आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santosh Musle Article On Sneha Makdoom And School

शिकण्‍याचं माहेरघर !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माहेर हा शब्द कानावर आला की, मनात कुठंतरी आपुलकी, आपलेपणा, मनमोकळेपणा या बाबी आपसूकच येतात. मुलांना शाळेची-शिक्षणाची गोडी लागावी, म्हणून वर्गात शैक्षणिक साहित्याचं माहेरघर तयार करणाऱ्या, स्नेहा मकदूम यांना भेटूयात या वेळच्या सदरात...

इचलकरंजीत स्नेहा मकदूम यांचा जन्म झाला. आईवडील दोघेही शिक्षक. दोन बहिणी व एक भाऊ असा परिवार. शैक्षणिक परिवारात लहानाची मोठी होताना नकळतच शिक्षकी पेशाला आवश्यक गुण अंगभूतच आले. पाच वर्षांपूर्वी ताई मिरजपासून जवळ, सांगली रस्त्यावर असलेल्या वानलेसवाडी या गावात बदलीने रुजू झाली. गावात आल्याबरोबर लोकांची, मुलांची शिक्षणाविषयी प्रचंड अनास्था दिसली. शाळेचे तर डबकेच होऊन बसले होते. मुलं शाळेत उद्धट वागायची. कुणाचेही काही एक ऐकायचे नाही, अशी त्यांची धारणा झाली होती. पटसंख्याही जेमतेम होती. ताईचे वडील २०००मध्ये याच शाळेत होते, तेव्हा एका एका वर्गाच्या तीन तीन तुकड्या होत्या. २०११मध्ये हे चित्र पालटलं होतं. त्यामुळे ताईने पालकांचे उद‌्बोधन सुरू केले. सोबतच मुलांना विविध उदाहरणांच्या माध्यमातून जीवनानुभव देऊ लागली. याचा परिणाम मुलांत दिसू लागला. मुलांचे शाळेविषयीचे प्रेम वाढले व ती आता आदराने वागायला लागली. मग ताईने गुणवत्तेसाठी विविधांगी उपक्रम सुरू केले. ताईच्या वर्गात गेलो तर मुलांच्या आवश्यकतेपेक्षा जास्त शैक्षणिक साहित्य दिसतं. हे साहित्य तब्बल दीड लाख रुपयांचं आहे. यात वर्गासाठी स्वतःचा लॅपटॉप व टॅब आहे. प्रत्येक प्रकारचे शैक्षणिक साहित्य वर्गात रॅकमध्ये भरलेले आहे. ज्या शाळेतील मुलं वर्गात काहीही दिसले तर ते चोरून नेत होती, त्याच मुलांचे स्वभाव विविध उपक्रम राबवून आता बदललेत.

उपक्रम :
स्वच्छतेकडून शाळेकडे
ताई वानलेसवाडी शाळेत २०११मध्ये रुजू झाली. शाळेचे वातावरण पाहून तिला रडू कोसळले. पटांगणावर गावातील घाण पाणी सोडलेले. मुळातच ही इमारत जेथे उभी आहे तेथे पूर्वी ओढा वाहात होता. सतत पाझरणाऱ्या पाण्यामुळे या ठिकाणी एकही झाड उगवू शकत नव्हते. यासाठी ताईने लोकसहभागातून परिसरात मुलांच्या मदतीने मुरुम टाकून घेतला. दररोज सकाळी सहा ते रात्री आठ दहा वाजेपावेतो स्वतः राबणारी ताई लोकांनी पाहिली व तेही मदत करू लागले. झाडासाठी माती आणून या दलदलीत झाडे लावली व मुलांना शाळेकडे आकर्षित केले. परिसरात वेळोवेळी निघणाऱ्या सापांपासून संरक्षणासाठी स्वतः रसायने व कीटकनाशके फवारली.

करा जवळीक निसर्गाशी
निसर्गाशी मुलांची जवळीक वाढावी, यासाठी हा उपक्रम सुरू केला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाषराव चिंचोडकर यांचे हॉटेल होते, त्या ठिकाणी पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांची पोती व नारळाच्या करंवट्या होत्या. ताईने हे सामान शाळेत आणले व यावर मुलांनी रंगीत पक्ष्यांची चित्रे काढली. सोबत पक्ष्यांसाठी पाणी व धान्य ठेवले. यासाठी मुलांनी मार्केट कमेटीतील सडलेले धान्य गोळा केले. अल्पावधीतच पक्ष्यांचीही शाळा या झाडांवर भरू लागली. यामुळे मुलांना तर आनंद झालाच, पण सुखद चिवचिवाट सर्वांसाठी आनंददायी ठरत होता.

बहुद्देशीय रेल्वे
मुलांची निरीक्षणक्षमता वाखाणण्याजोगी असते. काहीही पाहिले तरी ती कुतूहलास्तव प्रश्न विचारत असतात. अशीच अनुभूती मुलांना देण्यासाठी परिसरातील आठवडी बाजारात जाण्यासाठी हाताला हात धरून मुलांनी रेल्वे तयार केली. मुले ताईकडून पैसे घेऊन बाजार करण्यासाठी गेली. मुलांसाठी ही बाब नवीन होती. पण अतिशय चोखंदळपणे भाव करून ती भाजीपाला व इतर बाबी खरेदी करत होती. हे करत असताना संध्याकाळचे सात वाजले, तरी मुले बाजारातच फिरत होती व गणिती क्रिया, समाजानुभव शिकत होती.

दुसऱ्या दिवशी मल्लमा या मुलीने ताईला शाळेत थर्माकोल आणून दिला. रेफ्रिजरेटरचं वेष्टन होतं ते. यापासून मुलांनी बहुद्देशीय रेल्वे तयार केली. यातून मुले मराठी, इंग्रजी महिन्यांची नावे सांगू लागली. सोबतच क्रमवाचक, मूल्यवाचक संख्यांचे गमतीदार खेळही ती खेळू लागली.
वाचनकुटी
मुलांना अवांतर वाचनाची सवय जडावी, यासाठी वाचनकुटी उभारली. दलदल असलेल्या या भागात ताईने मोठ्या हिमतीने वाचनकुटी उभारली. ज्यात मुले दुपारी पुस्तके घेऊन वाचत बसत व न समजलेल्या शब्दांचे अर्थ वा अडचणींची पूर्तता शिक्षकांकडून करून घेत असत. वाचनामुळे मुलं बहुश्रुत झाली.

धावा धावा डॉक्टरदादा
मुले म्हटली की खेळ, हे समीकरण जुळलेलेच. मुलांना शाळेत अभ्यासासोबतच खेळायला खूप आवडतं. मात्र मैदानावर खेळताना ती पडतात, मार लागतो आणि मुलं रडायला लागतात. यासाठी ताईने आणलेल्या प्रथमोपचाराच्या पेटीतील औषधे व अन्य काही साधने एका मुलाकडे देऊन त्याला डॉक्टर असे नाव दिले. कुणास मैदानावर खरचटले किंवा जखम झाली की, हा डॉक्टरदादा धावतच मुलांकडे जातो व योग्य तो प्रथमोपचार करतो. यामुळे मुलांत आपलेपणाची व एकोप्याची भावना तयार झाली.

दैनंदिनी शिकू या
मुलांनी आपण दररोज शाळेत काय करतोय, याची नोंद ठेवण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. यात दिवसभरातील चांगल्या-वाईट घटनांची नोंद करण्यासाठी एक डायरी करायला लावली. मुलांनी ती आनंदाने केली व यात दररोज आपणासोबतच काय काय घडतेय, याची नोंद घेणे सुरू केले. दररोज सायंकाळी ४.३० वाजता मुलांनी या डायरीत आपले मत नोंदवायचे. सुरुवातीला ती आपणासोबत झालेली भांडणे व वाईट अनुभवच नोंदवायची. मात्र हळूहळू ती विचार करू लागली व यातूनच ती सकारात्मक घडामोडींच्या नोंदी पण ठेवू लागली.

ओझ्याविना दप्तर
शाळेत येणारी बहुतांश मुले बांधकाम मजुरांची, झोपडपट्टी परिसरातील आहेत. ताईने स्वतः राजा नावाच्या ७५ लेखन पाटी खरेदी केल्या. सोबतच एका रॅकमध्ये प्रत्येक मुलासाठी फूटपट्ट्या, पेन्सिली, रंगीत स्केचपेन, स्पंजचे बॉक्स यासह लेखनविषयक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. यामुळे मुले दप्तरात कुठलेच ओझे आणत नाहीत. आनंदाने येतात व दररोज काहीतरी नवीन शिकतात. यालाच खरा ज्ञानरचनावाद म्हणतात आणि ताईने तो मुलामुलात भिनवलाय.

काम करण्यासाठी गावातील शिक्षणप्रेमी नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य खूप मदत करतात. ताईची खरी ऊर्जा म्हणजे पुणे येथे बीई करत असलेला एकुलता एक मुलगा सौरव व भाऊ, असे ती सांगते.
santoshmusle1515@gmail.com
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो....