रात्री अचानक वादळ आले, जोराच्या वाऱ्यामुळे छतावरील पत्रे उडाले. काही मुलांना जखमा झाल्या. याविषयीची बातमी प्रसिद्ध झाल्यावर मुंबईच्या ‘ललिता फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे’ चेअरमन टी. एन. व्ही. अय्यर यांनी इमारतीसाठी ३० लाख रुपयांची मदत दिली. यातून मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे, दवाखाना बांधला.

२६ जानेवारी २००७ रोजी सुरू झालेल्या या संस्थेत आजमितीस ४८ मुले-मुली, पाच महिला, सहा पुरुष, दोन कुत्री, दहा मांजरी, सात गायी आश्रयाला आहेत. मुले देशाच्या विविध भागांतून आली आहेत. या मुलांना एचआयव्हीबाधित असल्यामुळे बीड शहरातील एकही शाळा प्रवेश द्यायला तयार नव्हती. दत्ता आणि संध्या यांना माहीत होते की, शिक्षणशिवाय समाज त्यांना स्वीकारणार नाही. यासाठी दत्ता यांनी शिक्षण विभागाकडे वेळोवेळी खेटे मारायला सुरुवात केली. अधिकारी नको त्या शब्दांत त्यांचा अपमान करायचे. कुणी त्यांना तुम्ही हे नाटक करत आहात, असेही म्हटले. तर काही जणांनी पैशाची मागणीही केली. अखेर मुलांसाठी बीड जि.प.कडून दोन शिक्षकांची नेमणूक केली. आज दोन खोल्यांत पहिली ते दहावीचे वर्ग भरतात. दोन वर्ग दोन शिक्षक अशा कठीण परिस्थितीतही ही मुले शिकतात. मुले शाळेतून आल्यानंतर महात्मा गांधी हस्तकला व लघुउद्योग केंद्रात मेणबत्त्या तयार करतात. आश्रमात संध्या व त्यांच्या सासूबाई गयाबाई (वय-७०) या मुलांची काळजी घेतात.

एचआयव्हीबाधित महिलांसाठी संध्या यांनी माहेर प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पात ११ महिला राहतात. येथील मुले आता मोठी व्हायला लागली. मुले आता कामात मदत करतात. या दोघांनी मुलांच्या मनात समाजाबद्दल आदर, प्रेम, स्नेहभाव निर्माण केला व विद्यार्थ्यांचे समाजाशी ऋणानुबंध वाढविले. ज्यांनी सुरुवातीला त्रास दिला तीच मंडळी आज मुलांना जेवायला, लग्नात, पूजेला बोलावतात, किंवा काही कारणास्तव बोलावणे नाही जमल्यास डबा पाठवितात. हा महत्त्वाचा बदल आहे.
santoshmusle1515@gmail.com
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..