आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंजळचे चार खांब !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून ३४ किमी अंतरावर असलेल्या किकवी फाट्यापासून तीन किमी अंतरावर निरा व गुंजवणी नदी संगमावर वसलेले १८८६ लोकवस्तीचे केंजळ हे गाव. १९१४मध्ये या गावात जिल्हा परिषद शाळेची स्थापना गेली आणि शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानाची नवशिखरे येथील मुलांनी गाठली. २०१४ हे शाळा स्थापनेचे शताब्दी वर्ष नवीन रीतीने कसे साजरे करता येईल, यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून व शासकीय निधीतून दोन कोटी रुपये खर्चून शाळेची नवीन भव्य इमारत बांधून गावातील मुलांना गावातच दर्जेदार व सर्वांगीण विकास साधता येईल, अशा शिक्षणाची सोय करून दिली. या दोन कोटीपैकी एक कोटी निधी लोकसहभागातून उभा राहिलेला अाहे.

पूर्वी याच गावातून शिकून गेलेले जि. प. सदस्य व पुण्यात बांधकाम व्यावसायिक असलेले चंद्रकांत बाठे अाणि त्यांच्या पत्नी व पंचायत समिती माजी सभापती सुनिता बाठे, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गावातील शिक्षणप्रेमींनी वेळोवेळी शाळेत येऊन शताब्दी वर्षानिमित्त शाळा देशभरात रोल मॉडेल म्हणून कशी उभारता येईल, यावर चर्चा केली. यातूनच या भव्यदिव्य इमारतीची उभारणी झाली, तीही एका वर्षात.

८१ गुंठे परिसर असलेल्या या जागेवर देखणी इमारत बघून सर्व जण अचंबित होतात. ती बांधताना अर्थातच प्रचंड अडचणी आल्या होत्या. परिसरात सर्वत्र खडकाळ ओबडधोबड जमीन. त्यामुळे २०० ट्रॉली मुरूम टाकून सपाटीकरण करावे लागले. यात १००० मुलं बसतील एवढा हॉल, ८०० मुलं बसतील असा खुला रंगमंच, क्रीडांगण, संगणक सुविधा यांसह मुलांना व्यक्त होता यावे यासाठी विविध माध्यमातून कौशल्य विकास व कलात्मक विकास साधला जातोय. एबीएल म्हणजे Activity Based Learning म्हणजेच कृतियुक्त अध्ययन पद्धती. या उपक्रमाची सुरुवात २००३मध्ये तामीळनाडूतील ३० शाळांतून झाली. पुढच्या चार वर्षांत त्या राज्यातील ३८,५०० शाळांत ही अध्यापन पद्धती लागू झाली होती. पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजीवकुमार यांनी २०१०मध्ये या पद्धतीचा अभ्यास करून अंमलबजावणीसाठी भोर तालुक्यातील ३० शाळांची निवड केली. त्यात केंजळ शाळेचे जे. के. पाटील हे एक शिक्षक होते, ज्यांनी या पद्धतीचा अभ्यास करून पाठ्यक्रम व अभ्यासक्रम यांची सांगड घातली. ४००० प्रकारची अध्ययन कार्डे तयार करून ती १७२ विविध ट्रेमध्ये ठेवून अंदाजे ४० हजार रुपयांचे एक एबीएल किट तयार केले व या शाळांना पुरवले. येथील शिक्षकांनी या साहित्याच्या माध्यमातून शिक्षणाचा चेहरामोहरा बदलला. आज केंजळ शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र म्हणून उभं राहिलंय.

इथे वर्ग ही संकल्पना नसल्यामुळे पहिली ते चौथीची मुले अध्ययन शिडीच्या माध्यमातून मेन व साइड लॅडरद्वारे शिकतात. यात मुलं सदोदित कृतिप्रवण तर राहतातच, सोबतच कार्यपद्धतीच्या पाच टप्प्यांतून त्यांना जावे लागते. पहिल्या टप्प्यात प्रथम संपूर्ण अभ्यासक्रम घटक, उपघटक, व पाठ्यमुद्द्याविषयीची संकल्पना स्पष्ट करण्यासाठीची कृती निवडणे. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक कृतीसाठी साहित्य तयार करणे. तिसऱ्या टप्प्यात निवडलेल्या कार्डाची क्रमबद्ध मांडणी करून विषयनिहाय १० ते १५ टप्प्यांतून माइलस्टोन तयार केलेले आहेत.
चौथ्या टप्प्यात या माइलस्टोनपासून अध्ययन शिडी तयार केली असून पाचव्या व अंतिम टप्प्यात पूरक अध्ययन शिडीच्या मुलांना रचनावादी पद्धतीने ज्ञाननिर्मिती करण्यास मदत मिळते. विषयनिहाय लॅबमधून पहिली ते चौथीच्या मुलांना गट करून कृतिप्रवण ठेवले जाते. येथील पहिलीची मुलेही चौथीचा अभ्यासक्रम सहज आत्मसात करतात. शिवाय विविध गटचर्चेतून प्रगल्भ होतात.

रत्नमाला निगडे
नेहमी मुलात मिसळणाऱ्या निगडे मॅडम मराठी लॅबची जबाबदारी सांभाळतात. त्यांच्या लॅबमध्ये प्रवेशताच दिसली पहिली ते चौथीची मुलं, ती आपापल्या लॅडरप्रमाणे बसून एबील कार्ड अध्ययन करत होती. आमच्याशी संवाद साधत त्या मुलांच्या समस्या सोडवत होत्या.
मुलांचं हस्ताक्षर सुधारावं, म्हणून त्यांनी वर्तमानपत्रातील ठळक बातम्यांची कात्रणे मुलांना वाचायला व लिहायला दिली. सोबतच स्वरचिन्हांची ओळख करून देताना बाराखडीची घोकंपट्टी न घेता प्रत्येक शब्दाचे वाचन व लेखन करताना त्या शब्दात विशिष्ट स्वरचिन्हेच का घ्यायची, हे मुलांना सकारण व सोदाहरण समजावून सांगतात. यामुळे मुलांचे भाषेसंदर्भातील मूलभूत संबोध पक्के झालेत.
उपक्रम :
दररोज गोष्ट, वर्ग वाचनालय, सारे मिळून निबंध लिहू या, जोडाक्षर फलक, वाचन सहजसोपे करू या.

वैशाली सुतार
केंजळच्या जडणघडणीत २००५पासून खारीचा वाटा उचलणाऱ्या सुतार मॅडमनी बदललेल्या केंजळची स्थित्यंतरे जवळून अनुभवली आहेत. आज त्या सहावी ते आठवीच्या मुलांना घडवत आहेत. वरच्या वर्गातील मुलांना आलेल्या पाहुण्यांशी कसे बोलावे, वागावे, हे त्या सांगतात.
उपक्रम
प्रश्नमंजुषेतून हुशार बनू या, इंग्रजी संभाषण कौशल्य विकास, नृत्य संगीतातून अभ्यासाची आवड, इ.

प्रतिभा जगताप
पुण्यातील सासवड हे यांचं मूळ गाव. केंजळ शाळेत त्या गणित विषयाची लॅब सांभाळतात. गणिताला कार्यानुभवसारख्या कृतिशील विषयाची जोड देऊन गणित अधिकाधिक सुलभ करून शिकवतात, मग ते पहिलीचे मूल असो वा चौथीचे. या लॅबमधील मुलं गणिताचा कुठलाच ताण घेताना दिसली नाहीत. पहिलीची काही मुलं तिसरीच्या पातळीवरील गणितं सहज सोडवत होती. यासाठी पाढे शिकवण्याची त्यांची हातोटी खरंच वाखाणण्याजोगी आहे. गणिताबद्दल मुलांच्या मनात सकारात्मक भावना त्यांनी निर्माण केलीय.
उपक्रम
संगीत वर्ग, मान्यवरांच्या मार्गदर्शनातून चौफेर विकास, शाळा परसबाग, भोंडला, अंधश्रद्धा निर्मूलन, शाडू मातीला आकार, काड्यांना भौमितिक आकार, इ.

रुपाली पाटणे
यांचा जन्म भोर तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या खानापूरचा. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेऊन २०१०मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊनही अजून आदेशाची वाट पाहात आहेत. इथे त्या आउटसोर्स शिक्षिका म्हणून काम करतात. पाटणे मॅडम परिसर अभ्यास या विषयाची लॅब सांभाळतात. त्यांच्या वर्गात गेले की, परिसर अभ्यासाशी निगडित विविध प्रकारचे तक्ते व मुलांनी तयार केलेले छोटी छोटी आकर्षक पेंटिंग मन मोहून घेतात. विद्यार्थीकेंद्रित वर्गसजावटीच्या माध्यमातून मुलांना आनंददायी शिक्षण कसे देता येईल, यासाठी त्या प्रयत्नरत असतात.
उपक्रम
परिसर अभ्यासात ईलर्निंगचा उपयोग, विनादप्तर वर्ग, कोलाजमधून मूल घडवताना, छंदविकास, कागदाशी खेळू या, कापूस व विविध बियांपासून पेंटिंग, निसर्गाशी नाते जोडू या, क्षेत्रभेटीतून मूल घडवू, शाळेतील शिक्षक योगेश राऊत, धनंजय भिलारे व लोकसहभागातून मुलांना शिकवण्यासाठी नेमलेल्या दानवले व चव्हाण मॅडम मुलांना घडवत असतात. रमेश कुलकर्णी दर वर्षी जूनमध्येच सर्व मुलांसाठी लेखनोपयोगी साहित्याचे वाटप करतात, असेच अनेक गावकरी शाळेला मदत करतात. पहिली ते आठवीची १९२ मुले एबीएलच्या माध्यमातून शिकत आहेत. दरवर्षी सरासरी २० मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून येतात, सोबतच आजूबाजूच्या गावातील शंभर पालक आपल्या मुलांना प्रवेश देण्यासाठी मागे लागतात. मात्र इथे याच गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण दिलं गेलं पाहिजे, म्हणून कुणालाच इथे प्रवेश दिला जात नाही. अशी लोकसहभागातून उभी राहिलेली केंजळची शाळा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र ही शैक्षणिक प्रयोगशाळा म्हणतात, त्याचे द्योतक आहे.

संतोष मुसळे, जालना
santoshmusle1515@gmail.com
बातम्या आणखी आहेत...