आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतीय संवत्सरात 2011 व 2012 ही वर्षे बरी-वाईट अर्थात, इतिहासात नोंद करण्यासारखी ठरली, हे निश्चित. त्यातील एका वर्षात केंद्र व राज्य शासनात सुमारे शंभर कोटी ते हजारो- लाखो- कोटींच्या तथाकथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे महास्फोट झाले, तर दुस-या वर्षात दोन मोठी जनआंदोलने विशेषत्वाने गाजली. यातील एक म्हणजे, सेवाभावी अण्णा हजारेंचे मूलभूत बदल सुचवणारे जनआंदोलन; तर दुसरे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगगुरू रामदेव बाबा यांनी परदेशातील बँकांमध्ये ठेवलेला (बाबांच्या मते!) सुमारे चारशे लाख कोटी रुपये इतका काळा पैसा भारतात परत आणण्याकरता चालवलेले आंदोलन. प्रारंभीच्या काळात या दोन्ही ऐतिहासिक जनआंदोलनांना देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, महाविराट प्रतिसादाचे वारे या दोन्ही आंदोलन प्रमुखांच्या मेंदूत शिरले. परिणामी, ही दोन्ही आंदोलने साधारणत: 12-15 महिन्यांच्या कालावधीत हळूहळू ओहोटीला लागली. त्यांचा अस्तही स्पष्टपणे दिसू लागला.
आश्चर्याची बाब म्हणजे, यातील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनादरम्यान आक्रस्ताळा अवतार धारण करणारे रामदेवबाबा, त्यांचा सहकारी बाळकृष्ण आणि त्यांचा व्यावसायिक मित्रसमूह यांची भारतात अनेक ठिकाणी व परदेशातही हजारो कोटी रुपयांची मालमत्ता स्थावर व जंगम स्वरूपात आहे. परदेशात तर एक संपूर्ण बेटच रामदेवबाबा समूहाचे असल्याची वदंता आहे. बाबांनी आजवर जमवलेल्या एकूण मालमत्तेपैकी काही पतंजली ट्रस्टच्या, तर काही कंपन्यांच्या नावाने आहे. ही सर्व माया त्यांना योगविद्येच्या छायेनेच मिळवून दिली आहे.
तत्पूर्वी, रामदेवबाबांनी विविध शिबिरांच्या माध्यमातून केवळ भारतभर नव्हे, तर परदेशांतही योगविद्येचा प्रसार केला. हरिद्वार येथे शेकडो एकरांवर ट्रस्टमार्फत शेकडो कोटी रुपयांचे साम्राज्य स्थापित केले. आयुर्वेदीय नानाविध औषधांचे कारखाने उभारून त्याची वितरणप्रणाली संपूर्ण भारतात व परदेशातही उभी केली. आज या व्यावसायिक संस्था समूहाची एकूण आर्थिक उलाढाल हजारो कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. मात्र, त्यातील शेकडो कोटी रुपयांच्या औषधांचा व्यापार-व्यवहार संशयातीत नाही. इतकेच नव्हे, रामदेवबाबांच्या साम्राज्याच्या हजारो कोटींच्या उलाढालीतही शासकीय करप्रणाली तंतोतंत अमलात आणल्याची निश्चितता नाही. त्यातही या समूहाने मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी केल्याची वदंता आहे. हवालाचे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले आहेत.
एकीकडे व्यापार-व्यवहारात संशय असतानाच आयोजलेल्या योग शिबिरांमध्ये भाग घेऊ इच्छिणा-या प्रत्येक शिबिरार्थीकडून किमान रु. 500 ते कमाल 10-15 हजारांपर्यंतची रक्कम वसूल केली जाते. सदर वर्गणीचे दर हे आसन व्यवस्थेच्या श्रेणीनिहाय ठरतात. शिवाय स्थानिक शिबिर आयोजकांकडून वा त्या संघटनांकडून मोठ्या रकमेच्या देणग्या उकळल्या जातात. याचाच अर्थ, नानाविध योग शिबिरांमार्फत कोट्यवधी लोकांना रामदेवबाबांनी जरी घाऊक व्यापाराप्रमाणे आजवर योगविद्या शिकवली असेल, तरीही ती काही विनामूल्य (रामदेवबाबांच्या रामलीला मैदानावर झालेल्या आंदोलनादरम्यान सदैव सशुल्क असलेले योगशिबिर पूर्णत: मोफत केले गेले. महत्त्वाकांक्षेचा ज्वर चढलेल्या रामदेवबाबांच्या या आंदोलनात निवासाची, चहापाणी, नाष्टा व दोन्ही वेळच्या जेवणाची उत्तम मोफत व्यवस्था अगदी व-हाडाप्रमाणे होती. ही सर्व प्रलोभने असूनही उपस्थिती 10 हजारांच्या दरम्यानच होती. म्हणजेच, या उपस्थितांत आत्मीयता कमी होती आणि व्यवहार अधिक होता.) शिकवलेली नाही. त्याची पुरेपूर किंमत त्यांनी वसूल केलेली आहे. याशिवाय देशातील अनेक सेवाभावी, अनुभवी योगाचार्य व योगविशारदांच्या मते, रामदेवबाबा शिबिरात शिकवत असलेल्या योगविद्येच्या शास्त्रशुद्धतेबाबत फार मोठ्या शंका व विवाद आहेत, ते वेगळेच. सुरुवातीला जनआंदोलनात अण्णा रामदेवबाबांपेक्षा सरस ठरले होते; पण टीममधील काहींनी अण्णांचे अवमूल्यन केले. ही संधी साधून रामदेवबाबांनी धूर्तपणे अण्णा हजारेंचे भ्रष्टाचारविरोधी व जनलोकपाल आंदोलन चाणाक्षरीत्या हायजॅक केले. अतिशयोक्तीपूर्ण व अतिरंजित आकडेवा-या सांगून जनसामान्यांना भडकवले. उदा. 20 हजार लाख कोटी रुपयांची भूखनिज संपदा भारतात आहे. 400 लाख कोटी रकमेचा काळा पैसा परदेशात आहे. तो देशात आल्यानंतर 20 वर्षे देश करमुक्त होईल, 30 रु. लिटर पेट्रोल होईल इ. इ. जे साधूच्या भगव्या वस्त्राला निश्चितच शोभा देणारे नाही.
रामदेवबाबा जर प्रामाणिक देशभक्त असतील व भारताविषयीच्या त्यांच्या निष्ठा वादातीत असतील, तर फसवणुकीने पासपोर्ट व शिक्षणाच्या पदव्या मिळवल्यामुळे तुरुंगवासात गेलेले आर्थिक साम्राज्यातील मुख्य सहकारी बाळकृष्ण हे आरोपांतून संपूर्णत: दोषमुक्त होत नाहीत तोवर रामदेवबाबांनी त्यांना सर्व न्यासातून व कंपन्यांतून निलंबित का केले नाही? हा प्रश्नही विचारात घेण्यासारखा आहे. मात्र, तसे न करता रामलीला मैदानात सुरू झालेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी व्यासपीठाच्या पार्श्वभागी जे मोठमोठे फ्लेक्स बोर्ड लावले गेले, त्यावर महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, हुतात्मा चंद्रशेखर आझाद, शिवाजी महाराज या थोरामोठ्यांच्या जोडीला तुरुंगवासी बाळकृष्ण महाराजांचेही छायाचित्र होते. हे सर्व त्या वेळी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून भारतभर जनतेने पाहिले आहे. मग अशा वेळी महत्त्वाचा प्रश्न एकच उरतो की, राष्ट्रपिता, दिवंगत स्वातंत्र्यसैनिक व भारतभूमीकरिता आपल्या प्राणांची आहुती देणारे हुतात्मे यांची बाळकृष्ण यांचा समावेश असलेल्या फलकामुळे जी मानहानी झाली, राष्ट्रप्रेमी भारतीयांच्या अस्मितेला जबर धक्का बसला, असे कृत्य हा राष्ट्रदोह नाही का? परंतु या प्रकारामुळे निषेधाचा सूर उमटणार, हे ध्यानात येताच तासाभरात ते फलक हटवण्यात आले.
मात्र, रामदेवबाबांनी आपल्या भाषणात या राष्ट्रपुरुषांच्या झालेल्या अपमानाबद्दल साधा खेदही व्यक्त केला नाही की निषेध केला नाही. याला भावनाशील साधू म्हणावे काय? असो.
केंद्र सरकारने त्या आंदोलनाची यत्किंचितही दखल घेतली नाही. बाबांचा तिळपापड झाला. सरकारविषयी विरोध नसल्याचे सुरुवातीला सांगणारे योगगुरू बाबा शेवटी शेवटी सत्ताधारी पक्षावरच आग ओकू लागले. खरे तर आंदोलकांची बवाना येथे राजीव गांधी स्टेडियममध्ये अस्थायी जेल उभारून सोय केली असतानाही दरियागंज येथील आंबेडकर स्टेडियममध्येच उतरण्याचा बाबांनी हट्ट धरला. मात्र, तेथे व्यवस्था व नियोजन काहीही नव्हते. परंतु, तेथे गेल्यावर पोलिसांनी बाबा व त्यांच्या आंदोलनकर्त्यांना सोडून दिल्याचे वेळोवेळी लाऊडस्पीकरवरून जाहीर केले. बाबांनाही शांतता राखण्याची विनंती केली; पण बाबांनी हटवाद स्वीकारला व रात्रभर तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. ताब्यात घेतलेल्या लोकांना सोडून दिल्यानंतर विषय संपतो, पण बाबांनी पुन्हा सर्व आंदोलनकर्त्यांच्या जेवणाची व शौचालयाची व्यवस्था करण्याचा आग्रह प्रशासनाकडे धरला; जी कायद्यानेही शासनाची जबाबदारी नव्हती व नाही. पण पुन्हा बाबांनी हे शासन प्यायला पाणी देत नाही, जेवण देत नाही, व्यवस्था करत नाही, असा आक्रोश सुरू केला. भडकाऊ भाषणे दिली. देशाच्या स्वातंत्र्यदिनी कायदा व सुव्यवस्थेत बाधा आणण्याच्या उद्देशानेच जणू सावळागोंधळ घातला. शेवटी उपोषण सोडतानाही बाबांनी, ‘काँग्रेसची अंत्ययात्रा निघाली आहे’, ‘काँग्रेस मेली आहे’, ‘मृत्युशय्येवर आहे’, ‘काँग्रेसचे तेरावे आहे, चौदावे घालायचे आहे’ वगैरे अर्वाच्य भाषण केले. आणि मग टप्प्याटप्प्याने ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या उक्तीचा प्रत्यय येत गेला. वास्तविक भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत बहुतांश सर्वच राजकीय पक्ष न्हाऊन निघाले आहेत. पण, बाबांच्या आंदोलनाचे हसू व्हायला नको व त्यांच्या तथाकथित जनाधाराची कुमक आयती आपल्या झोळीत पडावी, या उद्देशाने भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, जेडीयूचे शरद यादव व राजकारणाच्या पटलावर सदासर्वकाळ विदूषकाची भूमिका वठवणारे सुब्रह्मण्यम स्वामी बाबांच्या मंचावर अवतरले आणि भाषण ठोकून त्यांनी लगेचच काढता पाय घेतला. अर्थात, याबाबत भाजपला दोष देता येणार नाही, कारण विरोधी पक्ष काँग्रेस असता तर त्यांनीही तोच डाव खेळला असता. इकडे मात्र बाबांचे हे आंदोलन ‘फसले’ या दूषणापासून कसेबसे बचावले. मात्र, बाबांची आंतरिक राजकीय भूमिका अधोरेखित झाली.
आंदोलनाचा अंक आटोपल्यानंतर रामदेवबाबा विविध पक्षांच्या खासदारांना, मंत्र्यांना व पक्ष संघटनेतील प्रमुखांना, संसद, विधानसभा व काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मुखियांना भेटले. परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याच्या व इतर बाबींच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याची पत्रे त्यांनी मीडियाच्या साक्षीने गोळा केली. ही तथाकथित समर्थनपत्रे म्हणजे बँकेचा डिमांड ड्राफ्ट नव्हता; तर बहुतांशी न वटणारे कागदी धनादेश होते, हेही रामदेवबाबांना न कळणे, हा दुर्दैवविलास आहे. वस्तुत: किसनराव (अण्णा) बाबूराव हजारे व योगगुरू रामदेवबाबा हे दोन्ही जनचेतना जागवणा-या आंदोलनाचे निर्माते. एकाच्या नावात कृष्ण आहे, तर दुस-याच्या नावात सत्यवचनी राम आहे. या दोन्ही आंदोलक नेतृत्वाने उभारलेली आंदोलने स्वकर्मांमुळे अखेरचे आचके देत आहेत, हे पाहताना दोन्ही देव स्वर्गातून अश्रू ढाळत असतील, हे मात्र निश्चित.
मधल्या काळात दूरदर्शनवरील हिंदी वृत्तवाहिनीवर रामदेवबाबांचे जीवनचरित्र दाखवण्यात आले. त्यात हरियाणा प्रांतातील रामदेवबाबांचा जन्म व गुरुकुलमधील शिक्षण याबाबतचा इतिहास सांगण्यात आला. त्यानुसार त्यांची घरची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. वयाच्या 15व्या वर्षापर्यंत तर त्यांची दोन वेळच्या पोटभर जेवणाचीही भ्रांत होती. अशा वेळी घरची पिढीजात आर्थिक संपदा नसताना, वडलोपार्जित शेती नसताना, कोणताही अधिकृत व्यवसाय-उद्योगधंदा नसताना केवळ योगविद्येच्या भांडवलावर अल्पावधीत देशात व परदेशातही हजारो कोटींची उलाढाल करण्याची किमया कशी केली, याचे ‘अर्थासन’ ‘सत्ता’साधनेत मग्न असलेल्या या संन्याशाने सामान्यजनांना शिकवले तर देश त्यांचा आजन्म ऋणी राहील, एवढे मात्र खरे!
bhavarilalmodi@gmail.com
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.