आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santosh Musle Article About Vaishali Bankar Social Work

सावित्रीची लेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसानं असं जगावं की, जगल्यासारखं वाटलं पाहिजे, इतरांसाठी झटताना रक्त थोडे आटले पाहिजे, खरंच जीवन जगतोय गड्या, हे स्वत:च्या हृदयास पटलं पाहिजे. या ओळी बालवयातच स्वत:च्या मेंदूत खोलवर रुजवून समाजसेवी व्रत अंगीकारलेल्या, चंद्रपूर जिल्ह्यात नलिनी व प्रभाकर यांच्या पोटी जन्मलेल्या वैशाली बनकर म्हणजे समाजसेवीच. आपले पूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांप्रती वाहून घेऊन अगोदर आदिवासी भागात व आजमितीस मारकी, ता. भातुकली, जि. अमरावती या गावात स्वस्थ आरोग्यासोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कास धरणाच्या वैशाली बनकर-ठाकूलकर यांच्या कार्याची माहिती आपण या लेखाद्वारे घेणार आहोत.

Sound mind in sound body या म्हणीचा तंतोतंत उपयोग करून स्काऊट गाइडच्या माध्यमातून शालेय मुलांच्या अंगी शिस्त, मेहनत, जिद्द, सचोटी या गुणांची निर्मिती करण्यात त्या अग्रेसर आहेत. केकतपूरसारख्या आदिवासी गावात बदली झाल्यानंतर गावाची अवस्था बघून मॅडमना तत्काळ बदली करून घ्यावीशी वाटली. मागासलेले गाव,आरोग्य, शिक्षणाच्या कुठल्याच सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत, मुले शाळेत विनाअंघोळीचीच येत, त्यामुळे त्यांच्यात बसावेसे वाटत नसायचे. पण माघार न घेता, उपक्रमांच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास आपण घडवू शकताे, हा चंग मनाशी बांधून उपक्रमांची सुरुवात केली.

शिस्तीचे वारकरी - गावातील मुलांत शिस्तीचा लवलेशही नव्हता. विद्यार्थ्यांना पाठांतर, परिपाठ, अंघोळ, स्वच्छ राहणे हे काहीच या मुलांना माहीत नव्हते. आमची मुले काहीच करणार नाहीत, असे लोक सर्रास बोलून दाखवत. मग मुख्याध्यापिका आफरे यांच्या मदतीने पालक सभा बोलावली. पालकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. परिणामी आई मुलांना दररोज नियमितपणे अंघोळ घालून, स्वच्छ कपडे घालून शाळेत पाठ‌वायला लागली. पारधी समाजाचे गाव असल्यामुळे स्थलांतराचा मोठा प्रश्न होता. अशा वेळी जिथे जवळपास माळरानावर वस्ती जाईल, त्या ठिकाणी सर्व शिक्षक जाऊन शिक्षण व शिस्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत. हेच ते शिस्तीचे वारकरी.

सहलीतून कलाविष्कार - पारधी समाजातील मुले खूप चपळ व ज्ञानजिज्ञासू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, ही मुले कमी बोलायची. यासाठी नामदेवराव खरबडे यांच्या शेतात महिन्यातून सहल घे‌ऊन जाणे सुरू झाले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून मुले चुणूक दाखवू लागली व अभ्यासात रुची वाढली.

कब बुलबुल युनिट- मुंबई व कोराडी या ठिकाणी कब-बुलबुल मेळाव्यासाठी या दुर्गम गावातील मुले जायला लागली. या युनिटच्या स्थापनेमुळे शालेय परिसर स्वच्छता, परसबाग निर्मिती, गैरहजर मुलांना बोलावून आणणे, स्वच्छता पाहणे, जेवणापूर्वी हात धुऊन घेणे, शालेय वाचनालय चालविणे मुले सहज करू लागली. मुंबईसारख्या ठिकाणी या पारधी वस्तीतील मुले पहिल्यांदाच गेली व यशस्वी होऊन परत आली. आता इतर गावातील मुले या शाळेत यायला लागली.

निसर्ग माझा मित्र - निसर्गातील वनस्पतींची उपयुक्तता याविषयी माहिती करून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पावसाळ्यात वृक्षदिंडी काढणे, वृक्षारोपण करणे, गावातील खड्ड्यात माती टाकणे, गाव स्वच्छ करणे या उपक्रमांच्या माध्यमातून शाळा व समाज एकसंघ झाला. आिण यातच मॅडमच्या बदलीची बातमी गावात येऊन पोहोचली. पूर्ण गाव लेकराबाळांसहित मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना भेटून आमच्या मॅडमची बदली करू नका, त्यांनी आमच्या पारध्यांंच्या मुलांत शिक्षणाची ज्योत पेटवली; कृपा करून त्यांना आमच्याच गावात राहू द्या, अशी विनंती करू लागले. गावकर्‍यांची विनंती अधिकार्‍यांनी एेकली व त्याच गावात सेवेची संधी मॅडमना दिली.

माझा गाव, माझी मुले- बदली रोखल्यामुळे मॅडमचा आत्मविश्वास दुणावला आिण अशातच मुख्याध्यापिका म्हणून छायाताई इंगळे आल्या. या दोघींनी या उपक्रमांतर्गत गावातील सोयरिकी जमवणे, लग्नाचे नियोजन, पारधी बेळ्यावरच्या उघड्यावाघड्या मुलांसाठी स्वखर्चाने वस्त्रवाटप सुरू केले. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मुलींसाठी एकसारख्या आेढण्या, नथणी, बांगड्या, गंगावन, मुलांसाठी लुंग्या, कोळी नृत्याचे साहित्य मुलांना कायमस्वरूपी दिले. यामुळे या मुलांत आत्मविश्वास निर्माण होऊन क्रीडा महोत्सवात स्वत:च्या डफलीवर शंभर विद्यार्थ्यांचे लेझीम पथक तयार केले. कृषी विभाग, अमरावतीद्वारा आयोजित किसान सन्मान सप्ताहात फळ प्रक्रिया व संस्करण या कार्यक्रमासाठी केकतपूरच्या महिला उपस्थित होत्या. गावात बचत गटाची स्थापना करून देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्याचा प्रयत्न केला.
जून २०१३मध्ये मॅडमची बदली भातुकली तालुक्यातील मारकी या गावात झाली. पंधराशे लोकसंख्या असलेल्या मारकी गावात व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक आहे. पहिली ते सातवीपर्यंत १२५ मुले शाळेत ज्ञानार्जन करतात. या ठिकाणी बदल घडवण्यासाठी कब बुलबुल, स्काऊट गाइडच्या माध्यमातून सुरुवात केली.

माझी शाळा सुंदर शाळा पथनाट्य : मारकी गाव ८०% व्यसनाधीन असल्यामुळे शाळेची अवस्था गोठ्यासारखी झाली होती. शाळेच्या परिसरात कुठेही संडास, दारूच्या रिकाम्या बाटल्या, गुटखा, बिडी, तंबाखूच्या रिकाम्या पुड्या अशी खूपच घाण गावातील लोक करायचे. दररोज शाळेत आल्यानंतर मुलांकरवी ही स्वच्छता करवून घेतली जाई व त्याला मुले कंटाळली होती. यावर उपाय म्हणून कार्यानुभवाच्या तासिकेत म्हणजेच ४.३० वाजता दररोज गावात चौरस्त्यावर विद्यार्थ्यांकरवी छोटी सामाजिक प्रबोधनात्मक नाटके सादर करणे सुरू केले. लोकांना शाळेचे महत्त्व समजावून सांगितले. शाळेत घाण करू नका, ती तुमचीच मुले उचलतात, हे समजावले व थोड्याच दिवसांत स्वच्छ शाळा दिसायला लागली.

स्वप्न उज्ज्वल : या गावीतील युवकांना मुलांसमवेत मार्गदर्शन करणे, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी विविध खेळांद्वारे प्रशिक्षणाचे आयोजन करणे, युवा मंडळ स्थापन करण्यासाठी तरुणांना मार्गदर्शन करणे, विविध खेळांची शास्त्रोक्त माहिती देऊन व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणे यासाठी काम चालू आहे.

सामाजिक उपक्रम : २०००पासून ‘मी सावित्री बोलतेय’ या एकपात्री नाटकाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनात्मक कार्याची धुरा त्या आजतागायत सांभाळत आहेत. यासाठी सुरुवातीला डॉ. रामराव व शांताबाई (सासू-सासरे) तसेच प्रांजल व मृदुला या दोन्ही मुलींनी साथ दिली.

मारकीतील ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व गावकरी व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सहकार्यामुळेच आम्ही नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तयार राहू, असे मॅडम आवर्जून सांगतात.

संतोष मुसळे, जालना
santoshmusle1515@gmail.com