आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावाशी जोडलेली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोकणाचे नाव कानावर पडले की लगेचच समृद्ध सागरी किनारे, नारळांची उंचच उंच झाडे व घनदाट वनराईत दडलेल्या नागमोडी वळणांच्या वाटा नजरेसमोर येतात. अशाच कोकणात रायगड जिल्ह्यातील चित्रलेखा जाधव या कार्यतत्पर शिक्षिकेविषयी माहिती घेऊ या.
सांगली जिल्ह्यातील घोटीखुर्द, ता. खानापूर येथे चित्रलेखा मॅडमचा जन्म झाला. आईवडिलांनी पाचही मुलांना उत्तम प्रकारे शिक्षण देऊन आत्मनिर्भर केले. लहानपणापासूनच आपली वेगळी ओळख त्यांनी वेळोवेळी दाखवली. आताही शिक्षिका म्हणून काम करताना त्या आपले वेगळेपण जपताहेत. भाऊ, बहीण, पती रवींद्रनाथ जाधव, सासरची मंडळी यांच्या प्रोत्साहनामुळे शिक्षणात सातत्य ठेवत चित्रलेखा यांनी प्रगती केली. मुलगा उमेशही आईला वेळोवेळी सातत्याने बदलणाऱ्या नवनवीन गोष्टींची माहिती देत असतो.

मुंबई-गोवा हायवेवर रायगड जिल्ह्यातील गणपती मूर्तींसाठी जगभर प्रसिद्ध असणारे ठिकाण म्हणजे पेण. पेणपासून २० किमी आमटेम आगरी हे सात पाडे मिळून अडीच हजार
लोकसंख्येचे मोठे गाव. नावावरूनच येथे आगरी बांधवाची संख्या जास्त असेल, हे लक्षात येते. येथे ९०% मुले आगरी समाजातील आहेत. शेतकरी व कष्टकरी समाज, शेती, मासेमारी, मजुरी करणारे, नोकरदार आदींची तसेच आदिवासी मुलेही शाळेत येतात.

सुरुवातीला मॅडम या ठिकाणी रुजू झाल्या, तेव्हा भाषेची अडचण खूप मोठी होती. आगरी मुलांमध्ये बोलीभाषेमुळे खूप अडचण यायची. तसेच आदिवासी, कातकरी ठाकरी भाषा ही पण शिकण्यातली मोठी अडचण होती. मुलांना बोलीभाषेतून प्रमाण भाषेकडे नेण्यासाठी त्यांनी स्वतः या भाषा आत्मसात केल्या व नंतर मुलांना शिकविले. मुलांच्या भाषेचा स्वीकार त्यांनी केला व मुलांना व्यक्त होऊ दिलं. सततच्या सरावाने व मार्गदर्शनाने वैयक्तिक विविध सहशालेय उपक्रमांत सातत्याने मुलांना संधी देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव दिला. याचा फायदा असा झाला की, जिल्ह्यात या शाळेचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. नियमित लेखन, वाचन, सराव, पालकसंपर्क यामुळे येथील पट २३७ झाला असून ९ शिक्षक मोठ्या मेहनतीने या मुलांना घडविताना दिसतात.
उपक्रम
मैत्री इंग्रजीशी
इंग्रजी विषय सुरुवातीपासूनच मुलांना अवघड विषय वाटतो. कारण पहिलीपासून मुलांचे इंग्रजीचे मूलभूत संबोध मुलांना समजावून सांगण्यात शिक्षक कमी पडतात. मात्र मॅडमनी परिपाठापासून इंग्रजीची सुरुवात केली. परिपाठात सर्व सूचना इंग्रजीत द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला मुलं गोंधळायची; पण हळूहळू मुलं या सूचनांचं पालन करायला लागली. My blackboard my friend या अंतर्गत one sentence a day, इंग्रजी पाठ्यांशांचे नाट्यीकरण करणे व ते परिपाठात सादर करणे, सोबत इंग्रजी बातम्यांचे वाचन करणे सुरू ठेवले. यामुळे
आजमितीस मुलांच्या मनातून इंग्रजीची भीती त्यांनी दूर केली.
होईन मी स्वयंसिद्ध
मुलांना पहिलीपासूनच कामाची आवड लागावी व सोबतच पैशाची किंमत कळावी, यासाठी या उपक्रमाची अंमलबजावणी केली. यात मुलांकडून दसरा, दिवाळीला कागदी हार, पणत्या, विविधरंगी आकाश कंदिले तयार करून विकण्यासाठी ठेवतात. गावातील लोक मोठ्या आवडीने मुलांनी तयार केलेली ही साहित्ये खरेदी करतात. मुलांनादेखील या खरेदीतून थोडेफार पैसे मिळतात व यातूनच त्यांना स्वयंसिद्ध करण्याचा त्या प्रयत्न करताहेत.
गणित आणि माझे जीवन
गणित विषयाचा मानवी जीवनाशी खूप जवळचा संबंध आहे. दररोज आपण गणिती भाषेतच जास्तीत जास्त व्यक्त होत असतो. हा धागा पकडून मॅडमनी विविध प्रकारच्या गणिती पट्ट्या तयार केल्या. यात उलटसुलट अंकांची मांडणी करून मुलांचे अंकविषयक ज्ञान दृढ करण्याचा प्रयत्न केला. सोबतच अपूर्णांक, आलेख, परिमिती यांसह विविध भौमितीक आकार समजण्यासाठी यासंबंधीची परिसरातील विविध साधने जमा केली व यांच्या विविध आकृत्यासुद्धा काढून ठेवल्या. नोटा व नाणीविषयक घटक शिकविताना मुलांना खरेखुरे पैसे देऊन दुकानातून सामान खरेदी करून आणायला लावले. यामुळे हा घटक तर समजलाच, सोबतच खरेदी कशी करायची, हे पण त्यांना माहीत झाले. आजमितीस मुले गावातून जाताना दिसणाऱ्या विविध आकृत्यांचे भौमितीक घटकाशी संबंध जोडतात.
जीवनातील विज्ञान
विज्ञानातून मुलांना दररोजच्या घडामोडींतून वैज्ञानिक जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. यात अनौपचारिक घटकांवर गप्पा मारणे, विज्ञानातील छोट्या छोट्या घटकांवर चर्चा घडवून आणणे, तसेच मुलांना न समजलेल्या घटकाविषयी मार्गदर्शन असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. तसेच परिसरज्ञान व्हावे व पर्यावरण जाणीव जागृतीसाठी प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम समजावून सांगणे, मुलांच्या घरून रद्दी पेपर मागवून त्यापासून कागदी पिशव्या तयार करून घेणे व त्या मुलांना व पालकांना वापरायला लावतात. तसेच आठवडी बाजाराच्या दिवशी या कागदी पिशव्या प्रत्येक दुकानदारास मोफत वितरित करतात व यातूनच ग्राहकांना वस्तू द्याव्यात, अशी विनंती करतात. याचा परिणाम असा झाला की, लोकांनासुद्धा पर्यावरणाचे महत्त्व समजायला लागले.
माझा गाव आणि मी
खेडेगाव म्हटले की, तिथे एकमेकांशी आपुलकीची नाळ जुळलेली असते. ही अजून घट्ट व्हावी, यासाठी या उपक्रमाची सुरुवात मॅडमनी केली. यात स्वच्छता अभियानाविषयी जाणीव जागृती निर्माण करणे, तसेच पावसाळ्यात पसरणारे विविध साथीचे रोग व त्याचे प्रतिबंधात्मक उपायदेखील लोकांना समजावून सांगितले जातात. वृक्षदिंडी, पाणी जागर, जलदिंडीच्या माध्यमातून लोकांना या घटकांचे महत्त्व समजावून सांगितले जाते.
चिमणी वाचवा
मोबाइलच्या ध्वनिलहरींमुळे पक्ष्यांच्या जीवनावर, अधिवासावर गंभीर परिणाम झाले आहेत. यामुळे पक्ष्यांची संख्या घटत चालली आहे. मुलांमध्ये याविषयीची आपुलकी निर्माण करून उन्हाळ्यात पक्ष्यांना घरटे व पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी मुले रिकामी खोकी, कागदी काड्यांपासून घरटी तयार करतात व झाडांवर लटकवतात. गॅलरीत दाणे व पाणी दररोज ठेवतात. यामुळे उन्हाळ्यातही गावात पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येतो.
शाळा उभी करताना गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दररोजच्या अध्यापनातून मुलांना सतत नवीन काहीतरी देण्याचा ध्यास अंगी बाळगून मॅडम शाळेत येतात व मुलांना ते देतात. या सर्वात सर्व अधिकारी वर्ग, शाळा व्यवस्थापन सदस्य, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे, असे त्या सांगतात.
santoshmusle1515@gmail.com
बातम्या आणखी आहेत...