आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपस्तंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवसभर शाळेत मुलांना शिकवल्यानंतर रात्री पती- पत्नीने प्रौढ साक्षरता वर्गांतर्गत येथील लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. याचा परिणाम असा झाला की, पालकसंपर्क वाढला व यातूनच शाळा विकास साधता आला. महिला मेळावे, किशोरी मुलींसाठी व्यावसायिक प्रशिक्षणे, लोकप्रतिनिधींची प्रशिक्षणे घेऊन महिला सक्षमीकरणासोबतच राजकारणाचा शाळा विकासात सहभाग वाढविला.
नंदुरबार म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो राजाच्या कोपऱ्यातील सातपुडा पर्वत रांगा व नर्मदेच्या पात्राने वेढलेला एक आदिवासी जिल्हा.कुपोषणाने होणारे बालमृत्यू, शिक्षण देताना व घेताना येणाऱ्या अनंत अडचणी. मात्र आदिवासींची मुलं शिकून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सचोटीने काम करणारी शिक्षिका ते केंद्रप्रमुख असलेल्या ललिता भामरे पाटील म्हणजे दीपस्तंभच.
ललिताताईचा जन्म अंजने खुर्द, ता. शिंदखेडा, जि. धुळे येथे झाला. वडील शेतकरी तर आई गृहिणी.राबराब शेतात राबणारे वडील व त्यांना मदत करणारी आई. दोघांकडून काम करताना सचोटी, प्रामाणिकपणा हे गुण नकळतच आत्मसात झाले. आजही या गुणांमुळेच या पाड्या-वस्तीवरील गोरगरीब पण शिक्षणाप्रती सजग असलेल्या आदिवासी मुलांना शिक्षणाद्वारे जगाची कवाडे उघडी करण्यासाठी ताई प्रयत्नरत आहे.

नोकरीची सुरुवात १९८९मध्ये भडगाव, ता. साक्री या ५०० लोकवस्तीच्या गावातून केली. गाव कसले, छोटासा पाडाच हा. या ठिकाणी सहा वर्षे सेवा केली. नंतर १९९६मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातच काम केले. सोमावल बु ता. तळोदा येथे कार्यरत असताना दळणवळणाच्या सोयीअभावी गावातच राहावे लागे. आदिवासी पालकांत निरक्षरतेचे प्रमाण खूप होते. यांना शिक्षण दिले पाहिजे, या हेतूने ताई दिवसभर शाळेत मुलांना शिकवायची व रात्री पतीच्या साथीने प्रौढ साक्षरता वर्गांतर्गत येथील लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. याचा परिणाम असा झाला की, पालकसंपर्क वाढला व यातूनच शाळा विकास साधता आला. महिला मेळावे, किशोरी मुलींसाठी व्यावसायिक प्रशिक्षणे, लोकप्रतिनिधींची प्रशिक्षणे घेऊन महिला सक्षमीकरणासोबतच राजकारणाचा शाळा विकासात सहभाग वाढविला. येथेच असताना ताईंनी ‘वाचनदोरी’ हा उपक्रम राबविला. यात वर्गात एक दोरी बांधून यावर गोष्टी, कविता, चित्रांची पुस्तके लटकवली. दुपारच्या मधल्या सुट्टीत मुले आपापल्या आवडीनुसार या दोरीवरून पुस्तके घेऊन वाचायला लागली व यातून ती वाचती झाली.

ताई आज महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेलगत असलेल्या व नंदुरबार या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २० किमी अंतरावर असलेल्या पिंपळोद केंद्राची केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहे. ११ सरकारी व ४ खासगी शाळा असून सरकारी शाळेतील ३३ शिक्षक व ८१६ मुलांना जूनपासून ज्ञानरचनावादी पद्धतीने प्रगत करत आहे. यातील ढाकणपाडा, लोय, शेजवे, करंजवे या चार शाळा ‘अप्रगत विद्यार्थी’हीन झाल्यात.

उपक्रम :प्रवास सातपुडयाचा
नंदुरबार येथे राज्याच्या इतर भागातून नोकरीस लागलेल्या शिक्षकांसाठी भाषा ही खूप मोठी अडचण आहे कारण आदिवासींची बोलीभाषा वेगळी. त्यांना प्रमाणभाषेत संवाद साधलेला समजत नाही.एकदा शिक्षण सचिव नंदकुमार सर केंद्रातील शाळा पाहण्यासाठी आले. त्यांनी मुलांचे, शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. मुलांसाठी बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे जाण्यासाठी जिल्हाभरातील शिक्षकांना व गुरुजनांना मार्गदर्शक ठरेल अशी उपक्रम पुस्तिका काढ असे सांगितले आणि तीच ही ‘प्रवास सातपुड्याचा’ पुस्तिका.

यासाठी नंदुरबार येथील अधिव्याख्यात्या वनमाला पवार, गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील व ताई यांनी या उपक्रमाची आखणी केली. ताई जेव्हा सोमावल या गावात राहिली, तेव्हा तिथे तिने आदिवासी भिल भाषा शिकून घेतली. याचा फायदा इथे झाला. या उपक्रमाचे दोन भाग करण्यात आलेत.

पहिल्या भागात अभाषिक मुलांना आपलेसे करण्यासाठी बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे जाण्यासाठीचे उपक्रम आहेत. पहिलीच्या मुलांसाठी घरातील, परिसरातील वस्तूंची नावे, तसेच घरात नेहमी बोलले जाणारे शब्द दिलेले आहेत. यामध्ये मुले व शिक्षक सहभागी होत आहेत.

वाचन झोपडी
आदिवासी छोट्या पाड्यावरील मुलांना वाचनाची गोडी लागावी, म्हणून ताईने संपूर्ण केंद्रात वाचन झोपडी हा उपक्रम सुरू केला. यासाठी शाळेच्या एका कोपऱ्यात झोपडी तयार केलेली आहे. मुले दुपारच्या मधल्या सुट्टीत वाचनालयातून पुस्तके घेतात व तिथे जाऊन वाचत बसतात. मुलांना यातून नवीन आनंद मिळतोय. तसेच यात पहिलीची मुलेही चित्रांची पुस्तके वाचतात.

संध्याकाळच्या ग्रामसभा
शाळा म्हणजे समाजाने समाजासाठी सुरू केलेले संस्कारकेंद्र आहे. समाजाचा सक्रिय सहभाग जर शाळेत असेल तर मुलांची प्रगती नक्कीच होते. दिवसभर राब राब राबणारे लोक संध्याकाळच्या वेळी निवांत असतात. ही वेळ साधूनच गावोगावी संध्याकाळच्या ग्रामसभा आयोजित करणे सुरू केले. याला लोकांचा सहभाग चांगला मिळायला लागला. शिक्षणाप्रती सजग असलेल्या पालकांनी भरभरून सढळ हाताने शाळेसाठी मदत दिली. यातूनच
शिक्षकांचा आत्मविश्वास दुणावला व मुलेही शाळेत रमायला लागली.

चला शिक्षक जोडू या
आजमितीस आपणास सरकारी नोकरदारात, मग तो कुठल्याही विभागात असो, सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन गट दिसतात. ताईने सुरुवातीला सकारात्मक विचारांची शिक्षक मंडळी एकत्र आणली व यातून मुलांसाठी काहीतरी नवीन काम करू या, ही भावना रुजविणे सुरू केले. यासाठी केंद्रावर महिन्यातून एकदा इयत्तानिहाय वर्गशिक्षकांची बैठक बोलावून आपापसात आंतरक्रिया घडवून आणणे सुरू केले. काही ठिकाणी नवीन उपक्रमांद्वारे परिणामकारकपणे शिकविणे चालू आहे. अशा शिक्षकांना बोलावून त्यांनी अशा नवीन उपक्रमांची माहिती देऊन ते उपक्रम राबविणे सुरू केले. यामुळे सर्व शिक्षक आता कामाला लागलेत.

दिवाळीची मौज
दिवाळीची सुट्टी म्हटली की मुलांना खेळणे व सणाचा आनंद घेणे हे ठरलेले कार्यक्रम. पण या उपक्रमांतर्गत केंद्रातील सर्व शिक्षकांनी दिवाळीच्या सुट्टीत मुलांसाठी स्वाध्याय तयार केले व ते मुलांना दिले. मुलांनी सुट्टीत ते सोडविले. याचा फायदा असा झाला की, मुलं वाचन, लेखन यापासून दुरावली नाहीत. व शिक्षकांनादेखील दिवाळीनंतर अभ्यासक्रमाची उजळणी न करताच शिकविणे सोपे गेले.

सावित्रीच्या लेकी
सोशल मीडियाचा वापर शिक्षणात पाहिजे तसा आपणास करून घेता येतो. याचाच परिपाक म्हणून ताईने २६ शिक्षिकांचा एक गट तयार करून त्याद्वारे शैक्षणिक देवाणघेवाण व नवनिर्मिती करणे सुरू केले आहे. या कामासाठी मॅडमचे पती गोपाळराव पाटील, मुलगे राहुल व रोहन आणि मुलगी रेणुका नेहमी मदत करतात.
(santoshmusle1515@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...