आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाड्यांचा कायापालट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंगणवाड्यांमधल्या मुलांसाठी आकार या उपक्रमाखाली भाषा व गणित विषयांचा साचेबद्ध अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे, तो लवकरच सगळीकडे शिकवायला सुरुवात होईल. यानिमित्ताने यासंबंधीच्या काही प्रश्नांचा आढावा.
 
महाराष्ट्र शासनाने २५ जुलै २०१७ रोजी पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढला असून याअंतर्गत आता अंगणवाड्यांमधील ० ते ६ वयोगटातील मुलांसाठी ‘आकार’ या उपक्रमाखाली भाषा व गणित विषयाचा साचेबद्ध अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणात क्रांती करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल.
 
१९४० ते १९७५ पावेतो अंगणवाड्यांना सरकारी रूप आलेले नव्हते. त्यामुळे पाडे, वस्ती, गावे या ठिकाणी अंगणवाड्यांद्वारे उत्तम पद्धतीने काम सुरू होते. राज्यात अंगणवाड्यांना सरकारी रूप आल्यानंतर मात्र अंगणवाडीतील शिक्षण हा भागच गायब झाला. गावोगावीच्या अंगणवाड्यांमधून आजमितीस शासकीय विविध योजना अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांच्या माध्यमातून राबवणे हाच शासनाचा मुख्य कार्यक्रम झाला. यात आरोग्य विभागाशी निगडित गरोदर महिलांची तपासणी, लहान मुलांचे लसीकरण, किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक तपासणी व जनजागृतीविषयक कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे तसेच आदिवासी विभागांतर्गत येणारा कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पोषक आहाराची माहिती व पोषक आहार पुरवण्याकडे अधिक लक्ष पुरवावे लागते. महाराष्ट्रात लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात अंगणवाड्यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, ज्या उद्देशाने अंगणवाड्यांची, पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी सुरुवात करण्यासाठी झाली, त्यातील शिक्षण बाजूला पडत गेले. आणि केवळ योजनांची अंमलबजावणी हाच उद्देश साध्य झाला. २००० सालापासून खेडोपाडी पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या इंग्रजी शाळा सुरू झाल्या.
 
भारतीय राज्यघटनेने ३ ते ६ वयोगटातील मुलांनाही पूर्व प्राथमिक शिक्षणाचा हक्क दिलेला आहे. मात्र, आजपावेतो शिक्षण वगळता अंगणवाड्यंामध्ये बाकीचे उपक्रम राबवले जातात. महाराष्ट्रात शासकीय अंगणवाड्यांची सुरुवात झाली १९७५ मध्ये. ग्राममंगलने १९८२पासून अंगणवाड्यांसोबत काम करायला सुरुवात केली. पोषण, स्वच्छता,आरोग्य याविषयावर ग्राममंगलने खूप मोठ्या प्रमाणात काम केले. मात्र, २०१० मध्ये युनिसेफ व क्वेस्ट संस्थेच्या वतीने वाडा तालुक्यातील आदिवासी भागातील अंगणवाड्यात शिक्षणविषयक प्रशिक्षणाची सुरुवात केली. नंतर हाच उपक्रम २०१३ मध्ये राज्यातील ४८ तालुक्यांतील अंगणवाड्यांमध्ये राबवला गेला. विद्या प्राधिकरणाने तयार केलेल्या या अभ्यासक्रमात खरोखरच या बालकळ्यांना उमलण्यासाठी जे पोषक वातावरण लागते ते आटोकाट देण्याचा प्रयत्न यातून झाला.  आकार अभ्यासक्रमात लहानमोठा परिचय, पेक्षा जास्त पेक्षा कमी, सर्वात मोठा व सर्वात लहान, समूहाची तुलना करणारे विधान दिले असता प्रत्यक्ष समूह बनवता येणे, एक गुणधर्म वापरून वर्गीकरण करणे, वस्तूच्या आकाराप्रमाणे चढता-उतरता क्रम लावणे, एकास एक संगती, कलानुभव, तर काय होईल, शांतीचा खेळ, चित्र पट्ट्या वापरून पाहुणा ओळखा, वाचनाच्या दिशा समजणे डावीकडून-उजवीकडे, वरून खाली, दृक शब्द संपत्ती तयार करणे, वस्तू व नाव यांचा समन्वय, उच्चार व वाचनाची सांगड, चेतना व्यायाम, बोटाच्या स्नायूंचा विकास व हस्त नेत्र समन्वय, पाहुणा ओळखूया, जोड्या लावा, गोष्ट सांगणे, अनौपचारिक गप्पागोष्टी, शारीरिक खेळ, मुक्त खेळ या क्रियांचा समावेश करण्यात आलेला आहे.
 
आजघडीला अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्या व मदतनीस यांच्या शिक्षणाचा व प्रशिक्षणाचा प्रचंड प्रमाणात अभाव आहे. मोठमोठ्या शहरातील प्ले ग्रुप, नर्सरी, प्री प्रायमरी स्कूलमध्ये थोड्याफार प्रमाणात शिक्षण दिले जाते, मात्र ते १०० टक्के शास्त्रीय असते का, याचाही सर्वंकष विचार व्हायला हवा. याहूनही अत्यंत वाईट परिस्थिती अंगणवाड्यांमधील प्रशिक्षणाची आहे. अल्पशिक्षित, अल्पपगारी व सेवेत कायम नसतानाही या ठिकाणी या महिला शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करतात. बालमानसशास्त्राचा विचार करावयाचा झाल्यास पूर्व प्राथमिक शिक्षण देताना संबंधित शिकवणाऱ्यांचे बालमानशास्त्राचे शिक्षण किंवा प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. या शासन निर्णयाप्रमाणे सदर अभ्यासक्रम शिकवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना स्थानिक पातळीवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी मदत करावी. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी अंगणवाडी सेविकेला प्राथमिक शिक्षण स्तरावरील शैक्षणिक गरजा विचारात घेऊन मार्गदर्शन केल्यास हा अभ्यासक्रम यशस्वी होईल. तसेच आठवड्यातून किमान एकदा शाळेतील शिक्षकाने अंगणवाडीला भेट देऊन पूर्व बाल शिक्षण व संगोपन कामावर लक्ष केंद्रित करून अंगणवाडी सेविकेला मार्गदर्शन करावे, असे नमूद केलेले आहे. या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात. अगोदरच गुणवत्ता व लोकसहभाग या दुधारी कैचीत अडकलेल्या गुरुजनांवर हे काम सोपवणे कितपत योग्य आहे? केंद्र सरकारच्या अखत्यारीतील एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत चालणारी अंगणवाडीची पद्धत आहे. यात अंगणवाडी तपासणीसाठी पर्यवेक्षिका हे पद असता शालेय शिक्षण खातं शिक्षकांच्या मागे हे काम लावतेय.
 
बालमानसशास्त्रानुसार शून्य ते आठ वयोगटापर्यंत मुलांचा मेंदू आठ मिनिटेच एका जागी स्थिर राहू शकतो. या आठ मिनिटांत शक्य तेवढा पाठ्यांश मुलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिक्षकांवर येऊन ठेपलीय जी त्यांनी वेळोवेळी अंगणवाडी कार्यकर्तीस समजावून सांगावी. पण या शिक्षकांनी बालमानसशास्त्राचा अभ्यास केलाय का? त्यामुळे असे वाटते की, एकीकडे हा अभ्यासक्रम चांगला आहे, मात्र अंमलबजावणी करताना शासन निश्चितपणे चुकत आहे. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मुलाच्या मेंदूचा खरा विकास होत असतो. त्या वयात मुलाला आपण (आई-वडील, शिक्षक, समाज) काय देतोय, हे एकदा प्रत्येकानं स्वतःपुरतं तरी तपासून बघावं, असं वाटतं. युनिसेफच्या या रिपोर्टचा निष्कर्षही असाच आहे.
 
अहवालात नोंदवलेली निरीक्षणं :
१. ग्रामीण भागात ७०% मुलं वयाच्या चौथ्या वर्षी अंगणवाडी / बालवाडी / खासगी पूर्वप्राथमिक शाळांमधे दाखल झालेली दिसतात.
२. वयानुसार आखून दिलेला अभ्यासक्रम आणि मुलांची प्रत्यक्ष शिकण्याची क्षमता/प्रगती यांमधे तफावत दिसून येते. उदाहरणार्थ, काही ठिकाणी चार वर्षांची मुलं प्राथमिक शाळेत बसून पहिलीचा अभ्यासक्रम शिकतायत, तर सहा-सात वर्षांच्या मुलांवर पूर्व प्राथमिकमधे काम सुरू आहे. आपण समजतो तसा, वय आणि इयत्तांचा फारसा परस्परसंबंध प्रत्यक्षात दिसून येत नाही.
३. प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमानुसार, पाचसहा वर्षांच्या मुलाची भाषिक आणि सांख्यिक अनुभूती जेवढी अपेक्षित आहे, तेवढी सध्याच्या पूर्व प्राथमिक अभ्यासक्रमातून साध्य होत नाही. शाळेत गेल्यावर पहिल्या इयत्तेपासून पुढे ही दरी आणखी रुंदावत जाते.
(मुलं प्राथमिक शिक्षण सुरू करण्यासाठी तयार आहेत का हे तपासण्यासाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नांमधे, चार झाडांची चित्रं दाखवून सर्वांत जास्त/कमी फळं लागलेलं झाड ओळखणं, नळातून बादलीत पाणी भरताना चार चित्रं दाखवून रिकामी ते भरलेली बादली असा क्रम लावणं, वस्तूंची संख्या आणि अंक यांची जोडी लावणं, यांचा समावेश होता.)
४. शासकीय अंगणवाड्या आणि खासगी पूर्वप्राथमिक शाळा या दोन्हींमधे मुलांच्या वयानुरूप विकासासाठी आवश्यक वातावरणाचा आणि साधनांचा अभाव दिसतो. अंगणवाडीचा भर पोषक आहार आणि लहान मुलांसाठी पाळणाघर चालवण्यावर दिसतो. खासगी पूर्वप्राथमिक शाळा प्राथमिक शाळांचा जोड-उपक्रम म्हणून चालवल्या जातात, ज्यामधे वाचन-लेखन-गणित या औपचारिक शिक्षणावर जास्त भर दिलेला दिसतो.

निरीक्षणांवरून अहवालात केलेल्या धोरणात्मक सूचना:
१. सर्व मुलांना ठोस पायाभूत शिक्षण उपलब्ध होण्यासाठी पूर्वप्राथमिक/बालशिक्षणाला शिक्षण हक्क कायद्यात समाविष्ट करून घेणं. (सध्या ६ ते १४ वयोगटातल्या मुलांना, म्हणजे पहिलीच्या पुढं शिक्षण हक्क कायदा लागू होतो.)
२. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी पूर्वतयारी झाल्यावरच मुलांना प्राथमिक शाळेत प्रवेश देणं. (काही ठिकाणी सहा वर्षांखालील मुलांना पहिलीत प्रवेश दिलेला आढळला, त्यावरून ही सूचना आलेली दिसते. मुलांवर प्राथमिक शिक्षणाचा ताण पडू नये, असा हेतू यामागे आहे.)
३. प्राथमिक शिक्षणासाठी आवश्यक क्षमता मुलांमधे विकसित व्हाव्यात म्हणून सध्या वय वर्षे ‘पाच ते तीन’ अशा वयोगटासाठी अभ्यासक्रम ठरवला जातो. त्याऐवजी, जास्तीत जास्त खेळावर आधारित, संधी आणि अनुभवातून शिकता येईल असा, ‘तीन ते पाच’ वयोगटासाठी अभ्यासक्रम तयार करणं. त्या दृष्टीने शिक्षक प्रशिक्षणात बदल करणं. (मुलांना योग्य वयात योग्य शिक्षण मिळावं हा उद्देश आहे. पुढच्या इयत्तांसाठी त्यांना तयार करणं हाच उद्देश असेल तर वयानुरूप शिक्षण शक्य होत नाही.)
४. मुलांच्या महत्त्वाच्या वर्षांमधे त्यांना दिलं जाणारं शिक्षण आणि वातावरण यांच्या नियमनासाठी कार्यक्षम यंत्रणा / मानांकन पद्धत निश्चित करणं. अंगणवाडी, खासगी पूर्वप्राथमिक शाळा, स्वयंसेवी संस्थांचे अनौपचारिक वर्ग या सर्वांसोबत या यंत्रणेनं काम करणं आवश्यक.
५. मुलांच्या योग्य विकासासाठी बाल शिक्षण अभ्यासक्रम / पद्धत याबद्दल शिक्षक, पालक, आणि इतर घटकांशी संवाद साधून जागृती करणं. पूर्वप्राथमिक शिक्षणात सोप्या पद्धती व साधनांवर भर देऊन पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणं.

(लेखक प्रा.शा. गुंडेवाडी, पो. जामवाडी,ता.जि. जालना. येथे सहशिक्षक आहेत.)
 
 santoshmusle1515@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...